निकालपत्र
(दि.08.07.2015)
(घोषीत द्वारा- मा.सौ. स्मिता बी.कुलकर्णी,अध्यक्ष)
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेविरुध्द सेवेत त्रुटीच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. अर्जदार हा व्यवसायाने ऑटो चालक असून त्याचेकडे स्वतःचे मालकीचा ऑटो क्रमांक एमएच 26/आर2267 हा आहे. सदर ऑटो अर्जदार स्वतः चालवित होता. दिनांक 21.09.2013 रोजी अर्जदार स्वतः उमरखेडवरुन तिवडी येथे ऑटो चालवित असतांना रात्री 7.30 च्या दरम्यान आकाश ढाब्याजवळ एक ट्रक एमएच-15/बी.जी.3452 उभा होता. सदर ट्रक अंधारामुळे चालक गजाननला दिसून न आल्यामुळे व वेळेवर ब्रेक न लागल्यामुळे अपघात वाचविण्याच्या प्रयत्नात तोल जाऊन सदर ऑटो रोडाच्या खाली पलटी झाला. अर्जदारास गंभीर स्वरुपाचा मार लागून कायमचे अपंगत्व आले आहे. अर्जदारास मार लागल्याने त्याने उमरखेड येथील दवाखान्यात उपचार घेतलेला आहे. त्यानंतर नांदेड येथे ग्लोबल सुपर स्पेशालीटी हॉस्पीटल येथे उपचार घेतला. सदर अपघातामध्ये अर्जदाराचे उजव्या पायास गंभीर मार लागून फ्रॅक्चर झालेले आहे. तसेच उजव्या डोळयास,छातीस व कमरेस गंभीर स्वरुपाचा मार लागून त्याला कायम स्वरुपाचे अपंगत्व आलेले आहे. अर्जदारास वैद्यकीय उपचारासाठी आजपर्यंत रु.1,50,000/- खर्च आलेला आहे. अर्जदार हा घरातील कर्ता व्यक्ती असून सर्व कुटूंब त्याचेवर अवलंबून आहे. अपघतात कायम स्वरुपाचे अपंगत्व आल्यामुळे अर्जदारास कोणत्याही प्रकारचा कामधंदा करता येत नाही व ऑटो चालविता येत नाही. अर्जदाराने यवतमाळ येथील गैरअर्जदार यांचे कार्यालयात विमा पॉलिसी घेतलेली आहे त्यामध्ये ड्रायव्हर व मालक यांची पॉलिसी दिली आहे. सदर पॉलिसीचा कालावधी हा दिनांक 02.07.2013 ते 01.07.2014 असा आहे. अर्जदाराने गैरअर्जदार यांच्या यवतमाळ व नांदेड येथील दोन्ही कार्यालयात अपघाताची कागदपत्रे दोन्ही विमा कंपनीच्या व्यवस्थापकास दिलेली आहे व त्यांचेकडे रक्कम रु.2,00,000/- ची मागणी केलेली आहे. परंतु गैरअर्जदार यांनी अर्जदारास कोणत्याही प्रकारची रक्कम दिलेली नाही. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना दिनांक 19.11.2014 रोजी नोटीस पाठवून वरील रक्कम देणेबाबत विनंती केली. परंतु अर्जदाराची विनंती गैरअर्जदार यांनी फेटाळून लावलेली आहे. गैरअर्जदार यांनी नियमांचे उल्लंघन केलेले असून सेवेमध्ये त्रुटी ठेवलेली आहे. गैरअर्जदार यांनी त्यांचे कर्तव्यामध्ये निष्काळजीपणा दाखविलेला आहे. त्यामुळे अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमध्ये अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून विम्याची रक्कम रु.2,00,000/- कायम स्वरुपी अपंगत्व आल्याबाबत द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह अर्जदारास देण्याचा आदेश करावा. तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- इत्यादी रक्कमेची मागणी गैरअर्जदार यांचेकडून तक्रारीव्दारे केलेली आहे.
3. गैरअर्जदार यांना नोटीस तामील झाल्यानंतर गैरअर्जदार यांनी लेखी जबाब दाखल केलेला आहे.
गैरअर्जदार यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
4. अर्जदाराने त्याचा ऑटो क्रमांक एमएच 26/आर2267 चा विमा पॉलिसी गैरअर्जदार यांचे शाखा कार्यालय यवतमाळ या कार्यालयातून उतरविलेली आहे. तक्रार अर्जात अर्जदार यांनी सदर शाखेस गैरअर्जदार म्हणून नाव प्रविष्ट केले नाही. त्यामुळे अर्जदाराचा अर्ज टिकण्याजोगा नाही. कथीत अपघात उमरखेड जिल्हा यवतमाळ च्या हद्यीत घडलेला आहे. अर्जदार हा तिवडी तालुका उमरखेड जिलहा यवतमाळ येथील रहिवासी असून त्यांना दि.न्यु इंडिया एश्योरंस कंपनी लि. शाखा यवतमाळ यांचे कार्यालयातून विमा उतरविलेला आहे. त्यामुळे प्रस्तुत तक्रार मा. न्यायमंच यवतमाळ यांचे कार्यक्षेत्रातील आहे. नांदेड न्यायमंच यांना सदरील तक्रार दाखल करुन घेणे,चालविणे व न्यायनिवाडा करण्याचा अधिकार पोहोचत नाही. अर्जदाराने त्यांचे मालकीचा ऑटोचा विमा गैरअर्जदार कंपनीच्या यवतमाळ शाखेत उतरविलेला असून त्यांनी “compulsory PA premium for owner cum driver” भरलेला नाही. म्हणून अर्जदारास नुकसान भरपाई मागणेचा अधिकार पोहोचत नाही. “compulsory PA premium for owner cum driver” या क्लॉज प्रमाणे नुकसान भरपाई मागणी करावयाची असेल तर एक्ट्रा प्रिमियम भरणा आवश्यक आहे. अर्जदाराने विमा पॉलिसी घेतांना एक्ट्रा प्रिमियम भरलेला नाही. अर्जदाराने विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार अपंगत्व आल्यानंतर नुकसान भरपाईचा अर्ज दि.न्यु इंडिया एश्योरंस कंपनी लि. यवतमाळ कडे सादर केला नाही. तसेच गैरअर्जदार यांना एक्ट्रा प्रिमियम न दिल्यामुळे नुकसान भरपाईची जबाबदारी गैरअर्जदार यांची नाही. वरील बाबींचा बारकाईने विचार केल्यास अर्जदाराने त्याचे नुकसान भरपाईचा मागणीचा दावा सिध्द केलेला नाही. सदरील दावा हा खोटा व चुकीचा,निराधार आहे. त्यामुळे अर्जदाराचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा अशी विनंती गैरअर्जदार यांनी आपल्या लेखी जबाबाव्दारे केलेली आहे.
5. अर्जदार व गैरअर्जदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकला. दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
6. अर्जदार यांनी गैरअर्जदार दि.न्यु इंडिया एश्योरंस कंपनी लि. यांचे यवतमाळ शाखेतून पॉलिसी घेतलेली असल्याचे दाखल पॉलिसीवरुन दिसून येते. अर्जदार यांनी दाखल केलेल्या पोलीस पेपर्सवरुन अर्जदाराचे ऑटोचा अपघात हा यवतमाळ जिल्हयाच्या हद्यीत घडलेला असल्याचे दिसते. अर्जदार हा राहणार तिवडी तालुका उमरखेड,जिल्हा यवतमाळ येथील रहिवासी आहे. गैरअर्जदार यांनी तक्रारीमध्ये नांदेड न्यायमंचास तक्रार चालविण्याचा वरील सर्व कारणामुळे अधिकार नाही असा आक्षेप घेतलेला आहे. परंतु गैरअर्जदार यांचे विभागीय कार्यालय नांदेड येथे असल्याने गैरअर्जदार याचे वरील म्हणणे मंच ग्राह्य धरु शकत नाही. अर्जदार यांनी अपघात झाल्यानंतर पॉलिसीनुसार अर्जदारास कायम स्वरुपी अपंगत्व आलेले असल्यामुळे विमा रक्कम मिळणेसाठी गैरअर्जदार यांचेकडे अर्ज केलेला असल्याचे कागदपत्रांवरुन दिसून येत नाही. अर्जदाराने दिनांक 19.11.2014 रोजी गैरअर्जदार यांना कायदेशीर नोटीस पाठविलेली आहे. तक्रारीसोबत अर्जदाराने सर्व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. गैरअर्जदार यांनी आपल्या लेखी जबाबामधील परिच्छेद क्रमांक 8मध्ये विमा रक्कम मिळणेसाठी नुकसान भरपाई मागणेचा अर्ज गैरअर्जदार यांचेकडे सादर केलेला नाही असे कथन केलेले आहे. अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे विमा रक्कम मिळणेसाठी कागदपत्रांसह अर्ज दाखल केलेला होता असा पुरावा दिलेला नाही. परंतु तक्रारीसोबत अर्जदाराने कागदपत्रे दाखल केलेली आहे. अर्जदाराने तक्रारीसोबत दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांवरुन गैरअर्जदार यांनी निर्णय घेणे क्रमप्राप्त होते. परंतु गैरअर्जदार यांनी तसे केल्याचे दिसून येत नाही. म्हणून मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार विमा कंपनी यांनी अर्जदाराने तक्रारीसोबत दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन अर्जदाराचा अर्जावर आदेश तारखेपासून 15 दिवसाच्या आत गुणवत्तेवर निर्णय घ्यावा.
3. खर्चाबाबत आदेश नाही.
4. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.