Maharashtra

Gondia

CC/13/16

SHRI JAGDISH CHAITRAM SONWANE - Complainant(s)

Versus

THE NEW INDIA ASSURANCE CO. LTD. THROUGH BR. MANAGER SHRI DILIP C. NANDANKAR - Opp.Party(s)

MR. J. S. DONGRE

30 Jun 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, GONDIA
ROOM NO. 214, SECOND FLOOR, COLLECTORATE BUILDING,
AMGOAN ROAD, GONDIA
MAHARASHTRA
 
Complaint Case No. CC/13/16
 
1. SHRI JAGDISH CHAITRAM SONWANE
R/o. NEAR F. C. I. GODAWOON, MURRI, TAH. GONDIA
GONDIA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. THE NEW INDIA ASSURANCE CO. LTD. THROUGH BR. MANAGER SHRI DILIP C. NANDANKAR
BR. OFFICE, FIRST FLOOR, RUNGTHA COMPLEX, JAISHTAMBH CHOWK, GANESH NAGAR ROAD, GONDIA
GONDIA
MAHARASHTRA
2. THE NEW INDIA ASSURANCE CO. LTD. THROUGH MANAGER (CLAIM HUB) SHRI UMESH D. GOKHALE
REGINAL OFFICE, SHRI GANESH CHEMBER, LAXMINAGAR CHOUK, NAGPUR, TH. NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MS. VARSHA O. PATIL MEMBER
 HON'BLE MR. WAMAN V. CHOUDHARI MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

 

( आदेश पारित द्वारा मा. अध्‍यक्ष, श्री. अतुल दि. आळशी)

(पारित दि. 30 जून, 2014)

           तक्रारकर्त्‍याच्‍या मालकीचा ट्रक क्रमांकः MH-35/K-2648 चा अपघात झाल्‍यामुळे सदर ट्रकच्‍या दुरूस्‍तीकरिता आलेला खर्च मिळण्‍यासाठी विरूध्‍द पक्ष यांच्‍याकडे विमा दावा दाखल केला असता विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याचा विमा दावा ‘वाहन चालकाकडे Valid driving license’ नाही या कारणामुळे खारीज केला.  त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने सदरहू तक्रार विद्यमान न्‍याय मंचात नुकसानभरपाई मिळण्‍याकरिता दाखल केलेली आहे.  तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीचा आशय थोडक्‍यात खालीलप्रमाणेः-

2.     तक्रारकर्ता हा विद्यमान मंचाच्‍या कार्यक्षेत्रात राहात असून त्‍याने विरूध्‍द पक्ष 1 यांच्‍याकडून त्‍याचे TATA कंपनीचे वाहन मिनी ट्रक क्रमांकः MH-35/K-2648 (LPT 1109 EX ) चा विमा काढला होता.  विरूध्‍द पक्ष 2 हे विरूध्‍द पक्ष 1 यांचे वरिष्‍ठ कार्यालय आहे.  तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनाचा विमा कालावधी दिनांक 30/09/2011 ते 29/09/2012 असा असून पॉलीसी क्रमांकः 16030231110100001427 असा आहे.      

3.     तक्रारकर्त्‍याचे तक्रारीमध्‍ये असे म्‍हणणे आहे की, सदर ट्रक‍ हा त्‍याच्‍या उदरनिर्वाहाकरिता वापरण्‍यात येत होता.  दिनांक 08/02/2012 रोजी ट्रकचा ड्रायव्‍हर ऊसाचे पीक घेऊन जात असतांना एका शाळकरी मुलाला वाचविण्‍याच्‍या प्रयत्‍नात वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटून सदर वाहन अपघातग्रस्‍त झाले.  अपघातानंतर विरूध्‍द पक्ष 1 यांना अपघाताबाबतची Intimation देण्‍यात आली तसेच पोलीस स्‍टेशनमध्‍ये सुध्‍दा तक्रार नोंदविण्‍यात आली.  विरूध्‍द पक्ष यांनी अपघातग्रस्‍त वाहनाचा सर्व्‍हे करण्‍यासाठी सर्व्‍हेअरची नियुक्‍ती केली व सर्व्‍हेअरने त्‍यांचा सर्व्‍हे रिपोर्ट विरूध्‍द पक्ष यांना सादर केला.  तक्रारकर्त्‍याने अपघातग्रस्‍त वाहनाच्‍या दुरूस्‍तीकरिता रू. 92,000/- इतका खर्च करून मेसर्स जयका मोटर्स यांच्‍या नावाची असलेली संपूर्ण बिले विरूध्‍द पक्ष यांच्‍याकडे दावा अर्जासोबत सादर केली.  परंतु विरूध्‍द पक्ष 2 यांनी दिनांक 06/07/2012 रोजी ‘वाहन चालकाजवळ वैध परवाना नाही’ या कारणामुळे तक्रारकर्त्‍याचा विमा दावा खारीज केला.    

