जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 185/2009. तक्रार दाखल दिनांक : 04/04/2009. तक्रार आदेश दिनांक : 27/04/2011. श्री. अनिल राजाराम पवार, वय 31 वर्षे, व्यवसाय : व्यापार, रा. खासबाग गल्ली, अक्कलकोट, ता. अक्कलकोट. तक्रारदार विरुध्द दी न्यू इंडिया एश्युरन्स कं.लि., हुतात्मा स्मृति मंदिर, पार्क चौक, सोलापूर. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : शिरीष जगताप विरुध्द पक्ष यांचेतर्फे अभियोक्ता : जी.एच. कुलकर्णी आदेश सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य यांचे द्वारा :- 1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, त्यांच्या मालकीच्या ट्रक क्र.एम.एच.26/एच.5084 चा विरुध्द पक्ष (संक्षिप्त रुपामध्ये ‘विमा कंपनी’) यांच्याकडे पॉलिसी क्र.151300/31/07/01/00009268 अन्वये दि.5/2/2008 ते 4/2/2009 कालावधीकरिता विमा उतरविण्यात आलेला आहे. दि.20/5/2008 रोजी त्यांच्या ट्रकचा व ट्रॅक्टरचा अपघात होऊन ट्रकचे नुकसान झाले. त्याची सूचना विमा कंपनीला दिली असता, विमा कंपनीने सर्व्हेअरची नियुक्ती करुन वाहन दुरुस्त करण्याचा सल्ला दिला. तक्रारदार यांना ट्रक दुरुस्तीकरिता रु.1,59,248/- खर्च आलेला आहे. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी ट्रकची दुरुस्ती केली आणि नुकसान भरपाई मिळविण्याकरिता क्लेम दाखल केला. विमा कंपनीने दि.7/1/2009 रोजीच्या पत्राद्वारे वाहनाची क्षमता 3 व्यक्तींची असताना अपघाताचे वेळी इतर लोक प्रवास करीत असल्याच्या कारणामुळे क्लेम नाकारला आहे. विरुध्द पक्ष यांनी त्यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी केल्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन नुकसान भरपाईपोटी रु.1,59,248/- व्याजासह मिळण्यासह मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रार खर्चापोटी रु.2,000/- विमा कंपनीकडून मिळावेत, अशी विनंती केली आहे. 2. विमा कंपनीने रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी तक्रारदार यांच्या ट्रक क्र.एम.एच.26/एच.5084 करिता दि.5/2/2008 ते 4/2/2009 विमा संरक्षण दिले आहे. दि.20/5/2008 रोजी ट्रकचा अपघात होऊन नुकसान झाल्याची सूचना मिळताच त्यांनी श्री. डी.टी. होळीहोसूर, सर्व्हेअर व लॉस असेसर यांची स्पॉट सर्व्हे करण्यासाठी नियुक्ती केली. त्याप्रमाणे त्यांनी सर्व्हे करुन रिपोर्ट सादर केला. त्यानंतर तक्रारदार यांच्याकडून कागदपत्रे मागविली. तसेच श्री. एस.एस. मंगळुरे, सर्व्हेअर व लॉस असेसर यांच्याकडून अंतीम नुकसानीचे मुल्यनिर्धारण करण्यात आले. त्याप्रमाणे त्यांनी रु.88,086/- चे मुल्यनिर्धारण केले आहे. तसेच श्री. एस.एस. मेहता, सर्व्हेअर व लॉस असेसर यांची वाहनाचे पुनर्निरीक्षण करुन रिपोर्ट सादर करण्याकरिता नियुक्ती केली. त्याप्रमाणे त्यांनी रु.77,450/- चे मुल्यनिर्धारण केलेले आहे. तक्रारदार यांनी विमा कंपनीकडे दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन अपघाताचे वेळी ट्रकमध्ये 3 अनधिकृत प्रवाशी प्रवास करीत असल्याचे निदर्शनास आले. विमा संरक्षीत ट्रक माल-वाहतूक वाहन असून त्यामध्ये प्रवाशी वाहतुकीस परवानगी नाही. अपघातामध्ये 3 प्रवाशी जखमी झाले आणि चालकासह दोन प्रवाशी जागीच मृत्यू पावले आहेत. त्यामुळे पॉलिसीच्या अटी व शर्तीचा आणि मोटार व्हेईकल अक्टच्या तरतुदींचा भंग झालेला आहे. त्यांनी योग्य कारणास्तव विमा क्लेम नाकारला असून त्याप्रमाणे तक्रारदार यांना कळविले आहे. त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नसल्यामुळे शेवटी तक्रार खर्चासह रद्द करण्याची त्यांनी विनंती केली आहे. 3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार विमा रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांच्या मालकीच्या ट्रक क्र.एम.एच.26/एच.5084 चा विमा कंपनीकडे दि.5/2/2008 ते 4/2/2009 कालावधीकरिता विमा उतरविल्याविषयी विवाद नाही. विमा संरक्षीत ट्रकचा दि.20/5/2008 रोजी अपघात झाल्याचे आणि अपघातामध्ये ट्रकचे नुकसान झाल्याविषयी विवाद नाही. त्यानंतर तक्रारदार यांनी विमा कंपनीकडे विमा क्लेम दाखल केल्याविषयी आणि विमा कंपनीने तक्रारदार यांचा विमा क्लेम हा दि.7/1/2009 रोजीच्या पत्राद्वारे नाकारल्याविषयी विवाद नाही. 5. प्रामुख्याने, विमा कंपनीने अपघाताच्या वेळी विमा संरक्षीत ट्रकमध्ये अपघातामध्ये 3 प्रवाशी जखमी झाले आणि चालकासह दोन प्रवाशी जागीच मृत्यू पावल्याचे नमूद केले आहे. तसेच त्यांच्या म्हणण्यानुसार विमा संरक्षीत ट्रक माल-वाहतूक वाहन असून त्यामध्ये प्रवाशी वाहतुकीस परवानगी नाही आणि पॉलिसीच्या अटी व शर्तीचा आणि मोटार व्हेईकल अक्टच्या तरतुदींचा भंग झाल्यामुळे त्यांनी योग्य कारणास्तव विमा क्लेम नाकारल्याचे म्हटले आहे. 6. विमा संरक्षीत ट्रक क्र.एम.एच.26/एच.5084 चे नोंदणी प्रमाणपत्राचे अवलोकन करता, त्यामध्ये ‘आसन संख्या (चालकासह) :- 2 + 1’ असल्याचे नमूद आहे. अपघाताच्या वेळी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वाहनामध्ये बसावयाच्या व्यक्तींच्या आसन व्यवस्थेकरिता तीन व्यक्तींची मर्यादा घातलेली आहे. रेकॉर्डवर दाखल शांतप्पा संगण्णा विजापुरी यांच्या जबाबानुसार अपघाताचे वेळी ट्रकमधून ट्रकचालकासह 5 प्रवाशी असल्याचे निदर्शनास येते. 7. निर्विवादपणे, विमा संरक्षीत ट्रकमध्ये अपघाताच्या वेळी प्रवास करणा-या 2 अतिरिक्त प्रवाशांची वाहतूक केल्यामुळेच ट्रकचा अपघात झाल्याचे सिध्द करण्यात आलेले नाही. अशाच काही प्रकरणांमध्ये मा.सर्वोच्च न्यायालयासह, मा.राष्ट्रीय व राज्य आयोगांनी अनेक निवाडे दिलेले आहेत. 8. त्यापैकी मा.सर्वोच्च न्यायालयाने 'बी.व्ही. नागाराजू /विरुध्द/ मे. ओरिएंटल इन्शुरन्स कं.लि.', 2 (1996) सी.पी.जे. 18 (एस.सी.) निवाडयामध्ये असे नमूद केले आहे की, Para. 7 : It is plain from the terms of the Insurance Policy that the insured vehicle was entitled to carry 6 workmen, excluding the driver. If those 6 workmen when traveling in the vehicle, are assumed not to have increased any risk from the point of view of the Insurance Company on occurring of an accident, how could those added persons be said to have contributed to the causing of it is the poser, keeping apart the load it was carrying. .............. Merely by lifting a person or two, or even three, by the driver or the cleaner of the vehicle, without the knowledge of owner, cannot be said to be such a fundamental breach that the owner should, in all events, be denied indemnification. The misuse of the vehicle was somewhat irregular though, but not so fundamental in nature so as to put an end to the contract, unless some factors existed which, by themselves, had gone to contribute to the causing of the accident. In the instant case, however, we find no such contributory factor. 9. आमच्या मते, मा.सर्वोच्च न्यायालयाच्या प्रस्थापित व सर्वमान्य न्यायिक तत्वानुसार अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये विमा कंपनीस विमा क्लेम नाकारता येणार नाही. विमा कंपनीने तक्रारदार यांचा विमा क्लेम नाकारुन सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होते. त्यामुळे तक्रारदार हे विमा कंपनीकडून विमा रक्कम मिळविण्यास पात्र ठरतात. 10. विमा कंपनीने ट्रकच्या नुकसानीचे व दुरुस्तीचे मुल्यनिर्धारण करण्यासाठी एकूण 3 सर्व्हेअरची नियुक्ती केलेली आहे. श्री. डी.टी. होळीहोसूर यांची स्पॉट सर्व्हे करुन रिपोर्ट सादर केला. त्यानंतर श्री. एस.एस. मंगळुरे यांनी अंतीम नुकसानीचे रु.88,086/- चे मुल्यनिर्धारण केले आहे. तसेच श्री. एस.एस. मेहता यांनी वाहनाचे पुनर्निरीक्षण करुन त्यांनी रु.77,450/- चे मुल्यनिर्धारण केलेले आहे. वास्तविक पाहता, विमा कंपनी एकाच सर्व्हेअरकडून ते रिपोर्ट सादर करु शकली असती. परंतु विमा कंपनीने सोईनुसार सर्व्हेअर बदलून रिपोर्ट घेतले आहेत. वरिष्ठ न्यायालयांनी वेळोवेळी अशाप्रकारची कार्यपध्दती अवलंबने अनुचित असल्याचे न्यायिक तत्व विषद केले आहे. 11. योग्य विचाराअंती आम्ही श्री. एस.एस. मंगळुरे यांनी अंतीम नुकसानीचे रु.88,086/- चे मुल्यनिर्धारण निश्चित धरत असून त्याप्रमाणे रु.88,086/- विमा रक्कम क्लेम नाकारल्याच्या तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने मिळविण्यास तक्रारदार हक्कदार ठरतात, या मतास आम्ही आलो आहोत. 12. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना रु.88,086/- दि.7/1/2009 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रार खर्चापोटी रु.2,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. (सौ. संजीवनी एस. शहा) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/27411)
| [HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT | |