आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. एम. जी. चिलबुले
तक्रारकर्त्याचा शेतकरी जनता अपघात विमा योजनेची नुकसानभरपाई मिळण्याबाबतचा विमा दावा विरूध्द पक्षाने नामंजूर केल्यामुळे तक्रारकर्त्याने सदरहू प्रकरण दाखल केले आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ता प्रेमलाल दागो उके हा शेतकरी असून त्याच्या मालकीची मौजा कुणबीटोला, ता. सालेकसा, जिल्हा गोंदीया येथे भूमापन क्रमांक 535, क्षेत्रफळ 0.70 हेक्टर ही शेतजमीन आहे.
3. महाराष्ट्र शासनाने विरूध्द पक्ष दि न्यू इंडिया ऍश्युरन्स कंपनी लिमिटेड यांच्याकडे शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत शेतक-याचा विमा काढलेला आहे.
4. दिनांक 22/02/2013 रोजी तक्रारकर्ता सायकलने जात असता टाटा सुमो वाहन क्रमांक MP-43/E-029 च्या वाहनचालकाने आपले वाहन निष्काळजीपणे व हयगयीने चालवून तक्रारकर्त्यास धडक दिली. सदर अपघातामुळे तक्रारकर्त्याच्या दोन्ही पायांना फ्रॅक्चर झाले व शरीराच्या इतर भागाला देखील गंभीर दुखापत झाली. सालेकसा पोलीसांनी टाटा सुमो चालकाविरूध्द भा. दं. वि. चे कलम 279, 338 अन्वये अपराध क्रमांक 6/2013 नोंदविला आणि तपासात घेतला. अपघातामुळे तक्रारकर्त्यास 45% कायमस्वरूपी अपंगत्व आले असून तसे प्रमाणपत्र सिव्हील सर्जन, गोंदीया यांनी दिले आहे.
शासनाच्या शेतकरी जनता अपघात विमा योजनेप्रमाणे रू. 1,00,000/- विमा रक्कम मिळावी म्हणून तक्रारकर्त्याने योग्य मार्गाने विरूध्द पक्षाकडे विमा प्रस्ताव सादर केला. परंतु विरूध्द पक्षाने दिनांक 03/03/2014 च्या पत्रान्वये 45% अपंगत्वासाठी विमा रक्कम देय नसल्याचे कारण दाखवून तक्रारकर्त्याचा विमा दावा नामंजूर केला. विरूध्द पक्षाची सदर कृती ही सेवेतील न्यूनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब असल्याने तक्रारकर्त्याने तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केली आहे.
अ. शेतकरी जनता अपघात विम्याची रक्कम रू. 1,00,000/- द.सा.द.शे. 24% व्याजासह मिळावी.
ब. सेवेतील न्यूनतेबाबत रू. 20,000/- भरपाई मिळावी.
क. शारीरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसानभरपाई रू. 10,000/- मिळावी.
ड. तक्रारीचा खर्च रू. 5,000/- मिळावा.
5. तक्रारीचे पुष्ठ्यर्थ तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाचे दिनांक 03/03/2014 चे दावा नामंजूर केल्याबाबतचे तक्रारकर्त्याला उद्देशून लिहिलेले पत्र, 7/12 चा उतारा, 6-क उतारा, अपंगत्वाचे प्रमाणपत्र, एफ.आय.आर. व इतर पोलीस दस्तावेज, राशन कार्डची प्रत व अपघातग्रस्त व्यक्तीचा फोटो इत्यादी दस्तावेज दाखल केले आहेत.
6. विरूध्द पक्ष दि न्यू इंडिया ऍश्युरन्स कंपनी लिमिटेड यांनी लेखी जबाब दाखल करून तक्रारीस सक्त विरोध केला आहे.
तक्रारकर्ता व्यवसायाने शेतकरी असून त्याच्या मालकीची तक्रारीत नमूद शेतजमीन असल्याचे आणि महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत तक्रारकर्ता विमित व्यक्ती असल्याचे नाकबूल केले आहे.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे तक्रारकर्त्याचा अपघात झाला आणि त्यात त्याला 45% कायमस्वरूपी अपंगत्व प्राप्त झाल्याचे विरूध्द पक्षाने नाकारलेले नाही. मात्र दिनांक 03/03/2014 रोजी तक्रारकर्त्याचा विमा दावा विरूध्द पक्षाने बेकायदेशीरपणे नाकारल्याचे नाकबूल केले आहे. शेतकरी जनता अपघात विमा योजनेबाबत शासनाशी झालेल्या त्रिपक्षीय कराराप्रमाणे केवळ 50% ते 100% कायमचे अपंगत्व प्राप्त झाल्यासच अपघातग्रस्त शेतकरी विमा लाभ मिळण्यास पात्र असल्याने आणि तक्रारकर्त्यास 50% पेक्षा कमी अपंगत्व प्राप्त झाले असल्याने तो सदर योजनेप्रमाणे विमा लाभ मिळण्यास पात्र नसल्याने त्याचा विमा दावा नामंजुरीची विरूध्द पक्ष विमा कंपनीची कृती विमा पॉलीसीच्या अटी व शर्तीस अनुसरून असल्याने पूर्णतः कायदेशीर आहे व म्हणून त्याद्वारे विरूध्द पक्षाकडून सेवेत कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार किंवा अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब झाला नसल्याने तक्रार खारीज होण्यास पात्र असल्याचे म्हटले आहे.
7. तक्रारकर्ता व विरूध्द पक्ष यांच्या परस्पर विरोधी कथनांवरून तक्रारीच्या निर्णितीसाठी खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष व कारणमिमांसा खालीलप्रमाणेः-
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | विरूध्द पक्ष यांनी सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला आहे काय? | नाही |
2. | तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय? | नाही |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | अंतिम आदेशाप्रमाणे |
- कारणमिमांसा –
8. मुद्दा क्रमांक 1 बाबतः- सदरच्या प्रकरणात तक्रारकर्ता प्रेमलाल दागो उके याच्या मालकीची मौजा कुणबीटोला, ता. सालेकसा, जिल्हा गोंदीया येथे भूमापन क्रमांक 535, क्षेत्रफळ 0.70 हे. शेतजमीन असल्याबाबतचा 7/12 चा उतारा दस्त क्रमांक 2 वर आणि वारसा प्रकरणांची नोंदवही गांव नमुना 6-क, फेरफार पंजीची नक्कल दस्त क्रमांक 3 वर दाखल केली आहे. त्यावरून तक्रारकर्ता शेतकरी असल्याने त्याचा महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी जनता अपघात विमा योजनेत विमित व्यक्ती म्हणून समावेश होता हे सिध्द होते.
दिनांक 22/02/2013 रोजी तक्रारकर्ता सायकलने जात असता त्यास टाटा सुमो क्रमांक MP-43/E-029 च्या चालकाने धडक देऊन अपघात केला. त्याबाबत पोलीस स्टेशन, सालेकसा यांनी प्रथम खबरी क्रमांक 6/2013 भा.दं.वि. चे कलम 279, 338 दाखल केली त्याची प्रत दस्त क्रमांक 6 वर दाखल आहे. तसेच चौकशी अहवालाची प्रत दस्त क्रमांक 8 वर आणि घटनास्थळ पंचनामा दस्त क्रमांक 9 वर दाखल आहे. वरील दस्तावेजांवरून हे स्पष्ट आहे की, तक्रारकर्त्याला टाटा सुमो क्रमांक MP-43/E-029 ने दिलेल्या धडकेने तो जखमी झाला होता. सदर अपघातातील दुखापतीमुळे तक्रारकर्त्यास 45% कायमस्वरूपी अपंगत्व आल्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक, के. टी. एस. रूग्णालय, गोंदीया यांनी दिलेले प्रमाणपत्र दस्त क्रमांक 5 वर आहे. त्यात खालीलप्रमाणे मजकूर नमूद आहे.
“He is physically disabled and has 45% permanent (physical impairment) in relation to his …...” .
9. तक्रारकर्त्याचे अधिवक्ता श्री. गजभिये यांचा युक्तिवाद असा की, तक्रारकर्त्यास 45% कायम अपंगत्व आल्याने तो शेती व्यवसाय करू शकत नाही म्हणून शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत रू. 1,00,000/- नुकसानभरपाई मिळण्यास पात्र आहे. मात्र त्याचा वाजवी विमा दावा नामंजूर करून विरूध्द पक्ष विमा कंपनीने सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला आहे.
10. याउलट विरूध्द पक्षाच्या अधिवक्ता श्रीमती बघेले यांचा युक्तिवाद असा की, अभिलेखावर दाखल त्रिपक्षीय विमा कराराप्रमाणे शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत अपघातग्रस्त शेतक-यास खालीलप्रमाणे विमा लाभ देय आहेत.
(E) Benefits:
Benefits | Compensation as % of the Capital Sum Insured |
Death only/Permanent Total Disability | 100 |
Loss of one limb or one eye | 50 |
Loss of sight on both eye | 100 |
Loss of both hands | 100 |
Loss of both feet | 100 |
Loss of one hand and one foot | 100 |
Loss of one eye and one hand | 100 |
Loss of one eye and one foot | 100 |
No other benefits for Partial Disablement.
11. वरीलप्रमाणे अपघातामुळे अपघातग्रस्त शेतक-यास जर एक अवयव किंवा एक डोळा गमवावा लागला तर 50% म्हणजे रू. 50,000/- विमा लाभ देय आहे.
जर मृत्यु किंवा कायमचे संपूर्ण (100%) अपंगत्व आले तर 100% म्हणजे रू. 1,00,000/- विमा लाभ देय आहे.
तसेच अपघातामुळे दोन्ही डोळ्याची दृष्टी गेली, दोन्ही हात गेले, दोन्ही पाय गेले, एक हात आणि एक पाय गेला, एक डोळा व एक हात गेला किंवा एक डोळा आणि एक पाय गेला तर 100% म्हणजे रू. 1,00,000/- विमा लाभ देय आहे.
मात्र वरील बाबींशिवाय कोणत्याही प्रकारचे अंशतः अपंगत्व आल्यास कोणताही विमा लाभ देय नाही.
तक्रारकर्त्याने सादर केलेल्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्रात तक्रारकर्त्याने वरीलप्रमाणे कोणताही अवयव अपघातामुळे गमाविल्याचा उल्लेख नाही. त्यामुळे 45% आंशिक अपंगत्वासाठी कोणताही विमा लाभ मिळण्यास तक्रारकर्ता पात्र नसल्याने त्याचा विमा दावा योग्य कारणामुळे नाकारण्यात आला असल्याने विरूध्द पक्षाकडून सेवेत कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार किंवा अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब घडलेला नसल्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
उभय पक्षांच्या अधिवक्त्यांचा युक्तिवाद आणि वर नमूद केलेल्या त्रिपक्षीय करारातील अटींचा विचार करता सदर अपघातात तक्रारकर्त्याने डोळा, हात किंवा पाय यापैकी कोणताही अवयव पूर्णपणे कायमचा गमाविल्याबाबत अपंगत्व प्रमाणपत्रात उल्लेख नसल्याने सदर प्रमाणपत्राद्वारे तक्रारकर्त्यास केवळ 45% कायमचे अपंगत्व आल्याचे जरी सिध्द होत असले तरी अशा प्रकारच्या अपंगत्वामुळे तक्रारकर्ता शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत कोणताही विमा लाभ मिळण्यास पात्र ठरत नाही. म्हणून सदर कारण देऊन तक्रारकर्त्याचा विमा दावा नामंजूर करण्याची विरूध्द पक्ष विमा कंपनीची कृती विमा करारास अनुसरून असल्याने त्याद्वारे विरूध्द पक्षाकडून सेवेत कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार किंवा अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब घडला नाही. म्हणून मुद्दा क्रमांक 1 वरील निष्कर्ष नकारार्थी नोंदविला आहे.
12. मुद्दा क्रमांक 2 व 3 बाबतः- मुद्दा क्रमांक 1 वरील निष्कर्षाप्रमाणे विरूध्द पक्षाकडून सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार किंवा अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब घडला नसल्याने तक्रारकर्ता मागणी प्रमाणे कोणतीही दाद मिळण्यास पात्र नाही. म्हणून मुद्दा क्रमांक 2 व 3 वरील निष्कर्ष नकारार्थी नोंदविले आहेत.
वरील निष्कर्षास अनुसरून मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
2. तक्रारीचा खर्च ज्याचा त्याने सोसावा.
3. आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामूल्य पुरविण्यात यावी.
4. प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्त्यास परत करावी.