द्वारा - श्री.एस्.बी.धुमाळ : मा.अध्यक्ष
1. ग्राहक वाद संक्षिप्त स्वरुपात खालील प्रमाणे -
तक्रारदारांनी त्यांची मर्सिडीज कार नं.एम्एच्-01-955 साठी सामनेवाला विमा कंपनीकडून विमा पॉलिसी नं.131000/31/04/06480 घेतली. सदरची पॉलिसी ही दिनांक 25/02/2005 ते 24/02/2006 या कालावधीसाठी घेतली होती. सदर पॉलिसीची छायांकित प्रत तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत नि.‘अ’ला जोडली आहे.
2) तक्रारदारांच्या कारला दिनांक 28/04/2005 रोजी पेडर रोड येथे अपघात झाला. अपघाताच्यावेळी तक्रारदारांचा ड्रायव्हर कार चालवित होता व तक्रारदार सदर कारमध्ये बसले होते. पाठीमागून येणा-या मारुती 800 ने तक्रारदारांच्या कारला धडक दिली. सदर मारुती कारचा ड्रायव्हर हा शिकाऊ ड्रायव्हर होता व त्याच्या चुकीमुळे मारुती कारने तक्रारदारांच्या कारला पाठीमागून धडक दिली.
3) तक्रारदारांनी अपघातानंतर त्यांची कार दुरुस्तीसाठी मे.लतिफ ऑटो गॅरेजला नेली. दि.16/05/05 रोजी तक्रारदारांनी सामनेवाला यांचे डेव्हलपमेंट ऑफीसर श्री.जगदीशभाई जसानी यांना पत्र लिहिले व अपघातासंबंधी माहिती दिली व क्लेम फॉर्मची मागणी केली, तथापि, सामनेवाला यांनी तक्रारदारांना क्लेम फॉर्म पाठविला नाही. तक्रारदारांनी पुन्हा दिनांक 26/09/05 रोजी जगदीशभाई जसानी यांना पत्र लिहिले व सदर पत्रामध्ये अपघातासंबंधी त्यांनी गांवदेवी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविल्याचे कळविले. दि.30/09/2005 चे पत्राने तक्रारदारांनी सामनेवाला यांना त्यांचे क्लेम संबंधी लवकरात लवकर निर्णय घ्यावा व सर्व्हेअर तपासणीसाठी पाठवावा अशी विनंती केली.
4) श्री.जगदीशभाई जसानी, डेव्हलपमेंट ऑफीसर यांना तक्रारदारांनी दि.04/01/2006 चे पत्रासोबत मे.लतिफ ऑटो गॅरेजचा रु.44,000/- चा कॅश मेमो व मे.लालजी अण्ड सन्सचे रक्कम रु.40,551/-चे बिल पाठविले. तक्रारदारांनी एकूण रक्कम रु.84,551/- ची मागणी सदर पत्राद्वारे सामनेवाला यांचेकडे केली आहे. तक्रारदारांनी अनेक वेळा पत्र पाठवून तसेच, सामेनवाला यांचे कार्यालयात प्रत्यक्ष जावून त्यांच्या क्लेमसंबंधी निर्णय घेण्याची विनंती केल्यानंतर दि.26/04/2006 रोजी सामनेवाला यांनी तक्रारदारांना वरील क्लेमपोटी रक्कम रु.36,480/- मंजूर केले. दि.23/05/2006 रोजी तक्रारदारांनी सामनेवाला यांना पत्र पाठवून सामनेवाला यांनी मंजूर केलेली रक्कम प्रत्यक्ष कार दुरुस्तीसाठी झालेल्या खर्चापेक्षा अतिशय कमी असल्याचे निदर्शनास आणले. सामनेवाला यांनी या कामी सर्व्हेअर नेमणूकीसंबंधीची कल्पना सुध्दा तक्रारदारांना दिली नव्हती, सर्व्हेअरच्या रिपोर्टची प्रत तक्रारदारांना देण्यात आलेली नाही. सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या क्लेमसंबंधी निर्णय घेण्यास जाणूनबुजून विलंब लावला व सरतेशेवटी तक्रारदारांनी मागितलेल्या रकमेपैकी रक्कम रु.36,480/- मंजूर केली म्हणून तक्रारदारांनी सदरचा तक्रारअर्ज या मंचासमोर दाखल केला आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारांना कार दुरुस्तीच्या खर्चापोटी रक्कम रु.84,551/- द्यावेत असा आदेश सामनेवाला यांना करावा अशी विनंती केली आहे. तक्रारदारांनी वरील रकमेवर द.सा.द.शे.18 टक्के दराने व्याजाची मागणी केली आहे तसेच, या कामी तक्रारदारांना झालेल्या त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.1,00,000/-व या अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/-ची मागणी केली आहे. तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत यादीप्रमाणे कागदपत्रे दाखल केली आहेत.
5) सामनेवाला यांनी कैफीयत दाखल करुन तक्रारदारांची मागणी अमान्य केली आहे. तक्रारदार ग्राहक संरक्षण्ा कायदा, 1986 मधील तरतूदीनुसार ग्राहक नाहीत त्यामुळे या मंचास सदरचा तक्रारअर्ज चालविणेचा अधिकार नाही. तक्रारदारांनी सामनेवाला यांचेविरुध्द खोटे आरोप केलेले असून सदर तक्रारअर्ज खर्चासहित रद्द होणेस पात्र आहे असे सामनेवाला यांचे म्हणणे आहे.
6) सामनेवाला यांनी तक्रारअर्जात केलेले सर्व आरोप नाकारलेले आहेत. अपघात झाला त्यावेळी तक्रारदारांच्या गाडीला मारुती 800 ने पाठीमागून धडक दिली हा तक्रारदारांचा आरोप सामनेवाला यांनी नाकारला. तक्रारदारांच्या ड्रायव्हरकडे वाहन चालविणेचा वैध परवाना होता असे जरी तक्रारदारांनी म्हटले असले तरी सदचा परवाना सामनेवाला यांचेकडे सादर केलेला नाही. सामनेवाला यांनी विचारलेल्या प्रश्नांचा तक्रारदारांनी खुलासा केलेला नाही. तक्रारदारांनी विमा पॉलिसीच्या अटी व शर्तींचा भंग केलेला आहे. सामनेवाला यांनी याकामी सर्व्हेअरची नेमणूक केली व त्या सर्व्हेअरने याबाबत तपासणी करुन आपला अहवाल सामनेवाला यांना दिला. या सर्व्हेअर रिपोर्टची माहिती सामनेवाला यांनी तक्रारदारांना दिली होती व त्यामध्ये तक्रारदारांचा क्लेम रक्कम रु.27,335/- वर सेटल करावा असे सुचविण्यात आले होते. तक्रारदारांनी त्यानंतर कंन्झुमर एव्हीडंन्स सोसायटी यांचेकडे तक्रार दाखल केली होती. त्यामुळे सदरचा तक्रारअर्ज या मंचासमोर चालू शकत नाही. तक्रारदारांनी तक्रारअर्जात केलेल्या मागण्या चुकीच्या असून तक्रारअर्ज खर्चासहित रद्द होणेस पात्र आहे.
7) सामनेवाला यांनी Affidavit of Evidence दाखल केला असून त्यासोबत सर्व्हेअर एस्.के.बतीश आणि कंपनीच्या अहवालाची छायांकित प्रत हजर केली आहे.
8) तक्रारदारांनी Affidavit of Evidence दाखल केले. याकामी तक्रारदार व सामनेवाला यांनी आपापला लेखी युक्तिवाद दाखल केला.
9) दि.17/08/09 पासून सामनेवाला मंचासमोर हजर राहिले नाहीत सबब तक्रारदारांतर्फे अड श्वेता शर्मा यांचा तोंडी युक्तिवाद ऐकण्यात आला व सदर प्रकरण निकालासाठी ठेवण्यात आले.
10) निकालासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात -
मुद्दा क्र.1 - तक्रारदार हे सामनेवाला यांच्या सेवेत कमतरता आहे हे सिध्द करतात काय ?
उत्तर -होय.
मुद्दा क्र.2 - तक्रारदार यांना तक्रारअर्जात मागितल्याप्रमाणे कारच्या दुरुस्तीसाठी झालेल्या खर्चाची रक्कम रु.84,551/- 18 टक्के व्याजासहित तसेच,त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रु.1,00,000/- व अर्जाच्या
खर्चापोटी रक्कम रु.5,000/- वसुल करता येईल काय ?
उत्तर - अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
स्पष्टीकरण मुद्दा क्र.1 - तक्रारदारांनी त्यांची मर्सिडीज कार नं.एम्एच्-01-955 साठी सामनेवाला विमा कंपनीकडून विमा पॉलिसी नं.131000/31/04/06480 घेतली व सदरची पॉलिसी ही दिनांक 25/02/2005 ते 24/02/2006 या कालावधीसाठी घेतली होती. सदर पॉलिसीची छायांकित प्रत तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत नि.‘अ’ला सादर केली आहे. तक्रारदारांच्या मर्सिडीज कारसाठी सामनेवाला यांनी वरील पॉलिसी दिली होती ही बाब सामनेवाला यांना मान्य आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे दि.28/04/2005 रोजी पेडर रोड येथे त्यांच्या गाडीला पाठीमागून येणा-या मारुती 800 ने जोरात धडक दिल्याने त्यांच्या मर्सिडीज कारचे फार मोठे नुकसान झाले. सदरचा अपघात मारुती 800 कारच्या ड्रायव्हरच्या चुकीमुळे झाला. अपघातानंतर त्यांनी त्यांची अपघातग्रस्त गाडी मे.लतिफ ऑटो गॅरेजला नेली. तक्रारदारांच्या मर्सिडीज कारला दि.28/04/05 रोजी पेडर रोड येथे अपघात झाला होता ही बाब सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. तक्रारदारांनी वरील अपघातासंबंधीची माहिती सामनेवाला यांना दि.16/05/05 चे पत्राने दिली हे सामनेवाला यांना मान्य आहे. वरील पत्राची छायांकित प्रत तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत नि.‘ब’ ला सादर केली आहे. सदर पत्रामध्ये मारुती कारच्या ड्रायव्हरने त्यांच्या मर्सिडीज कारला पाठीमागून धडक दिल्यामुळे अपघात होवून त्यांच्या गाडीचे नुकसान झाले असे नमूद केले आहे. सदर पत्रामध्ये तक्रारदारांनी 2 आठवडयांपूर्वीच सामनेवाला यांना अपघातासंबंधी माहिती दिली असताना सुध्दा सामनेवाला यांनी प्रतिसाद दिला नाही व तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडून क्लेम फॉर्मची मागणी करुनही त्यांना तो देणेत आलेला नाही असे नमूद करुन सदर क्लेम फॉर्म ताबडतोब पाठवावा अशी विनंती तक्रारदारांनी केली आहे. वरील पत्रास सामनेवाला यांनी प्रतिसाद न दिल्यामुळे दि.26/09/05 रोजी तक्रारदारांनी सामनेवाला यांचे डेव्हलपमेंट ऑफीसर श्री.जगदीशभाई जसानी यांना अपघाताची खबर गावदेवी पोलीस स्टेशनला दिली असून क्लेम फॉर्म पाठविण्याची विनंती केली. वरील पत्रानंतर सुध्दा सामनेवाला यांनी कार्यवाही न केल्यामुळे तक्रारदारांनी दि.30/09/2005 रोजी सामनेवाला यांना पत्र पाठवून त्यांच्या अपघातग्रस्त गाडीच्या दुरुस्तीसाठी ताबडतोब कार्यवाही करावी व सर्व्हेअरला सदर गाडीची तपासणी करण्यासाठी पाठविण्यात यावे अशी विनंती केल्याचे दिसून येते. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे पत्र लिहून सुध्दा सामनेवाला यांनी योग्य तो प्रतिसाद दिला नाही व तक्रारदारांना सर्व्हेअर नेमणूकीसंबंधी काहीही कळविले नाही. अशा परिस्थितीत तक्रारदारांनी मे.लतिफ ऑटो गॅरेजमध्ये त्यांची गाडी दुरुस्त करुन घेतली त्यासाठी त्यांना रु.40,551/- चे स्पेअर पार्टस् मे.लालजी आणि सन्स् कं.लि.कडून विकत घ्यावे लागले व मे.लतिफ ऑटो गॅरेजला गाडी दुरुस्तीसाठी रु,40,000/- द्यावे लागले. मे.लतिफ ऑटो गॅरेजचे बील तसेच स्पेअर पार्टस् विकत घेतल्याचे बील तक्रारदारांनी सामनेवाला यांना दिनांक 04/01/2006 चे पत्रासोबत पाठवून वरील खर्चाच्या परिपूर्ततेची मागणी केली. तक्रारदारांनी दि.04/01/2006 चे पत्र व त्यासोबतची मे.लतिफ ऑटो गॅरेजचा कॅश मेमोच्या प्रती सादर केल्या.
दि.26/04/2006 चे पत्राने सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या क्लेमपोटी एकूण रक्कम रु.36,480/- मंजूर केली. तथापि, तक्रारदारांनी सदर रक्कम स्विकारण्याचे नाकारले. सामनेवाला यांचे म्हणण्याप्रमाणे तक्रारदारांनी क्लेम सादर केल्यानंतर सामनेवाला यांनी मे.एस्.के.बतिश आणि कंपनी यांची सर्व्हेअर म्हणून नेमणूक केली. सदरच्या सर्व्हेअरने तक्रारदारांनी सादर केलेली बीले, गॅरेजच्या स्पेअर पार्टसच्या बीलांची छाननी करुन तक्रारदारांचा क्लेम रु.36,500/- मंजूर करणेस हरकत नाही असा अहवाल दिला. सदर अहवालाची छायांकित प्रत सामनेवाला यांनी कैफीयतीसोबत नि.2 ला सादर केली आहे.
सर्व्हेअर यांच्या म्हणण्याप्रमाणे मे.लतिफ ऑटो गॅरेजच्या बीलांची छाननी केल्यानंतर त्यांना गॅरेजची बीले अवास्तव जादा असल्याचे दिसून आले व त्याबाबतचा स्पष्ट तपशील सर्व्हेअरने आपल्या अहवालात दिला असून सर्व्हेअरने आपल्या अहवालामध्ये तक्रारदाराने गॅरेजच्या खर्चाची रक्कम रु.65,449/-चे बीलापोटी फक्त रु.27,335/- तक्रारदाराला देणे योग्य होईल तसेच, खरेदी केलेल्या स्पेअर पार्टस् हे अपघातग्रस्त गाडीच्ो नुकसान झाले त्यापेक्षा जास्त खरेदी करणेत आले होते असे म्हणून त्यापोटी रक्कम रु.35,000/- मंजूर करावेत व त्यातून 50 टक्के डिप्रीशिएशन मेटलपार्ट व रबर पार्टचे वजा करावेत असे सुचविले आहे.
तक्रारदारांच्या मर्सिडीज कारला अपघात दि.28/04/05 रोजी झाला. अपघातानंतर तक्रारदारांनी सामनेवाला यांना दि.16/05/05 रोजी पत्र पाठविले होते ही बाब सामनेवाला यांना मान्य आहे. सदर पत्रामध्ये तक्रारदारांनी 2 आठवडयापूर्वीच सामनेवाला सदर अपघाताची माहिती दिली होती तरी सुध्दा सामनेवाला यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही असा आरोप त्यांनी केला आहे. या पत्रातील मजकूर सामनेवाला यांनी नाकारलेला नाही. वरील पत्रानंतर तक्रारदारांनी दिनांक 26/09/2005 व 30/09/2005 रोजी सामनेवाला यांना पत्र पाठवून सर्व्हेअरची नेमणूक करावी व त्यांच्या गाडीच्या दुरुस्तीसाठी त्वरित कार्यवाही करावी अशी विनंती केली होती. वरील पत्र मिळाल्याचे सामनेवाला यांना मान्य आहे. वास्तविक अपघातात तक्रारदारांच्या कारचे नुकसान झाले आहे ही माहिती मिळाल्यानंतर सामनेवाला यांनी त्वरित सर्व्हेअरची नेमणूक करुन झालेल्या नुकसानीचे अंदाज काढणे आवश्यक होते परंतू या कामी सामनेवाला यांनी ताबडतोब सर्व्हेअरची नेमणूक केली नाही. अशा परिस्थितीत तक्रारदारांना त्यांची गाडी दुरुस्त करण्यासाठी मे.लालजी आणि सन्स कं. यांचेकडून स्पेअर पार्टस् खरेदी करुन मे.लतिफ ऑटो गॅरेजकडून गाडी दुरुस्त करुन घ्यावी लागली. वरील कार दुरुस्तीसाठी झालेल्या खर्चाची बीले तक्रारदारांनी सामनेवाला यांना दि.04/01/2006 चे पत्रासोबत पाठविले असल्याचे दिसून येते. सामनेवाला यांनी नेमलेल्या सर्व्हेअरने तक्रारदारांच्या अपघातग्रस्त गाडीच्या नुकसानीची पाहणी केली असे दिसून येत नाही. सर्व्हेअरच्या रिपोर्टवरुन असे स्पष्ट होते की, सर्व्हेअरने सादर केलेली गॅरेजची स्पेअर पार्टसच्या बीलांची छाननी करुन आपल्या अहवालामध्ये गॅरेजची बीलांची रक्कम जादा आहे असे नमूद केले आहे. अपघातात नुकसान झालेल्या गाडीची पाहणी न करता केवळ बीलांची छाननी करुन सर्व्हेअरने दिलेला अहवालाला महत्व देता येणार नाही. तथापि, सामनेवाला यांनी सदर रिपोर्टच्या आधारावर तक्रारदारांचा क्लेम कमी रकमेवरती मंजूर केला. सर्व्हेअरने अहवालात तक्रारदारांचा क्लेम विमा पॉलिसीच्या अटी व शर्तींप्रमाणे कमी करणेत आला आहे असे म्हटले आहे. तथापि, विमा पॉलिसीच्या अटी व शर्ती सामेनवाला यांनी या मंचासमोर सादर केलेल्या नाहीत. वास्तविक तक्रारदारांच्या कारला अपघात झाल्यानंतर सामनेवाला यांनी ताबडतोब सर्व्हेअरची नेमणूक करुन कारची पाहणी करुन नुकसानीचा अंदाज घेणे आवश्यक होते तथापि, या कारणासाठी तक्रारदारांनी वेळोवेळी पत्र पाठवून सुध्दा सामनेवाला यांनी योग्य ती कार्यवाही केली नाही. सामनेवाला यांनी अगदी उशिराने सर्व्हेअरची नेमणूक केली तोपर्यंत तक्रारदारांनी सदरची कार दुरुस्त करुन घेतली असे दिसते. सर्व्हेअरच्या तथाकथीत रिपोर्टवर अवलंबून राहून तक्रारदारांनी सादर केलेला रक्कम रु.84,551/- च्या क्लेमपैकी सामनेवाला यांनी फक्त रक्कम रु.36,480/- चा क्लेम मंजूर केला. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्यक्ष तक्रारदारांनी रु.84,551/- इतका खर्च केला असल्यामुळे वरील रु.36,480/- तक्रारदारांनी घेण्याचे नाकारले. वरील बाबींचा विचार करता तक्रारदारांनी सामनेवाला यांचे सेवेत कमतरता आहे हे सिध्द केले आहे असे म्हणावे लागते. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
स्पष्टीकरण मुद्दा क्र.2 - तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडून त्यांच्या अपघातग्रस्त कारच्या दुरुस्तीचा खर्च रक्कम रु.84,551/- ची मागणी केली आहे. विमा पॉलिसीमध्ये आश्वासित रक्कम रु.1,50,000/- नमूद करणेत आली आहे. तक्रारदारांनी कारच्या दुरुस्तीसाठी खर्च झालेल्या रकमेची बीले सामनेवाला यांचेकडे सादर केली आहेत. अपघातात कारचे झालेल्या नुकसानीपेक्षा जास्त दुरुस्ती तक्रारदारांनी करुन घेतली या सामनेवालेंच्या म्हणण्यात तथ्य वाटत नाही. सामनेवाला यांनी मुद्दामहून तक्रारदारांना कमी रक्कम रु.36,480/- मंजूर केल्याचे दिसते. तक्रारदारांनी त्या कारच्या दुरुस्तीसाठी एकूण रक्कम रु.84,551/- खर्च केल्याचे दिसते. सबब सामनेवाला यांनी तक्रारदारांना रक्कम रु.84,551/- द्यावेत असा आदेश करणे योग्य होईल.
तक्रारदारांनी वरील रक्कम रु.84,551/- यावर द.सा.द.शे.18 टक्के दराने व्याजाची मागणी केली आहे. तक्रारदारांनी केलेली व्याजाच्या दराची मागणी ही अवास्तव जादा आहे. या तक्रारअर्जातील वस्तुस्थितीचा विचार करता सामनेवाला यांनी तक्रारदारांना रक्कम रु.84,551/- यावर दि.26/04/2006 पासून संपूर्ण रक्कम तक्रारदारांना मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज द्यावे असा आदेश करणे योग्य होईल.
क्लेमसंबंधी निणर्य घेण्यास सामेनवाला यांनी विलंब लावला त्यामुळे तक्रारदारांना झालेल्या मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.1,00,000/- तसेच, या अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/- ची मागणी तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडून केली आहे. वरील प्रकरणातील वस्तुस्थितीचा विचार करता सामेनवाला यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व या अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/- द्यावेत असा आदेश करणे योग्य होईल. सबब मुद्दा क्र.2 चे उत्तर त्याप्रमाणे देण्यात येते.
वर नमूद कारणास्तव तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत असून खालील प्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहे -
अं ति म आ दे श
1.तक्रार क्रमांक 298/2007 अंशतः मंजूर करणेत येत आहे.
2.सामनेवाला यांनी तक्रारदारांना रक्कम रु.84,551/- (रु.चौ-याऐंशी हजार पाचशे एकावन्न मात्र) द्यावेत व वरील रकमेवर दि.26/04/2006 पासून द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज संपूर्ण रक्कम
तक्रारदारांना मिळेपर्यंत द्यावी.
3.सामनेवाला यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.5,000/- (रु.पाच हजार मात्र) व या अर्जाचा खर्च म्हणून रक्क्म रु.1,000/-(रु.एक हजार मात्र) द्यावेत.
4. सामनेवाला यांनी वरील आदेशाची अंमलबजावणी या आदेशाची प्रत प्राप्त झालेल्या तारखेपासून 1 महिन्याच्या आत करावी.
5. सदर आदेशाची प्रमाणित प्रत सर्व पक्षकारांना देणेत यावी.