आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. एम. जी. चिलबुले
तक्रारकर्तीचा शेतकरी जनता अपघात विमा योजनेची नुकसानभरपाई मिळण्याबाबतचा विमा दावा विरूध्द पक्षाने नामंजूर केल्यामुळे तक्रारकर्तीने सदरहू प्रकरण दाखल केले आहे. तक्रारकर्तीच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ती शशीकलाबाई हिचे पती श्री. श्रावण काशिराम सहारे हे व्यवसायाने शेतकरी होते व त्यांच्या मालकीची मौजा खमारी, तालुका व जिल्हा गोंदीया येथे गट क्रमांक 969 ही शेतजमीन होती.
3. महाराष्ट्र शासनाने विरूध्द पक्ष न्यू इंडिया ऍश्युरन्स कंपनी यांच्याकडे राज्यातील शेतक-यांचा शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत विमा काढला होता.
4. तक्रारकर्तीचे पती श्रावण काशिराम सहारे दिनांक 12/11/2011 रोजी शेतामध्ये काम करीत असतांना अचानक बेहोश होऊन खाली पडले. त्यांना ताबडतोब घरी आणले असता शौचास जातांना पुन्हा अचानक बेहोश होऊन खाली पडले आणि मृत्यु पावले.
5. तक्रारकर्तीचे पती हे त्यांच्या मृत्युपूर्वी सुदृढ होते व त्यांना कोणताही आजार नव्हता. सदर घटनेचा रिपोर्ट पोलीस स्टेशन, गोंदीया (ग्रामीण) येथे देण्यात आला आणि पोलीसांनी दिनांक 13/11/2011 रोजी मर्ग क्रमांक 20/11 दाखल केला. तक्रारकर्तीचे मयत पती श्रावण सहारे यांचे के. टी. एस. रूग्णालय, गोंदीया येथे शव विच्छेदन करण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी त्यांचा मृत्यु हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचे प्रमाणित केले.
6. तक्रारकर्तीने तिच्या पतीच्या अपघाती मृत्युबाबत शेतकरी जनता अपघात विमा पॉलीसीप्रमाणे विम्याची रक्कम रू. 1,00,000/- मिळावी म्हणून रितसर मार्गाने विरूध्द पक्षाकडे विमा दावा दाखल केला. परंतु विरूध्द पक्षाने दिनांक 21/08/2012 रोजीच्या पत्राप्रमाणे शव विच्छेदन अहवालात श्रावण सहारे यांचा मृत्यु Heart Attack ने झाल्याचे नमूद केले असल्याने सदरचा मृत्यु हा नैसर्गिक मृत्यु असून अपघाती मृत्यु नाही व म्हणून विमा दावा नामंजूर करण्यात येत असल्याचे कळविले. विरूध्द पक्षाची सदरची कृती ही सेवेतील न्यूनता व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब आहे म्हणून तक्रारकर्तीने सदर तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केलेली आहे.
1. तक्रारकतीचे पती श्रावण सहारे यांच्या शेतकरी जनता अपघात विमा दाव्याची रक्कम रू. 1,00,000/- द. सा. द. शे. 12% व्याजासह मिळावी.
2. सेवेतील न्यूनतेबाबत रू. 20,000/- मिळावे.
3. शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल नुकसानभरपाई रू. 10,000/- आणि तक्रारीचा खर्च रू. 5,000/- मिळावा.
7. तक्रारीचे पुष्ठ्यर्थ तक्रारकर्तीने विरूध्द पक्षाने दावा खारीज केल्याबाबतचे पत्र, वारसानांचे नाव चढविण्याबाबतचा अर्ज, 7/12 चा उतारा, मर्ग सूचना, मरणान्वेषण प्रतिवृत्त, घटनास्थळ पंचनामा, पोस्ट-मार्टेम रिपोर्ट, मृत्यु प्रमाणपत्र, तक्रारकर्तीचे आधार कार्ड, दारिद्र्य रेषेखालील नोंदणी प्रमाणपत्र व शिधापत्रिकेची प्रत इत्यादी दस्तावेज दाखल केले आहेत.
8. विरूध्द पक्ष विमा कंपनीने लेखी जबाब दाखल करून तक्रारीस सक्त विरोध केला आहे. तक्रारकर्तीचे पती श्रावण काशिराम सहारे हे महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी जनता अपघात विमा योजनेचे लाभार्थी होते हे नाकबूल केले आहे. तसेच तक्रारकर्तीच्या पतीचा दिनांक 12/11/2011 रोजी अपघाती मृत्यु झाल्याचे देखील नाकबूल केले आहे. त्यांचे म्हणणे असे की, तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु Heart Attack ने झाला असून सदरचा मृत्यु हा नैसर्गिक असून अपघाती मृत्यु नाही म्हणून तक्रारकर्ती शेतकरी जनता अपघाता विमा योजनेअंतर्गत विमा लाभ मिळण्यास पात्र नाही. सदर कारणाने विरूध्द पक्षाने तक्रारकर्तीचा विमा दावा दिनांक 21/08/2012 रोजी नामंजूर केला असून विरूध्द पक्षाची सदर कृती ही पॉलीसीच्या अटी व शर्तीप्रमाणे योग्य असल्याने त्याद्वारे सेवेत न्यूनता किंवा अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब झालेला नाही.
9. तक्रारकर्ती व विरूध्द पक्ष यांच्या परस्पर विरोधी कथनांवरून तक्रारीच्या निर्णितीसाठी खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष व कारणमिमांसा खालीलप्रमाणेः-
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | विरूध्द पक्ष यांनी सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला आहे काय? | होय |
2. | तक्रारकर्ती मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय? | अंशतः |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | अंतिम आदेशाप्रमाणे |
- कारणमिमांसा –
9. मुद्दा क्रमांक 1 बाबतः- सदरच्या प्रकरणात तक्रारकर्तीचे पती श्री. श्रावण सहारे यांच्या नावाने असलेली शेत जमीन भूमापन क्रमांक 969 क्षेत्रफळ 0.22 हेक्टर मौजा खमारी, तालुका व जिल्हा गोंदीया संबंधाने फेरफार घेण्याबाबत दिलेल्या अर्जाची प्रत दस्त क्रमांक 2 वर दाखल केली आहे. सदर अर्जावरून फेरफार क्रमांक 839, दिनांक 09/02/2012 रोजी वरील शेत जमिनीसंबंधाने श्रावण सहारे यांच्या मृत्युमुळे त्यांचे वारस तक्रारकर्ती शशीकला आणि मुलगा महेश तसेच मुली रचना, अर्चना व अंजना यांची नांवे 7/12 मध्ये घेण्यात आली आहेत. सदरचा 7/12 चा उतारा तक्रारकर्तीने दस्त क्रमांक 3 वर दाखल केला आहे. तक्रारकर्तीचे पती श्रावण सहारे यांचा अपघाती मृत्यु झाल्याबाबत पोलीस स्टेशन, गोंदीया (ग्रामीण) येथे मर्ग क्रमांक 20/2011 दाखल करण्यात आला होता त्याची प्रत दस्त क्रमांक 4 वर दाखल आहे. तसेच मरणन्वेषण प्रतिवृत्त आणि घटनास्थळ पंचनामा अनुक्रमे दस्त क्रमांक 5 व 6 वर दाखल आहेत. घटनास्थळ पंचनाम्यामध्ये नमूद आहे की, मयत श्रावण सहारे सायंकाळी 4.00 वाजताचे दरम्यान संडाससाठी गेले असता संडास झाल्यावर उठतांना चक्कर आल्याने बेशुध्द होऊन खाली पडले व औषधोपचाराकरिता के. टी. एस. रूग्णालय, गोंदीया येथे भरती केले असता औषधोपचार घेतांना मरण पावले. श्री. श्रावण सहारे यांचे शव विच्छेदन के. टी. एस. रूग्णालय, गोंदीया येथे करण्यात आले. त्याचा अहवाल दस्त क्रमांक 7 वर आहे. त्यात मृत्युचे कारण हार्ट अटॅक असे नमूद केले आहे.
वरील पुराव्यावरून तक्रारकर्तीचे पती हे शेतकरी होते व महाराष्ट्र शासनाने त्यांचा शेतकरी जनता अपघात विमा काढला होता तसेच दिनांक 12/11/2011 रोजी ते शेतात काम करीत असतांना चक्कर येऊन पडल्यावर त्यांना घरी आणण्यात आले तेव्हा शौचास गेले असता पुन्हा चक्कर येऊन पडले आणि के. टी. एस. रूग्णालयात उपचाराकरिता नेले असता हार्ट अटॅक ने मरण पावल्याचे स्पष्ट होते.
तक्रारकर्तीने विरूध्द पक्षाकडे शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत तिच्या पतीच्या मृत्युबाबत रू. 1,00,000/- विमा लाभ मिळावा म्हणून अर्ज सादर केला होता. तो विरूध्द पक्षाने त्यांच्या दिनांक 21/08/2012 च्या पत्रान्वये शव विच्छेदन अहवालाप्रमाणे मृत्युचे कारण Heart Attack असून सदर कारणाने झालेला मृत्यु नैसर्गिक मृत्यु असून अपघाती मृत्यु नाही असे कारण देऊन तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केला आहे. विमा दावा नामंजूरीचे सदरचे पत्र तक्रारकर्तीने दस्त क्रमांक 1 वर दाखल केले आहे.
10. तक्रारकर्तीचे अधिवक्ता श्री. गजभिये यांनी आपल्या युक्तिवादात सांगितले की, मयत श्रावण सहारे हे प्रकृतीने सुदृढ होते. त्यांना पूर्वीपासून हृदयविकार नव्हता केवळ घटनेच्या दिवशीच दिनांक 12/11/2011 रोजी एकाएकी हार्ट अटॅक येऊन त्यांचा मृत्यु झाला असल्याने सदरचा मृत्यु अपघाती स्वरूपाचा असल्याने तक्रारकर्ती तिच्या पतीच्या अपघाती मृत्युबाबत शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत रू. 1,00,000/- विमा दावा मिळण्यास पात्र आहे. असे असतांनाही सदरचा मृत्यु अपघाती मृत्यु नाही असे कारण देऊन तक्रारकर्तीचा वाजवी विमा दावा नामंजूर करण्याची विरूध्द पक्षाची कृती ही सेवेतील न्यूनता व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब आहे.
11. याउलट विरूध्द पक्षाच्या अधिवक्ता श्रीमती इंदिरा बघेले यांनी आपल्या युक्तिवादात सांगितले की, के. टी. एस. रूग्णालय, गोंदीया येथे करण्यात आलेल्या शव विच्छेदन अहवालाप्रमाणे तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा Heart Attack ने म्हणजे आजारामुळे झालेला असून तो नैसर्गिक मृत्यु आहे. Heart Attack ने झालेला मृत्यु हा अपघाताने झालेला मृत्यु नाही म्हणून तक्रारकर्ती शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत विमा लाभ मिळण्यास पात्र नाही. त्यामुळे वरील कारणाने दस्त क्रमांक 1 प्रमाणे तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर करण्याची विरूध्द पक्षाची कृती ही विमा योजनेच्या अटी व शर्तीस अनुसरून असल्याने त्याद्वारे सेवेत कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार किंवा अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब झालेला नाही.
12. उभय पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद विचारात घेता वादाचा मुद्दा फक्त हृदयविकाराच्या झटक्याने झालेला श्रावण सहारे यांचा मृत्यु हा अपघाती
मृत्यु आहे काय? एवढाच आहे.
सदरच्या प्रकरणातील वस्तुस्थिती लक्षात घेता तक्रारकर्तीचे पती श्रावण सहारे हे घटनेच्या वेळी अंदाजे 44 वर्षाचे सुदृढ शेतकरी होते. ते शेतात काम करीत असतांना त्यांना अचानक चक्कर आली म्हणून घरी आणले असता शौचास गेले आणि पुन्हा चक्कर येऊन खाली पडले. के. टी. एस. रूग्णालयामध्ये त्यांना उपचाराकरिता नेले असता त्यांचा हृदयविकाराने मृत्यु झाला. श्रावण सहारे हे पूर्वीपासून हृदयविकाराने ग्रस्त होते असे विरूध्द पक्षाचे म्हणणे नाही किंवा तसा कोणताही पुरावा अभिलेखावर नाही. त्यामुळे तक्रारकर्तीचे पती श्रावण सहारे यांचा मृत्यु दिनांक 12/11/2011 रोजी अचानक आलेल्या Heart Attack ने झालेला आहे. अशा प्रकारे अचानक आलेल्या अटॅकने झालेला मृत्यु हा अपघाती मृत्यु ठरतो व अपघात विमा योजनेअंतर्गत विमा लाभ देण्यास विमा कंपनी जबाबदार ठरते असा निर्णय माननीय पाटणा उच्च न्यायालयाने खालील प्रकरणात दिलेला आहे.
1) Kamlawati Devi vs State of Bihar and Ors. on 1 July, 2002 Equivalent citations: 2002 (2) BLJR 1522.
2) The Branch Manager, United India…. vs The State of Bihar And Ors. on 16 April, 2003
Equivalent citations: 2004 ACJ 744, 2003 (2) BLJR 1117.
माननीय पाटणा उच्च न्यायालयाच्या वरील निर्णयाप्रमाणे अचानक उद्भवलेल्या Heart Attack ने झालेला मृत्यु हा अपघाती मृत्यु ठरत असल्याने तक्रारकर्तीच्या पतीचा हार्ट अटॅकने झालेला मृत्यु हा अपघाताने झालेला मृत्यु नसून नैसर्गिक मृत्यु आहे असे कारण देऊन तक्रारकर्तीचा वाजवी विमा दावा नाकारण्याची विरूध्द पक्षाची कृती निश्चितच सेवेतील न्यूनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब आहे. करिता मुद्दा क्रमांक 1 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविलेला आहे.
13. मुद्दा क्रमांक 2 व 3 बाबतः- सदरच्या प्रकरणात तक्रारकर्तीचे पती श्रावण सहारे हे महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत विमित शेतकरी होते म्हणून त्यांच्या अपघाती मृत्युमुळे रू. 1,00,000/- विमा दाव्याची रक्कम मिळण्यास तक्रारकर्ती पात्र आहे. याशिवाय विरूध्द पक्षाने दिनांक 21/08/2012 रोजी विमा दावा नामंजूर केल्याच्या तारखेपासून विमा दाव्याची रक्कम प्रत्यक्ष अदा करेपर्यंत सदर रकमेवर द. सा. द. शे. 9% दराने व्याज मिळण्यास देखील तक्रारकर्ती पात्र आहे. तसेच शारीरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसानभरपाई रू. 10,000/- आणि तक्रारीचा खर्च रू. 5,000/- मिळण्यास तक्रारकर्ती पात्र आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 2 व 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.
वरील निष्कर्षास अनुसरून मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला तिच्या मृतक पतीच्या शेतकरी जनता अपघात विम्याची रक्कम रू. 1,00,000/- विमा दावा नामंजूर केल्याच्या तारखेपासून म्हणजेच दिनांक 21/08/2012 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द. सा. द. शे. 9% व्याजासह द्यावी.
3. विरूध्द पक्ष यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रू. 10,000/- आणि तक्रारीच्या खर्चापोटी रू. 5,000/- द्यावे.
4. विरूध्द पक्ष यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी उपरोक्त आदेशाचे पालन आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांचे आंत करावे.
5. आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामूल्य पुरविण्यात यावी.
6. प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्तीला परत करावी.