निकालपत्र :- (दि.06/08/2010) ( सौ. प्रतिभा जे. करमरकर,सदस्या) (1) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:-यातील तक्रारदार यांचे पती मयत महादेव पोवार यांनी श्री पांडूरंग नागरी सह. संस्थेतर्फे सामनेवाला विमा कंपनीकडून शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा पॉलीसी घेतली होती. मयत महादेव पोवार दि.14/08/2005 रोजी शेतीच्या कामासाठी चालले असता शिवेचा ओढा या ठिकाणी पाय घसरुन पडले. त्यांच्या मानेला व छातीला बराच मुका मार लागला म्हणून त्यांना वाळवा येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. त्यानंतर तेथील डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे त्यांना सी.पी.आर.हॉस्पिटल,कोल्हापूर येथे नेण्यात आले. परंतु उपचार चालू असतानाच दि.15/08/2005 रोजी त्यांचा मृत्यू झाला. हा मृत्यू अपघातामुळे झालेल्या जखमांनी झाला असल्याबाबतचा दाखला सी.पी.आर. हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी दिला आहे. (2) त्यानंतर तक्रारदाराने पतीचा मृत्यू झाल्याबद्दल पांडूरंग नागरी सह.पत संस्था यांच्यातर्फे सामनेवाला विमा कंपनीकडे सर्व आवश्यक कागदपत्रांसह क्लेम दाखल केला. त्यानंतर सामनेवाला विमा कंपनीने दि.21/06/2006 रोजी तक्रारदाराकडून ज्यादा काही कागदपत्रांची मागणी केली.त्या सर्व कागदपत्रांची पूर्तताही तक्रारदाराने वेळेत केली. त्यानंतर सामनेवाला विमा कंपनीने क्लेम लवकरच मंजूर होईल असे तक्रारदारांना सांगून झुलवत ठेवले. परंतु अजूनही सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा क्लेम मंजूर केला नाही. तक्रारदार या दुर्गम भागात राहणा-या गरीब, अशिक्षीत विधवा आहेत व त्यांच्यावर संपूर्ण कुटूंबाची जबाबदारी आहे. सामनेवाला विमा कंपनी 2006 पासून सर्व कागदपत्रांची पूर्तता करुनही सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराच्या न्याययोग्य क्लेमची योग्य दखल घेऊन तक्रारदाराचा क्लेम मंजूर केला नाही. त्यामुळे तक्रारदार व त्यांचे कुटूंबीय यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. म्हणून ही सामनेवालाच्या सेवेतील गंभीर त्रुटी आहे. म्हणून त्याविरुध्द दाद मागण्यासाठी व आपल्या पुढील मागण्या मंजूर व्हाव्या म्हणून तक्रारदाराने प्रस्तुत मंचाचा दरवाजा ठोठावला आहे. सामनेवाला यांनी तक्रारदांराना विमा क्लेमची रक्कम रु.1,00,000/- द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह मिळावी अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत श्री पांडूरंग नागरी सह.पत संस्था मर्या. यांनी सामनेवाला यांना पाठविलेले पत्र, सामनेवाला यांनी पाठविलेले पत्र, तक्रारदार यांनी सामनेवाला यांना पाठविलेली वकीलांमार्फतची नोटीस, सी.पी.आर.हॉस्पिटल,कोल्हापूर यांचा मृत्यूचा दाखला, तक्रारदाराचे पतीचा मृत्यूचा दाखला, मेडिकल रिपोर्ट, पोलीस पेपर्स, शाळा सोडल्याचा दाखला, दै.पुढारीचा दि.24/08/05 चा अंक व तक्रारदार यांचे वारसाबाबतचे अॅफिडेव्हीट इत्यादी कागदपत्र दाखल केली आहेत. (4) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेत तक्रारदाराची पॉलीसी मान्य केली आहे. परंतु इतर सर्व कथनाला तीव्र आक्षेप घेतला आहे. मयत महादेव पोवार यांच्यावर उपचार करणा-या डॉक्टर दिपक पाटील यांनी महादेव पोवार यांचा मृत्यू "Hypersensitive intracerebral Haemorrahage."या कारणाने झाला आहे. त्यामुळे सदरचा मृत्यू हा अपघाती मृत्यू या सदराखाली येत नाही. त्यांना झालेली दुखापत ही अपघाताने झाली नसून त्यांचे बी.पी.वाढले असल्यामुळे ते पडले व त्यामुळे झाली असल्याचे सामनेवाला यांचे कथन आहे. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (5) सामनेवाला यांनी आपल्या कथनासोबत रा.छ.शाहू म.ग.मे.कॉलेज आणि सी.पी.आर.हॉस्पिटल,कोल्हापूर यांचे श्री महादेव भाऊ पोवार यांचे नांवे देणेत आलेले रिपोर्टचे कागदपत्र, सी.पी.आर.व डॉ.दिपक पाटील यांचे सर्टीफिकेट तसेच दि.09/03/10 रोजी इन्शुरन्स पॉलीसी व क्लेम नाकारलेचे पत्र व स्लॅब परिपत्रक व सामनेवाला यांनी श्री पांडूरंग नागरी सह.पत संस्थेला दिलेले पत्र इत्यादी कागदपत्र दाखल केले. (6) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व दाखल कागदपत्रे व उभय पक्षांचा युक्तीवाद इत्यादीचा विचार करता तक्रारदाराची विमा पॉलीसी सामनेवाला यांनी मान्य केली आहे.त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत याबाबत वाद नाही. आता1) सामनेवाला यांच्या सेवेत त्रुटी आहे काय? व 2) असल्यास त्याबद्दल नुकसानभरपाई देय आहे काय? या मुद्दयांचा विचार करावयाचा आहे.
(7) तक्रारदार यांचा मृत्यू अपघाताने छातीवर पडल्यामुळे मार बसून झाला असे तक्रारदाराचे कथन आहे.त्याप्रमाणे मयत महादेव भाऊ पोवार यांच्यावर सी.पी.आर.हॉस्पिटलमध्ये उपचार करणा-या डॉ.दिपक पाटील यांनी मृत्यूचा दाखल्यामध्ये मृत्यूचे कारण"Hyper sensitive intraecerebral Haemorrahage."असे दिले आहे. पोलीस पंचनाम्यातही मयत महादेव पोवार शेताकडील ओढयाचे दरडीवरुन पाय घसरुन छातीवर पडल्यामुळे जखमी झाल्याचे म्हटले आहे. इन्व्हेस्टीगेशन ऑफिसर अॅड पांढरे यांनी डॉ.दिपक पाटील यांच्याशी चर्चा करुन मयत महादेव पाटील यांना पूर्वीपासून बी.पी.चा त्रास असावा व बी.पी.वाढल्यामुळे पडून ते जखमी झाले असावेत अशी शक्यता व्यक्ती केली आहे. परंतु हा केळव अंदाज आहे व मयत महादेव पोवार यांना पूर्वीपासून बी.पी.चा त्रास असल्याचे सामनेवाला यांनी कुठेही पुराव्यानिशी शाबीत केले नसल्यामुळे हे मंच ते ग्राहय धरु शकत नाही.तक्रारदाराचा क्लेम नाकारल्याचे कारण सामनेवाला यांनी तक्रारदारांना पाठवलेल्या पत्रात आवश्यक कागदपत्रे न पोचल्याचे कारण दिले आहे. परंतु तक्रारदाराने सर्व कागदपत्रे दाखल केलेली दिसून येत आहेत.
(8) शेतकरी अपघात विमा योजना कर्त्या माणसाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटूंबाची वाताहत होऊन ते उघडयावर पडू नये या उदात्त हेतुने महाराष्ट्र शासनाने सुरु केली आहे.परंतु सामनेवालाने केवळ तांत्रिक कारणे दाखवून गरीब,अशिक्षीत व दुर्गम भागात राहणा-या विधवा महिलेचा न्याययोग्य क्लेम नामंजूर केला आहे व ही सामनेवालाच्या सेवेतील गंभीर त्रुटी आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करणेत येते. 2) सामनेवाला कंपनीने तक्रारदारास विमा क्लेमचे रु.1,00,000/-(रु.एक लाख फक्त) दि.31/03/2006 पासून द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह दयावेत.
3) सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) दयावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |