घोषित द्वारा श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराचा मुलगा प्रशांत पैठण पगारे हा गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. दिनांक 22/9/2008 रोजी हार्ट अटॅकमुळे त्याचा मृत्यु झाला. तक्रारदाराचा मुलगा प्रशांत पैठण पगारे हा राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजनेचा लाभार्थी होता. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी सर्व कागदपत्रासहीत क्लेमफॉर्म गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीकडे दिनांक 10/11/2009 रोजी पाठवून दिला. गेरअर्जदार क्रमांक 1 यांनी तक्रार दाखल करेपर्यंत क्लेमची रक्कम दिली नाही म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार गैरअर्जदाराकडून क्लेमची रक्कम रु 30,000/- 18 टक्के व्याजासह तसेच नुकसान भरपाई म्हणून रु 5000/- मागतात. तक्रारदारानी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली आहेत. गैरअर्जदार क्रमांक 1 यांना संधी देऊनाही त्यांनी लेखी जवाब दाखल केला नाही. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी त्यांचा लेखी जवाब दाखल केला. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदाराच्या मुलाचा मृत्यु हा दिनांक 22/9/2009 रोजी झाल. राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजनेनुसार दिनांक 28/11/2008 रोजी तक्रारदाराचा प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठवून देण्यात आला होता. सदरील प्रस्ताव युनायटेड इंडिया अश्युरन्स कंपनीने स्विकारला नाही. याबाबत महाविद्यालयाने तक्रारदारास कळविले होते. त्यावर तक्रारदारानी सदरील गैरअर्जदारास हा प्रस्ताव पुन्हा एकदा पोष्टाने पाठवून द्यावा अशी विनंती केली. त्यानुसार दिनांक 10/11/2009 रोजी युनायटेड इंडिया अश्युरन्स कंपनी औरंगाबाद यांच्या तो पाठविण्यात आला. त्यामुळे त्यांच्यकडून कुठलीही सेवेत त्रुटी नाही्. गैरअर्जदारानी कागदपत्रे दाखल केली आहेत. दोन्हीही पक्षकारानी दाखल केलेल्या कागदपत्राची मंचाने पाहणी केली. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी त्यांचा लेखी युक्तिवाद दाखल केला. तक्रारदारानी तक्रारीसोबत क्लेमफॉर्मची कॉपी जोडलेली आहे परंतु त्यावर पॉलिसीनंबर कळून येत नाही. तक्रारदाराने मंचात दाखल केलेल्या कागदपत्रावरुन असे दिसून येते की, त्यांनी पीएम रिपोर्ट दाखल केला नाही. क्लेम सेटल करण्यासाठी तक्रारदारानी योग्य ती कागदपत्रे दाखल केली नाहीत असे गैरअर्जदाराचे म्हणणे आहे. तक्रारदारानी आणि गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी दाखल केलेल्या कागदपत्रावरुन तक्रारदाराच्या मुलाचा मृत्यू झाला हे दिसून येते. राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा विमा योजनेमध्ये जर विद्यार्थाचा मृत्यू झाला तर रु 30,000/- पालकास क्लेमची रक्कम मिळते. मृत्यू झाल्यानंतर तक्रारदारानी महाविद्यालयाकडे सर्व कागदपत्रे क्लेमफॉर्म भरुन पाठविला आणि महाविद्यालयाने सुध्दा क्लेमफॉर्म दिनांक 28/11/2008 रोजी पाठविला. यावरुन गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी पॉलिसीनुसार योग्य ती कार्यवाही केली आहे परंतु गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीने मात्र पॉलिसीनुसार तक्रारदारास क्लेमची रक्कमी दिली नाही. युक्तिवादाच्या वेळेस गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे अड राठी यांनी तक्रारदारास रु 30,000/- देण्याची तयारी दर्शविली. त्यावर तक्रारदाराचे असे म्हणणे आहे की, क्लेम फॉर्म भरुन दिला तरीही विमा कंपनीने तक्रारदारास क्लेमची रक्कम दिली नाही व मंचात तक्रार दाखल केल्यावर ते रक्कम देण्यात तयार आहेत असे म्हणतात. दिनांक 13/11/2009 राजी महाविद्यालयाने पुन्हा एकदा क्लेम गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीकडे पाठवून दिला म्हणून मंच गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीस असा आदेश देतो की, त्यांनी क्लेमची रक्कम रु 30,000/- दिनांक 13/11/2009 पासून 9 टक्के व्याजसह तसेच तक्रारीचा खर्च रु 1,000/- तक्रारदारास द्यावा. गैरअर्जदार क्रमांक 2 महाविद्यालयाविरुध्द कुठलाही आदेश नाही. वरील विवेचनावरुन व कागदपत्रावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. आदेश 1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे. 2. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी या आदेशाच्या प्राप्तीपासून 6 आठवडयाच्या आत तक्रारदारास रक्कम रु 30,000/- दिनांक 13/11/2009 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याजदराने तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रु 1,000/- द्यावेत. (श्रीमती रेखा कापडिया) (श्रीमती अंजली देशमुख) सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT | |