आदेश पारित द्वारा मा. सदस्य, श्री. एच. एम. पटेरिया
तक्रारकर्त्यांचा शेतकरी जनता अपघात विमा योजनेची नुकसानभरपाई मिळण्याबाबतचा विमा दावा विरूध्द पक्ष 1 ने नामंजूर करून दावा बंद केल्यामुळे तक्रारकर्त्यांनी सदरहू प्रकरण दाखल केले आहे. तक्रारकर्त्यांच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ती क्रमांक 1 ही मृतक मनोहर यांची मोठी पत्नी व तक्रारकर्ती क्रमांक 2 ही मृतकाची लहान पत्नी आहे. तक्रारकर्ती क्रमांक 1 व 2 यांचे पती मनोहर रतिराम पटले हे मौजा पांजरा, ता. तिरोडा, जिल्हा गोंदीया येथील रहिवासी होते व त्यांच्या नावाने मौजा पांजरी येथे तलाठी साझा क्रमांक 20 अन्वये खालीलप्रमाणे शेतजमीन असून ते व्यवसायाने शेतकरी होते.
अ.क्र. गट नंबर आराजी प्रकार
1. 85 0.12 हे.आर. वर्ग-1
2. 84 0.05 हे.आर. वर्ग-1
3. 82/2 0.14 हे.आर. वर्ग-1
4. 70 0.02 हे.आर. वर्ग-1
5. 63/3 0.12 हे.आर. वर्ग-1
6. 48/3 0.10 हे.आर. वर्ग-1
3. विरूध्द पक्ष क्रमांक 1 ही विमा कंपनी असून विरूध्द पक्ष क्रमांक 2 हे शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याचे प्रस्ताव अर्ज स्विकारतात. तक्रारकर्त्यांच्या पतीचा महाराष्ट्र शासनातर्फे शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा काढण्यात आला होता.
4. दिनांक 23/05/2013 रोजी तक्रारकर्त्यांच्या पतीचा ट्रॅक्टर मध्ये अपघात होऊन ते मरण पावले. तिरोडा पोलीसांनी ट्रॅक्टर ड्रायव्हरवर गुन्हा क्रमांक 64/13 कलम 279, 304 (अ) भा. दं. वि. चा गुन्हा नोंदविला.
5. दिनांक 23/05/2013 रोजी तक्रारकर्तींच्या पतीचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर तक्रारकर्तींनी सर्व कागदपत्रांसह विमा दावा प्रस्ताव विरूध्द पक्ष क्रमांक 2 यांच्याकडे सादर केला. विरूध्द पक्ष क्रमांक 1 यांना सदर विमा प्रस्ताव दिनांक 24/12/2013 रोजी प्राप्त झाला असून विरूध्द पक्ष क्रमांक 1 यांनी त्यांचे पत्र दिनांक 20/11/2014 नुसार सदर विमा प्रस्ताव अपघातग्रस्ताच्या जुन्या फेरफाराची नोंदवही (फेरफार पत्रक) नमुना 6-ड न दिल्यामुळे नामंजूर केल्याने तक्रारकर्तींनी शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याची रक्कम रू. 1,00,000/- दिनांक 24/12/2013 पासून द. सा. द. शे. 18% व्याजासह मिळण्याकरिता तसेच शारिरिक व मानसिक त्रासापोटी रू. 30,000/- व तक्रारीचा खर्च रू. 15,000/- मिळण्यकरिता सदरहू तक्रार दाखल केली आहे.
6. तक्रारकर्तींची तक्रार दाखल करून प्रस्तुत न्यायमंचामार्फत विरूध्द पक्ष यांना दिनांक 02/09/2015 रोजी नोटीसेस पाठविण्यात आल्या. मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांनी हजर होऊन त्यांचा लेखी जबाब दाखल केला आहे.
7. विरूध्द पक्ष क्रमांक 1 विमा कंपनीने सदरहू प्रकरणामध्ये आपला लेखी जबाब दाखल केला असून त्यांनी आपल्या लेखी उत्तरामध्ये मृतक मनोहर रतिराम पटले हे शेतकरी नव्हते व त्यांचा विमा नव्हता. तसेच सदर दाव्यात अपघातग्रस्ताच्या जुन्या फेरफाराची नोंदवही (फेरफार पत्रक) 6-ड न दिल्यामुळे तक्रारकर्तींचा विमा दावा बंद करण्यात आल्याने विरूध्द पक्ष क्रमांक 1 कडून सेवेत कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार किंवा अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब घडला नसल्याने तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
8. विरूध्द पक्ष क्रमांक 2 तालुका कृषि अधिकारी, तिरोडा, जिल्हा गोंदीया यांनी त्यांच्या लेखी जबाबात असे म्हटले आहे की, तक्रारकर्तींचा शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याचा दावा त्यांना दिनांक 06/11/2013 रोजी प्राप्त झाला व सदर दावा पडताळणी करून दिनांक 07/11/2013 रोजी उप विभागीय कृषि अधिकारी यांचेकडे पाठविण्यात आला. विरूध्द पक्ष क्रमांक 2 हे फक्त शेतकरी जनता अपघात विम्याचे प्रस्ताव स्विकारतात व पडताळणी करून पुढील कार्यवाहीस वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करतात. त्यामुळे विरूध्द पक्ष क्रमांक 2 यांचेकडून सेवेमध्ये कोणतीही त्रुटी झालेली नसल्यामुळे त्यांना सदर तक्रारीतून मुक्त करावे अशी विनंती केली आहे.
9. तक्रारकर्ती व विरूध्द पक्ष यांच्या परस्पर विरोधी कथनांवरून तक्रारीच्या निर्णितीसाठी खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष व कारणमिमांसा खालीलप्रमाणेः-
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | विरूध्द पक्ष यांनी सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला आहे काय? | होय |
2. | तक्रारकर्त्या मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहेत काय? | अंशतः |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | अंतिम आदेशाप्रमाणे |
- कारणमिमांसा –
10. मुद्दा क्रमांक 1 बाबतः- सदर प्रकरणात तक्रारकर्ती क्रमांक 1 निर्मला मनोहर पटले हिने शपथपत्रावर कथन केले आहे की, मृतक मनोहर रतिराम पटले हे शेतकरी होते व त्यांच्या मालकीची मौजा पांजरा, तालुका तिरोडा, जिल्हा गोंदीया येथे गट क्रमांक 85, 84, 82/2, 70, 63/3, 48/3 प्रमाणे शेतजमीन होती.
मृतक मनोहर यांचे वडील रतिराम मनीराम पटले याचा मृत्यू दिनांक 17/09/2002 रोजी झाला. त्यांच्या मृत्यूनंतर वारसा हक्काने मनोहर रतिराम पटले हे शेतकरी झाले व फेरफार नोंदवहीमध्ये नोंद दिनांक 31/05/2005 रोजी झाली आहे. सदर फेरफाराची नोंद तक्रारकर्त्यांनी दिनांक 21/10/2016 रोजीच्या यादीसोबत दस्त क्रमांक 1 वर दाखल केली आहे. त्यावरून हे सिध्द होते की, मृतक मनोहर रतिराम पटले हे त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर दिनांक 17/09/2002 रोजी वारसा हक्काने तक्रारीतील शेताचे मालक म्हणून शेतकरी झाले आणि महाराष्ट्र शासनाने सन 2012-13 साली विरूध्द पक्षाकडून काढलेल्या शेतकरी वैयक्तिक अपघात विमा योजनेत विमित शेतकरी म्हणून समाविष्ट होते.
तक्रारकर्तीने तक्रारीसोबत मृत्यू प्रमाणपत्र, मरणान्वेषण प्रतिवृत्त दाखल केले आहे. त्यावरून मनोहर रतिराम पटले यांचा मृत्यू ट्रॅक्टर ट्रॉली अपघाताने जखमी होऊन झाल्याचे सिध्द होते. परंतु विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने आवश्यक कागदपत्र उदा. अपघातग्रस्ताचा जुना फेरफार 6-ड न दिल्याचे क्षुल्लक कारण दर्शवून तक्रारकर्तींचा विमा दावा दिनांक 20/11/2014 रोजी नामंजूर केला. विरूध्द पक्ष क्रमांक 1 ची ही कृती विमा लाभार्थ्यांप्रती सेवेतील न्यूनता व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब या सदरात मोडणारी असल्याने मुद्दा क्रमांक 1 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.
11. मुद्दा क्रमांक 2 व 3 बाबतः- मुद्दा क्रमांक 1 व 2 वरील विवेचनाप्रमाणे सदर प्रकरणातील विमित शेतकरी मनोहर रतिराम पटले यांचा पॉलीसी कालावधीत अपघाती मृत्यु झाला असल्याने त्यांच्या वारस विधवा तक्रारकर्ती क्रमांक 1 निर्मलाबाई मनोहर पटले व तक्रारकर्ती क्रमांक 2 शीला मनोहर पटले या विमा दाव्याची रक्कम रू. 1,00,000/- विमा दावा नामंजूर केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 20/11/2014 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द. सा. द. शे. 9% व्याजासह मिळण्यास पात्र आहेत. याशिवाय शारीरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसानभरपाई रू. 10,000/- आणि तक्रारीचा खर्च रू. 5,000/- मिळण्यास देखील पात्र आहेत. म्हणून मुद्दा क्रमांक 2 व 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.
वरील निष्कर्षास अनुसरून मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष 1 विमा कंपनीला आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्ती क्रमांक 1 व 2 यांना संयुक्तरित्या त्यांचे मृतक पती मनोहर रतिराम पटले यांच्या शेतकरी जनता अपघात विम्याची रक्कम रू. 1,00,000/- विमा दावा नामंजूर केल्याच्या तारखेपासून म्हणजेच दिनांक 20/11/2014 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द. सा. द. शे. 9% व्याजासह द्यावी.
3. विरूध्द पक्ष 1 विमा कंपनीला आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तींना झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रू. 10,000/- आणि तक्रारीच्या खर्चापोटी रू. 5,000/- संयुक्तरित्या द्यावे.
4. विरूध्द पक्ष 1 विमा कंपनीला आदेश देण्यात येतो की, त्यांनी उपरोक्त आदेशाचे पालन आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांचे आंत करावे.
5. विरूध्द पक्ष 2 विरूध्द कोणताही आदेश नाही.
6. आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामूल्य पुरविण्यात यावी.
7. प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्तींना परत करावी.