घोषित द्वारा श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराचा मुलगा हा शाहु विद्यालय जायकवाडी उत्तर ता पैठण येथे इ 6 वी (अ) मध्ये शिकत होता. दिनांक 13/10/2007 रोजी सकाळी 5:30 वाजता फिरण्यासाठी गेला असता पाय घसरुन पडला, त्याचे डोके दगडावर आदळून गंभीर इजा झाली. त्यानंतर त्यावर औरंगाबाद येथे अपेक्स हॉस्पिटलध्ये आणि किल्लारीकर हॉस्पिटल येथे उपचार करण्यात आले. तक्रारदाराचा पाल्य प्रवीण करंजकर हा राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजनेचा लाभार्थी होता. तक्रारदारानी सर्व कागदपत्रासहीत क्लेमफॉर्म शाळेमार्फत गैरअर्जदाराकडे पाठवून दिला. ती रक्कम मिळाली नसल्यामुळे सदरील तक्रार. तक्रारदार गैरअर्जदाराकडून दवाखान्यात झालेला खर्च रु 14,929/- आणि 10,000/- तक्रारीचा खर्च मिळावा अशी मागणी करतात. तक्रारदारानी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली आहेत. गैरअर्जदारानी त्यांचा लेखी जवाब मंचात दाखल केला. त्यांच्या म्हणण्यानुसार राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजनेच्या अटी व शर्तीनुसार अपघाताबद्दल 15 दिवसाच्या आत गैरअर्जदारास कळविणे आवश्यक असते. तक्रारदारानी अपघाताविषयी कळविले नाही. तसेच क्लेमफॉर्म आणि आवश्यक ती कागदपत्रे अपघात झाल्यापासून एक महिन्याच्या आंत त्यांच्याकडे पाठविणे गरजेचे असते. अटी व शर्तीचे पालन केले नसल्यामुळे तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी ते करतात. गैरअर्जदारानी त्यांच्या अतिरिक्त लेखी जवाबात असे नमूद केले आहे की, पॉलिसीच्या क्लॉज क्रमांक 4 नुसार तक्रारदाराच्या मुलास गंभीर इजा झाली असल्यामुळे त्यास फक्त रु 2,000/- पॉलिसीप्रमाणे देण्यात येतील. तक्रारदारानी हॉस्पिटलचा खर्च रु 14,929/- आणि रु 10000/- तक्रारीचा खर्च याबद्दल मागितलेले आहेत ते देता येणार नाही. गैरअर्जदारानी त्यांच्या लेखी जवाबासोबत पॉलिसीची कागदपत्रे दाखल केली आहेत. दोन्हीही पक्षकारानी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदाराचा मुलगा हा पैठण येथील शाळेमध्ये इ 6 वी मध्ये शिकत होता आणि तो राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजनेचा लाभार्थी आहे. व्यायाम करीत असताना त्याचा पाय घसरुन त्यास गंभीर इजा होऊन त्यास हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले त्या उपचारासाठी आलेला खर्च तक्रारदार मागतात. राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजने अटी व शर्तीनुसार अशा अपघातातील वैद्यकीय उपचाराबद्दल फक्त रु 2000/- देता येतात. परंतु यात जर सर्जरी असेल तर रु 10,000/- देण्यात येतात. तक्रारदारानी त्यांच्या मुलाची सर्जरी केल्याचे दाखवून दिलेले नाही म्हणून तक्रारदारास पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार रु 2000/- मिळण्यास पात्र ठरतात असे मंचाचे मत आहे. म्हणून मंच गैरअर्जदारास असा आदेश देतो की, त्यांनी तक्रारदारास रु 2,000/- दिनांक 5/12/2007 पासून 9 टक्के व्याजदराने व तक्रारीचा खर्च रु 1000/- द्यावा. वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. आदेश - तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
- गैरअर्जदाराने या आदेशाच्या प्राप्तीपासून 6 आठवडयाच्या आंत तक्रारदारास रक्कम रु 2,000/- दिनांक 5/12/2007 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याजदराने तसेच तक्रारीचा खर्च रु 1,000/- द्यावा.
(श्रीमती रेखा कापडिया) (श्रीमती अंजली देशमुख) सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT | |