न्यायनिर्णय
द्वारा- सौ.माधुरी विश्वरुपे...................मा.सदस्या.
1. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून “ ज्वेलरी ब्लॉक इन्शुरन्स पॉलीसी” ता.01.07.03 पासुन सातत्याने घेत आहेत. सन-2006 मध्ये तक्रारदारांनी ता.26.06.2006 ते ता.25.06.2007 या कालावधीची रक्कम रु.7,00,000/- ची “ ज्वेलरी ब्लॉक इन्शुरन्स पॉलीसी” घेतली होती. सदर पॉलीसीचा प्रिमीयम रु.44,397/- चेकव्दारे सामनेवाले यांचेकडे भरणा केला.
2. तक्रारदार नियमितपणे व्यवसायाकरीता मुंबई येथुन सोने खरेदी करुन दागिने बनवतात व BIS Hallmarking Centre झवेरी बाजार मुंबई येथे हॉलमार्किंग करीता पाठवतात. त्यानंतर दागिने शोरुममध्ये विक्रीसाठी कल्याण येथे ठेवले जातात. तक्रारदारांनी ता.18.05.2007 रोजी 375.610 ग्रॅम सोन्याचे दागिने हॉलमार्कींगसाठी दिले होते. तक्रारदारांनी हॉलमार्किंग झालेले दागिने ता.19.05.2007 रोजी सेंटर मधुन घेतले, एका पॉकेटमध्ये 248.650 ग्रॅम वजनाच्या 45 सोन्याच्या अंगठया व दुस-या पॉकेटमध्ये 127.22 ग्रॅम वजनाचे चार नेकलेस चांगल्या रितीने पॅक केले व पॅटच्या खिशात ठेवले. तक्रारदार यांनी क्रॉफर्ड मार्केट कडून सीएसटी रेल्वेस्टेशन पर्यंत टॅक्सी केली व सीएसटी येथुन कल्याणला ट्रेनमध्ये आले. तक्रारदारांचे ज्वेलरी शॉप कल्याण स्टेशनपासुन जवळ असल्यामुळे स्टेशनपासुन दुकानात पायी चालत आले. तक्रारदारांनी दुकानात आल्यानंतर दागिन्याचे पॉकेट पाहिले असता एक पॉकेट ज्यामध्ये 45 सोन्याच्या अंगठया ठेवल्या होत्या ते सापडले नाही. सीएसटी पासुन कल्याणपर्यंत प्रवासामध्ये सदर पॉकेट कोणीतरी अज्ञात व्यक्तीने काढून घेतले. तक्रारदारांनी तात्काळ महात्माफुले पोलीस स्टेशन कल्याण येथे फीर्याद दिली. पोलीसांनी तक्रार क्रमांक-399/2007 ता.19.05.2007 रोजी सोने गहाळ झाल्याबाबत दाखल करुन घेतली. पोलीसांनी सोन्याच्या अंगठयांचा तपास केला व शेवटी ता.17.08.2007 रोजी केस बंद केली. तक्रारदारांनी सामनेवाले यांना सदर घटनेची माहिती पत्राव्दारे दिली. सामनेवाले यांचे सर्व्हेअर श्री.प्रकाश सुळे यांनी ता.22.05.2007 रोजी तक्रारदारांच्या दुकानाला भेट दिली. तक्रारदारांनी सर्व्हेअर यांना आवश्यक कागदपत्रे मागणीनुसार दिली. सर्व्हेअर यांनी ता.03.08.2007 रोजी अहवाल दिला. सामनेवाले यांनी सर्व्हेअर अहवालाची प्रत तक्रारदारांना दिली नाही. तक्रारदारांनी आरटीआय अॅक्ट अन्वये अर्ज करुन अहवालाची प्रत घेतली. सर्व्हेअर अहवालानुसार चोरी झालेलया सोन्याची किंमत रु.2,17,866/- ठरविण्यात आली. परंतु सामनेवाले यांनी सर्व्हेअर अहवालानुसार तक्रारदारांना रक्कम न देता ता.02.01.2008 रोजी विमा प्रस्ताव नामंजुर केला. अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
3. सामनेवाले यांचे म्हणण्यानुसार तक्रारदारांनी Transit करीता प्रिमियम दिलेला नाही तसेच पॉलीसीच्या नियमानुसार दागिने स्टील कपबोर्डमधील इनबिल्ट लॉकरमध्ये सुरक्षितरित्या ठेवले नाहीत. तक्रारदारांनी प्रवासात दागिन्याची काळजी घेतली नाही. तक्रारदारांनी दागिने गहाळ झाल्याची तक्रार दिली, चोरीची फीर्याद दिली नाही. मेसर्स हॉलमार्किंग यांचा परिसर तक्रारदारांच्या पॉलीसीमध्ये नमुद केला नाही. तक्रारदारांनी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता सामनेवाले तसेच सर्व्हेअर यांचेकडे केली नाही. सर्व्हेअर यांनी तक्रारदारांच्या विमा पॉलीसीची व इतर कागदपत्रांची पाहणी न करता अहवाल दिला आहे. त्यामुळे सामनेवाले यांना सदर अहवाल मान्य नाही. सामनेवाले यांनी पॉलीसीतील अटी व शर्तींनुसार नियमानुसार योग्यरितीने तक्रारदारांचा प्रस्ताव नामंजुर केला आहे.
4. तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, पुराव्याचे शपथपत्र, लेखी युक्तीवाद, सामनेवाले यांची कैफीयत, दाखल कागदपत्रे, पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तीवाद यांचे सखोल वाचन केले. तक्रारदार व सामनेवाले यांचे वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकला. यावरुन खालील प्रमाणे मुद्दे स्पष्ट होतात.
मुद्दे निष्कर्ष
अ. सामनेवाले यांनी अयोग्यरित्या तक्रारदारांचा विमा प्रस्ताव
नामंजुर करुन त्रुटीची सेवा दिल्याची बाब तक्रारदार यांनी
सिध्द केली आहे काय ?.....................................................................नाही.
ब. तक्रारदार दाद मिळण्यास पात्र आहेत काय ?.........................................नाही.
क.अंतिम आदेश ?.............................................................................निकालाप्रमाणे.
5.कारण मिमांसा
अ. तक्रारदारांची विमा पॉलीसी सामनेवाले यांना मान्य आहे. सदर घटना विमा कालावधीत झालेली असुन तक्रारदारांनी घटनेची फीर्याद ता.19.05.2007 रोजी म्हणजेच घटनेच्या दिवशीच 24 तासात दाखल केली आहे. महात्माफुले पोलीस स्टेशन कल्याण यांचेकडे प्रॉपर्टी मिसिंग रजि.नं.99/2007 ता.19.05.2007 रोजी दाखल असुन ता.20.05.2007 रोजी पोलीस स्टेशनने यासंदर्भातील रिपोर्ट दिला आहे. तक्रारदारांनी सदर घटनेची माहिती सामनेवाले यांना दिल्यानंतर ता.22.05.2007 रोजी सर्व्हेअर यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासणी केली. सर्व्हेअर यांनी ता03.08.2007 रोजीच्या अहवालानुसार नुकसानीची रक्कम रु.2,21,098/- ऐवढी निश्चित केली आहे. संबंधीत पोलीस स्टेशन यांनी ता.17.08.2007 रोजी दिलेल्या समजपत्रानुसार तक्रारदारांच्या सोन्याच्या वस्तुंचा तपास केला असता ते मिळून आले नाही, तसेच पुढे मिळून येईल असे वाटत नाही असे नमुद केलेले आहे. सर्व्हेअर रिपोर्ट श्री.प्रकाश सुळे यांनी ता.03.08.2007 रोजी दिलेला आहे. रिपोर्टचे अवलोकन केले असता तक्रारदारांची पॉलीसी Transit मध्ये रु.7,00,000/- ऐवढया रकमेच्या सोन्याच्या दागिन्यांची असल्याचे नमुद केले आहे. सर्व्हेअर यांनी तक्रारदार यांच्याकडून खालील कागदपत्रे घेतली.
(1) घटनेची माहिती दिलेल्या पत्राची प्रत.
(2) घटनेचा तपशील.
(3) नुकसानी बाबतचा तपशील.
(4) पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीची प्रत.
(5) हॉलमार्क एजन्सीच्या व्यवहारा संदर्भातील बील, दागिने दिल्याबद्दलची पावती, पैसे
दिल्याची पावती.
(6) सोने विकत घेतल्याची पावती.
(7) ता.19.05.2007 रोजी दागिने विक्री केल्याच्या पावत्या.
(8) स्टॉक स्टेटमेंट.
(9) खरेदी व विक्रीचा तपशील.
(10)क्लेम फॉर्म.
सर्व्हेअर यांनी वरील कागदपत्रांची तपासणी केली. त्याचप्रमाणे हॉलमार्क एजन्सीच्या बिलांवरुन 45 सोन्याच्या अंगठयांचे वजन 248.36 ग्रॅम निश्चित करुन सोने विकत घेतलेल्या किंमतीनुसार फक्त एकूण सोन्याची किंमत रु.2,17,866/- निश्चित केल्याचे अहवालानुसार दिसुन येते.
ब. तक्रारीतील कागदपत्रे पाहता सर्व्हेअर यांनी ता.03.08.2007 रोजीचा अहवाल दिल्यानंतर तक्रारदारांकडे ता.29.05.2007 रोजी व ता.17.11.2007 रोजी काही कागदपत्रांची
मागणी केल्याचे दिसुन येते. यावरुन सर्व्हेअर यांनी ता.03.08.2007 रोजी दिलेला अहवाल हा अंतिम अहवाल नव्हता, असे मंचाचे मत आहे. तक्रारदारांनी डिसेंबर-2007 मध्ये सदर कागदपत्रांची पुर्तता सामनेवाले यांचेकडे केली आहे. सर्व्हेअर यांच्या अहवाला नुसार सर्व्हेअर यांनी तक्रारदारांच्या पॉलीसीची प्रत विचारात घेतल्याचे दिसुन येत नाही. अहवालामध्ये पॉलीसीच्या अटी व शर्तींबाबत काहीच नमुद नाही. सर्व्हेअर यांनी ता.03.08.2007 रोजीच्या अहवालामध्ये फक्त तक्रारदारांच्या गहाळ झालेल्या सोन्याचे मुल्य निश्चित केले आहे. सामनेवाले यांनी ता.05.10.2007 व ता.10.10.2007 रोजीच्या पत्रामध्ये तक्रारदार रु.3,12,665/- ऐवढया किंमतीचे सोने घेऊन जात होते, असे नमुद केले आहे. तसेच ता.02.01.2008 रोजीच्या पत्रामध्ये तक्रारदार 375.610 ग्रॅम सोने पॉकेटमध्ये घेऊन जात असल्याचे नमुद आहे. सामनेवाले यांचे म्हणण्यानुसार तक्रारदारांच्या पॉलीसीमध्ये नमुद केल्याप्रमाणे Sec I & Sec II करीता प्रिमीयम भरणा केलेला आहे. तसेच Sec II मध्ये नमुद केल्याप्रमाणे तक्रारदारांनी रक्कम रुपये दोन लाखापेक्षा जास्त किंमतीची प्रॉपर्टी (सोने) स्टील कपाटातील इनबिल्ट लॉकरमध्ये ठेवणे बंधनकारक आहे असे नमुद केले आहे. तक्रारदारांच्या प्रपोजल फॉर्ममध्ये नमुद केलेल्या प्रिमायसेस म्हणजेच कल्याण येथील दुकानामध्ये ठेवलेलया सोन्याच्या दागिन्यां करीता सदर पॉलीसी घेतली होती. तक्रारदारांच्या प्रपोजल फॉर्ममध्ये हॉलमार्क एजन्सीचा पत्ता नमुद केलेला नाही. तसेच तक्रारदारांचे सोने हॉलकार्म एजन्सी ते तक्रारदारांचे कल्याण येथील शॉप दरम्यान प्रवासामध्ये गहाळ झाले आहे. तक्रारदारांनी हॉलमार्क एजन्सीचा प्रिमायसेस प्रपोजल फॉममध्ये नमुद केलेला नाही, त्यामुळे सदरील बाब पॉलीसीमध्ये कव्हर होत नाही. सामनेवाले यांनी तक्रारदारांच्या पॉलीसीतील अटी व शर्तींनुसार नियमानुसार, तक्रारदारांचा विमा प्रस्ताव योग्य रितीने योग्य कारणास्तव नामंजुर केला आहे. त्यामुळे मुद्दा क्रमांक-4 अ व ब चे उत्तर नकारार्थी देत आहोत. अशा परिस्थितीत सामनेवाले यांनी त्रुटीची सेवा दिल्याचे स्पष्ट होत नाही असे मंचाचे मत आहे.
वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक-193/2009 नामंजुर करण्यात येत आहे.
2. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
3. आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.
ता.11.02.2015