4.     तक्रारकर्त्‍याचे असे म्‍हणणे आहे की, तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनचालकाकडे दिनांक 12/05/2005 पासून वाहन चालविण्‍याचा परवाना होता व त्‍याला वाहन चालविण्‍याचे skill संपूर्ण अवगत होते.  परंतु अपघाताच्‍या दिवशी परवान्‍याचे नुतनीकरण झाले नव्‍हते.  त्‍यामुळे विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याचा विमा दावा “Non Standard Basis” या सदराखाली निकाली काढणे न्‍यायाच्‍या दृष्‍टीने आवश्‍यक होते.  मात्र विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याचा विमा दावा तांत्रिक कारणावरून खारीज केला ही बाब म्‍हणजे सेवेतील त्रुटी असून विरूध्‍द पक्ष यांच्‍याविरूध्‍द आदेश पारित करण्‍यात यावा की, विरूध्‍द पक्ष यांनी वाहन दुरूस्‍तीचा खर्च रू. 92,362/- व गाडी टोचण खर्च रू. 2500/- अपघाताच्‍या दिनांकापासून व्‍याजासह द्यावा.  तसेच नुकसानभरपाई म्‍हणून रू. 20,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रू. 10,000/- देण्‍यात यावे.    

5.     तक्रारकर्त्‍याची तक्रार विद्यमान न्‍याय मंचाने दिनांक 27/02/2013 रोजी दाखल करून घेतल्‍यानंतर विरूध्‍द पक्ष यांना मंचामार्फत नोटीसेस बजावण्‍यात आल्‍या.  विरूध्‍द पक्ष 1 व 2 यांना नोटीस प्राप्‍त झाल्‍यानंतर त्‍यांनी हजर होऊन त्‍यांचे लेखी उत्‍तर दिनांक 16/04/2013 रोजी न्‍याय मंचात दाखल केले.  

         विरूध्‍द पक्ष 1 व 2 यांनी त्‍यांच्‍या जबाबात असे म्‍हटले आहे की, तक्रारकर्त्‍याने दाखल केलेली तक्रार ही खोटी असून विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याचा विमा दावा अपघाताच्‍या वेळेस वाहनचालकाकडे Effective Driving License नसल्‍यामुळे खारीज केला हे म्‍हणणे खरे आहे.  तक्रारकर्त्‍याने विरूध्‍द पक्ष यांच्‍यासोबत केलेल्‍या Contract of Indemnity & Guarantee या कायद्याअंतर्गत केलेल्‍या कराराचा व अटींचा Valid & effective driving license ड्रायव्‍हरकडे नसल्‍यामुळे केलेला भंग आहे व त्‍या कृतीकरिता तक्रारकर्ता हा स्‍वतःच जबाबदार असल्‍यामुळे त्‍याला कुठल्‍याही प्रकारे नुकसानभरपाई कायद्याप्रमाणे मिळू शकत नाही.  तसेच तक्रारकर्त्‍याने सक्षम व्‍यक्‍तीलाच आपले वाहन चालविण्‍याची परवानगी न दिल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍यात यावी. 

6.     तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत विरूध्‍द पक्ष यांनी पाठविलेले दिनांक 06/07/2012 रोजी Repudiation Letter पृष्‍ठ क्र. 18 वर दाखल केले असून विमा पॉलीसी प्रमाणपत्र पृष्‍ठ क्र. 19 वर दाखल केले आहे.  तसेच दावा अर्ज पृष्‍ठ क्र. 21 वर, मेसर्स जयका मोटर्स यांची वाहन दुरूस्‍तीची बिले पृष्‍ठ क्र. 22 ते 25 वर, ट्रकचे परमिट पृष्‍ठ क्र. 26 वर, ट्रकचे फिटनेस सर्टिफिकेट पृष्‍ठ क्र. 27 वर, रजिस्‍ट्रेशन सर्टिफिकेट पृष्‍ठ क्र. 28 वर, आणि ड्रायव्हिंग लायसेन्‍स पृष्‍ठ क्र. 32 वर दाखल केले आहे. 

7.     तक्रारकर्त्‍याच्‍या वकिलांनी लेखी युक्तिवाद दिनांक 21/03/2014 रोजी दाखल केला असून तोंडी युक्तिवाद दिनांक 18/06/2014 रोजी केला.  तक्रारकर्त्‍याचे वकील ऍड. ए. एन. कांबळे यांनी युक्तिवादात असे म्‍हटले की, तक्रारकर्त्‍याच्‍या मिनी ट्रकला दिनांक 08/02/2012 रोजी मौजा उसारी, ता. रामटेक, जिल्‍हा नागपूर येथे अपघात झाला असून ट्रकचा विमा विरूध्‍द पक्ष यांच्‍याकडे काढला होता व त्‍याचा कालावधी दिनांक 30/09/2011 ते 29/09/2012 असा होता.  तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनचालकाकडे वाहन चालविण्‍याचा परवाना दिनांक 14/06/2005 पासून होता व त्‍याला वाहन चालविण्‍याचे उत्‍तम skill होते.  अपघाताच्‍या वेळेस शाळेतील मुलाला वाचविण्याच्‍या प्रयत्‍नात वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटून वाहनास अपघात झाला.  तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनचालकाने त्‍याचे ड्रायव्हिंग लायसेन्‍स जे 11.05.2011 ला मुदत संपलेले होते ते नुतनीकरणाकरिता आर. टी. ओ. भंडारा येथे पाठविले होते.  तक्रारकर्त्‍याचा वाहनचालक हा सतत मागील ब-याच वर्षापासून सदरहू घटनेतील प्रकारचे वाहन चालवित असल्‍यामुळे घडलेली घटना म्‍हणजे breach of  policy नसून तसेच ही घटना statutory breach of condition या सदराखाली येत नसून Non Standard Basis च्‍या आधारावर विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याचा दावा माननीय उच्‍च व सवोच्‍च न्‍यायालयाच्‍या न्‍यायनिवाड्याप्रमाणे 75% Non Standard Claim देऊन अपघाताच्‍या दिनांकापासून व्‍याजासह मंजूर करण्‍यात यावा असे म्‍हटले. 

8.    विरूध्‍द पक्ष 1 व 2 च्‍या वकील ऍड. श्रीमती इंदिरा बघेले यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्त्‍याकडे Valid & Effective Driving License नसल्‍यामुळे तो अटी व शर्तींचा भंग असून तसेच तक्रारकर्त्‍याने त्‍याच्‍या वाहनचालकाचे ड्रायव्हिंग लायसेन्‍स दिनांक 11/05/2011 रोजी मुदतबाह्य झालेले होते व ते घटनेच्‍या दिवशी renew केलेले नसल्‍यामुळे विरूध्‍द पक्ष यांनी खारीज केलेला विमा दावा हा सेवेतील त्रुटी दर्शवित नाही. 

9.     तक्रारकर्त्‍याचा तक्रारअर्ज, विरूध्‍द पक्ष यांचा लेखी जबाब, तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे तसेच दोन्‍ही पक्षाच्‍या वकिलांचा लेखी व तोंडी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.

अ.क्र.

मुद्दे

निर्णय

1.

तक्रारकर्त्‍याची तक्रार मान्‍य होण्‍यास पात्र आहे काय?

होय

3.

या तक्रारीचा अंतिम आदेश काय?

कारणमिमांसेप्रमाणे

- कारणमिमांसा –

10.    तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनचालकाचे ड्रायव्हिंग लायसेन्‍स दिनांक 11/05/2011 ला मुदतबाह्य झाले व त्‍याने ते संबंधित कार्यालयाकडे नुतनीकरणाकरिता पाठविले असे तक्रारकर्त्‍याने तक्रारीत नमूद केले आहे.  त्‍यामुळे घटनेच्‍या दिवशी तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनचालकाजवळ नुतनीकरण केलेले ड्रायव्हिंग लायसेन्‍स नव्‍हते.  तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीमधील नोंदणी केलेले वाहन हे कमर्शियल या सदरात मोडत असून तक्रारकर्ता सदरहू वाहन हे त्‍याच्‍या उदरनिर्वाहाकरिता वापरत असल्यामुळे न्‍याय मंचाला सदरहू हाती असलेले अपघात नुकसान भरपाई प्रकरण चालविण्‍याचा अधिकार आहे. 

11.    विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनचालकाजवळ अपघाताच्‍या वेळेस Valid Driving License नव्‍हते हे जरी सिध्‍द केले असले तरी तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनचालकाकडून झालेला अपघात यासाठी ड्रायव्हिंग लायसेन्‍स renew केलेले नसणे हे कितपत दोषी आहे हे सिध्‍द करू शकत नाही.  तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनचालकाकडे Renewed License नसणे म्‍हणजे त्‍यास वाहन चालविता येत नाही असा अर्थ काढल्‍या जाऊ शकत नाही.  तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनचालकाकडे 2005 पासून Transport Vehicle परवाना होता व तो मागील ब-याच वर्षापासून सतत सदरहू प्रकारचे वाहन चालवित येत असल्‍यामुळे त्‍यासंबंधी त्‍याच्‍याजवळ वाहन चालविण्‍याची mastery होती ही बाब निश्चितच सिध्‍द होते.  तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनचालकाकडून झालेल्‍या अपघाताची परिस्थिती व वाहनचालकाचा परवाना यामधील direct nexus or fundamental breach हे विरूध्‍द पक्ष सदरहू प्रकरणामध्‍ये सिध्‍द करू शकले नाहीत. तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनाचा अपघात कुठल्‍या परिस्थितीत झाला व त्‍याला जबाबदार असणारे घटक आणि त्‍याकरिता जबाबदार असणा-या वाहनचालकाचे ड्रायव्हिंग लायसेन्‍स यांचा परस्‍पर संबंध विरूध्‍द पक्ष यांनी सदरहू प्रकरणामध्‍ये Independent Evidence द्वारे सिध्‍द करू न शकल्‍यामुळे सदरहू अपघात हा वाहनचालकाच्‍या चुकीमुळे झाला व त्‍यास वाहनचालकाकडील परवाना Renew केलेला नाही ही बाब कुठल्‍याही परिस्थितीत directly or indirectly संबंधित नसल्‍यामुळे विरूध्‍द पक्ष यांनी त्‍यांची Statutory Liability टाळण्‍याच्‍या दृष्‍टीने घेतलेला एक सुरक्षात्‍मक पवित्रा आहे असे मंचाचे मत आहे.  करिता मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी देण्‍यात येत आहे.

12.    माननीय सर्वोच्‍च न्‍यायालय यांच्‍या  2004 ACJ 1 (SC)  – NATIONAL INSURANCE CO.  LTD.  versus  SWARAN SINGH  या न्‍यायनिवाड्यामध्‍ये असे म्‍हटले आहे की, “Clearly laid down that the liability of the insurance company vis-à-vis the owner would depend upon several factors.  The owner would be liable for payment of compensation in a case where the driver was not having a license at all.  In each case, on evidence led before the Claims Tribunal, a decision has to be taken whether the fact of the driver possessing license for one type of vehicle but found driving another type of vehicle, was the main or contributory cause of accident. If on facts, it is found that accident was caused solely because of some other unforeseen or intervening causes like mechanical failures and similar other causes having no nexus with the driver not possessing requisite type of license, the insurer will not be allowed to avoid its liability merely for technical breach of conditions concerning driving license”.    

13.    तक्रारकर्त्‍याच्‍या वकिलांनी दाखल केलेल्‍या माननीय मध्‍य प्रदेश राज्‍य आयोग यांच्‍या I (2003) CPJ 567 – ORIENTAL INSURANCE CO. LTD.  versus  LAXMINARAYAN GUPTA या न्‍यायनिवाड्यात असे म्‍हटले आहे की, “Insurance company is liable to settle the claim as non standard claim and repudiation of claim is not justified when driver driving ambulance at accident time holding license to drive L.M.V. – Ambulance is transport vehicle endorsement authorizing driver to drive transport vehicle necessary- Insurance company liable to settle a claim as non standard claim

                तक्रारकर्त्‍याने दाखल केलेला उपरोक्‍त न्‍यायनिवाडा हा तक्रारकर्त्‍याच्‍या प्रकरणाशी सुसंगत आहे असे मंचाचे मत आहे.    

14.    विरूध्‍द पक्ष यांच्‍या वकिलांनी दाखल केलेल्‍या माननीय सर्वोच्‍च न्‍यायालय यांच्‍या 2009 ACJ 666 – National Insurance Co. Ltd. Versus Meena Agrawal या न्‍यायनिवाड्यामध्‍ये वापरण्‍यात आलेले वाहन हे वैयक्तिक उपयोगाकरिता नोंदणी करण्‍यात आलेले होते व ते व्‍यावसायिक प्रयोजनाकरिता वापरण्‍यात आल्‍याच्‍या मुद्दयावर आधारित असल्‍यामुळे सदरहू न्‍यायनिवाडा प्रस्‍तुत प्रकरणाशी सुसंगत नाही    माननीय सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निवाड्याप्रमाणे नवीन ड्रायव्‍हरने विना ड्रायव्हिंग लायसेन्‍स ची गाडी चालविणे म्‍हणजे Statutory breach of terms & condition होते.  परंतु जुना ड्रायव्‍हर जो सतत व ब-याच वर्षापासून त्‍या प्रकारची गाडी चालवित आलेला आहे, मात्र त्‍याचे License renew झालेले नाही त्‍यासाठी Statutory breach of terms & condition होत नाही.  त्‍या ड्रायव्‍हरकडून यापूर्वी अपघात झालेला आहे व त्‍याच्‍या गाडी चालविण्याच्‍या दोषामुळे अपघात झालेला आहे असे तपासात किंवा summery report मध्‍ये जर “mention” केलेले आढळले नाही तर वाहनाच्‍या अपघातासाठी किंवा वाहनचालकाचे ड्रायव्हिंग हे अपघातासाठी जबाबदार धरल्‍या जाऊ शकत नसल्‍यामुळे सदरहू breach of statutory condition लायसेन्‍स संबंधी होत नसल्‍यामुळे विरूध्‍द पक्ष यांच्‍या वकिलांनी दाखल केलेला माननीय सर्वोच्‍च न्‍यायालयाचा न्‍यायनिवाडा सदरहू घटनाक्रमाशी व वस्‍तुस्थितीशी सुसंगत नसल्‍यामुळे तो सदरहू प्रकरणात ग्राह्य धरल्‍या जाऊ शकत नाही असे मंचाचे मत आहे.

15.    विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याचा दावा अर्ज परवाना Renew न केल्याच्‍या तांत्रिक कारणामुळे नाकारणे व तो मागणी केल्‍यानुसार Non standard claim म्‍हणून 75% प्रमाणे न देणे म्‍हणजे सेवेतील त्रुटी होय असे मंचाचे मत आहे.     

       करिता खालील आदेश.             

-// अंतिम आदेश //-

1.      तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2.     विरूध्‍द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला Non standard claim नुसार देय होणारी दावा रक्‍कम रू. 69,272/- (रू. 92,362/- च्‍या 75% रक्‍कम) तक्रार दाखल केल्‍याच्‍या           दिनांकापासून म्‍हणजेच दिनांक 27/02/2013 पासून ते संपूर्ण पैसे अदा होईपर्यंत द. सा. द. शे. 7% दराने व्‍याजासह द्यावी.   

3.     विरूध्‍द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसानभरपाई म्‍हणून रू.5,000/- द्यावे.

4.     विरूध्‍द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्‍यात येतो की, या तक्रारीचा खर्च म्हणून त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला रू. 3,000/- द्यावे.

5.     विरूध्‍द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी या आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 30 दिवसांचे आंत करावे.

 

 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
[HON'BLE MS. VARSHA O. PATIL]
MEMBER
 
[HON'BLE MR. WAMAN V. CHOUDHARI]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.