न्या य नि र्ण य
(दि.02-07-2024)
व्दाराः- मा. श्रीम. अमृता नि.भोसले, सदस्या.
1. प्रस्तुतचा तक्रार अर्ज सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा अपघात विमा दावा नाकारुन सेवेत त्रुटी केलेने दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथने थोडक्यात पुढील प्रमाणे-
तक्रारदार हे तक्रार अर्जातील नमुद पत्त्यावर कायमस्वरुपी राहत असून दि.27-01-2021 रोजी तक्रारदार व तिचे पती कै.राजेश महादेव धुमक आणि मुलगा साईश यांचेसोबत तक्रारदाराचा मुलगा कु.साईश हा आजारी असलेने त्याला दवाखान्यामध्ये दाखवून हिरोहोंडा कंपनीची स्पलेंडर मोटरसायकल क्र.MH-08-S-0159 या वाहनावरुन रत्नागिरीहून मुंबई–गोवा महामार्गावरुन झरेवाडी येथे स्वत:चे घरी जात असताना रात्री 8.30 वाजता हातखंबा पिरदर्गा येथे गोव्याच्या बाजूने मुंबईच्या दिेशेला भरधाव वेगाने येणा-या ट्रक नं.MH-42-T-1301 या वाहनाने ओव्हरटेक करत तक्रारदाराचे मोटरसायकलला जोरदार धडक दिली. सदर धडकेमुळे तक्रारदाराचे पती राजेश महादेव धुमक हे जागीच ठार झाले. तसेच तक्रारदार व तिचा मुलगा साईश हे गंभीर जखमी झाले. कु.साईश यास अपघातात मोठी दुखापत झाल्याने त्याला पुढील उपचारकरिता हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वीच मयत झाला. तक्रारदार हिस डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. तक्रारदार यांनी त्यांचे मोटर सायकलचा सामनेवाला विमा कंपनीकडे विमा हप्ता रक्क्म रु.1,211/-भरुन पर्सनल ॲक्सीडेंट क्लेम हा विमा उतरविलेला होता. या परिस्थितीत तक्रारदार हिने सामनेवाला विमा कंपनीकडे दि.29/12/2022 रोजी विमा रक्कम मागणीचा अर्ज भरुन दिला.परंतु विमा कंपनीने दि.22/06/2023 रोजी अपघाताचे वेळी मोटरसायकलवर तीन व्यक्ती स्वार होत्या असे कारण सांगून तक्रारदाराचा विमा दावा केवळ तांत्रिक कारणासाठी नाकारला. त्यामुळे प्रस्तुतचा तक्रार अर्ज मे. आयोगात दाखल करणे भाग पडले आहे. सबब तक्रारदारास विमा दाव्याची रक्क्म रु.15,00,000/- व त्यावर विमा दावा नाकारलेपासून संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.12 % दराने व्याज मिळावेत. तसेच मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासापोटी प्रत्येकी रक्क्म रु.25,000/- व तक्रारीचा खर्च रक्कम रु30.000/- अशी एकूण रक्कम रु.16,05,000/- सामनेवालाकडून मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर आयोगास केली आहे.
2. तक्रारदाराने त्याचे तक्रारीच्या पुष्टयर्थ नि.7 कडे एकूण 8 कागदपत्रे दाखल केली असून त्यामध्ये विमा पॉलिसी, सामनेवाला यांनी विमा दावा नाकारलेचे पत्र, तक्रारदाराने सामनेवालाकडे केलेला विमा दाव्याचा अर्ज, तक्रारदाराचे पती राजेश महादेव धुमक यांचा मृत्यू दाखला, तक्रारदाराचे मोटार सायकलचे आर.सी. बुक, तक्रारदाराचे पतीचे लायसन्स, तक्रारदाराचे व तिचे पतीचे आधार कार्ड, नि.17 कडे एकूण 7 कागदपत्रांच्या सत्यप्रती दाखल केल्या आहेत. त्यामध्ये तक्रारदाराचे पतीचा मृत्यू दाखला, आर.सी.बुक, लायसन्स, आधारकार्ड, तक्रारदाराचे आधारकार्ड,सनराईज हॉस्पिटल कोल्हापूर यांचे डिस्चार्ज कार्ड व सर्जरीचे हॉस्पिटलचे बील, इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच नि.18 कडे सरतपासाचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.19 कडे पुरावा संपलेची पुरसिस दाखल केली आहे. नि.23 कडे लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
3. सामनेवाला हे त्यांचे वकीलामार्फत हजर होऊन त्यांनी सदर कामी त्यांचे लेखी म्हणणे नि.12 कडे दाखल केले आहे. सामनेवाला यांनी तक्रारदाराची विमा पॉलिसी मान्य केली असून इतर मजकूर नाकारला आहे. विमा कायदयाप्रमाणे विमा दाव्याला कारण झालेपासून एक वर्षाच्या मुदतीत विमा दावा विमा कंपनीकडे विमाधारक अथवा त्यांचे वारसाने करणे आवश्यक आहे. परंतु तक्रारदाराने त्यांचे मोटारसायकलचा अपघात दि.27/01/2021 रोजी झाला असताना तक्रारदाराने दि.29/12/2022 रोजी म्हणजे अपघाताची माहिती सुमारे 22 महिन्याच्या दिर्घ कालावधीनंतर दिली आहे. विमा पॉलिसीप्रमाणे तक्रारदार यांने सर्व शर्ती व अटींचे पालन करणे कायदयाने बंधनकारक आहे. तक्रारदाराने त्यांचे तक्रारीमध्ये अपघाताचे वेळी विषयांकित मोटार सायकलवर मयत पती, मयत मुलगा साईश व तक्रारदार असे तिघेजण बसले होते व मयत राजेश हा मोटारसायकल चालवित होता व पाठिमागच्या सिटवर मयत साईश व तक्रारदार बसले होते. विम्याचा करार हा Insurance Act व Motor vehicles Act, 1988 चे तरतुदीनुसार करण्यात येतो. Motor vehicles Act च्या तरतुदींचा व त्यामधील कलम-128 चा विमाधारक राजेश धुमक यांनी स्वत:च भंग करुन मोटारसायकल चालवली होती. त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदाराचा विमा दावा योग्य कारणासाठीच नाकारला असलेने सामनेवाला यांनी कोणत्याही अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केलेला नाही. तसेच तक्रारीस मुदतीच्या कायदयाची बाधा येते. त्यामुळे तक्रारदार यांचा तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा अशी विनंती सामनेवाला यांनी केली आहे.
4. सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ नि.14सोबत तक्रारदाराची पॉलिसीची प्रत दाखल केली आहे.नि.20 कडे सरतपासाचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.21 कडे पुरावा संपलेची पुरसिस दाखल केली आहे. नि.22 कडे सरतपासाचे प्रतिज्ञापत्र हाच लेखी युक्तीवाद समजावा अशी पुरसिस दाखल केली आहे. नि.24 कडे वरिष्ठ न्यायालयाचे न्यायनिवाडे दाखल केले आहेत.
5. वर नमुद तक्रारदार यांचा तक्रार अर्ज व दाखल कागदपत्रे व लेखी युक्तीवाद, सामनेवाला यांचे म्हणणे, कागदपत्रे व उभयतांचा तोंडी युक्तीवाद यांचे बारकाईने अवलोकन करता सदर आयोगाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ खालील मुददे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व सामनेवाला हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | प्रस्तुत तक्रारीस मुदतीची बाधा येते काय? | नाही |
3 | सामनेवाला यांनी तक्रारदाराचा विमा दावा नाकारुन तक्रारदारास सदोष सेवा पुरविली आहे काय? | होय. |
4 | तक्रारदार हे सामनेवाला यांचेकडून विमा क्लेमची रक्कम व मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय? | होय. |
5 | अंतिम आदेश काय? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
-वि वे च न –
मुद्दा क्रमांकः 1 –
6. तक्रारदार यांनी नि.7/1 कडे सामनेवाला विमा कंपनीची पॉलिसी दाखल केली असून सदर पॉलिसीचे अवलोकन करता सदरची पॉलिसी तक्रारदाराचे पतीचे नांवे दिसून येते. तसेच पॉलिसीचा कालावधी दि.03/11/2020 ते 02/11/2021 असा दिसून येतो व Sum Insured Rs.15,00,000/- असलेचे दिसून येते. सदरची बाब सामनेवाला विमा कंपनीने त्यांचे लेखी म्हणणेमध्ये मान्य केलेली असून उभयतांमध्ये त्याबाबत कोणताही वाद नाही. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक असलेचे व सामनेवाला विमा कंपनी ही सेवापुरवठादार असलेची बाब निर्विवादपणे सुस्पष्ट होते. सबब तक्रारदार व सामनेवाला हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब मुद्रदा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्रमांकः 2 –
7. सामनेवाला यांनी नि.12 कडील त्यांचे लेखी म्हणणेमध्ये तक्रारदाराने सदरचा तक्रार अर्ज मुदतीमध्ये दाखल केलेला नाही असा आक्षेप नोंदविला आहे.तक्रारदाराने सामनेवाला कंपनीस अपघाताची माहिती उशिरा कळविली. त्यामुळे तक्रारदाराचा विमा दावा मुदतबाहय झाला आहे असे कथन केले आहे. प्रस्तुत तक्रारीचे अवलोकन केले असता, तक्रारदाराने नि.7/3 कडे सामनेवाला कंपनीकडे पर्सनल ॲक्सीडेंट इन्शुरन्स चा Death Claim भरुन दिलेला आहे. त्याची प्रत जोडली आहे व सदरचा क्लेम सामनेवाला विमा कंपनीने दि.22/06/2023 रोजी नाकारलेला आहे. तदनंतर प्रस्तुत तक्रार दि.29/08/2023 रोजी दाखल केली आहे. सदर तक्रारीस विमा कंपनीने तक्रारदाराचा क्लेम नाकारल्यापासून कारण घडले असल्यामुळे सदरची तक्रार ही मुदतीमध्ये आहे असे आयोगाचे मत आहे.
मुद्दा क्रमांकः 3 –
8. तक्रारदार तिचे पती कै.राजेश महादेव धुमक व मुलगा साईश यांचेसोबत तक्रारदाराचा मुलगा कु.साईश हा आजारी असलेने त्याला दवाखान्यामध्ये दाखवून हिरोहोंडा कंपनीची स्पलेंडर मोटरसायकल क्र.MH-08-S-0159 या वाहनावरुन रत्नागिरीहून मुंबई–गोवा महामार्गावरुन झरेवाडी येथे स्वत:चे घरी जात असताना रात्री 8.30 वाजता हातखंबा पिरदर्गा येथे गोव्याच्या बाजूने मुंबईच्या दिेशेला भरधाव वेगाने येणा-या ट्रक नं.MH-42-T-1301 या वाहनाने ओव्हरटेक करत तक्रारदाराचे मोटरसायकलला जोरदार धडक दिली. सदर धडकेमुळे तक्रारदाराचे पती राजेश महादेव धुमक हे जागीच ठार झाले. तसेच तक्रारदार व तिचा मुलगा साईश हे गंभीर जखमी झाले. कु.साईश यास अपघातात मोठी दुखापत झाल्याने त्याला पुढील उपचारकरिता हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वीच मयत झाला. तक्रारदार हिस डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. तक्रारदाराला सदर दुखापतीतून बरे होण्यास बराच कालावधी लागला त्यासाठी तक्रारदार यांनी नि.17/6 व नि.17/7 कडे सनराईज हॉस्पिटलचे डिस्चार्ज कार्ड व सर्जरीचे बील दाखल केलेले आहे. त्यामुळे तक्रारदार हिने सामनेवाला विमा कंपनीकडे दि.29/12/2022 रोजी विमा रक्कम मागणीचा अर्ज भरुन दिला. परंतु विमा कंपनीने दि.22/06/2023 रोजी अपघाताचे वेळी मोटरसायकलवर तीन व्यक्ती स्वार होत्या असे कारण सांगून तक्रारदाराचा विमा दावा नाकारला. सदरचे पत्र तक्रारदाराने नि.7/2 कडे दाखल आहे. तसेच तक्रारदाराचे पतीचा मृत्यू दाखला, मोटार सायकलचे रजिस्ट्रेशन सर्टीफिेट, ड्रायव्हींग लायसन्स नि.7/4 ते 7/6 कडे दाखल केले आहे. विमा दाव्यासाठी लागणारे सर्व कागदपत्रे तक्रारदाराकडे होती. तक्रारदाराने नि.7 चे कागदयादीने सामनेवाला विमा कंपनीकडून काढलेल्या विमा पॉलिसीची प्रत दाखल केली आहे. तसेच अ.नं.5 येथे मयताचे मोटार सायकलचे रजिस्ट्रेशनची प्रत दाखल केली आहे व नि.4 येथे मयताचे लायसन्स दाखल केले आहे. प्रस्तुत कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारदाराचे पती हे दि.27/01/2021 रोजी मयत झाले व त्यावेळी त्यांचेकडे सामनेवाला कंपनीची दि.03/11/2020तजे 02/11/2021 या कालावधीतील वैध विमा पॉलिसी होती व ते वाहनाचे मालक असून त्यांचेकडे वाहन चालविण्याचा परवाना होता. वरील सर्व बाबी सामनेवाला कंपनीने नि.12 कडील आपल्या कैफियतमधील पॅरा नं.10 मध्ये मान्य व कबूल केलेल्या आहेत. नि.14 वर सामनेवाला यांनी विमा पॉलिसी दाखल केली आहे. तक्रारदाराचे पतीचे विमा पॉलिसी ही ‘Personal Accident Cover’ या स्वरुपाची होती. सदर पॉलिसीमध्ये
- The owner-driver in the registered owner of the vehicle insured herein.
- The owner driver is the insured named in this policy.
- The owner-driver holds an effective license in accordance with the rule 3 of M.V.Rules, 1989 at the time of accident.
वरील सर्व अटींची पूर्तता विमाधारकाकडून झालेली आहे असे दिसून येत आहे.
9. सामनेवाला यांनी तक्रारदाराचा विमा दावा अपघातावेळी मोटारसायकलवर तीन व्यक्ती स्वार होत्या फक्त या कारणासाठी नाकारलेला आहे. त्यासाठी सामनेवाला यांनी खालील दोन वरिष्ठ न्यायालयाचे दोन न्यायनिवाडे दाखल केले आहेत.
- 2015 0 Supreme (Cal)755 - IN THE HIGH COURT OF CALCUTTA – Menoka Mondal V/s Oriental Insurance Co. Ltd- F.M.A. 3260 of 2013 & CAN 282 of 2015 Decided on 05-05-2015
- NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMSSION, NEW DELHI- Revision Petition No.1026 of 2017 L I C of India V/s Dolly Jose
सदरच्या दोन्ही न्यायनिवाडयामधील पहिल्या न्यायनिवाडयामध्ये मोटर सायकल चालवणा-याच्या चुकीमुळे अपघात झालेला असलेने व चालकाने Motor vehicles Act च्या तरतुदींमधील कलम-128 चा भंग केलेला असलेचे कथन केले आहे. तसेच दुस-या न्यायनिवाडयामध्ये मयताच्या शरिरात अल्कोहोल सापडल्याने विमा कंपनीने विमा दावा नाकारला आहे.
10. परंतु सदर प्रकरणात तक्रारदार व त्यांचे पती व त्यांचा 6 वर्षाचा छोटा मुलगा हे मोटारसायकलवरुन घरी जात असताना ट्रकने समोरुन धडक दिलेली आहे. त्यावेळी तक्रारदाराचे पती राजेश धुमक मोटारसायकल चालवत होते. सदर अपघात हा मोटारसायकल चालविणा-या विमाधारकाच्या चुकीमुळे किंवा मोटारसायकलवर तिघेजण स्वार असलेने झालेला आहे असे कुठेही नमुद नाही किंवा सामनेवाला यांनी तसा कोणताही कागदोपत्री पुरावा याकामी दाखल केलेला नाही. केवळ तीन व्यक्ती मोटारसायकलवर बसल्या हे अपघाताचे कारण होऊ शकत नाही. मयताचा मुलगा आजारी असलेने तो negligently driving करीत होता असे अनुमान काढता येत नाही. मयताचे वाहनास ट्रकने जोरदार धडक दिल्याने अपघात घडला त्यामुळे सामनेवाला कंपनी ही विमा रक्कम देण्याची जबाबदारी टाळू शकत नाही.
11. त्यासाठी मे. आयोग यांनी याकामी खालील न्यायनिवाडयातील मुद्दे विचारात घेत आहे.
- IN THE SUPREME COURT OF INDIA-CIVIL APPEAL NO. 79 OF 2020 – Mohammed Siddque & Anr. V/s National Insurance Company Ltd. & Ors. Decided on 08/01/2020
The fact that thedeceased was riding on a motor cycle along with the driver and another, may not, by itself, without anything more, make him guilty of contributory negligence. It is not the case of the insurer that the accident itself occurred as a result of three persons riding on a motorcycle. It is not even the case of the insurer that the accident would have been averted, if three persons were not riding onthe motor cycle. The fact that the motor cycle was hit by the car from behind, is admitted.
- IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT MADRAS- National Insurance Company Limited V/s P. Suresh & Ors. Decided on 19.09.2018
It is the contention of the learned counsel appearing for the claimant that triple driving though prohibited under the Motor Vehicles Act, would not lead to automatic conclusion that the driver concerned was negligent and it was the cause for accident; the legislature prohibits triple driving only in order to avoid accident taking place if negligence creeps in while driving; triple driving may lead to accident if sufficient care is not taken; if sufficient care is taken while driving, then, merely because it is a triple driving it cannot lead to accident and therefore, no negligence can be attributed to the driver of the vehicle, i.e. the claimant.
For a man who suffered amputation up to hip level and who suffered loss of expectant child and loss of his wife, for no fault of him, no law could say that he is not entitled to compensation. When the loss caused to the claimant is unbearable and irreparable, it is the duty of the State to compensate him, especially, when there is omission to ensure right to life. So far as this case is concerned, apart from the evidence of the claimant/injured, there is no other evidence indicating that there could be any negligence on the part of the claimant/injured also. In the absence of any evidence showing that triple riding was the cause for accident, then, it cannot be contented that triple riding alone would amount to negligence. As rightly pointed out, triple riding may be an offence under the statute, but, so far as civil liability is concerned, apart from triple riding evidence showing that the way in which triple riding was negligent must be available. In the absence of such evidence, the contention that triple riding alone is the cause for accident cannot be accepted.
सदर न्यायनिवाडयाचा विचार करता सामनेवाला यांनी तक्रारदाराचा विमा दावा नाकारुन तक्रारदारास दयावयाचे सेवेत त्रुटी ठेवलेचे स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदार सामनेवाला विमा कंपनीकडून विमा रक्कम व मानसिक, शारिरीक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. त्यामुळे मुद्दा क्र.3 चे उत्तर या आयोगाने होकारार्थी दिले आहे.
12 सबब तक्रारदार सामनेवाला विमा कंपनीकडून विमा दाव्यापोटी पॉलिसीची Sum Insured रक्कम रु.15,00,000/- मिळणेस पात्र आहेत. तसेच सामनेवाला विमा कंपनीने विमा दाव्याची रक्कम न दिल्यामुळे तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब मुद्दा क्र.4 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्रमांकः 5 –
13. सबब, वरील सर्व विवेचनांचा विचार करता प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदार यांना विमा दाव्याची रक्कम रु.15,00,000/- (रुपये पंधरा लाख फक्त) अदा करावेत. सदर रक्कमेवर तक्रार दाखल तारखेपासून संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.9 % दराने व्याज अदा करावे.
3) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- (रुपये दहा हजार फक्त) व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त) अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता सामनेवाला क्र.1 यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत सामनेवाला यांनी आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींअन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.