नि.17
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्य - श्री के.डी.कुबल
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 2178/2009
तक्रार नोंद तारीख : 12/10/2009
तक्रार दाखल तारीख : 30/10/2009
निकाल तारीख : 25/03/2013
----------------------------------------------
श्री सदाशिव बापु मस्के
वय 44 वर्षे, धंदा – ट्रक मालक
रा.सिध्देश्वर सोसायटी, प्लॉट नं.6/7,
जुना बुधगांव रोड, पंचशीलनगर, सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
दी न्यू इंडिया एश्योरन्स कं.लि.
शाखा कामगार भवन, म.गांधी रोड,
सांगली, सध्या शाखा टाटा पेट्रोल पंपाशेजारी,
गेस्ट हाऊस, सांगली ...... जाबदार
तक्रारदार तर्फे : अॅड जे.व्ही.नवले
जाबदारतर्फे : अॅड श्रीमती एम.एम.दुबे
- नि का ल प त्र -
द्वारा: मा. अध्यक्ष: श्री. ए.व्ही.देशपांडे
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने जाब देणार विमा कंपनीने दिलेल्या सदोष सेवेबाबत दाखल करुन त्यांचेकडून एकूण रक्कम रु.1,32,000/- ची मागणी केली आहे.
2. तक्रारअर्जातील थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदाराने सन 2005 साली ट्रक नं.एमएच 10/झेड 560 हा सिटी कॉर्पोरेशन फायनान्सकडून द.सा.द.शे. 8 टक्के दराने कर्ज घेवून विकत घेतला व त्या ट्रकचे उत्पन्नावरच त्याचा उदरनिर्वाह चालत होता. सदर ट्रकचा सर्वसमावेशक जोखमीचा विमा दि.25/8/06 ते 24/8/07 या कालावधीकरिता तक्रारदाराने जाबदार विमा कंपनीकडून घेतला. दि.21/2/07 रोजी सदर ट्रकचा अपघात झाला. त्या अपघातात सदर ट्रकचे बरेच नुकसान झाले. अपघातानंतर त्वरित तक्रारदाराने जाबदार विमा कंपनीला ट्रकला अपघात झाल्याचे कळविले. जाबदार विमा कंपनीने अपघातस्थळी आपला सर्व्हेअर पाठवून स्पॉट सर्व्हे केला व त्यानंतर तो ट्रक सांगली येथे जाबदार विमा कंपनीचे संमतीने दुरुस्ती करण्याकरिता आणण्यात आला. त्यावेळी विमा कंपनीने तक्रारदाराचे ट्रकचे स्पेअर पार्टस व दुरुस्तीच्या होणा-या बिलांची सर्व रक्कम सुरुवातीस तक्रारदाराने भागवावी व विमा कंपनी त्या संपूर्ण बिलाचा चेक नंतर पाठवित आहे असे सांगितले. तक्रारदाराने कसेबसे दुरुस्तीच्या बिलाची रक्कम उभी करुन ट्रक दुरुस्त करुन घेतला. दुरुस्तीकरिता 3-4 महिन्यांचा कालावधी गेला व त्या 4 महिन्यांचे उत्पन्न तक्रारदारास मिळाले नाही. दुरुस्ती व स्पेअर पार्टसकरिता तक्रारदाराची सुमारे रु.1 लाखापेक्षा जास्त रक्कम खर्च झालेली आहे. या सर्व बिलांच्या मूळ पावत्या तक्रारदाराने विमा कंपनीस वेळोवेळी दिलेल्या आहेत. विमा कंपनीच्या सांगण्याप्रमाणे क्लेम फॉर्म, पोलिस पेपर्स, आदी सर्व कागदपत्रे विमा कंपनीकडे दिली आहेत. सदर बिलांच्या रकमा भागविण्याकरिता तक्रारदारास लोकांकडून खाजगी उसनवार रक्कम घेवून दुरुस्तीची रक्कम उभी करावी लागली. त्या खाजगी लोकांकडून सारखी रकमांची मागणी होत असल्यामुळे त्या दुरुस्त ट्रकवर तक्रारदाराने सिटी कॉर्पोरेशनकडून द.सा.द.शे. 16.25 टक्के व्याजदराने दि.29/4/2008 रोजी नवीन कर्ज घेतले. आश्वासनाप्रमाणे जाबदारकडून विम्याची रक्कम न मिळाल्याने तक्रारदार विमा कंपनीकडे वारंवार चौकशी केली असता विमा कंपनीने तक्रारदारास “ट्रकमध्ये प्रवासी होते असे आम्हांस समजून आले आहे त्यामुळे जर तुम्ही आमच्या सांगणेप्रमाणे लिहून अर्ज करुन दिलात तर तुमचा क्लेम नॉन स्टँडर्ड क्लेमने मंजूर करु आणि त्याप्रमाणे होणा-या रकमेचा चेक काढू ” असे तोंडी सांगितले. अपघातामुळे महिने ट्रकपासून उत्पन्न न मिळाल्याने व ट्रकच्या कर्जाचे हप्ते वेळेत न भरल्याने दंड होणार असल्याने नाईलाजाने दि.28/8/2007 रोजी तक्रारदाराने जाबदार विमा कंपनीकडे विमा कंपनीचे सांगण्याप्रमाणे त्यांचेच कार्यालयात बसून अर्ज लिहून दिला, त्यावेळी विमा कंपनीने 8 दिवसात तडजोड बेसीसवर होणा-या रकमेचा चेक पाठवतो असे सांगितले. पण तोही चेक न पाठवता आणि कोणताही खुलासा न करता दि.30/10/07 ज्या पत्राने “ पॉलिसी अटींचा भंग झालेला आहे त्यामुळे तुमची क्लेम फाईल बंद करीत आहोत ” असे विमा कंपनीने कळविले. जाबदार कंपनीने क्लेम का नामंजूर केला याबाबत वारंवार विचारणा करुनही जाबदार कंपनीने त्यांचा कोणताही खुलासा केलेला नाही. दि.3/4/2008 व दि.29/9/09 रोजी लेखी पत्र पाठवून तक्रारदाराने विमा कंपनीकडून या क्लेम संदर्भातील बिले सर्व्हे रिपोर्ट, इ. सर्व कागदपत्रांच्या नकला देण्याबाबत व त्या रकमा देण्याचा जो काही खर्च होईल तोही देण्याची तयारी असल्याचे कळवून देखील जाबदार विमा कंपनीने सर्व्हे रिपोर्ट किंवा कोणत्याही पत्र व्यवहाराच्या नकला तक्रारदारास दिल्या नाहीत किंवा त्याबाबत आजतागायत कळविलेले नाही. त्यावरुन विमा कंपनी ही कोणते तरी कारण शोधून काढून त्या सबबीचे निमित्त करुन तक्रारदाराचा विमादावा अयोग्य कारणाकरिता देण्याचे नाकारुन सदोष सेवा देत आहेत. त्या अपघातात ट्रकचे क्लिनरचा मृत्यू झाला आहे. क्लिनरचे अपघाती रकमेबद्दलची रु.1 लाखाची जोखमीचे हप्ते तक्रारदारने भरले होते. सदर क्लिनरच्या मृत्यूबाबत विमा कंपनीने अपघातानंतर 1 वर्ष 3 महिन्यांनी नुकसान भरपाईचा चेक तक्रारदारास दिला आहे. क्लिनरच्या अपघाती मृत्यूचा क्लेम देण्यास उशिर केल्याने व ट्रकच्या नुकसानीचा क्लेम देण्याचे नाकारल्यामुळे व गेले 15 वर्षापासून तक्रारदाराने जाबदार कंपनीचे ग्राहक असूनही येनकेनप्रकारे जाबदार विमा कंपनी तक्रारदाराचा विमा दावा नाकारीत असल्याने तक्रारदारास मानसिक धक्का सहन करावा लागला. लोकांची देणी लवकर न भागविता आल्याने त्रास सहन करावा लागला आणि नंतर कर्जाचे व्याज भरावे लागले याकरिता तक्रारदारास नुकसान भरपाई मिळण्याबाबत मागणी करावी लागत आहे. दि.30/10/07 चे पत्र पाठवून क्लेम फाईल बंद केल्याचे दाखवून क्लेम देण्याचे नाकारले म्हणून या दिवशी तक्रारीस कारण प्रथम घडले त्यामुळे सदरची तक्रार मुदतीत आहे. अशा कथनावंरुन तक्रारदाराने ट्रकचे स्पेअर पार्टस दुरुस्ती बिलापोटी रक्कम रु.1 लाख, त्याला सहन करावा लागलेला मानसिक धक्का व वेदना व कर्ज काढावे लागल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागले त्यापोटी रु.30,000/- आणि अर्जाचे टायपिंग, झेरॉक्स इ. खर्चापोटी रु.2,000/- अशी एकूण रु.1,32,000/- ची मागणी तक्रारदाराने केलेली आहे. सदर रकमेवर अपघात तारखेपासून योग्य त्या दराने व्याजदेखील तक्रारदाराने मागितले आहे. तसेच या अर्जाचा खर्च जाबदारकडून वसूल होवून मिळावा अशीही विनंती त्यांनी केली आहे.
सदर तक्रारीसोबत तक्रारदाराने आपले शपथपत्र नि.3 लादाखल करुन फेरिस्त नि.5 ला एकूण 8 कागदपत्रे दाखल केली आहेत.
3. जाबदार विमा कंपनीने आपली लेखी कैफियत नि.12 ला दाखल करुन तक्रारदाराची सर्व विधाने स्पष्टपणे नाकबूल केलेली आहेत. ट्रक नं.एमएच 10/झेड 560 हा तक्रारदाराच्या मालकीचा ट्रक असून त्याचा विमा दि.25/8/06 ते 24/08/07 या मुदतीकरिता जाबदार विमा कंपनीकडे उतरविलेला होता ही बाब जाबदार कंपनीने मान्य केलेली आहे. दि.21/2/2007 रोजी सदर ट्रकला अपघात झाला ही बाब जाबदार विमा कंपनीने स्पष्टपणे नाकारली नाही. सदर अपघातात ट्रकच्या झालेल्या नुकसानीची भरपाई विमा कंपनीने केली नाही ही बाब देखील जाबदार कंपनीने मान्य केली आहे. तक्रारदाराची त्या बाबतीतील सर्व विधाने जाबदार विमा कंपनीने स्पष्टपणे नाकारलेली आहेत. विमा कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे सदरचा ट्रक हा मालवाहतुकीचे वाहन होते. त्यामधून प्रवासी वाहतूक करण्यासाठी परवानगी नाही व नसते. अपघाताचे वेळी सदर ट्रकमधून प्रवासी प्रवास करीत होते ही बाब तक्रारदाराने जाबदार विमा कंपनीपासून लपवून ठेवली. ज्यावेळी सदर ट्रकमध्ये अपघाताचेवेळी प्रवासी होते ही गोष्ट विमा कंपनीला कळाली, त्यावेळेला तक्रारदाराने अपघाताचे वेळी ट्रकमध्ये प्रवासी होते असे जाबदार कंपनीला लिहून दिले. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने तक्रारदारचा विमा दावा मंजूर करता येत नव्हता, त्यामुळे सदर कारणावरुन तक्रारदारास त्याचा विमा क्लेम मंजूर करता येत नाही असे जाबदार विमा कंपनीने कळविले आहे. त्यामुळे तक्रारदाराचा विमा दावा अयोग्य कारणाकरिता नाकारला हे खरे नाही. तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे जी कागदपत्रे दाखल केली आहेत, त्यावरुन अपघाताचे वेळी ट्रकमध्ये प्रवासी होते हे दिसून येते. तक्रारदारास देण्यात आलेल्या विमा पॉलिसीच्या दर्शनी भागावर त्या पॉलिसीच्या अटींचा भंग विमेदाराकडून झाल्यास विमा कंपनी कोणतीही नुकसान भरपाई देण्यास जबाबदार राहणार नाही याचा स्पष्ट उल्लेख केला आहे व त्या अटीची स्पष्ट जाणीवदेखील तक्रारदारास विमा पॉलिसी घेत असतान दिलेली होती. असे असतानादेखील सदरच्या मालवाहतूक वाहनामध्ये प्रवासी बसवून तक्रारदाराने पॉलिसीमधील अटी व शर्तींचा भंग केला आहे. त्यामुळे योग्य कारणाकरिताच जाबदार यांनी अर्जदार यांचा विमा क्लेम नामंजूर केलेला आहे, सबब प्रस्तुत तक्रारीकरीता कोणतेही कारण घडलेले नाही. जाबदार विमा कंपनीचे म्हणण्याप्रमाणे ती तक्रारदारास कोणतीही रक्कम देण्यास जबाबदार नाही. या सर्व कारणांवरुन व कथनावरुन जाबदारने प्रस्तुतची तक्रार खर्चासह नामंजूर करावी अशी विनंती केली आहे.
जाबदार विमा कंपनीने आपल्या म्हणण्याचे पुष्ठयर्थ नि.13 ला विभागीय अधिकारी सौ लचके यांचे शपथपत्र दाखल करुन फेरिस्त नि. 14 सोबत सर्व्हे रिपोर्ट व विमा नाकारलेचे पत्र दि.30/10/07 चे दाखल केले आहे.
4. प्रस्तुतचे प्रकरणात कोणीही पक्षकाराने मौखिक पुरावा दिलेला नाही. तक्रारदारतर्फे नि. 16 ला लेखी युक्तिवाद दाखल करण्यात आला आहे तर जाबदार विमा कंपनीतर्फे त्यांच्या विद्वान वकीलांचा युक्तिवाद ऐकून घेण्यात आला आहे.
सदर प्रकरणी खालील मुद्दे आमच्या निष्कर्षाकरिता उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1. तक्रारदार जाबदार कंपनीचा ग्राहक होतो काय ? होय.
2. जाबदार विमा कंपनीने तक्रारदार यांचा विमादावा नाकारुन सदोष
सेवा दिली आहे ही बाब तक्रारदार यांनी सिध्द केली आहे काय ? नाही
3. अंतिम आदेश खालीलप्रमाणे.
आमच्या वरील निष्कर्षाची कारणे खालीलप्रमाणे आहेत.
कारणे
5. मुद्दा क्र.1
तक्रारदार अपघातग्रस्त ट्रकचा मालक होता व त्याने वर नमूद केलेल्या कालावधीकरिता सदर अपघाताचा विमा जाबदार विमा कंपनीकडे उतरविलेला होता ही बाब दोन्ही पक्षकारांना मान्य आहे. सदर विमा पॉलिसी ही सर्वसमावेशक पॉलिसी होती ही देखील बाब दोन्ही पक्षकारांना मान्य आहे. सदर ट्रकचा अपघात दि.21/2/2007 या तारखेस झाला ही बाब देखील दोन्ही पक्षकारांना मान्य आहे. सदरचे अपघातात ट्रकचे बरेच नुकसान झाले व त्यात त्या ट्रकवरचा क्लिनर मरण पावला आणि त्याचे विम्याची भरपाई जाबदार कंपनीने दिली ही बाब देखील दोन्ही पक्षकारांना मान्य आहे. या सर्व बाबींवरुन ही गोष्ट स्पष्ट होते की तक्रारदार हा जाबदार विमा कंपनीचा ग्राहक आहे आणि त्याने उपस्थित केलेली तक्रार ही ग्राहक तक्रार आहे. सबब हे मंच तक्रारदार हा विमा कंपनीचा ग्राहक होतो या निष्कर्षास आलेला आहे आणि म्हणून वर नमूद केलेल्या मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी दिलेले आहे.
6. मुद्दा क्र.2
सदरच्या प्रकरणातील सर्व तथ्य/Facts दोन्ही पक्षकारांना जवळपास मान्य आहेत. त्यामुळे प्रस्तुतचे प्रकरणातील बाबी/Facts यांचेमध्ये जास्त न गुंतता या प्रकरणातील जो मुख्य मुद्दा आहे त्याचा विचार करणे आवश्यक आहे असे आम्हांस वाटते. तो मुद्दा असा की, अपघाताचे दिवशी सदर ट्रकचा सर्वसमावेशक विमा विमा कंपनीकडे उतरविलेला असताना देखील विमा कंपनीस सदर अपघाताबद्दल व ट्रकचे नुकसानीबद्दल विम्याच्या रकमेची मागणी नाकारता येते किंवा नाही आणि ती नाकारताना जाबदार कंपनीने तक्रारदारास काही सदोष सेवा दिली किंवा नाही.
7. विमा कंपनीची लेखी कैफियत जर आपण अवलोकीली तर त्यावरुन असे दिसते की सदरची विमा पॉलिसी ही काही अटी व शर्तींवर अवलंबून आहे. त्या अटी आणि शर्तीमध्ये एक अट अशी देखील आहे की, सदरच्या माल वाहतुकीच्या वाहनातून कोणत्याही प्रवाशाची वाहतूक केली जाणार नाही. मोटार वाहन कायदा आणि त्याखालील अधिनियमामध्येही माल वाहतुकीच्या वाहनामधून प्रवासी वाहतूक करण्यास मनाई केलेली आहे आणि त्यास गुन्हा मानण्यात आला आहे. जर आपण तक्रारदाराची तक्रार बारकाईने वाचली तर त्यातून हे स्पष्टपणे दिसते की अपघाताचे वेळी सदरचे ट्रकमधून प्रवासी प्रवास करीत होते ही बाब त्याने मान्य केलेली आहे आणि तसे त्याने विमा कंपनीसमोर लिहूनही दिलेले आहे. अर्थात विमा कंपनीसमोर तसे लेखी कबूल करण्यास जी कारणांची काही पूर्वपिठीका तक्रारदाराने आपल्या तक्रारीत नमूद केलेली आहे, त्याचा थोडक्यात गोषवारा असा की, अशा पध्दतीने लिहून देण्यामागे त्यावर काही घटकांचा आणि विमा कंपनीचा दबाव होता व त्या दबावाखाली त्यांनी सदर ट्रकमध्ये अपघाताचेवेळी प्रवासी प्रवास करीत होते, सबब त्यांना नॉन स्टँडर्ड क्लेमप्रमाणे त्यांच्या क्लेम मंजूर करावा असे विमा कंपनीने लिहून देण्यास भाग पाडले. थोडक्यात तक्रारदारास असे म्हणावयाचे आहे की, सदरची बाब विमा कंपनीला लिहून देताना त्याने स्वेच्छेने सदर गोष्ट विमा कंपनीस लिहून दिलेली नाही. सदरचे दि.28/8/07 चे पत्र “ मूळ ” तक्रारदाराने फेरीस्त नि.5 सोबत याप्रकरणी हजर केले आहे. त्याचे अवलोकन करता असे दिसते की, तक्रारदाराने त्या पत्रात अपघातसमयी त्यांचे ट्रकमध्ये बाळासाहेब दादू खोत रा. सातारा हा प्रवासी प्रवास करीत होता असे स्पष्टपणे नमूद केलेले आहे. सदरच्या पत्रावर कोठेही ते पत्र त्याने विमा कंपनीला दिले याबद्दल कसलीही पोच किंवा विमा कंपनीचे कोणत्याही अधिका-यांची सही इ. घेतलेली नाही. तथापि सदरचे पत्र आपण काही दबावामुळे लिहून दिले आणि हे पत्र स्वेच्छेने लिहीलेले नाही हे सिध्द करण्याची किंवा त्याचे शाबीतीकरणाची मोठी जबाबदारी (Burden of proof) हे तक्रारदारांवर होते. हे जरुर आहे की, ग्राहक मंचासमोरील तक्रारीत किंवा प्रकरणात पुराव्याचा कायद्याची तरतूद संपूर्णतया लागू नाही तथापि त्याचा अर्थ असा होत नाही की, ज्या बाबी सिध्द करावयाच्या आहेत त्यांची प्राथमिक जबाबदारी देखील पक्षकाराने टाळावी. तक्रारदारास प्रस्तुतचे प्रकरणामध्ये ज्या कोणत्या घटनेच्या दबावाखाली सदरचे पत्र त्याने लिहून दिले, हे शपथेवर सांगून विरुध्द पक्षकाराला त्याबाबत उलटतपास करण्याची संधी देवून मगच सदर बाब सिध्द झाली किंवा नाही याबद्दलचा ऊहापोह करणे जरुर होते. दि.28/8/07 चे जे पत्र या प्रकरणात तक्रारदाराने नि.5 ला जोडलेले आहे, ते मुळ पत्र असल्याचे दिसते. मग हे पत्र जर तक्रारदाराने जाबदारांचे हक्कात लिहून दिले होते तर ते पत्र जाबदाराच्या ताब्यात असणे आवश्यक होते आणि त्या कंपनीच्या अभिलेखावर असावयास पाहिजे होते. ते मूळ पत्र तक्रारदाराच्या ताब्यात कसे राहिले हे त्याने कोठेही स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे सदर पत्राचे सत्यतेबद्दल शंका निर्माण होत आहे. मग जर असे असेल तर काही दबावामुळे मी अपघाताचे वेळी सदर अपघातग्रस्त वाहनामध्ये प्रवासी होते असे लिहून दिले असे तक्रारदारास म्हणता येत नाही. मग जर तसे असेल तर अपघाताचे वेळी सदर ट्रकमध्ये विमा पॉलिसीचे अटींचा भंग करुन प्रवासी प्रवास करीत होते ही बाब आपोआपच सिध्द होते. मग जर असे असेल तर विमा पॉलिसीच्या अटीचा भंग झाला म्हणून विमा कंपनी तक्रारदाराने मागितलेली नुकसान भरपाई देण्यास जबाबदार होत असे म्हणता येत नाही. करिता सदर विमा दावा विमा कंपनीने सुयोग्य कारणाने व विमा पॉलिसीच्या अटीचा भंग झाल्यामुळे नाकारला आहे असेच म्हणावे लागेल. त्यायोगे तक्रारदारांना विमा कंपनीने कोणतीही सदोष सेवा दिल्याचे दिसत नाही. सबब हे मंच जाबदार विमा कंपनीने सदोष सेवा दिली हे तक्रारदाराचे कथन तक्रारदाराने सिध्द केलेले नाही या निष्कर्षाप्रत आलेले आहे आणि म्हणून वर नमूद केलेल्या मुद्दा क्र.2 चे उत्तर नकारार्थी दिलेले आहे.
8. मुद्दा क्र.3
ज्या अर्थी विमा कंपनीने तक्रारदारास कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही, त्याअर्थी प्रस्तुत प्रकरणात कोणतीही ग्राहक तक्रार उपस्थित होत नाही आणि त्यामुळे तक्रादारास मागितलेली कोणतीही रक्कम मिळणेस तो पात्र नाही, सबब ही तक्रार खर्चासह नामंजूर करावी असे या मंचाचे नम्र मत आहे. सबब आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
- आ दे श -
प्रस्तुतची तक्रार ही रक्कम रु.500/- च्या खर्चासह नामंजूर करण्यात येत आहे.
सांगली
दि. 25/03/2013
( के.डी.कुबल ) ( ए.व्ही.देशपांडे )
सदस्या अध्यक्ष