(पारीत व्दारा मा.श्री नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्य)
(पारीत दिनांक–29 नोव्हेंबर, 2019)
01. उभय तक्रारदारांनी प्रस्तूत तक्रार एकत्रितरित्या ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष विमा कंपनी विरुध्द तीन विमित गायीचे मृत्यू बाबत विमा दावे नामंजूर केल्या बाबत दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
उभय तक्रारदारांनी विरुध्दपक्ष विमा कंपनीकडे त्यांचे गायींचा विमा उतरविला होता आणि त्यामुळे ते विमा कंपनीचे ग्राहक आहेत.
तक्रारकर्ता श्री पांडूरंग लांजेवार यांचे तक्रारी प्रमाणे-
तक्रारकर्ता श्री पांडूरंग लांजेवार यांनी एकूण चार गायींचा विमा विरुध्दपक्ष विमा कंपनीकडे काढला होता आणि त्याचा विमा पॉलिसी क्रं-16030447160400000814 असा असून विम्याचा कालावधी हा दिनांक- 30.09.2016 ते 29.09.2019 असा होता. विमित गायीचे ओळखीसाठी टॅग क्रं-00707, 00706, 00761 आणि 3544 असे विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे देण्यात आले होते आणि विम्यापोटी हप्ता रुपये-17,664/- विरुध्दपक्ष विमा कंपनीकडे भरला होता. एकूण चार विमीत गायींपैकी दोन गायींचा विम्याचे वैध कालावधीत आजाराने मृत्यू झाला. टॅग क्रं 00761 या गायीचा मृत्यू दिनांक-19.07.2018 रोजी झाला आणि टॅग क्रं-3544 या गायीचा मृत्यू दिनांक-01.05.2018 रोजी झाला. दोन्ही गायींचे मृत्यूचे कारण हे शवविच्छेदन अहवालात नमुद केलेले आहे.
तक्रारकर्ता श्री अजय भैय्यालाल राणे यांचे तक्रारी प्रमाणे-
तक्रारकर्ता श्री अजय भैय्यालाल राणे यांनी एकूण चार गायींचा विमा विरुध्दपक्ष विमा कंपनीकडे काढला होता आणि त्याचा विमा पॉलिसी क्रं-16030447160400000623 असा असून विम्याचा कालावधी हा दिनांक- 04.09.2016 ते 03.09.2019 असा होता. विमित गायीचे ओळखीसाठी टॅग क्रं-3111, 00754, 3116 आणि 3106 असे विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे देण्यात आले होते आणि विम्यापोटी हप्ता रुपये-17,664/- विरुध्दपक्ष विमा कंपनीकडे भरला होता. एकूण चार विमीत गायींपैकी एक गाय टॅग क्रं-00754 हिचा विम्याचे वैध कालावधीत “Parasitic disease”आजाराने दिनांक-15.06.2018 रोजी मृत्यू झाला आणि मृत्यूचे कारण हे शवविच्छेदन अहवालात “Parasitic disease” असे नमुद केलेले आहे.
उभय तक्रारदारांनी पुढे असे नमुद केले की, उपरोक्त नमुद टॅग असलेल्या एकूण 03 गायींचे मृत्यू नंतर त्यांनी स्थळ पंचनामा केला, मृत गायींचे फोटोग्राफस काढलेत तसेच पशुवैद्दकीय अधिकारी यांचे मार्फतीने मृतक विमाकृत गायींची तपासणी करुन शवविच्छेदन अहवाल प्राप्त केलेत. त्यानंतर दोन्ही तक्रारदारांनी आवश्यक दस्तऐवजांसह विमा प्रस्ताव विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे शाखे मध्ये अनुक्रमे दिनांक-19.06.2018 आणि दिनांक-21.07.2018 रोजी सादर केलेत. विमा प्रस्ताव प्राप्त झाल्या नंतर विरुध्दपक्ष विमा कंपनीने सखोल चौकशी करणे आवश्यक होते परंतु विरुध्दपक्ष विमा कंपनीने विमा दावा प्रस्तावावर कोणतीही कार्यवाही केली नाही आणि विमा दावा देण्यास टाळाटाळ केली. अशाप्रकारे विरुध्दपक्ष विमा कंपनीने दोन्ही तक्रारदारांना दोषपूर्ण सेवा दिली. प्रत्येकी रुपये-60,000/- या प्रमाणे विमा राशी देण्याची जबाबदारी विरुध्दपक्ष विमा कंपनीने स्विकारलेली होती, त्यामुळे तक्रारकर्ता श्री पांडूरंग सखाराम लांजेवार हे त्यांचे दोन गायींचे मृत्यू संबधात विमा रक्कम रुपये-1,20,000/- आणि तक्रारकर्ता श्री अजय भैय्यालाल राणे हे त्यांचे एक गायीचे मृत्यू संबधात विमा रक्कम रुपये-60,000/- मिळण्यास पात्र् आहेत. दोन्ही तक्रारदारांनी विमा रक्कम मिळण्यासाठी अनेकदा विरुध्दपक्ष विमा कंपनीचे कार्यालयात भेटी दिल्यात परंतु प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचे वकील श्री पटेल यांचे मार्फतीने विरुध्दपक्ष विमा कंपनीला दिनांक-25.09.2018 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली, सदर नोटीस मिळूनही विरुध्दपक्ष विमा कंपनीने त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही म्हणून शेवटी उभय तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समोर दाखल करुन विरुध्दपक्ष विमा कंपनी विरुध्द खालील प्रमाणे मागण्या केल्यात-
- तक्रारकर्ता श्री पांडूरंग सखाराम लांजेवार यांना विमाकृत दोन गायींचे मृत्यूपोटी रुपये-1,20,000/- आणि तक्रारकर्ता श्री अजय भैय्यालाल राणे यांना विमाकृत एक गायीचे मृत्यूपोटी रुपये-60,000/- अशा विम्याच्या रकमा द.सा.द.शे.12 टक्के दराने व्याजासह विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून देण्याचे आदेशित व्हावे.
- प्रस्तुत तक्रारीचा खर्च विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून मिळावा.
03. प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचात दाखल झाल्या नंतर ग्राहक मंचाचे मार्फतीने विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 विमा कंपनीला नोंदणीकृत डाकेने नोटीस पाठविली असता विरुध्दपक्ष विमा कंपनीतर्फे एकत्रीत उत्तर पान क्रं 65 ते 72 वर दाखल करण्यात आले. तक्रारदार हे विरुध्दपक्ष विमा कंपनीचे ग्राहक होत असल्याची बाब नाकबुल केली. तक्रारदार हे दुध विक्रीतून नफा कमाविण्यासाठी व्यवसाय करीत असल्याने व्यवसायिक हेतू या कारणामुळे ते ग्राहक संरक्षण कायदयाचे तरतुदी प्रमाणे ग्राहक होत नाहीत. विमाकृत गायींचा विमा काढल्याची बाब हा एक दस्तऐवजाचा भाग आहे.
तक्रारकर्ता श्री पांडूरंग सखाराम लांजेवार यांचे संबधातील उत्तर-
तक्रारकर्ता श्री पांडूरंग सखाराम लांजेवार यांचे टॅग क्रं 00761 या गायीचा मृत्यू दिनांक-19.07.2018 रोजी झाला आणि टॅग क्रं-3544 या गायीचा मृत्यू दिनांक-01.05.2018 रोजी झाला आणि मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालात नमुद आहे ही बाब नाकबुल केली. तक्रारकर्ता श्री पांडूरंग सखाराम लांजेवार हे सत्यवस्तुस्थिती ग्राहक मंचा पासून लपवून ठेवीत आहेत. तक्रारकर्ता श्री पांडूरंग सखाराम लांजेवार यांचे नावे जारी विमा पॉलिसीचे अवलोकन केले असता विरुध्दपक्ष विमा कंपनीने टॅग क्रं 761 आणि 3544 या म्हशींचा (Cross breed MILCH Buffaloes) विमा काढलेला होता आणि सदर नमुद टॅग क्रमांक हे गायींना देण्यात आलेले नव्हते. परंतु तक्रारकर्ता श्री पांडूरंग सखाराम लांजेवार यांनी दुधाळू गायींचे वैददकीय दस्तऐवज सादर करुन ते गायींचे विमा राशीची मागणी करीत आहेत. यावरुन असे दिसून येते की, तक्रारकर्ता श्री पांडूरंग सखाराम लांजेवार हे चुकीच्या विमा दाव्याची मागणी करीत आहेत. तक्रारकर्ता श्री पांडूरंग सखाराम लांजेवार यांनी पान क्रं 24 वरील दिनांक-19.07.2018 रोजीचे अर्जा प्रमाणे विमाकृत गाय टॅग क्रं-00761 मरण पावल्या बाबत सुचना देणारे पत्र विरुध्दपक्ष विमा कंपनीला पाठविले नव्हते तसेच पान क्रं 34 वरील दिनांक-02.05.2018 रोजीचे अर्जा प्रमाणे त्यांची विमाकृत गाय टॅग क्रं-3544 ही दिनांक-01.05.2018 रोजी मरण पावत्या बाबत सुचना देणारे पत्र् विरुध्दपक्ष विमा कंपनीकडे सादर केलेले नव्हते, त्या संबधीची कोणतीही पोच त्यांनी दाखल केलेली नाही, खरी वस्तुस्थिती अशी आहे की, तक्रारकर्ता श्री पांडूरंग लांजेवार यांनी विमाकृत दोन्ही गायींचे मृत्यूची सुचना देणारे सदरची पत्रे उशिराने दाखल केलेले आहेत, त्यामुळे मृत विमाकृत जनावरांचे निरिक्षण करण्याचे कायदेशीर हक्कापासून विरुध्दपक्ष विमा कंपनी वंचित राहिलेली आहे. तक्रारकर्ता श्री पांडूरंग लांजेवार यांनी त्वरीत विरुध्दपक्ष विमा कंपनीकडे विमाकृत गायीचे मृत्यूची सुचना दिलेली नाही आणि उशिराने विमा दावा दाखल केला. तक्रारकर्ता श्री पांडूरंग लांजेवार यांचे मालकीची गाय टॅग क्रं 3544 संबधाने मृत्यूचे कारण पशुचिकित्सकांनी “Due to chronic septic wound” जखमेच्या संसर्गामुळे झाल्याचे नमुद केले आहे. डॉक्टरांचा “might have been” हा “General remark” आहे त्यामुळे पशुचिकित्सकांनी सुध्दा मृत्यूचे नेमके कारण दिलेले नाही. टॅग क्रं 3544 संबधात आजारी पडण्यापूर्वी आणि आजारा नंतर दुध देण्याची नमुद क्षमता लिटरचे आकडयां मध्ये वैदकीय दस्तऐवजा मध्ये फरक पडलेला आहे.
तक्रारकर्ता श्री अजय भैय्यालाल राणे यांचे संबधातील उत्तर-
तक्रारकर्ता श्री अजय भैय्यालाल राणे यांचे संबधात असे नमुद केले की, त्यांचे मालकीची गाय टॅग क्रं 754 ही दिनांक-15.06.2018 रोजी “Parasitic disease” या आजाराने मृत्यू पावल्याची बाब नाकबुल केली. विमा दावा अर्जात गायीचे मृत्यूचे कारण “Parasitic disease” असे नमुद केले आहे परंतु पशुचिकित्सकाचे प्रमाणपत्रा मध्ये मृत्यूचे कारण Shock असे नमुद आहे. सामान्य शे-यामध्ये गाय अचानक आजारी पडल्याचे नमुद आहे त्यामुळे पशुाचिकित्सक सुध्दा गायीचे मृत्यूचे कारणा बददल निश्चीत नव्हते. तक्रारकर्ता श्री अजय भैय्यालाल राणे यांनी सुध्दा विरुध्दपक्ष विमा कंपनीकडे विमा दावा प्रस्ताव उशिराने दाखल केलेला आहे. तक्रारकर्ता श्री अजय राणे यांचा पान क्रं 50 वरील दिनांक-15.06.2018 रोजी विमाकृत गाय मरण पावल्या बाबत सुचना देणारे पत्र विरुध्दपक्ष विमा कंपनीला मिळालेले नाही, ते मिळाल्या बाबत विरुध्दपक्ष विमा कंपनीची कोणतीही पोच दाखल केलेली नाही, पोचचे अभावी तक्रारकर्ता श्री अजय राणे यांनी दिनांक-15.06.2018 रोजी विरुध्दपक्ष विमा कंपनीकडे विमाकृत गायीचे मृत्यूचे सुचनेचा अर्ज केला होता असे म्हणता येणार नाही.
विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे लेखी उत्तरा मध्ये पुढे असे नमुद करण्यात आले की, उभय तक्रारदारांनी मृत विमाकृत जनावरांचे स्थळपंचनामे केले, मृत विमाकृत जनावरांचे फोटोग्राफस काढलेत, पशुवैददकीय अधिकारी यांचे कडून तपासणी केली, शवविच्छेदन अहवाल प्राप्त केलेत आणि आवश्यक दस्तऐवजांसह विमा दावा प्रस्ताव विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे भंडारा येथील शाखेत अनुक्रमे दिनांक-19.06.2018 आणि 21.07.2018 रोजी सादर केलेत ही बाब नाकबुल केली. तक्रारदारांनी विरुध्दपक्ष विमा कंपनी विरुध्द केलेली अन्य विपरीत विधाने नाकबुल केलीत. दोन्ही तक्रारदारांनी चुकीचे आणि बनावट विमा दावे विरुध्दपक्ष विमा कंपनीकडे सादर केलेत, सदर विमा दावे हे कायदया नुसार वैध नाहीत त्यामुळे विमा दाव्यांवर विचार करण्यात आला नाही. तक्रारदारांनी उशिराने विमाकृत जनावर मरण पावल्याचे विरुध्दपक्ष विमा कंपनीला कळविल्याने विरुध्दपक्ष विमा कंपनीला मृत विमाकृत जनावरांचे निरिक्षण करता आले नाही. तक्रारकर्ता श्री पांडूरंग सखाराम लांजेवार यांचे नावे जारी विमा पॉलिसी प्रमाणे विरुध्दपक्ष विमा कंपनीने टॅग क्रं 761 आणि 3544 नुसार म्हशींचा (Cross breed MILCH Buffaloes) विमा काढलेला होता आणि तक्रारकर्ता श्री लांजेवार यांनी गायींचा विमा दावा दाखल केला. तक्रारदारांची कायदेशीर नोटीसला विरुध्दपक्ष विमा कंपनीने उत्तर दिलेले असताना तक्रारदार हे नोटीसला विरुध्दपक्ष विमा कंपनीने उत्तर दिले नाही असे खोटे नमुद करीत आहेत. विरुध्दपक्ष विमा कंपनीने कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. तक्रारदारांची तक्रार मुदतबाहय आहे. शवविच्छेदन अहवाल हा दिनांक-01.05.2018 रोजीचा आहे आणि त्यानंतर उशिराने विरुध्दपक्ष विमा कंपनीला मृत्यूची सुचना दिलेली आहे. विरुध्दपक्ष विमा कंपनीने म्हशींचा विमा काढलेला असताना तक्रारकर्ता श्री लांजेवार हे संकरीत गायीचे मृत्यू संबधी विमा दाव्याची मागणी करीत आहेत. शवविच्छेदन अहवालामध्ये जनावरांचे मृत्यूचे नेमके कारण दर्शविलेले नाही. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारदारांची तक्रार ही नामंजूर करण्यात यावी अशी विनंती विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे करण्यात आली.
04. तक्रारदारांनी पान क्रं 10 वरील यादी नुसार एकूण 20 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात, ज्यामध्ये विमा पॉलिसी प्रत, लिव्ह स्टॉक क्लेम, पशुचिकित्सकांची प्रमाणपत्रे, मृत गायींचे फोटोग्राफ, तक्रारदारांनी सादर केलेला विमा दावा, पंचनामा, तक्रारदारांनी पाठविलेली कायदेशीर नोटीस व पोच तसेच आधारकॉर्ड अशा दस्तऐवजांचा समावेश आहे. तक्रारकर्ता श्री लांजेवार यांनी पान क्रं-73 ते 75 .वर स्वतःचे पुराव्या दाखल शपथपत्र दाखल केले तर तक्रारकर्ता श्री राणे यांनी पान क्रं-76 ते 78 वर स्वतःचे पुराव्या दाखल शपथपत्र दाखल केले तसेच पान क्रं- 79 व 80वर लेखी युक्तीवाद दाखल केला.
05. विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने एकत्रीत लेखी उत्तर पान क्रं 65 ते 72 वर दाखल केले. तसेच पान क्रं 82 ते 84 वर पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. तर पान क्रं-85 ते 88 वर लेखी युक्तीवाद दाखल केला. तसेच पान क्रं 90 वरील दस्तऐवज यादी प्रमाणे एकूण 04 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात, ज्यामध्ये तक्रारदारांचे कायदेशीर नोटीसला दिलेले उत्तर, दावा नामंजूरीची पत्रे व रजि. पोच अशा दस्तऐवजांचे प्रतींचा समावेश आहे. तसेच विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे मा.वरिष्ठ न्यायालयाच्या न्यायनिवाडयाच्या प्रती दाखल केल्यात.
06. तक्रारदारांची तक्रार, त्यांनी दाखल केलेले दस्तऐवज, पुराव्याचे शपथपत्र तसेच विरुध्दपक्ष विमा कंपनीचे उत्तर आणि पुराव्याचे शपथपत्र तसेच त्यांनी दाखल केलेले दस्तऐवज इत्यादीचे ग्राहक मंचा व्दारे अवलोकन करण्यात आले. तसेच तक्रारदारांचे वकील श्री एस.डी.पटेल आणि विरुध्दपक्ष विमा कंपनीचे वकील श्री ललीत लिमये यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला, त्यावरुन ग्राहक मंचा समोर खालील मुद्दे न्यायनिवारणार्थ उपस्थित होतात -
अक्रं | मुद्दा | उत्तर |
1 | दोन्ही तक्रारदार हे विरुध्दपक्ष विमा कंपनीचे ग्राहक होतात काय? | होय. |
2 | दोन्ही तक्रारदारांच्या तक्रारी या मुदतीत आहेत काय | होय |
3 | विरुध्दपक्ष विमा कंपनीने दोन्ही तक्रारदारांचे विमा दावे प्रलंबित ठेऊन दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते काय? | होय. |
4 | काय आदेश? | अंतिम आदेशा नुसार |
:: कारण-मिमांसा ::
मुद्दा क्रं 1 ते 4-
07. तक्रारदार हे विरुध्दपक्ष विमा कंपनीचे ग्राहक होत नसल्या बाबत-
विरुध्दपक्ष विमा कंपनीचे वकीलांनी आपले उत्तरात असे नमुद केले की, दोन्ही तक्रारदार यांचा विमाकृत जनावरांचे दुध विक्रीतून नफा कमाविण्याचा हेतू आहे आणि सदर हेतू हा व्यवसायिक असल्याने ते ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी प्रमाणे विरुध्दपक्ष विमा कंपनीचे ग्राहक होत नाहीत. परंतु सदर आक्षेपात ग्राहक मंचाला कोणतेही तथ्य दिसून येत नाही, याचे कारण असे आहे की, दोन्ही तक्रारदार हे ग्रामीण भागातील राहणारे असून त्यांचे मुख्य उदरनिर्वाहाचे कारण हे शेती आणि पशुपालन असे आहे आणि त्यावरच त्यांचा आणि संपूर्ण कुटूंबाचा चरितार्थ चालतो. पशुपालन हा फारमोठया प्रमाणावरील व्यवसाय नाही ही बाब उघड आहे त्यामुळे विरुध्दपक्ष विमा कंपनीचा व्यवसायिक हेतू असल्या बाबतचा आक्षेप नामंजूर करण्यात येतो म्हणून आम्ही मुददा क्रं 1 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत.
08. तक्रार मुदतबाहय असल्याचे विरुध्दपक्ष विमा कंपनीचे आक्षेपा बाबत-
विरुध्दपक्ष विमा कंपनीचे वकीलांचा असाही आक्षेप आहे की, प्रस्तुत तक्रार ही मुदतबाहय आहे. या संदर्भात ग्राहक मंचा तर्फे स्पष्ट करण्यात येते की, तक्रारकर्ता श्री पांडूरंग सखाराम लांजेवार यांचे मालकीची गाय टॅग क्रं 00761 हीचा मृत्यू दिनांक-19.07.2018 रोजी आणि टॅग क्रं-3544 हिचा मृत्यू दिनांक-01.05.2018 रोजी झालेला आहे. तर तक्रारकर्ता श्री अजय भैय्यालाल राणे यांचे गायीचा मृत्यू हा दिनांक-15.06.2018 रोजी झालेला आहे. प्रस्तुत तक्रारीचे कारण गायीचे मृत्यू पासून म्हणजे अनुक्रमे दिनांक-01.05.2018, 15.06.2018 आणि दिनांक-19.07.2018 असे जरी हिशोबात धरले तरी प्रस्तुत तक्रार ही ग्राहक मंचा समोर दिनांक-31.10.2018 रोजी दाखल करण्यात आलेली आहे. ग्राहक मंचातील कायदयातील तरतुदी प्रमाणे ग्राहक मंचा समोर तक्रार दाखल करण्यासाठीचे कारण घडल्या पासून दोन वर्षाचे आत तक्रार दाखल करता येते आणि हातातील तक्रारीतील तक्रारीचे कारण हे अनुक्रमे मे, जून आणि जुलै-2018 मध्ये घडलेले असून तक्रार ही ऑक्टोंबर-2018 मध्ये ग्राहक मंचा समोर दाखल केलेली असल्याने तक्रार ही मुदतीत आहे त्यामुळे विरुध्दपक्ष विमा कंपनीचा तक्रार मुदतबाहय असल्याचा आक्षेप नामंजूर करण्यात येतो.
09. विमाकृत गायींचे मृत्यू संबधी उशिरा सुचनापत्र दिल्याचे आक्षेपा बाबत-
विरुध्दपक्ष विमा कंपनीचा असाही आक्षेप आहे की, विमित गायीचे मृत्यू नंतर सुचना देणारे पत्र त्यांना उशिराने देण्यात आले त्यामुळे त्यांना मृत विमाकृत गायींचे निरिक्षण करता आले नाही. मृतक गायींचे मृत्यू संबधी विरुध्दपक्ष विमा कंपनीस सुचना देणारी पत्रे जरी तक्रारदारांनी अभिलेखावर दाखल केलेली असली तरी ती सुचनापत्रे मिळाल्या बाबत विरुध्दपक्ष विमा कंपनीची पोच दाखल केलेली नाही असे विरुध्दपक्ष विमा कंपनीचे म्हणणे आहे. सदर सुचनापत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन ग्राहक मंचा व्दारे करण्यात आले. तक्रारकर्ता श्री पांडूरंग लांजेवार यांनी टॅग क्रं-761 या गायीचा मृत्यू दिनांक-19.07.2018 रोजी झाल्या बाबत सुचना देणारे व दावा फॉर्मची मागणी बाबत त्याच दिवशी म्हणजे दिनांक-19.07.2018 रोजी विरुध्दपक्ष विमा कंपनीचे भंडारा येथील कार्यालयात पत्र दिल्याचे दिसून येते. तर तक्रारकर्ता श्री पांडूरंग लांजेवार यांनी टॅग क्रं-3544 गायीचा मृत्यू दिनांक-01.05.2018 रोजी झाल्या बाबत सुचना देणारे व दावा फार्मची मागणी करणारे पत्र दिनांक-02 मे, 2018 रोजी विरुध्दरपक्ष विमा कंपनीचे भंडारा येथील कार्यालयात दिल्याचे दिसून येते. तर तक्रारकर्ता श्री अजय भैय्यालाल राणे यांनी त्यांचे मालकीची गाय टॅग क्रं-00754 दिनांक-15.06.2018 रोजी मृत्यू झाल्या बाबत विरुध्दपक्ष विमा कंपनीचे भंडारा येथील कार्यालयात त्याच दिवशी म्हणजे दिनांक-15.06.2018 रोजी दावा फार्मची मागणी करणारे आणि मृत्यूची सुचना देणारे पत्र दिल्याचे दिसून येते. विरुध्दपक्ष विमा कंपनीचा मुख्य आक्षेप असा आहे की, ही सुचना देणारी पत्रे उशिराने त्यांना देण्यात आलेली आहेत आणि त्यामुळे त्यांना मृत गायींचे निरिक्षण करता आले नाही व त्यांचा कायदेशीर हक्क हिरावून घेतलेला आहे. अशी सुचना दिली असती तर तक्रारदारांनी पोच का दाखल केलेली नाही असे विरुध्दपक्ष विमा कंपनीचे म्हणणे आहे. क्षणभरासाठी असे गृहीत धरले की, तक्रारदारांनी विमीत गायींचे मृत्यू संबधीची सूचना देणारी पत्रे ही मागाहून तयार केलीत तर तक्रारदारां जवळ विमा दावा प्रपत्राचे फॉर्म कसे आलेत कारण ते विहित नमुन्यातील विमा दावा मागणी करणारे फार्म विरुध्दपक्ष विमा कंपनीचे आहेत. तसेच मृत विमित गायींचे शवविच्छेदन अहवाल सुध्दा विरुध्दपक्ष विमा कंपनीव्दारे पुरविण्यात आलेल्या विहित नमुन्यातील आहेत. जर तक्रारदारांनी विमित गायी मृत झाल्या बाबत वेळेवर सुचना दिली नसती तर त्यांचे जवळ विमित मृत गायींचे शवविच्छेदन अहवालाचा विरुध्दपक्ष विमा कंपनीचा विहित नमुन्यातील नमुना फॉर्म कसे काय आले. सदरचे विहित नमुन्यातील फॉर्म विरुध्दपक्ष विमा कंपनीचे भंडारा येथील कार्यालयातून त्यांना पुरविण्यात आलेले आहेत, ही बाब उघड आहे, त्याशिवाय त्यांना पशुदावा चिकित्सा प्रमाणपत्र हे डॉक्टरांकडून भरणे अशक्य होते. त्यामुळे विरुध्दपक्ष विमा कंपनीचे म्हणणे की, त्यांना गायी मृत झाल्या बाबत सुचना देणारे पत्र उशिराने देण्यात आले त्यामुळे त्यांना मृत गायींचे निरिक्षण करण्याचे कायदेशीर अधिकारा पासून वंचित ठेवण्यात आले या विरुध्दपक्ष विमा कंपनीचे आक्षेपा मध्ये ग्राहक मंचाला कोणतेही तथ्य दिसून येत नाही.
दुसरी महत्वाची बाब अशी आहे की, विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे पान क्रं 95 वर तक्रारकर्ता श्री अजय भैय्यालाल राणे यांचे दावा संबधी विभागीय व्यवस्थापकांचे दिनांक-22.11.2018 रोजीचे कार्यालयीन टिप्पणी मध्ये स्पष्टपणे नमुद केलेले आहे की, टॅग क्रं-754 ही दिनांक-15.06.2018 रोजी अचानकपणे आजाराने मृत पावली आणि तिचे संबधाने सर्व दस्तऐवज भंडारा शाखा कार्यालयातून त्यांना दिनांक-19.06.2018 रोजी प्राप्त झालेत. शवविच्छेदन अहवालाचे अवलोकन केले असता मृत्यूचे कारण “Parasitic Disease” असे नमुद आहे आणि शवविच्छेदन अहवालामध्ये मृत्यूचे कारण Shock असे नमुद आहे त्यामुळे मृत्यूचे कारण हे वेगवेगळी नमुद आहेत, त्यामुळे विमा दावा नाकारण्यात येत असल्याचे नमुद आहे. ज्याअर्थी टिप्पणी मध्ये दिनांक-19 जुन, 2018 रोजी दसतऐवज प्राप्त झाल्याचे नमुद आहे त्याअर्थी मृतक विमाकृत गायीचा दिनांक-15.06.2018 रोजी मृत्यू झाल्याची सुचना त्वरीत दिल्याची बाब सिध्द होते आणि म्हणून आम्ही मुददा क्रं 2 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत.
10. विमा पॉलिसीचे प्रतीमध्ये तक्रारकर्ता श्री पांडूरंग सखाराम लांजेवार यांचे टॅग क्रं 00761 आणि टॅग क्रं-3544 हया दुधाळू म्हशी असे दर्शविलेले असताना पशुचिकित्सा प्रमाणपत्रात सदर टॅगच्या गायी दर्शविलेल्या आहेत आणि मृत फोटो सुध्दा गायींचे आहेत या विसंगती बाबत विरुध्दपक्ष विमा कंपनीने घेतलेल्या आक्षेपा बाबत-
या संबधात ग्राहक मंचा तर्फे स्पष्ट करण्यात येते की, या दोन्ही मृत झालेल्या गायी टॅग क्रं 00761 आणि टॅग क्रं-3544 यांचे शवविच्छेदन अहवाल पशुचिकित्सक यांनी स्वतः करुन त्यावर त्यांनी त्यांची सही व शिक्का मारलेला आहे. तसेच त्यांनी पशुचिकित्सा प्रमाणपत्रात टॅग क्रं-00761 आणि टॅग क्रं 3544 हया दोन्ही दुधाळू संकरीत गायी असल्याचे नमुद केलेले आहे. पशुचिकित्सक यांचे प्रमाणपत्र विरुध्दपक्ष विमा कंपनीवर बंधनकारक आहे, त्यांनी प्रमाणपत्र खोटे निर्गमित करण्याचा प्रश्नच उदभवत नाही. दुसरी बाब अशी आहे की, विरुध्दपक्ष विमा कंपनीने संबधित पशुचिकित्सक यांना ग्राहक मंचा समोर तपासलेले नाही. अशापरिस्थितीत पॉलिसी प्रमाणे म्हशी दर्शविलेल्या असताना त्या टॅग क्रमांकाच्या गायी कशा या विरुध्दपक्ष विमा कंपनीच्या आक्षेपा मध्ये ग्राहक मंचाला कोणतेही तथ्य दिसून येत नाही. असेही होऊ शकते की, विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे विमा पॉलिसी जारी करताना चुकीने गायी ऐवजी म्हशींचा उल्लेख केल्या गेलेला असेल परंतु त्या चुकीसाठी तक्रारकर्ता श्री पांडूरंग सखाराम लांजेवार यांना जबाबदार धरता येणार नाही कारण तक्रारकर्ता हे ग्रामीण भागातील व्यक्ती असून त्यांना पॉलिसी मधील इंग्रजी भाषेमधील मजकूर समजला नसेल. विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे पान क्रं 96 वर तक्रारकर्ता श्री पांडूरंग सखाराम लांजेवार यांचे दावा संबधी विभागीय व्यवस्थापकांचे दिनांक-12.10.2018 रोजीचे पत्रामध्ये स्पष्टपणे नमुद केलेले आहे की, त्यांचे भंडारा येथील शाखे कडून त्यांना विमाकृत दुधाळू म्हैस टॅग क्रं-00761 चे विम्याचे दसतऐवज दिनांक-10.09.2018 रोजी प्राप्त झालेत. मृतक जनावराचा मृत्यू दिनांक-19 जुलै, 2018 रोजी झालेला आहे. सदर पत्रात पुढे असे नमुद आहे की, विमा दाव्याचे दस्तऐवज उशिराने म्हणजे जनावराचा मृत्यू दिनांक-01.05.2018 नंतर दाखल केलेले आहेत परंतु सदर पत्रात वर म्हशीचा मृत्यू 19.07.2018 असा दर्शविलेला आहे. अशाप्रकारे सदरचे पत्रात विसंगती दिसून येते. सदरचे पत्रात पुढे असेही नमुद आहे की, पॉलिसी प्रमाणे दुधाळू म्हशीचा विमा काढलेला असताना संबधीत दस्तऐवज आणि फोटे हे दुधाळू गायीचे दाखल केलेले आहेत. त्यासंबधाने उशिरा दाखल करण्याचे कारण आणि म्हशी संबधी दस्तऐवजाची पुर्तता करण्याचे नमुद केलेले आहे. मृतक जनावराचा मृत्यू जुलै, 2018 मध्ये झालेला असताना ज्याअर्थी वरिष्ठ कार्यालयास सप्टेंबर, 2018 मध्ये भंडारा शाखेतून दस्तऐवज प्राप्त होतात, याचाच अर्थ असा निघतो की, तक्रारकर्ता श्री लांजेवार यांनी विहित मुदतीत विमा दावा दाखल केलेला आहे आणि जो काही उशिर झालेला आहे तो विरुध्दपक्ष विमा कंपनीचे शाखा कार्यालय भंडारा कार्यालयाकडून झालेला आहे, त्या संबधी तक्रारकर्ता श्री लांजेवार यांना दोषी धरता येणार नाही.
11. पशुचिकित्सक यांचे पशुचिकित्सा प्रमाणपत्रात गायीचे मृत्यू संबधी दोन वेगवेगळी कारणे दिल्या संबधी विरुध्दपक्ष विमा कंपनीचे आक्षेपा बाबत-
विरुध्दपक्ष विमा कंपनीचा असाही आक्षेप आहे की, तक्रारकर्ता श्री पांडूरंग सखाराम लांजेवार यांचे मालकीची गाय टॅग क्रं 3544 संबधात पान क्रं 27 ते 29 वर दाखल पशुचिकित्सकांचे निर्गमित प्रमाणपत्रात अक्रं 5 मध्ये मृत्यूचे कारण हे “Disease” असे नमुद केलेले आहे तर अक्रं 40 मध्ये General Remarks – “The animal might have been died due to Toxemia from Chronic Septic Wounds leads shock” असे नमुद आहे अशाप्रकारे टॅग क्रं 3544 चे मृत्यू संबधात दोन वेगवेगळी कारण नमुद केलेली आहेत परंतु सदर पशुचिकित्सकाचा अहवाल हा विरुध्दपक्ष विमा कंपनीचे विहित फॉर्म मध्ये भरलेला आहे. पशु वैददकीय चिकित्सकांनी जर प्रमाणपत्रात मृत्यू संबधी दोन मते दिलेली आहेत तर त्या संबधी संबधित पशुचिकित्सक यांना ग्राहक मंचा समोर तपासण्याची जबाबदारी (Cross Examination of Veterinary Doctor by O.P. Insurance Company) विरुध्दपक्ष विमा कंपनीची होती कारण आरोप विरुध्दपक्ष विमा कंपनी करीत असल्याने केलेले आरोप सक्षम अशा पुराव्याव्दारे सिध्द करण्याची जबाबदारी ही विरुध्दपक्ष विमा कंपनीची आहे परंतु असे विरुध्दपक्ष विमा कंपनीने या प्रकरणात केलेले नाही त्यामुळे विरुध्दपक्ष विमा कंपनीचे या आक्षेपामध्ये सुध्दा फारसे तथ्य ग्राहक मंचाला दिसून येत नाही.
12. विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे वकील श्री ललीत लिमये यांनी खालील मा.वरिष्ठ न्यायालयांचे निवाडयांवर आपली भिस्त ठेवली-
- Hon’ble National Consumer Disputes Redressal Commission New Delhi-First Appeal No. 410 of 2008-.-Decided on 16/04/2018 “Gowhar Riyaz Khan-Versus- Ansal Housing & Construction Ltd. & Anr”
- Hon’ble State Consumer Disputes Redressal Commission Uttarakhand Dehradun-First Appeal No. 56 of 2012 –Decided on -20/09/2018- “Sh.Shishupal S/o Sitaru-Versus-Oriential Insurance Company Limited”
आम्ही उपरोक्त नमुद मा.वरिष्ठ न्यायालयांच्या निवाडयांचे काळजीपूर्वक वाचन केले, सदर न्यायनिवाडयांमधील वस्तुस्थिती आणि हातातील प्रकरणा मधील वस्तुस्थिती ही भिन्न भिन्न असल्यामुळे सदर न्यायनिवाडयांचा उपयोग विरुध्दपक्ष विमा कंपनीला होणार नाही असे ग्राहक मंचाचे स्पष्ट मत आहे.
13. एकंदरीत घटनाक्रम, पुराव्या दाखल दस्तऐवज पाहता विरुध्दपक्ष विमा कंपनीने दोन्ही तक्रारदारांचा विमा दावा दयावयाचा नाही अशी भूमीका घेऊन पःश्चात बुध्दीतून चुकीचे आक्षेप घेतलेले आहेत. विरुध्दपक्ष विमा कंपनीने चुकीची कारणे पुढे करुन तक्रारदारांचा अस्सल विमा दावा नाकारलेला आहे आणि विरुध्दपक्ष विमा कंपनीचे चुकीचे कृतीमुळे व दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारदारांना निश्चितच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला आहे. अशाप्रकारे विरुध्दपक्ष विमा कंपनीने दोन्ही तक्रारदारांना दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते म्हणून आम्ही मुददा क्रं 3 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत आणि त्यामुळे दोन्ही तक्रारदार हे देय विमा राशी व्याजासह तसेच त्यांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बददल नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून मिळण्यास पात्र आहेत असे ग्राहक मंचाचे स्पष्ट मत आहे.
14. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा सर्वकष विचार करुन ग्राहक मंच प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहे-
:: अंतिम आदेश ::
(01) उभय तक्रारदार अनुक्रमे श्री पांडूरंग सखाराम लांजेवार आणि श्री अजय भैय्यालाल राणे यांची तक्रार, विरुध्दपक्ष क्रं 1 दि न्यु इंडीया अॅश्योरन्स कंपनी लिमिटेड, रिजनल ऑफीस, नागपूर आणि विरुध्दपक्ष क्रं-2 दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनी लिमिटेड तर्फे शाखा व्यवस्थापक, शाखा भंडारा यांचे विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या खालील प्रमाणे मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष 1 व क्रं 2 विमा कंपनीला आदेशित करण्यात येते की, त्यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या तक्रारकर्ता श्री पांडूरंग सखाराम लांजेवार यांना त्यांचे विमाकृत गायी टॅग क्रं-00761 आणि टॅग क्रं-3544 संबधाने देय विमा राशी प्रत्येकी रुपये-60,000/- प्रमाणे एकूण रुपये-1,20,000/- (अक्षरी रुपये एक लक्ष विस हजार फक्त) दयावी आणि सदर रकमेवर दिनांक-12.10.2018 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने व्याज दयावे.
(03) विरुध्दपक्ष 1 व क्रं 2 विमा कंपनीला आदेशित करण्यात येते की, त्यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या तक्रारकर्ता श्री अजय भैय्यालाल राणे यांना त्यांचे विमाकृत गाय टॅग क्रं-00754 चे मृत्यू संबधाने देय विमा राशी रुपये-60,000/- (अक्षरी रुपये साठ हजार फक्त) दयावी आणि सदर रकमेवर दिनांक-22.11.2018 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने व्याज दयावे.
(04) विरुध्दपक्ष क्रं. 1 व क्रं-2 विमा कंपनीला आदेशित करण्यात येते की, त्यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या उभय तक्रारदारांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बाबत प्रत्येकी रुपये-10,000/- (अक्षरी प्रत्येकी रुपये-10,000/- फक्त) आणि तक्रारीचे खर्चा बाबत प्रत्येकी रुपये-5000/- (अक्षरी प्रत्येकी रुपये पाच हजार फक्त) दयावेत.
(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं- 1 व क्रं 2 विमा कंपनीने वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या प्रस्तुत निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.
(06) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
(07) तक्रारदारांना “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.