जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 367/2010. तक्रार दाखल दिनांक : 17/06/2010. तक्रार आदेश दिनांक :21/03/2011. श्री. सिध्देश्वर गोविंदराव बुगडे, वय 40 वर्षे, व्यवसाय : वकिली, रा. प्लॉट नं.1-ब, वेणुगोपाल नगर, हुच्चेश्वर मठाजवळ, सोलापूर. तक्रारदार विरुध्द दी न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लि., विभागीय कार्यालय, हुतात्मा स्मृति मंदिरामागे, सोलापूर. (नोटीस विभागीय व्यवस्थापक यांचेवर बजावण्यात यावी.) विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : एन.एन. मारडकर विरुध्द पक्ष यांचेतर्फे अभियोक्ता : विदुला आर. राव. आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, त्यांनी विरुध्द पक्ष (संक्षिप्त रुपामध्ये ‘विमा कंपनी’) यांच्याकडून मेडिक्लेम पॉलिसी घेतलेली असून तिचा क्रमांक 151300/34/08/14/00000767 आहे आणि कालावधी दि.26/9/2009 ते 25/9/2010 असा आहे. तक्रारदार यांची पत्नी दि.14/10/2009 रोजी कंबरदुखी आजारामुळे व उलटया झाल्यामुळे त्यांना तीन दिवसांकरिता युनिक हॉस्पिटल येथे उपचारास दाखल करण्यात आले. त्याकरिता त्यांना रु.4,000/- खर्च आला. त्यांनी विमा कंपनीकडे क्लेम फॉर्म भरुन विमा रकमेची मागणी केली असता पॉलिसी क्लॉज नं.4.3 चा आधार घेऊन क्लेम नाकारण्यात आला. तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारीद्वारे विमा रक्कम रु.4,000/- व्याजासह मिळावी आणि मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रार खर्चापोटी रु.5,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे. 2. विमा कंपनीने रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांना निश्चित अटी व शर्तीस अधीन राहून पॉलिसी दिलेली आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची छाननी केली असता, त्यांना ‘रेनीक कोलीक’ आजार उदभवला असून तो आजार पॉलिसी सुरु झाल्यापासून दोन वर्षात उदभवल्यास त्या आजारास वगळण्यात आलेले आहे. तक्रारदार यांचा विमा क्लेम पॉलिसी क्लॉज नं.4.3 प्रमाणे नाकारला असून तक्रारदार यांना विमा रक्कम देय नाही. शेवटी त्यांनी तक्रार रद्द करण्याची विनंती केली आहे. 3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार विमा रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांनी विमा कंपनीकडे मेडिक्लेम विमा पॉलिसी घेतल्याविषयी व विमा कालावधीमध्ये त्यांच्या पत्नीस आजार झाल्याविषयी विवाद नाही. तसेच तक्रारदार यांनी विमा क्लेम दाखल केला असता, त्यांच्या पत्नीचा आजार ‘रेनीक कोलीक’ असल्यामुळे पॉलिसी क्लॉज नं.4.3 प्रमाणे विमा क्लेम देय नसल्याचे तक्रारदार यांना कळविल्याविषयी विवाद नाही. 5. रेकॉर्डवर दाखल कागदपत्रांचे अवलोकन करण्यात आले. तक्रारदार यांच्या सन्माननिय अभियोक्त्यांनी त्यांना अटी व शर्तीचे पत्रक देण्यात आले नसल्याविषयी युक्तिवादामध्ये नमूद केले. रेकॉर्डवर दाखल जनता मेडिक्लेम पॉलिसीचे पत्रकातील क्लॉज नं. 4.3 पाहता, त्यामध्ये विमा कंपनीने नमूद केलेला ‘रेनीक कोलीक’ या आजाराचा अंतर्भाव नाही. विमा कंपनीने तक्रारदार यांना पॉलिसी अटी व शर्तीचे पत्रक दिल्याविषयी नमूद केलेले नाही. मा.राष्ट्रीय आयोगाने 'युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि. /विरुध्द/ एस.एम.एस. टेलीकम्युनिकेशन्स् व इतर', 3 (2009) सी.पी.ज. 246 (एन.सी.) निवाडयामध्ये असे नमूद केले आहे की, Para. 15 : In our view, the unexplained or unnoticed exclusion clauses would not be binding to the insured. 6. पॉलिसीच्या तथाकथित अटीप्रमाणे तक्रारदार यांच्या पत्नीस आजार असल्याचे सिध्द होत नाही. विमा कंपनीने अत्यंत तांत्रिक कारण देऊन तक्रारदार यांना विमा क्लेम नाकारला असून सदर कृत्य त्यांच्या सेवेतील त्रुटी ठरते. त्यामुळे तक्रारदार हे विमा रक्कम रु.4,000/- क्लेम नाकारल्याच्या तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने मिळविण्यास पात्र ठरतात, या मतास आलो आहोत. 7. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारदार यांना रक्कम रु.4,000/- दि.23/11/2009 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाच्या आत द्यावी. 2. विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 3. उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी मुदतीत न केल्यास संपूर्ण देय रक्कम विरुध्द पक्ष यांनी तेथून पुढे द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने रक्कम द्यावी. (सौ. संजीवनी एस. शहा) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/25311)
| [HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT | |