निकालपत्र (पारीत दिनांक 18 सप्टेंबर, 2010) व्दारा श्रीमती प्रतिभा बा. पोटदुखे, अध्यक्षा. तक्रारकर्ता श्री. लक्ष्मीकांत प्रभाकर हरडे, यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा थोडक्यात आशय असा की, 1. तक्रारकर्ता यांची फोर्ड आयकॉन कार क्रमांक एमएच-04/बीएच-2840 ही पॉलिसी क्रमांक 160302/31/06/00002574 प्रमाणे दिनांक 26/01/2007 ते दिनांक 25/01/2008 करिता विरुध्दपक्ष यांच्याकडे विमीत करण्यात आली होती. 2. दिनांक 25/10/2007 रोजी नागपूर भंडारा रोडवर या गाडीचा अपघात झाला. गाडीच्या झालेल्या नुकसानीची विमा रक्कम तक्रारकर्ता यांना विरुध्दपक्ष यांचेकडून प्राप्त झाली नाही त्यामुळे त्यांनी सदर ग्राहक तक्रार दाखल केली असून मागणी केली आहे की, तक्रारकर्ता यांना रुपये 82,200/- ही रक्कम 12% व्याजासह विरुध्दपक्ष यांचेकडून दिनांक 30/10/2007 पासून मिळावी तसेच मानसिक व शारीरिक त्रासासाठी रुपये 10,000/- तर ग्राहक तक्रारीचा खर्च रुपये 5000/- मिळावेत. 3. विरुध्दपक्ष त्यांच्या लेखी जबाबात म्हणतात की, त्यांच्या सेवेत कोणतीही न्युनता नसल्यामुळे सदर तक्रार ही खारीज करण्यात यावी. कारणे व निष्कर्ष 4. तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष यांनी दाखल केलेली शपथपत्रे, कागदपत्रे, इतर पुरावा व केलेला युक्तीवाद यावरुन असे निदर्शनास येते की,तक्रारकर्ता यांनी अपघातात गाडीच्या झालेल्या नुकसानी करीता भरपाई म्हणून 1,71,125/-रुपयाची मागणी ही विरुध्दपक्ष यांच्याकडे केली होती. विरुध्दपक्ष यांच्यातर्फे नेमण्यात आलेले पहिले सर्व्हेअर श्री. एस.के. गुप्ता यांनी नुकसानभरपाईची रक्कम ही रुपये 82,200/- अशी त्यांच्या दिनांक 12/08/2008 च्या सर्व्हे रिपोर्टमध्ये काढली आहे तर विरुध्दपक्ष यांच्याकडून नेमण्यात आलेले दुसरे सर्व्हेअर श्री संजय श्रीवास्तव यांनी नुकसानभरपाईची रक्कम ही त्यांच्या सर्व्हे रिपोर्टमध्ये रुपये 49,000.20/- अशी काढलेली आहे. 5. विरुध्दपक्ष यांनी दिनांक 07/01/2010 रोजी तक्रारकर्ता यांना रुपये 46,500/- तर दिनांक 01/04/2010 रोजी रुपये 67,187/- वाहन अपघाताच्या नुकसानभरपाईची रक्कम म्हणून देण्याचा प्रस्ताव दिला आहे. परंतू पहिले सर्व्हेअर श्री गुप्ता यांच्या सर्व्हे रिपोर्ट प्रमाणे रुपये 82,200/- ही रक्कम नुकसानभरपाई म्हणून ठरविलेली असल्यामुळे तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष यांचे दोनही प्रस्ताव नाकारले. 6. तक्रारकर्ता यांनी नॅशनल इन्श्युरंस कंपनी लिमी. व इतर विरुध्द पॅसेफिक पॅकर्स या III (2009) CPJ 270 (NC) मध्ये प्रकाशित झालेल्या न्यायनिवाडयात आदरणीय राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग यांनी असे प्रतिपादन केले आहे की, विमा कायदा 1938 च्या कलम 64UM, उपकलम (3) व (4) प्रमाणे इन्श्युरंस कंपनी ही सहजच दुसरा सर्व्हेअर नियुक्त करु शकत नाही. जर का पहिल्या सर्व्हेअरचा रिपोर्ट विमा कंपनीस अमान्य असेल तर त्याची कारणे ही विमा कंपनी तर्फे दिल्या जायला पाहीजेत. तसेच पहिल्या सर्व्हेअरच्या विरोधात ग्राहकाबरोबर कथीत संगनमताबद्दल कारवाई केल्या गेली नसेल तर पहील्या सर्व्हेअरचा अहवाल हा अन्यायकारक रित्या नाकारल्या गेला असे म्हणावे लागेल. 7. सदर प्रकरणात विरुध्दपक्ष यांनी पहिल्या सर्व्हेअरचा अहवाल का नाकारला यांची कारणे दिली नाहीत. तसेच पाहिले सर्व्हेअर श्री गुप्ता यांचे विरोधात कोणतीही कारवाई केलेली दिसून येत नाही त्यामुळे तक्रारकर्ता यांना पहिल्या सर्व्हेअर व्दारा नुकसानभरपाईची आकारणी करण्यात आलेली रक्कम रुपये 82,200/- ही न देणे ही विरुध्दपक्ष यांच्या सेवेतील न्युनता आहे. असे तथ्य व परीस्थिती असतांना सदर आदेश पारीत करण्यात येत आहे. आदेश 1. विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता यांना रुपये 82,200/- ही रक्कम दिनांक 12/08/2008 पासून ती रक्कम तक्रारकर्ता यांना प्राप्त होत पर्यंत 9% व्याजासह दयाव 2. विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता यांना शारीरिक व मानसिक त्रासाकरीता रुपये 3,000/- तर ग्राहक तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 1,000/- दयावेत. 3. विरुध्दपक्ष यांनी आदेशाचे पालन हे आदेशाच्या तारखेपासून एक महिण्याचे आत करावे. (श्री अजितकुमार जैन) (श्रीमती प्रतिभा बा. पोटदुखे) सदस्य, अध्यक्षा, जिल्हा ग्राहक मंच, गोंदिया जिल्हा ग्राहक मंच, गोंदिया.
| [HONORABLE Shri. Ajitkumar Jain] Member[HONORABLE Smt. Potdukhe] PRESIDENT | |