(घोषित दि. 30.05.2013 व्दारा श्रीमती नीलिमा संत,अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
तक्रारदार हा भोकरदन जि.जालना येथील रहीवासी आहे. त्याच्या व्यवसायासाठी त्याने स्वत:च्या मालकीचा ट्रक नंबर एम.एच.19-झेड – 0864 घेतलेला होता. तक्रारदाराने ट्रकचा रुपये 5,19,000/- इतक्या किमतीचा विमा उतरवलेला होता व विमा हप्ता रुपये 13,293/- भरला होता. पॉलीसीचा नंबर 16050031090100202394 असून तिचा कालावधी दिनांक 27.02.2010 पासून 26.02.2011 असा होता.
दिनांक 07.09.2010 रोजी रात्री 10.00 वाजता नेहेमीप्रमाणे ट्रकला कुलूप लावून तो “मद्रास टायर्स” या स्वत:च्यादुकानापाशी तक्रारदारांनी उभा केलेला होता. दुसरे दिवशी म्हणजे दिनांक 08.09.2010 रोजी सकाळी 6.00 वाजता तक्रारदार दुकान उघडण्यासाठी आला असता त्याला आपला ट्रक जागेवर आढळून आला नाही. तक्रारदाराने ट्रकचा खूप शोध घेतला आठ-नऊ दिवस शोध घेवूनही तक्रारदाराचा ट्रक सापडला नाही. शेवटी दिनांक 16.09.2010 रोजी त्याने ट्रक चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली. संबंधित पोलीसांनी गुन्हा क्रमांक 103/2010 भा.द.वि. क्रमांक 379 अन्वये दाखल केली व चोरीबद्दल गैरअर्जदार कंपनीस कळवले. त्यानंतर कंपनीचे फिल्ड ऑफिसर श्री.माने यांना गैरअर्जदारांनी चौकशीसाठी पाठवले. तेव्हाच तक्रारदाराने आवश्यक ती कागदपत्रे कंपनीकडे पाठवली. परंतू एक वर्ष उलटले तरी दावा मंजूर अथवा नामंजूर झाल्याबद्दल काहीही तक्रारदाराला कंपनीने कळविले नाही. दिनांक 08.12.2011 रोजी प्रथम वर्ग न्याया दंडाधिकारी यांनी सदर प्रकरणात “ए” समरी मंजूर केली आहे. त्यानंतर तक्रारदाराने पुन्हा सर्व कागदपत्रे स्पीड पोस्टाने कंपनीला पाठवली. परंतू त्यांचे उत्तर आले नाही. म्हणून तक्रारदार सदरची तक्रार दाखल करत आहे व त्या अंतर्गत
01. | ट्रक चोरीस गेल्याबद्दल विम्याची रक्कम | रुपये 5,19,000 |
02. | तक्रारदाराचे बुडालेले उत्पन्न | रुपये 4,50,000 |
03. | तक्रारदारास झालेला शारिरीक व मानसिक त्रासाची नुकसान भरपाई | रुपये 50,000 |
04. | या तक्रारीचा खर्च | रुपये 25,000 |
| एकूण रक्कम | रुपये 10,44,000 |
मागणी करत आहे. तक्रारदारांनी तक्रारी सोबत पॉलीसीची प्रत, पोलीसांचा फायनल रिपोर्ट, प्रथम खबरीची प्रत, आर.सी.बुक ची प्रत, तक्रारदारांनी दिनांक 09.09.2010 रोजी गैरअर्जदार यांना पाठवलेले पत्र, तक्रारदारांनी दिनांक 27.01.2012 ला गैरअर्जदारांना पाठवलेले पत्र “ए” समरी रिपोर्ट, क्लेम फॉर्म इत्यादी कागदपत्रे हजर केली.
गैरअर्जदार या मंचासमोर हजर झाले. त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले. ते म्हणतात की, सदर घटनेची प्रथम खबर ही दिनांक 16.09.2010 रोजी दाखल झाली तर त्यांना घटनेची माहिती सुमारे दोन ते अडीच वर्षानंतर मिळाली शिवाय तक्रारदारांनी योग्य त्या कालावधीत त्यांना आवश्यक कागदपत्रे दिली नाहीत. घटना दिनांक 07.09.2010 रोजी घडली तर त्यांना तक्रारदाराचे चोरी झाल्याबद्दलचे पत्र दिनांक 27.01.2012 रोजी मिळाले. त्यामुळे तक्रारदाराचा दावा नामंजूर करण्यात आला. दिनांक 09.09.2010 ला कंपनीच्या जालना शाखेला कोणतेही पत्र मिळालेले नाही. कंपनीला घटना कळायला सुमारे दीड वर्षाचा कालावधी गेला आहे. त्यामुळे कंपनीला चोरीबाबत चौकशी करता आली नाही. तक्रारदाराने रात्री वाहन योग्य ती काळजी न घेता ठेवले त्यामुळे विमा करारातील अटींचा भंग झाला आहे. तक्रारदाराने दाखल केलेल्या क्लेम फॉर्मवर गैरअर्जदारांच्या अधिका-यांची सही नाही व तारीखही नाही.
गैरअर्जदारांनी पुढे लेखी जवाबात खालील युक्तीवादांचे दाखले दिले.
1. The New India Assurance Co. V/s Dharamsingh (Appeal No.426/04)
2. The New India Assurance Co. V/s / Trilokchand (Appeal No.321/05)
वरील खटल्यांमध्ये मा. राष्ट्रीय आयोगाने “Notice shall be given in wrtting to the Insurance Co. immediately upon the occurance of the theft,accidentor loss” असे म्हटले आहे.
शेवटी त्यांनी तक्रारदारांनी कंपनीला वेळेत चोरीची नोटीस न दिल्यामुळे तक्रारदारांची तक्रार नामंजूर करावी अशी विनंती केली.
तक्रारदारांची विद्वान वकील श्री.डी.एम.जंजाळ व गैरअर्जदाराचे विद्वान वकील श्री.संदीप देशपांडे यांचा युक्तीवाद ऐकला. दाखल कागदपत्रांचा अभ्यास केला. त्यावरुन असे दिसते की,
- चोरीची घटना दिनांक 07.09.2010 रोजी घडली तर पोलीसांकडे प्रथम खबर ही दिनांक 16.09.2010 रोजी नोंदविण्यात आली. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार ते ट्रकचा शोध घेत होते. म्हणून खबर नोंदवण्यास उशीर झाला. परंतू तक्रारदार या आठ-नऊ दिवसांच्या उशीराचे कोणतेही समर्थनीय कारण देवू शकलेले नाहीत असे मंचाचे मत आहे.
- तक्रारदारांनी दिनांक 09.09.2010 रोजी गैरअर्जदारांच्या जालना येथील शाखेत पत्र दिले. ते तक्रारदारांनी दाखल केले आहे. परंतू त्या पत्रावर गैरअर्जदारांच्या कोणत्याही अधिक-याची सही नाही. त्यामुळे दिनांक 09.09.2010 रोजीच तक्रारदारांनी गैरअर्जदारांना घटनेची माहिती दिली ही गोष्ट स्वीकारता येत नाही.
- तक्रारदारांनी जो क्लेम फॉर्म दाखल केला आहे त्यावर देखील गैरअर्जदाराच्या अधिका-यांची सही नाही अथवा कोणतीही तारीख नाही त्यामुळे क्लेम फॉर्म नेमका कधी दाखल झाला ते समजू शकत नाही.
- घटनेनंतर जवळ-जवळ दीड वर्षांनी दिनांक 27.01.2012 रोजी गैरअर्जदार कंपनीकडे तक्रारदारांनी सर्व कागदपत्रे आर.पी.ए.डी.ने पाठवलेली आहेत तोपर्यंत कंपनीला कोणतीही माहिती दिल्याचा पुरावा मंचासमोर नाही.
वरील विवेचनावरुन व गैरअर्जदारांनी दाखल केलेल्या मा.राष्ट्रीय आयोगाच्या निकालांचा अभ्यास करुन मंच पुढील निष्कर्ष काढत आहे. चोरीच्या घटनेनंतर सुमारे आठ दिवसानंतर प्रथम खबर दिल्यामुळे व सुमारे दीड वर्षानंतर विमा कंपनीकडे विमा प्रस्ताव पाठवल्यामुळे विमा करारातील अटींचा भंग झाला आहे. तक्रारदारांनी चोरीच्या घटनेची माहिती लेखी स्वरुपात विना विलंब गैरअर्जदार विमा कंपनी यांना द्यावयास हवी होती. त्यामुळे तक्रारदार विमा रक्कम मिळण्यास पात्र नाहीत.
सबब मंच खालील आदेश पारीत करत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
- खर्चाबाबत आदेश नाही.