संयुक्त निकालपत्र :- (दि.04.08.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुत ग्राहक तक्रार केस नं.421/07, 422/07 व 166/08 या तिन्ही तक्रारींच्या विषयांमध्ये साम्य आहे. तसेच, सामनेवाला हे देखील एकच असल्याने हे मंच तिन्ही प्रकरणांमध्ये एकत्रित निकाल पारीत करीत आहे. (2) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (3) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदार यांचा शहर कोल्हापूर येथील सि.स.नं.796/ग, डी वॉर्ड, बाजार गेट, कोल्हापूर येथे विजय स्टेशनर्स नांवाचा व्यवसाय असून ते सदर व्यवसायाचे मालक व प्रोप्रायटर आहेत. सदर व्यवसायासाठी तक्रारदारांनी सामनेवाला क्र.2 बँकेकडून कॅश क्रेडिट कर्ज रक्कम रुपये 20,00,000/- सन 2005 साली काढले होते. तसेच, तक्रारदारांच्या व्यवसायाच्या ठिकाणी सन 2005 ते 2006 या कालावधीमध्ये रक्कम रुपये 39,00,000/- चा माल होता. उपरोक्त मिळकत ही दोन मजली इमारत व तिस-या मजल्यावरील शेडसह तक्रारदारांच्या आई-वडिलांनी एकत्र कुटुंबाच्या उत्पन्नातून दि.17.10.2003 रोजी रुपये 6,10,000/- इतक्या मोबदल्यात खरेदी केली. सदर इमारतीच्या नुतनीकरणासाठी तक्रारदारांनी रुपये 6,50,000/- खर्च केला. (4) ग्राहक तक्रार केस नं.421/07 व 422/07 मध्ये तक्रारदार पुढे सांगतात, सामनेवाला बँकेकडून कर्ज काढलेने उपरोक्त उल्लेख केलेल्या मिळकतीमधील इमारतीचा विमा रक्कम रुपये 12,78,000/- सामनेवाला न्यु इंडिया अॅश्युरन्स कंपनीकडे उतरविला होता. त्याचा पॉलीसी क्र.151201/11/06/11/00009414 असा असून पॉलीसीचा कालावधी दि.19.07.2006 ते दि.10.07.2007 असा होता. तसेच, मिळकतीमधील मालाच्या चोरीची पॉलीसी सामनेवाला बँकेने सामनेवाला न्यु इंडिया अॅश्युरन्स कंपनीकडून रक्कम रुपये 35,10,000/- घेतलेली होती, त्याचा पॉलीसी क्र.151201/46/06/0000092 असा असून कालावधी दि.07.07.2006 ते दि.06.07.2007 असा होता. सदर दोन्ही पॉलीसींचा प्रिमियम रक्कम रुपये 15,544/- खर्ची टाकलेले आहेत. (5) तक्रारदार पुढे सांगतात, तक्रारदारांच्या दुकानास दि.15.10.2006 रोजी आग लागली. सदर आगीमध्ये संपूर्ण इमारत व त्यामधील संपूण माल नष्ट झालेला आहे. सदर आग विझविणेचे काम तीन दिवस चालले होते. त्याचा फायर ब्रिगेडचा खर्च रक्कम रुपये 26,400/- इतका झालेला आहे. सामनेवाला, न्यु इंडिया अॅश्युरन्स कंपनीकडे क्लेमची मागणी केली असता चौकशीअंती सामनेवाला बँकेने मालाची पॉलीसी फक्त चोरीबद्दलच घेतली असल्याचे तक्रारदारांना समजून आले. त्यामुळे तक्रारदारांना सामनेवाला न्यु इंडिया अॅश्युरन्स कंपनीने नुकसान भरपाई दिलेली नाही. सबब, ग्राहक तक्रार केस नं.421/07 यामध्ये तक्रारदारांनी सामनेवाला बँक व न्यु इंडिया अॅश्युरन्स कंपनी यांनी मालाची नुकसानी रुपये 18,50,000/-, नोटीस खर्च रुपये 10,000/-, आग विझविणेचा खर्च रुपये 26,400/-, मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/- इत्यादीची मागणी केली आहे. तसेच, ग्राहक तक्रार केस नं.422/07 यामध्ये मालाची नुकसानीबाबत रुपये 12,78,000/-, मानसिक त्रासापोटी रुपये 1 लाखाची मागणी केली आहे. (6) ग्राहक तक्रार केस नं.166/08 यामध्ये तक्रारदारांनी उपरोक्त उल्लेख केलेल्या मिळकतीमध्ये असलेल्या व्यवसायासाठी सामनेवाला, युनायटेड इंडिया इन्श्युरन्स कंपनी यांचेकडे स्टॉक, फर्निचर व इमारतीचा विमा उतरविलेला आहे. यामध्ये इमारतीचा रुपये 3,50,000/-, तसेच स्टॉकचा रक्कम रुपये 23,00,000/- व फर्निचरचा रुपये 1,70,000/- चा विमा उतरविला होता. त्याचा पॉलीसी नं.160500/48/05/3400002780 व कालावधी दि.20.01.2006 ते दि.19.01.2007 असा होता. (7) प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार पुढे सांगतात, उपरोक्त उल्लेख केलेप्रमाणे दि.15.10.2006 रोजी आग लागली व इमारत व फर्निचरचे 100 टक्के नुकसान झाले. याबाबत सामनेवाला विमा कंपनीकडे पॉलीसीप्रमाणे रुपये 28,20,000/- ची क्लेमची मागणी केली असता सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना रुपये 21,30,000/- इतकी रक्कम मंजूर करुन सुभद्रा लोकल एरिया बँक, कोल्हापूर शाखा या तक्रारदारांच्या कर्ज खात्यावर दि.15.11.2007 रोजी चेक जमा केला. कर्जाची रककम वाढू नये यासाठी तक्रारदारांनी सदरचा चेक स्विकारला व लगेच दि.10.12.2007 रोजी नुकसानीपोटी रक्कम मान्य नाही असे विमा कंपनीला पत्राने कळविले. सबब, उर्वरित क्लेमची रक्कम रुपये 6,80,000/- द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह देणेचा आदेश व्हावा व दि.15.10.2006 ते दि.15.11.2007 पर्यन्त रक्कम रुपये 21,30,000/- वर द.सा.द.शे.18 टक्के व्याजा द्यावा, मानसिक त्रासापोटी रुपये 15,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 2,000/- देणेबाबत आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (8) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत पॉलीसी नं. 151201/46/06/0000092 व 151201/11/06/11/00009414 व नं.160500/48/05/3400002780, सामनेवाला क्र.1 व 2 यांना पाठविलेल्या नोटीसेस, सामनेवाला क्र.2 यांचे उत्तर, पोलीसांनी केलेला पंचनामा, जबाब व वर्दीची प्रत, तसेच सामनेवाला बँकेतील खातेउतारा, युनायटेड इंडियाकडील पॉलीसी, नफा-तोटा पत्रक, ऑडिट रिपोर्टस् व वार्णिक खाते, सामनेवाला क्र.2 यांना पाठविलेली नोटीस, युनायटेड इंडिया इन्श्युरन्स कंपनीने केलेला खुलासा, नगर भूमापन अधिकारी यांचे पत्र, संस्था नोंदणी दाखला, पुढारी अंक, हायपोथिकेशन अॅग्रीमेंट इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (9) ग्राहक तक्रार क्र.421 व 422/07 यामध्ये सामनेवाला, दि न्यु इंडिया अॅश्युरन्स कंपनीने त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. तसेच, तक्रारदारांनी मागणी केलेली नुकसान भरपाई नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, सदर कंपनीने तक्रारदारांच्या पॉलीसीच्या कागदपत्रांची छाननी करुन तक्रारदारांचा क्लेम नाकारली आहे, त्यामध्ये सामनेवाला यांची सेवात्रुटी नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह फेटाळणेत यावी अशी विनंती केली आहे. (10) तसेच, सामनेवाला, आय.डी.बी.आय.बँकेने त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, प्रस्तुत तक्रारदार व सामनेवाला यांच्यामध्ये ग्राहक हे नाते निर्माण होत नाही. सामनेवाला बँकेच्या सेवेत कोणतीही सेवात्रुटी झालेली नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह फेटाळणेत यावी व त्रासापोटी रुपये 10,000/- देणेचे आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (11) सामनेवाला क्र.2 आय.डी.बी.आय.बँकेने त्यांच्या म्हणण्यासोबत पॉलीसी इन्डॉर्स केलेबाबत सामनेवाला क्र.1 यांचे पत्र, तक्रारदारांनी खाते बंद करणेबाबत दिलेला अर्ज इत्यादीच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. (12) ग्राहक तक्रार केस नं.166/08 यामध्ये सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, सर्व्हेअर यांची नेमणुक केली आहे. सदर सर्व्हेअर यांनी सूंपर्क सर्व्हे करुन रक्कम रुपये 21,30,000/- निश्चित केली आहे. सदर सर्व्हेअर व इतर कागदपत्रांच छाननी करुन सदर रक्कम तक्रारदारांना दिलेली आहे. तक्रारदारांनी अंतिम परिपूर्ती म्हणून सदरची रक्कम स्विकृत केलेली आहे. सामनेवाला यांची सेवेत त्रुटी झालेली नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह फेटाळणेत यावी. (13) ग्राहक तक्रार केस नं.166/08 यामध्ये सामनेवाला विमा कंपनीने त्यांच्या म्हणण्याच्या पुष्टर्थ सर्व्हे रिपोर्ट व अंतिम परिपुर्तीचे व्हौचर दाखल केले आहे. (14) या मंचाने दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद सविस्तर व विस्तृतपणे ऐकलेला आहे. तसेच, उपलब्ध कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन केले आहे. तक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे तक्रारदारांचा विजय स्टेशनर्स या नांवाने व्यवसाय आहे. सदर व्यवसाचे ठिकाणी, दि.15.10;2006 रोजी आग लागून इमारत पोष्टाचे नुकसान झाले व त्याच्या भरपाईबाबत उपरोक्त तिन्ही तक्रारी दाखल केलेल्या आहेत. ग्राहक तक्रार केस नं.421 व 422/07 यामध्ये सामनेवाला बँकेकडुन तक्रारदारांनी कर्ज घेतलेने दि न्यु इंडिया अॅश्युरन्स कंपनीची सामतनेवाला बँकेने पॉलीसी घेतलेली आहे. परंतु, सदरची पॉलीसी ही आगीबाबतची न घेता चोरीबाबतची पॉलीसी घेतली आहे. त्यामुळे आगीबाबत झालेल्या नुकसानीची मागणी तक्रारदारांनी केलेली आहेत. गुणवत्तेचा विचार करता बँका या कर्ज देत असताना कर्जाच्या सुरक्षिततेपोटी पॉलीसी उतरवित असतात. परंतु, बँकांची सदरची कृती ही बँकांवर बंधनकारक नसून मार्गदर्शक स्वरुपाची आहे. वास्तविक पहाता, बँकेने पॉलीसी उतरविलेनंतर सदरची बाब तक्रारदारांना माहिती आहे. त्योवळेस सदर पॉलीसीबाबत तक्रारदारांनी हरकत नोंदविलेली नाही व पश्चात बुध्दीने आगीच्या पॉलीसी ऐवजी चोरीची पॉलीसी उतरविलेली आहे, याबाबतची तक्रारदारांनी केलेली मागणी ही पश्चतबुध्दीची आहे. इत्यादीचा विचार करता ग्राहक तक्रार केस नं.421 व 422/07 या तक्रारींमध्ये कोणतीही गुणवत्ता या मंचास दिसून येत नाही. (15) ग्राहक तक्रार केस नं.166/08 यामध्ये सामनेवाला युनायटेड इंडिया इन्श्युरन्स कंपनीने दि.15.10.2006 रोजीच्या आग होवून झालेल्या नुकसानीबाबत त्यांचेकडे क्लेमची मागणी केलेनंतर स्वतंत्रपणे सर्व्हेअर यांची नेमणुक करुन नुकसानीबाबतचा अहवाल सर्व्हेअर यांचेकडून घेतलेला आहे. सदर सर्व्हेअर यांच्या अहवालानुसार रक्कम रुपये 21,30,000/- इतक्या रक्कमेची नुकसानी निश्चित करुन सदर रक्कमेचा चेक दि.15.11.2007 रोजी तक्रारदारांच्या कर्जखात्यावर जमा केला आहे. तक्रारदारांची कर्ज देणारी बँक व तक्रारदार यांनी अंतिम परिपूर्ती म्हणून सामनेवाला विमा कंपनी व्हौचर दिले आहे. सदरच्या व्हौचरचे अवलोकन या मंचाने केले आहे. सदर व्हौचरवर हक्क राखून (under protest) म्हणून रक्कम स्विकारलेली नाही. सदर व्हौचरवर हरकत नोद केलेली नाही. संपूर्ण वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारदारांनी सदरचे अंतिम परिपूर्ती म्हणून दिलेले व्हौचर हे कोणताही दबाब अथवा फ्रॉड अगर तत्सम कोणत्याही गोष्टीच्या दबावाखाली न येता दिलेल्या आहेत. केवळ तक्रारदारांनी व्याजाची रक्कम वाढते म्हणून रक्कम स्विकारली एवढेच त्यांच्या तक्रारीत नमूद केले आहे. परंतु, तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीमध्ये सामनेवाला विमा कंपनीने दि.15.11.2007 रोजी तक्रारदारांच्या क्लेम रक्कमेचा चेक बँकेत जमा केलेला आहे. त्यानंतर दि.10.12.2007 रोजी सामनेवाला बँकेला दिलेली नुकसान भरपाई मान्य नाही असे कळविले आहे. सदरची बाब ही पश्चात बुध्दीने केलेली आहे. इत्यादी संपूर्ण विवेचनाचा विचार करता तक्रारदारांनी अंतिम परिपुर्ती म्हणून तक्रारदारांनी रक्कम स्विकारली आहे. सबब, तक्रारदारांना नंतर नुकसान भरपाईची मागणी विमा कंपनीकडे करता येणार नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (16) उपरोक्त संपूर्ण विवेचन विचारात घेता ग्राहक तक्रार क्र.166/08 मध्ये तक्रारदारांनी दाखल केलेले I (2008) CPJ 267 (NC), 2006 ACJ 2547, III (2009) CPJ 194 (NC), III (2009) CPJ 234 (NC), 1998 CCJ 210 व II (2009) CPJ 278 हे पूर्वाधार प्रस्तुत तक्रारीस लागू नाहीत असे या मंचाचे मत झाले आहे. सबब, हे मंच खालीलप्रमाणे एकत्रित आदेश पारीत करीत आहे. आदेश 1. तक्रारदारांच्या उपरोक्त तिन्ही तक्रारी फेटाळणेत येतात. 2. खर्चाबाबत आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |