निकालपत्र :- (दि.06/10/2010) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र. 1 व 2 त्यांचे वकीलांमार्फत हजर झाले. त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले. तक्रारदारचा लेखी युक्तीवाद दाखल. सामनेवाला वकीलांचा युक्तीवाद ऐकणेत आला. सदरची तक्रार तक्रारदाराचा न्याययोग्य विमा दावा सामनेवाला विमा कंपनीने नाकारल्यामुळे दाखल करणेत आला आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- अ)तक्रारदार बॅंक ही महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 नुसार नोंदणीकृत संस्था आहे. सदर बँक ही शेडयूल बँकेचा दर्जा असलेली आहे व ती बँकींगचा व्यवसाय करते. सदर बँकेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्यापुरते आहे. तक्रारदार बँकेचे प्रधान तसेच नोंदणीकृत कार्यालय इचलकरंजी येथे असून बँकेच्या एकूण 27 शाखा आहेत. यापैकी एक शाखा काळबादेवी रोड, मुंबई येथे आहे. ब) सामनेवाला क्र.1 हे सामनेवाला विमा कंपनीचे क्षेत्रीय कार्यालय आहे. सामनेवाला क्र.2 हे कोल्हापूर शाखा कार्यालय आहे. सदर सामनेवाला कंपनीकडून तक्रारदार बँकेने त्यांचे एकूण 27 शाखांचे इमारती, फर्निचर, फिक्चर्स, कॉम्प्युटर्स, डेड स्टॉक, लायब्ररी, एटीएम मशिन्स इत्यादीसाठी स्टॅन्डर्ड फायर अन्ड स्पेशल पेरिल्स पॉलीसी घेतली आहे. सदर पॉलीसीचा जुना क्र.151103/11/07/11/00000204 असा असून पॉलीसीची मुदत दि.01/04/2007 ते 31/03/2008 आहे व नुतनीकरणानंतरचा नवीन पॉलीसी क्र.160300/11/08/11/00000084 असा असून नवीन पॉलीसीची मुदत दि.01/04/2008 ते 31/03/2009 पर्यंत आहे. क) तक्रारदार बँकेचे काळबादेवी रोड मुंबई येथील सिलींग व स्लॅब कोसळला. त्यामुळे बँकेचे कॉम्प्युटर्स, टेबल्स, कौन्टर, खुर्च्या, मॉनिटर्स, सीपीयु, पॅल्स्टर ऑफ पॅरिसचे सिलींग इत्यादीचे मोठे नुकसान झाले. सदरची घटना रात्री घडलेमुळे सकाळी शाखा उघडलेनंतर सदरची बाब निदर्शनास आली. सदर जागेची पाहणी करणेबाबत व सहकार्य करणेबाबत सामनेवाला यांना कळवले. सदर शाखेचे इमारत व फर्निचर यांची विमा रक्कम ही रु.1,64,44,754/- इतकी आहे. सामनेवालांनी नेमलेली सुनिगम इंटरनॅशनल सर्व्हेअर यांनी मागणी केलेप्रमाणे जरुर त्या कागदपत्रांची व माहितीची पूर्तता करुनही सामनेवालांनी दि.18/12/2008 चे पत्राने क्लेम नाकारलेला आहे. प्रस्तुत सिलींगमध्ये ड्रेनेज व टॉयलेट वॉटरमध्ये दिर्घकालीन लिकेजमुळे सदर घटना घडल्यामुळे पॉलीसीमध्ये सदर नुकसान येऊ शकत नाही असे कळवलेले आहे. तक्रारदारांना शाखा सुरु करणेसाठी रक्कम रु.4,25,690/- इतका दुरुस्ती खर्च आलेला आहे. सामनेवालांचे क्लेम नाकारलेचे कृत्यामुळे तक्रारदारांना मोठा त्रास व अपरिमीत हानी झालेली आहे. सामनेवाला यांनी योग्य व आवश्यक सेवा देणेस हेळसांड केल्यामुळे दि.19/02/2009 रोजी वकील स्वानंद कुलकर्णी यांचेमार्फत कायदेशीर नोटीस पाठवून नमुद खर्चाचे रक्कमेची मागणी केली. सदर नोटीस स्विकारुनही सामनेवाला यांनी पूर्तता केली नसलेने प्रस्तुतची तक्रार तक्रारदांराना दाखल करावी लागली. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह मंजूर करुन क्लेम रक्कम रु.4,25,690/-मानसिक व शारिरीक त्रासापोटी व खर्चापोटी रक्कम रु.4,25,690/- नोटीस फी रक्कम रु.2,000/- अशी एकूण रक्कम रु.8,53,380/- द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह वसुल होऊन मिळावेत अशी विंनती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या प्रित्यर्थ बँकेचा ठराव, पॉलीसीची प्रत, नुकसानीनंतर केलेला अर्ज, बँकेने केलेला क्लेम फॉर्म, सर्व्हेअरची पत्रे, तक्रारदारने त्यास दिलेले उत्तर, क्लेम नामंजूर केलेले पत्र, वकीलांना पाठविलेली नोटीस व त्याची पोच पावती इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच रिजॉइन्डर दाखल केला आहे. (4) सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार सामनेवाला यांनी तक्रारदारांचा क्लेम पॉलीसी अंतर्गत कव्हर होत नसलेने नाकारलेला आहे. तक्रारदाराची तक्रार सामनेवाला यांनी नाकारलेली आहे. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, तक्रारदाराने पाठवून दिेलेले क्लेम पेपर्स तसेच सुनिगम इंटरनॅशनल सर्व्हेअर यांनी दिलेल्या अहवालाचे बारकाईने अवलोकन केले असता असे निदर्शनास आले की, तक्रारदाराचे इमारत व त्याअनुषंगे चल मालमत्तेचे नुकसान हे पाईप लाईनमधून झालेल्या पाण्याच्या गळतीमुळे झालेली आहे. सदर गळतीमधील पाणी हे स्लॅब बांधकाम व सिलींगमध्ये बराच कालावधीपासून मुरल्यामुळे तसेच पाणी व ड्रेनेज लाईन पाईप्स लिकेज असलेने स्लॅब व सिलींग कमकुवत झाले व त्यामुळे त्याचा परिणाम ते कोसळण्यात झालेली आहे. सदरचा स्लॅब व सिलींग दि.25/03/2008 रोजी कोसळलेले आहे. प्रस्तुतची नुकसानी ही पॉलीसीच्या अटी व शर्तीमध्ये समाविष्ट होत नसलेने कायदेशीर कारणास्तव प्रस्तुतचा क्लेम नाकारला आहे. सबब सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही. तक्रारदाराने पाठविलेली नोटीस ही बेकायदेशीर आहे. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करावी व सामनेवाला यांना रक्कम रु.5,000/- तक्रारदाराकडून देणेबाबत आदेश व्हावा अशी विंनती केली आहे. (5) सामनेवाला यांनी आपले लेखी म्हणणे हे शपथपत्रासह दाखल केले आहे. तसेच सुनिगम इंटरनॅशनल सर्व्हेअर यांचा सर्व्हे रिपोर्टची सत्यप्रत दाखल केली आहे. (6) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, रिजॉइन्डर, सामनेवाला क्र. 1 व 2 यांचे लेखी म्हणणे व तक्रारदाराचा लेखी युक्तीवाद व उभय पक्षांचे वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? --- नाही. 2. काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1:- तक्रारदार बँकेने तिच्या विविध शाखाबरोबरच मुंबईतील शाखेचाही सामनेवालाकडे विमा उतरविलेची बाब ही दाखल पॉलीसीच्या प्रतीवरुन निर्विवाद आहे. सदर पॉलीसीचे अवलोकन केले असता सदरची पॉलीसी ही स्टॅन्डर्ड फायर अन्ड स्पेशल पेरिल्सची असून पॉलीसी क्र.151103/11/07/11/00000204 असा आहे व विमा कालावधी हा दि.01/04/2007 ते 31/03/2008असा आहे. सदर पॉलीसीप्रमाणे इमारतीपोटी रुपये 6,80,40,101/-, प्लॅन्ट, मशीनरी व अक्सेसरीज, एटीएम मशीनरी व कॉम्प्युटर साठी रु.1,43,18,680/- फर्निचर फिक्श्चर्स आणि फिटींग रु.1,99,00,306/-कॅटॅगरी स्टॉक्ससाठी रक्कम रु.1,88,58,934/-अशी एकूण रु.12,11,18,021/- इतके विमा रक्कमेचे संरक्षण देणेत आलेले होते. तक्रारदाराने आपल्या तक्रारीमध्ये दि.25/03/2008रोजी तक्रारदारांचे काळबादेवी रोड, मुंबई येथील शाखेतील सिलींग व स्लॅब कोसळून कॉम्प्युटर्स, टेबल, कौन्टर्स, खुर्च्या, मॉनिटर, सीपीयु, प्लास्टर ऑफ पॅरीस सिलींग आदीचे नुकसान झाले असलेचे नमुद केले आहे. तसेच नमुद शाखा संपूर्ण संगणकीकृत असलेने फॉल्स सिलींगमध्ये पॉवर केबल्स, लॅन केबल्स, पीव्हीस केसींग पाईपही होत्या. त्याही पडलेने मोठे नुकसान झाले आहे. सदर दुरुस्तीपोटी तक्रारदारास रक्कम रु.4,25,690/- इतका खर्च आलेला आहे. तक्रारदाराने सामनेवालांकडे सदर रक्कमेची मागणी केल्याचे सामनेवाला यांनी आपल्या म्हणणेत मान्य केलेले आहे. तसेच सुनिगम इंटरनॅशनल सर्व्हेअर यांनी आपल्या सर्व्हे रिपोर्टमध्ये सदर बाबी नमुद केल्या आहेत. सदरचा स्लॅब हा पाण्याच्या गळतीमुळे कोसळल्याची बाबही नमुद केली आहे. दि.26/03/2008 रोजी त्यांची सर्व्हेअर म्हणून नेमणूक केली. त्यांनी दि.27/03/2008 रोजी सदर जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. सदर पाहणीमध्ये फर्निचर, कॉम्प्युटर, एसी, ऑफिस सिलींगचे इलेक्ट्रीकल फिटींग इत्यादीचे नमुद सिलींगमधून झालेल्या पाणी गळतीमुळे नुकसान झालेचे नमुद केले आहे. तसेच रक्कम रु.4,25,690/- नुकसान झालेचे नमुद केले आहे. मात्र सदरची नुकसानी देणेसाठी सामनेवालांचे उत्तर दायित्व येत नाही. सबब नो क्लेम म्हणून प्रस्तुतचे प्रकरण बंद केलेचे नमुद केले आहे. सर्व्हेअर यांनी केलेल्या पाहणीनुसार त्यांनी निष्कर्ष नोंदवलेले आहेत. सदर निष्कर्षानुसार नमुद कार्यालयाचे इमारतीमध्ये पाण्याचे पाईपचे फिटींग केलेले आढळून आले. ड्रेनेज/टॉयलेट चे पाणी छतामध्ये दिर्घ कालावधीपासून मुरत गेलेने प्रस्तुतचे छत कमकुवत झाले व त्यामुळे ते दि.25/03/2008 चे रात्री कोसळलेले आहे. तसेच पाण्याच्या पाईपमधून कोणतेही लिकेज आढळून आलेले नाही. कारण त्यासाठी स्वतंत्र पाईप लाईन व मोटर बसवलेली आहे. त्यामुळे प्रस्तुतचे झालेले नुकसान हे प्रस्तुत पॉलीसी अंतर्गत समाविष्ट होत नाही. सबब सदर नुकसानी देणेस सामनेवाला कंपनीचे उत्तर दायित्व येत नसलेबाबतचे मत नोंदवलेले आहे. सदर पॉलीसीचे अवलोकन केले असता मटेरियल डॅमेज क्लॉज 9 “ Brusting and/or overflowing of Water Tanks Apparatus and Pipes.” या तरतुदीचा विचार करता प्रस्तुत कार्यालयाचे छत हे ड्रेनेज/टॉयलेटचे पाणी हे दिर्घकाळ छतामध्ये मुरत गेलेने प्रस्तुतचे छत कोसळलेले आहे. सदर छत कोसळण्याची घटना ही अचानक नसुन सदरची प्रक्रिया दिर्घकालावधीपासून सुरु होती. त्याबाबत तक्रारदाराने कोणतीही कारवाई केलेली नाही. याचा विचार करता दि.18/12/2008 चे पत्रानुसार वर नमुद कारणास्तव क्लेम नाकारलेला आहे. सदरचा क्लेम हा पॉलीसीच्या अटी व शर्तीप्रमाणे नाकारलेला असलेमुळे यामध्ये सामनेवाला यांची कोणतीही सेवात्रुटी दिसून येत नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2:- सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी ठेवलेली नाही. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार फेटाळणेत येते. 2) खर्चाविषयी कोणतेही आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |