न्यायनिर्णय
सदर न्यायनिर्णय मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य यानी पारित केला
1. तक्रारदाराने सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे.
2. तक्रारदाराचे तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणे-
तक्रारदार हे वारुंजी शिवाजीनगर, ता.कराड येथील रहिवासी असून ते फोटोग्राफी व्यावसायिक आहेत. त्यानी त्यांचे घरगुती वापरासाठी MH-45-A-1400 टोयाटो इनोव्हा कार गाडी सन 2011 साली खरेदी केली होती. यातील जाबदार ही विमा कंपनी असून वाहन धारकांच्या वाहनाना वेगवेगळया प्रकारचे आग, अपघात, चोरी वगैरे बाबींपासून वाहनाच्या होणा-या नुकसानीबाबत संरक्षण देणेची सेवा पुरवते. त्यामुळे तक्रारदाराने जाबदाराकडून वर नमूद विषयांकित (वर नमूद MH-45-A-1400 याचा उल्लेख पुढे संक्षिप्तमध्ये विषयांकित वाहन असा करणेत येईल) वाहनाच्या सन 2011 ते 2012 या सालासाठीचे विमा संरक्षण घेणेचे ठरविले. त्याप्रमाणे जाबदारानी विषयांकित वाहनाची सन 2011 ते 2012 या वर्षातील बाजारभावाची सर्वोच्च किंमत रक्कम रु.5,00,000/- (रु.पाच लाख मात्र) निर्धारित करुन हीच विषयांकित वाहनाची किंमत विमा रक्कम म्हणून स्विकारुन वरील विषयांकित वाहनास विमा संरक्षण बहाल केले. वाहनाची विमा पॉलिसी दिली त्याचा विमा पॉलिसी क्र.15170231110100009545 असा असून विषयांकित वाहनाचे विम्याचा वैध कालावधी दि.23-8-2011 ते 22-8-2012 असा होता. दि.20-3-2012 रोजी रात्रौ.अंदाजे 22.00 (10.00) वाजणेचे सुमारास वेणेगांव येथून घरगुती कार्यक्रम करुन कराडकडे परत येत असताना कोल्हापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर तासवडे टोल नाका पार केलेनंतर तासवडे गावाचे हद्दीत बाजूकडून येणा-या लाईटचा प्रकाश चालकाचे डोळयावर पडल्याने संबंधित कार चालकाने प्रसंगावधान राखून वाहनाचा वेग कमी करुन कार डाव्या साईडला घेत असता ती म्होरी क्र.694/1 चे पुलाचे कट्टयास जोरदारपणे धडकली त्यामुळे विषयांकित वाहनाचे डाव्या बाजूचे पुढील बाजूचा डंपर, जाळी, रेडीएटर बॉनेट, पुढील शॉकॉप, डाव्या बाजूचा दरवाजा, डॅश बोर्ड, डाव्या बाजूचे अँपरॉन वगैरे बाधित होऊन इंजिन संपूर्णतया नुकसानग्रस्त होऊन अंदाजे रु.तीन लाखाचे नुसान झाले. विषयांकित वाहन संतोष किसन जांभळे हा अपघातसमयी चालवीत होता. त्याचा चालक परवाना क्र.2006/622/केआरडी दि.7-2-2006 असून तो अपघातसमयी वैध होता. विषयांकित वाहनचालकाने या अपघाताची खबर तक्रारदाराना देऊन त्याना घटनास्थळी बोलावून घेतले व त्यांचेसमवेत श्री.जांभळे या वाहनचालकाने तळबीड पोलिस स्टेशन, ता.कराड, जि.सातारा यांचेकडे दि.21-3-2012 रोजी सकाळी 10.15 वा. स्टे.डा.ई.17/2012 ने वाहन अपघाताची नोंद केली व त्यादिवशी विषयांकित वाहनाचे विमा कंपनीस अपघाताची सूचना दिली व जाबदार विमा कंपनीने दिलेल्या सूचनेप्रमाणे विषयांकित वाहनाची संपूर्ण नुकसानभरपाई (total loss)ची मागणी विषयांकित वाहनाची व अपघाताची संपूर्ण कागदपत्रे जोडून जाबदार विमा कंपनीकडे प्रस्ताव सादर केला व दि.25-6-2013 रोजी विषयांकित वाहन अपघात नुकसानीचा प्रस्ताव सादर करतेवेळी अपघातग्रस्त वाहन मे.साई वाहनतळ (पार्कींग) कराड या ठिकाणी पार्किंग करुन वाहनाच्या चाव्या व वाहनाची सर्व मूळ कागदपत्रे जाबदार विमा कंपनीस सादर केले. त्याची पोहोच जाबदारानी तक्रारदाराना दिली आहे. दि.31-10-2012 रोजी जादबारानी तक्रारदाराना पत्र पाठवून माहिती मागवली. त्याप्रमाणे वाहनचालकाने जाबदार विमा कंपनीस त्याच्या चौकशीसाठी (Investigation) गाडीतील प्रवासी व ड्रायव्हर याना समक्ष भेटून जाबदाराना माहिती दिली होती. जाबदारांचे मागणीप्रमाणे अपघाताचे कारणाबाबत व वाहनाचे विम्याबाबत प्रतिज्ञापत्रेही तक्रारदारानी वेळोवेळी जाबदार विमा कंपनीस दिली व तक्रारदारानी जाबदाराकडे सर्व कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता वेळेत करुनही क्लेम मंजुरीबाबत जाबदाराना तक्रारदारानी प्रत्यक्ष भेटून, वारंवार विनंती करुनही त्याना काहीही कळविले नाही व अचानक दि.8-8-2013 रोजी विविध खोटी कारणे देऊन Suppressed of Material Facts कारणाने तक्रारदारांचा विमा नुकसानभरपाई दावा जाबदार विमा कंपनीने नाकारला व विमा वाहन नुकसानी दावा तक्रारदारानी प्रस्ताव दाखल केलेपासून 17 महिन्यानी जाबदारानी तक्रारदारांचा विमा नुकसानी दावा फेटाळलेचे तक्रारदारास कळविले आहे. त्यामुळे जाबदारांचे या बेकायदेशीर कृतीविरुध्द तक्रारदाराने मे.मंचात दाद मागितली असून ते जाबदाराकडून वाहन अपघात नुकसानभरपाईपोटी रु.5,00,000/- त्यावर दि.8-5-2013 पासून द.सा.द.शे.12 टक्के दराने होणारे व्याजासह होणारी रक्कम, मानसिक, शारिरीक, त्रासापोटी रु.70,000/-, दि.20-7-2012 पासून दि.1-2-2012 चे वाहन पार्किंग भाडे रु.82,500/-व तक्रारअर्जाचा खर्च रु.15,000/- मिळणेबाबत विनंती मे.मंचास तक्रारदारानी केली आहे.
2. तक्रारदारानी तक्रारीचे पृष्टयर्थ नि.1 कडे तक्रारअर्ज, नि.2 कडे तक्रारीचे पृष्टयर्थ प्रतिज्ञापत्र, नि.7 कडे तक्रारीचा गोषवारा, नि.4 कडे अँड.वाघमारे यांचे वकीलपत्र, नि.5 कडे पुराव्याची एकूण 11 कागदपत्रे, नि.14 कडे तक्रारदाराचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, नि.15 कडे तक्रारदाराची पुरावा संपलेची पुरसीस, नि.16 कडे तक्रारदाराचा लेखी युक्तीवाद इ.कागदपत्रे पुराव्यानिशी दाखल केलेली आहेत.
3. सदर प्रकरणाची नोटीस जाबदाराना मे.मंचातर्फे रजि.पोस्टाने पाठवणेत आली. सदर नोटीस जाबदाराना मिळाली त्याप्रमाणे जाबदार हे त्यांचे विधिज्ञ अँड.फडके यांचेतर्फे नि.8 कडे वकीलपत्र दाखल करुन हजर झाले. त्यांनी त्यांचे म्हणणे नि.11 कडे दाखल केले असून नि.12 कडे त्याचे पृष्टयर्थ प्रतिज्ञापत्र, नि.13 कडे पुराव्याची महत्वाची सहा कागदपत्रे, नि.18 कडे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, नि.17 कडे लेखी युक्तीवाद इ.कागदपत्रे दाखल केली असून जाबदारानी त्यांचे दाखल कागदपत्रांमध्ये तक्रारदाराचे तक्रारीस खालील आक्षेप नोंदवलेले आहेत. तक्रारदारानी वाहन चालकाबाबत केलेले कथन मान्य नाही. जाबदारांचे तपास अधिका-यांचे मते पवार नावाचा इसम विषयांकित वाहन चालवीत होता, जांभळे चालवीत नव्हता. अपघात ठिकाणाबाबत विसंगती आहे. तक्रारदाराने दाखवलेले अपघात ठिकाण व पोलिस पंचनाम्यातील अपघात ठिकाण यामध्ये विसंगती आहे. (सर्व्हेअर अहवालाप्रमाणे दोन्ही सर्व्हेअर यांचे अहवालात तफावत दिसून येत आहे) सदर अपघातामध्ये कोणी जखमी नाही असे तक्रारदारांनी जाबदारांकडे दिलेल्या माहितीत नमूद आहे, परंतु पोलिस रिपोर्टमध्ये 2 इसम सहयाद्री हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. तक्रारदाराचे कथनाप्रमाणे विषयांकित वाहनात पाच माणसे होती. पोलिस रिपोर्टमध्ये 7-8 माणसे गाडीतून प्रवास करीत असल्याचे नमूद आहे. त्यामुळे अशी विसंगती असलेने दि.21-3-2012 रोजी तक्रारदारानी प्रस्ताव सादर करताना पोलिस पेपर्स नाहीत, पंचनामा नाही असे कथन केले आहे, परंतु अपघाताचा पंचनामा व एफ.आय.आर दि.21-3-2012 रोजीच झाला होता. प्रत्यक्ष वाहनाचे नुकसान व अपघाताचे स्वरुप पहाता अपघाताचे योग्य कारण पटण्याजोगे नाही. त्यामुळे Suppressed the material facts या कारणावरुन जाबदारानी तक्रारदारांचा विमा क्लेम नाकारला आहे.
4. तक्रारदाराचे अर्जास अनुसरुन न्यायनिर्णय कलम 1 मधील तक्रारीचे सारांश कथन, कलम 2 मधील प्रतिज्ञापत्रे, पुराव्याची कागदपत्रे व जाबदारानी पुराव्याप्रकरणी दाखल केलेले म्हणणे, प्रतिज्ञापत्र, लेखी युक्तीवाद, पुराव्याची कागदपत्रे व त्यातील आक्षेपांचा विचार करता सदर तक्रारीचे निराकरणार्थ आमचेसमोर खालील मुद्दे निर्माण होतात-
अ.क्र. मुद्दा निष्कर्ष
1. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय? होय.
2. जाबदाराने तक्रारदारांचा योग्य, न्याय्य विमा क्लेम देय
असताना जाबदारानी तो किरकोळ कारणाने नाकारुन
तक्रारदाराना सदोष सेवा दिली आहे काय? होय.
3. तक्रारदार हे त्यांचे मागणीप्रमाणे वाहन पार्किंगची रक्कम
रु.82,500/- जाबदाराकडून मिळणेस पात्र आहेत काय? होय.
4. अंतिम आदेश काय? तक्रार अंशतः मंजूर.
कारणमीमांसा- मुद्दा क्र.1 ते 4
5. सदर प्रकरणातील जाबदार ही विमा कंपनी असून विविध प्रकारच्या वाहनांना आग, अपघात, वाहनचोरी इ.प्रकारच्या धोक्यापासून वार्षिक, ठराविक रक्कम आकारुन वाहनाना विमा संरक्षण, सेवा पुरवते व या प्रकारचा व्यवसाय विमा कंपनी करते व त्याप्रमाणे वाहनधारक व जाबदारांमध्ये वाहनधारक ज्या सेवांची मागणी करतो त्याचे मूल्य जाबदार विमा कंपनी ठरवते व जाबदार उभयतामध्ये ठरलेल्या घेतलेल्या सेवा, तपशील या बाबी नमूद करुन जाबदार वाहनधारकाला विमा पॉलिसी देते व विमा संरक्षण वाहनधारकास पुरविते. याच प्रकारची सेवा तक्रारदारानी त्यांचे घरगुती वापरासाठी उपभोगासाठी घेतलेल्या विषयांकित वाहनासाठी (क्र.MH-45-A-1400 याचा वैध विमा कालावधी दि.23-8-2011 ते 22-8-2012 असा होता.) घेतली होती व जाबदारानी वरील वाहनाची वर नमूद वैध संपूर्ण विमा कालावधीच्या काळातील वाहनाचे बाजारमूल्य रु.5,00,000/- ठरवून त्यावर वाहन अपघात नुकसानभरपाई (own damage) एकूण प्रिमियम टॅक्ससह रु.16,360/- जाबदाराकडे भरलेला होता हे नि.5/1 कडील जाबदारानी तक्रारदाराला दिलेल्या विमा पॉलिसी क्र.15170231110100009545 वरुन स्पष्ट होते. त्यामुळे या व्यवहारावरुन तक्रारदार हा जाबदारांचा ग्राहक असल्याची बाब निर्विवादरित्या स्पष्ट होते. त्यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो.
5.2- तक्रारदारांचे वाहन क्र. MH-45-A-1400 यास येथून पुढे सोयीसाठी विषयांकित वाहन असा उल्लेख करणेत येईल. दि.20-3-2012 रोजी अंदाजे रात्रौ.10.00 चे सुमारास वेणेगांव येथून घरगुती कार्यक्रम करुन कोल्हापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरुन कराडकडे येत असता तासवडे टोलनाका पार करुन पुढे गेले असता तासवडे गावाचे हद्दीत कराड बाजूकडून येणा-या वाहनाच्या लाईटचा प्रखर प्रकाश चालकाचे डोळयावर पडल्याने वाहनाचा वेग नियंत्रित करत डाव्या साईडला घेत असताना ती म्होरी क्र.694/1 ला जबरदस्त धडकली व विषयांकित वाहन संपूर्ण नुकसानग्रस्त झाले. विषयांकित वाहनाची धडक ही अत्यंत जोरदार होती. विषयांकित वाहनाचे डाव्या साईडचे पुढील बाजूस चालकाचे लेबलचे वरचे बाजूस साइड कट्टा असलेने कारचा बंपर, जाळी, रेडीएटर, बॉनेट, पुढील शॉकॉप, इंजिन, डावे बाजूचा पुढील दरवाजा, डेटा बोर्ड, डावे बाजूचे अँपरॉन, मध्यवर्ती ग्रीलला तडे गेले, तुटले, Central tie member is crumpled, torn. Wind shield frame is twisted, open at wedling pillars are bent, cut, wind shield glass is broken. Dash board is cracked, broken. Engine bonnet is badly pressed, crumpled, torn, LH side fender, apron panel are baldy pressed, crumpled, torn, LH rear view mirror is broken. Entire body shell is shaken and misallgned. RH front door and door frame are twisted. Misallgned. Door glass sis.intact. LH front door and door frame are badly pressed, crumpled, torn. Torn. Door glass is broken, trim is affected. LH central piller is bent. LH running board is pressed, dented. Roof top panel is pressed, twisted, dented. Driver and co-driver seat frames are twited, bent.
Chassis frame: Front bumper is pressed, cut, chassis LH long member needs checking. Front cross member is pressed, twisted. Steering linkages are shaken and jolted. LH head light and indicator are broken. Wiper are and blades are bent, Battery missing and not available for inspection. Wiring is cut and affected at places. Instrument panel is shaken and affected. Cooling system- Radiator bracket is twisted, bent, Cores are cut, hose pipes and foundations are strained, cut, Condenser is pressed, fines are cut. About Engine and transmission- Engine assembly is shaken and misaligned Air cleaner is pressed, broken suspension is damaged या पध्दतीने विषयांकित गाडीचे नुकसान झालेचे नि.5-3 5-4 नि.15 कडे जाबदारातर्फे जगताप सर्व्हेअर व व्हॅल्युएटर यांनी विषयांकित नुकसानग्रस्त वाहनाचा सर्व्हे रिपोर्ट दाखल केला असून त्यात वर नमूद केल्याप्रमाणे विषयांकित वाहनाची नुकसानी झालेचे दिसून येते, ते पहाता अपघातामध्ये विषयांकित वाहनाची 100 टक्के नुकसानी झालेचे स्पष्ट होते. त्याबाबत जाबदार व तक्रारदाराना या बाबी मान्य आहेत. सदर प्रकरणी विषयांकित अपघातग्रस्त वाहनाची नुकसानभरपाईची ज्यावेळी जाबदाराकडे तक्रारदारानी सर्व कागदपत्राची पूर्तता करुन मागणी केली त्यावेळी जाबदारानी खालील आक्षेप घेऊन तक्रारदारांचा क्लेम नाकारला. अपघाताची खबर दि.21-3-2012 रोजी संबंधित पोलिस स्टेशनला देताना तक्रारदारानी पोलिस पेपर्स नाहीत असे जाबदाराला प्रस्तावामध्ये सांगितले व प्रस्तावासोबत सादर केलेले नाहीत परंतु प्रत्यक्षात दि.21-3-2012 रोजी एफ.आय.आर.व पंचनामा पोलिसांकडे तयार होता. आमचे मते यात तक्रारदाराने कोणतीही चुकीची माहिती दिल्याचे दिसत नाही. कदाचित त्यावेळी तक्रारदाराना ते मिळू न शकल्याने त्याचे स्पष्टीकरण जाबदारानी त्यांचे नि.13 सोबत नि.13-1 कडे दाखल केलेल्या दि.3-5-12 रोजी तळबीड पोलिस स्टेशनच्या दाखल्यावरुन स्पष्ट होते की, विषयांकित वाहनाचा वर नमूद दिवशी, ठिकाणी अपघात झाला होता परंतु यात कोणाची तक्रार नसल्याने पुन्हा नोंद न करता स्टे.डा.ई.ने वरुन अपघात घटनास्थळाचा पंचनामा करुनदेणेत आला असे नमूद केले आहे. त्यावरुन जाबदारानी कर्जदाराचे वाहन अपघात नुकसानभरपाई नाकारणेचे दि.5-2 चे पत्रातील कलम 2 चे कारण निकाली निघते. तक्रारदारानी विमा अपघात नुकसानी प्रस्तावामध्ये कोणतीही चुकीची माहिती दिली नव्हती हेच शाबीत होते. प्रत्यक्षात याबाबत तक्रारदारानी वरील आक्षेप सिध्द करणेसाठी कोणताही पुरावा मंचात दाखल केलेला नाही. त्यामुळे हा जाबदारांचा किरकोळ आक्षेप नाशाबीत होतो, त्याचप्रमाणे पोलिस पेपर व सर्व्हेअरनी केलेला नि.15 कडील सर्व्हे रिपोर्ट पहाता अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होत नाही, ते वेगवेगळे आहे, परंतु हायवेवरील एकूण परिस्थिती पहाता चालकाने गाडी डाव्या बाजूस घेत असताना जी म्होरीला धडक दिली त्यावेळी नि.14 कडे जाबदारानी नेमलेल्या अँड.संतोष के पवार सातारा याना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले होते, त्याचा चौकशी अहवाल नि.14 कडे दाखल आहे ते चौकशी अहवाल कलम 14 मध्ये असे नमूद करतात की, पोलिस पंचनामा अपघात ठिकाणी कोणत्याही खाणाखुणा, फुटलेल्या काचा, फायबर किंवा रबर पडलेचे नमूद नाही. या आक्षेपाचे अनुषंगाने नि.5-10 चे अपघातग्रस्त वाहनाचे फोटो, नि.15 चा सर्व्हे रिपोर्टमधील निरीक्षण पाहिले असता काचेला तडे गेलेचे दिसते व तसे सर्व्हे रिपोर्टमध्ये नमूद आहे. दरवाजाच्या काचा जशाच्या तशा आहेत, दरवाज्याचे काचाना तडे गेले आहेत असे प्रत्यक्ष वाहन तपासणी वर्णनात नमूद आहे, त्यामुळे अपघाताचे ठिकाणी तुटलेल्या काचा रबर किंवा फायबर आढळून येणारच नाही व त्यामुळेच गाडीच्या काचा किंवा रबर वा फायबर अपघाताचे ठिकाणी पडलेचे दिसून येणार नाही हे नि.15 चे रिपोर्टवरुन व नि.5-10 चे वाहनाचे फोटोवरुन स्पष्ट होते, त्यामुळे ज्याआधारे जाबदारानी नि.5-2 चे पत्रातील कलम 1 चा काढलेला निष्कर्ष व आक्षेप हा पूर्णतः चुकीचा ठरतो. जाबदारानी ठोस पुराव्याअभावी वाहनाचे पंचनाम्यात नमूद अपघात ठिकाण चुकीचे आहे असा निष्कर्ष काढणे पूर्णतः अयोग्य आहे याचे कारणही वर नमूद आहे. त्याचप्रमाणे विषयांकित वाहनाची धडक स्विकारणेची क्षमता कितीतरी पट अधिक समोरच्या कठडयामध्ये असणे शक्य आहे त्यामुळे त्याच्या खुणा म्होरी क्र.694/1 चे साडेतीन फूट उंचीचे पुलाच्या कठडयावर न होता त्या वाहनाच्या नुकसानीच्या स्वरुपात पुढे आल्या हेच स्पष्ट होते. यातील सर्व्हेअर यानी नि.15 चा रिपोर्ट व नि.14 चा चौकशी अहवालात पोलिस पेपरमध्ये अपघातग्रस्त वाहनाचे अपघातात कोणीही जखमी नाही परंतु जाबदारातर्फे चौकशी अधिका-यांचे प्रस्तुत चौकशी अहवालात सहयाद्री हॉस्पिटल कराड यांचे नोंदीनुसार विषयांकित वाहनाचे अपघातात सौ.शोभा अनिल राऊत व गौरव अनिल राऊत हे जखमी असलेचे दिसून आले व विषयांकित वाहनाचे अपघातावेळी गाडीत साधारणपणे 7 ते 8 प्रवासी होते असे आक्षेप तक्रारदारांचा विमा क्लेम नाकारणेचे नि.5-2 चे पत्रात कलम 2 व 4 मध्ये जाबदारानी नोंदले आहेत ते नि.14 कडील याच चौकशी अधिका-याचे अहवालावरुन घेतलेचे दिसून येतात या आक्षेपाचे अनुषंगाने विचार करता व तक्रारदाराचा विमा दावा नाकारणेचे सर्वच कारणांचा विचार करता नि.14 कडील चौकशी अधिकारी अँड.पवार यांच्या नि.14 चा अहवाल जाबदारानी पायाभूत धरलेला दिसून येतो परंतु त्याचे स्वरुप पहाता सदर चौकशी अधिका-याने अपघात जागेवर नेमक्या कोणत्या दिवशी व तारखेस केली हे समजून येत नाही. त्यानी याबाबत त्यांचे अहवालातही काही नमूद केलेले नाही. नि.14च्या प्रकरणी दाखल अहवालावरुन तो दि.21-12-2012 रोजी केलेला दिसून येतो म्हणजे अपघात झालेवर 9 महिन्यानी तो केलेला दिसतो. अशा वेळी दि.21-3-2012 च्या अपघाताच्या खाणाखुणा अपघात ठिकाणी दिसणे, रहाणे शक्यच नाही ही वस्तुस्थिती आहे. नि.14 चा चौकशी अहवाल केवळ पोलिस पेपर्सवरुन त्यावरुन निष्कर्ष काढून ऐकीव माहितीवरुन संबंधित अधिका-याने बनवलेला दिसतो व त्यावरुन काही शंका काढून विषयांकित अपघाताबाबत विवाद उत्पन्न करणेचा प्रयत्न केला आहे त्यामुळे तो विश्वसनीय असलेचे दिसून येत नाही व त्यातील सर्व्हेअरनी असा रिपोर्ट दिला आहे, त्याद्वारे असे दिसते, असे शब्दप्रयोग करुन दुस-यांच्या माहितीवरुन निष्कर्ष काढले आहेत परंतु त्यांच्या चौकशी अहवालाच्या अनुषंगाने कोणताही ठोस पुरावा मंचात दाखल करुन त्यानी चौकशी अहवालातील मुद्दे सिध्द केलेले नाहीत. त्यांचे त्याबाबतचे प्रतिज्ञापत्रसुध्दा चौकशी अहवालासोबत दाखल केलेले नाही. त्यामध्ये नमूद केलेल्या व नि.5-2 चे क्लेम नाकारणा-या पत्रातील मुद्दा क्र.2 व 4 हे वरील कारणाने नाशाबित होतात कारण वरील त्यांचे सर्व निष्कर्ष हे ऐकीव माहितीवर आधारीत आहेत. अपघातसमयी लोक जखमी झाले. ते अपघातग्रस्त वाहनातून प्रवास करीत होते या अपघातामध्ये ते जखमी झाले असे दाखवणारी प्रतिज्ञापत्रे किंवा इतर पुरावा जाबदारानी मंचात दाखल केलेला नाही. त्याचप्रमाणे असे समजते की अपघातसमयी गाडीत 7 ते 8 प्रवासी होते परंतु तक्रारदारानी ते 5 प्रवासी होते असे प्रस्तावामध्ये खोटे सांगितले परंतु याबाबत पोलिस पेपर्समध्ये पंचनाम्यातही काही नमूद नाही. त्यामुळे जाबदारानी ऐकीव माहितीवर आधारित वरील कथने केली आहेत व तीच तक्रारदारांचे विमा दावा नाकारणा-या पत्रात नमूद केली आहेत. त्या आक्षेपांचे सिध्दतेसाठी जाबदारानी कोणताही ठोस पुरावा मंचात दाखल करुन वरील बाबी पुराव्यानिशी शाबीत केलेल्या नाहीत. सर्वात महत्वाचे म्हणजे तक्रारदारांचे वाहनाचे जाबदारानी नि.13-8 कडे विषयांकित वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र पाहिले असता त्यामध्ये आसनसंख्या 1+7=8 अशी नमूद आहे व जाबदारांचे विषयांकित वाहनातून 7-8 प्रवासी प्रवास करीत होते असे जाबदार म्हणतात व तक्रारदारानी पाचच प्रवासी होते अशी खोटी माहिती सांगितली त्यामुळे ही नि.5-2 कडील पत्रात कलम 2 कडे असा आरोप घेऊन क्लेम नाकारला आहे परंतु कायदयानेच जर विषयांकित वाहनातून 8 माणसे नेणेस आर.टी.ओ.ची परवानगी असेल तर ते बेकायदेशीर कसे ठरते म्हणजेच प्रस्तुत जाबदार विमा कंपनीने तक्रारदारांचा वाहन अपघान नुकसानभरपाई विमा दावा नाकारताना अत्यंत बालीशपणा करुन कोणताही कायदेशीरपणा न पहाता खोटी व तारतम्यरहित, गैरलागू कारणे देऊन तक्रारदारांचा विमा क्लेम नाकारला आहे हे आम्हांस स्पष्ट दिसून आले आहे. कायदयानुसार जे योग्य आहे गाडीत 7 ते 8 प्रवासी होते तेही जाबदारानी खोटे असलेचा आक्षेप घेऊन तक्रारदारांचा विमा क्लेम नाकारलेचे स्पष्ट होते तसेच नि.5-2 मधील नुकसानभरपाई नाकारणा-या पत्रातील कलम 5,6,7 मधील व याच पत्रातील कलम 1 ते 4 यांची पुनरावृत्ती आहे. एकच आक्षेप वेगवेगळया शब्दात विचारला आहे व हे सर्व आक्षेप सबळ पुरावा मंचात दाखल करुन जाबदारानी ते सिध्द केलेले नाही हे पूर्णतः शाबित होते.
5.3- यातील जाबदारांचे नि.11 कडील म्हणणे व नि.12 चे प्रतिज्ञापत्र, नि.20 चा युक्तीवाद व त्यातील कथने पाहिली असता तक्रारदारानी दाखल केलेल्या नि.5-3 व नि.5-4 कडील पोलिस पेपर्स पाहिले असता त्यात कोठेही जखमी व्यक्तीचा उल्लेख नाही. जाबदारांनी मात्र तो त्यामध्ये असल्याचे भासविले आहे. प्रत्यक्षात जखमी व्यक्तीबाबत त्यात कोणताही उल्लेख नाही, त्यामुळे जाबदारानी सदर कथने कोणत्या पोलिस पेपर्सवरुन केली हे मंचास समजून येत नाही असा मजकूर नमूद असलेले कोणतेही पोलिस पेपर्स जाबदारानी मंचात पुरावा म्हणून दाखल केलेले नाहीत किंबहुना जाबदारानी प्रकरणी नि.13-2, 13-3 कडे दाखल केलेला पुरावा पोलिस पेपर्समध्ये सुध्दा जाबदारानी कथन केलेली माहिती नमूद नाही. त्यामुळे जाबदारांचे सर्वच आक्षेप हे पूर्णतः खोटे, लबाडीचे आहेत, त्यात कोणताही तथ्यांश नाही हे पूर्णतः शाबीत होते. या कामी जाबदारानी नि.15 व 16 कडे अनुक्रमे श्री.जगताप सर्व्हेअर व व्हॅल्युएटर यांचा विषयांकित वाहन नुकसानीचा सर्व्हे रिपोर्ट व नितीन जोशी युनायटेड सर्व्हेअर्स यांचा सर्व्हे रिपोर्ट प्रकरणी दाखल केला आहे. त्यामध्ये अपघात जागेचे वर्णनामध्ये तफावत आहे असे जाबदारांचे म्हणणे आहे, आक्षेप आहे. परंतु नि.15 चा सर्व्हे रिपोर्ट हा दि.21-3-2012 चा असून नि.16 चा सर्व्हे रिपोर्ट दि.20-4-2012 ला होऊन त्याचा रिपोर्ट दि.10-4-12 ला मिळाला तयार केला असे त्यातील नमूद नोंदीवरुन वर्णनावरुन दिसते. साहजिकच त्यामध्ये तफावत असणार हे निर्विवाद सत्य आहे. कारण प्रस्तुत सर्व्हे हे वस्तुस्थितीला धरुन केलेले नाहीत त्यामध्ये नेमक्या अपघात जागच्या ठिकाणची म्होरी ज्या म्होरीचा नं.694/1 नंबर अपेक्षित आहे तो सर्व्हे रिपोर्टमध्ये कोठेही नाही त्यामुळे प्रस्तुत सर्व्हेअरनी अपघात मार्गावरील कोणत्या मोरीच्या कठडयाबाबतचा सर्व्हे केला हे समजून येत नाही त्याचप्रमाणे नि.16 चा सर्व्हे अपघातानंतर 2 महिन्यानी झाला आहे. त्यामुळे तो सर्व्हे अपघाताच्या ठिकाणाबाबत विश्वसनीय पुरावा नाही असे आमचे स्पष्ट मत आहे. फार तर तो फक्त विषयांकित वाहनाचे नुकसानीबाबतचे स्वरुप समजणेसाठी विचारात घेता येईल व त्यावरुनही वरील विवेचनावरुन असे दिसते की, जाबदारातर्फे दाखल केलेले दोन्ही सर्व्हे हे जादातर पोलिस पेपर्सवरुन व ऐकीव माहितीवरुन घेतलेचे दिसून येतात. त्यामुळे त्याची विश्वासार्हता कायदेशीरदृष्टया पुराव्यासाठी स्विकारणे योग्य ठरत नाही असे आमचे स्पष्ट मत आहे.
5.4- प्रस्तुत प्रकरणी तक्रारदाराच्या विषयांकित वाहनाचा अपघात झालेवर त्यानी अपघातग्रस्त वाहन त्यांचेकडे ठेवणेची सोय नसल्याने व शहरामध्ये वाहन पार्किंगची समस्या असलेने अपघातग्रस्त वाहन तक्रारदाराला मे.साई वाहन तळ पार्किंग कराड यांचेकडे दि.20-7-2012 रोजी पार्क केले व ऑक्टोबर 2012 मध्ये विषयांकित वाहनाची सर्व मूळ कागदपत्रे, गाडीच्या दोन चाव्या जाबदाराकडे जमा केल्या. वरील सर्व कागदपत्रे, वाहनाच्या चाव्या मिळालेची पोहोच जाबदारानी तक्रारदाराना दिली असून सदर पोहोचपावती नि.5-8 कडे प्रकरणी दाखल आहे. दि.1-2-14 रोजी मे.साई वाहनतळ- पार्किंग यानी तक्रारदाराला नोटीस देऊन तक्रारदाराचे विषयांकित वाहनाचे दि.20-7-2012 पासून एकूण 550 दिवसांचे पार्किंग बील रु.82,500/- सत्वर अदा करावे अशी नोटीस तक्रारदाराला दिलेली आहे व त्यामुळे वरील पार्कींग रक्कम रु.82,500/- व दि.1-2-14 पासून होणारे पुढील पार्कींग बिल जाबदाराकडून मिळावे अशी मागणी तक्रारदाराने मंचाकडे केली आहे. यासंबंधाने विचार करता विषयांकित अपघातग्रस्त वाहन मे.साई पार्कींगकडे पार्क केलेचे जाबदाराना माहित होते व सदर वाहनाची सर्व मूळ कागदपत्रे व दोन चाव्या जाबदाराकडे तक्रारदारानी जमा केल्या, त्याच दिवशी दि.25-6-13 रोजी जाबदाराला माहित होते. त्याचवेळी जाबदारानी वरील कागदपत्रे व गाडीच्या चाव्या जाबदाराकडे जमा केल्याबद्दल पोहोचपावती दिली असून ती नि.5-8 कडे दाखल आहे. त्याच दिवशी जर जाबदारानी तक्रारदारांचा क्लेम मान्य करुन विषयांकित वाहन जर कोणत्याही अधिकृत मोटार गॅरेजकडे दुरुस्तीसाठी पाठवले असते किंवा पाठवणेस सांगितले असते तर पार्किंगचा प्रश्नच आला नसता, परंतु त्यानी तसे काहीही तक्रारदाराला शेवटपर्यंत व आजअखेर सांगितलेचे दिसून येत नाही व विषयांकित वाहनाच्या चाव्या जाबदाराकडे असलेने त्यांनीही ते ठेवलेल्या पार्किंगमधून काढून त्यांचे जागेत नेले असते तरी चालले असते परंतु अशी कोणतीही कृती न करुन जाबदारानी निष्काळजीपणा केला आहे. त्यामुळे तक्रारदारांचा पार्किंगचा खर्च मिळणेची तक्रारदारांची मागणी आम्हांस योग्य वाटते. एकूणच परिस्थितीत तक्रारदारानी दाखल केलेल्या नि.5-1 कडील विषयांकित वाहनाची पॉलिसी, नि.5-3 कडील पंचनामा, नि.5-4 कडील खबरीजबाब(एफ.आय.आर) नि.5-5 कडील चौकशी अधिकारी संतोष पावार यांचे दि.31-10-2012 चे पत्र, दि.9-1-2013 चे जाबदारांचे तक्रारदारांच्या क्लेमचा निर्णय करणेसाठी कागदपत्रे पूर्तता करणेचे पत्र, नि.5-7 कडे तक्रारदारांचे नोटरीसमोरील अपघाताचे वस्तुस्थितीबाबतचे प्रतिज्ञापत्र, नि.5-8 कडील विषयांकित वाहन चालकाचे प्रतिज्ञापत्र, नि.5-9 कडील विषयांकित वाहनाची मूळ कागदपत्रे व गाडीच्या 2 चाव्या जाबदाराला मिळालेची जाबदारानी दिलेली पोहोचपावती, नि.5-10 कडील मे.साई वाहनतळ-पार्कींगची दि.1-4-2014 ची नोटीस, नि.5-11 कडील अपघातग्रस्त वाहनाचे फोटो, नि.13-6, 13-7 कडील अनुक्रमे आर.सी.सी.बुक व चालकाचा वाहन परवाना इ.पुराव्याचे कागदपत्रे दाखल केली असून तक्रारदारांनी त्यांचा वाहन नुकसानी विमा दावा योग्य व कायदेशीर असल्याचे शाबित कले असून तक्रारदारांचा विमा दावा कोणत्याही ठोस, योग्य व कायदेशीर कारणाशिवाय नाकारुन तक्रारदाराना जाबदारानी सदोष सेवा दिली असल्याचे पूर्णतः शाबित होते. त्याचप्रमाणे सदर तक्रारदार हे वाहन पार्किंगचे भाडे जाबदाराकडून मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हा मंच आला आहे. त्यामुळे मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो.
5.5- सदर प्रकरणातील जाबदारांचे वकीलांनी मे.मंचासमोर तोंडी कथन केले होते व त्यांच्या युक्तीवादातही त्यानी नमूद केले आहे की, जाबदार हे सदर प्रकरण तडजोडीने मिटवणेस तयार आहेत. सदर अपघातग्रस्त वाहनाची टोटल लॉस प्रमाणे जास्तीत जास्त रक्कम रु.2,64,000/- (रु.दोन लाख चौसष्ट हजार मात्र)देणेस तयार आहेत, त्यामुळे प्रस्तुत प्रकरण लोकन्यायालयात ठेवणेत आले. परंतु तक्रारदारानी वरील रकमेवर तडजोड करणेस नकार दिला. यावरुन एक बाब स्पष्ट होते की, जाबदाराना विषयांकित वाहन 100 टक्के बाधित झाले आहे, नुकसानग्रस्त झाले आहे हे मान्य आहे. प्रस्तुत प्रकरणी जाबदारानी दाखल केलेले नि.16 कडील नितीन जोशी यांचा अंतिम सर्व्हे रिपोर्ट पाहिला असता असे स्पष्ट होते की, तक्रारदारांचे वाहन हे 100 टक्के नुसानग्रस्त झाले असून सदर वाहन पुन्हा दुरुस्त करुन दयावयाचे झालेस विषयांकित वाहनाचे स्पेअरपार्टस, कामगार चार्जेस व टॅक्स धरुन एकूण रु.7,85,017/- इतका खर्च अपेक्षित धरला आहे व प्रत्यक्ष रिपेअर जबाबदारी किंमत रु.3,95,587.20 इतकी दाखवली आहे. याच सर्व्हेअरनी त्यांचे प्रतिज्ञापत्र नि.21 कडे दाखल केले आहे. त्यात त्यांनी ही बाब प्रतिज्ञापत्राच्या पान क्र.1 कलम 2 मध्ये पूर्णतः मान्य केली आहे की, 'या ठिकाणी वाहनाची किंमत ही रु.5,00,000/-(रु.पाच लाख मात्र) आहे व हीच रक्कम देय असते'. त्याचप्रमाणे वरील कथन यातील जाबदारांनी त्यांच्या कैफियत पान क्र.2, कलम 8 मध्ये व लेखी युक्तीवादातही मान्य केले आहे व प्रस्तुत तक्रारदारांची हीच मागणी आहे, तरी परंतु सदर रक्कम तक्रारदारास दयावी लागू नये म्हणून जाबदारानी तक्रारदाराचे अपघातग्रस्त वाहनाची दुरुस्ती केलेवर देयता रु.3,30,000/-(रु.तीन लाख तीस हजार मात्र) इतकी येते तर टोटल लॉस देयता रक्कम रु.2,64,000/-(रु.दोन लाख चौसष्ट हजार मात्र) इतकी येते व नादुरुस्त वाहन विकल्यावर त्याची किंमत रु.2,35,000/- इतकी येते. अशा प्रकारे तक्रारदाराला रु.पाच लाख नुकसानभरपाई मिळते असे अजब गणित मांडले आहे, परंतु आमचे मते या जरतरच्या गोष्टी असून अशा प्रकारचा तक्रारदाराचा बुध्दीभेद जाबदारानी करणेचा प्रयत्न केला आहे. मुळातच नि.16 चा सर्व्हे रिपोर्ट सांगतो की, विषयांकित अपघातग्रस्त वाहन दुरुस्ती करणेसाठी अंदाजे रु.7,85,017/- (रु.सात लाख पंचाऐशी हजार सतरा मात्र)इतका खर्च येईल हे मान्य केले आहे परंतु तक्रारदाराचे वाहनदुरुस्तीची देयता रक्कम मात्र रु.3,90,000/- येते असे म्हणतात हे गणित आम्हांस अनाकलनीय वाटते. त्यामुळे आम्हांस सदर सर्व्हे रिपोर्टवर विसंबून रहाता येणार नाही. प्रत्यक्षात विषयांकित वाहन हे आर्थिकदृष्टया रिपेअरयोग्य नाही हे स्पष्ट होते. तक्रारदारानी सदर कामी मा.वरिष्ठ कोर्टाचे, सी.पी.जे.2009 (IV) page 46 Supreme Court of India यांचे New India Insurance Co.Ltd.V/s.Pradeep Kumar या निकालात स्पष्ट केले आहे की, Surveyors report not last and final word, it may be basis for settlement of claim but not binding upon insurer nor insured complainant claim accepted by consumer forum as duly supported by original vouchers, bills reports etc. असाच निष्कर्ष व मत मा.वरिष्ठ न्यायालयाने तक्रारदारानी सदर प्रकरणी दाखल केलेल्या पुढील न्यायनिवाडयात नोंदवले आहे. 1. मा.राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग, नवी दिल्ली 1. Rev.petition no.2203/2001- Vinit Poonia V/s. New India Insurance. 2. Rev.Petition No.4206/2007, IFFCO Tokio General Ins.Co.Ltd. And Anr. V/s. K.P.Prakas. हे जादा न्यायनिवाडे तक्रारदारानी मंचात दाखल केलेले आहेत. त्यांचा सारांश हा वरील न्यायनिवाडयाशी सुसंगत असाच आहे. यामध्येसुध्दा वाहनाची 100 टक्के नुकसानी धरुन sum assured price जेवढी होती ती संपूर्ण किंमत देय धरुन वाहनधारकास दिली आहे. वरील न्यायनिवाडे हे तक्रारदाराचे दाव्याची निर्विवादपणे पुष्टी करतात.
त्यामुळे आम्ही तक्रारदाराचे वाहनाची पॉलिसी, वाहनपार्किंगची बीलमागणी नि.15 व 16 सर्व्हे रिपोर्टमधील नोंद केलेली वाहनाची नुकसानी (Total loss) नोटीस वगैरेवर अवलंबून निष्कर्ष नोंदवले आहेत.
त्यामुळेच जाबदारानी प्रकरणी दाखल केलेला अपघातग्रस्त वाहनाच्या भरपाईच्या दर्शवलेल्या रकमेशी आम्ही सहमत नाही. आमचे मते सदर जाबदार विमा कंपनी यानी तक्रारदाराना विषयांकित अपघातग्रस्त वाहनाची विमा पॉलिसी दिली आहे ती विमा पॉलिसी क्र.1517023111010000945 हा उभयतामधील करार आहे व त्यास बांधील राहून कृती करणे ही जाबदाराची कायदेशीर व नैतिक जबाबदारी आहे. जाबदारानी दि.23-8-2011 ते 22-8-2012 अखेरच्या कालावधीसाठी या संपूर्ण वर्षाची विषयांकित वाहनाची बाजारभाव किंमत रु.5,00,000/-(रु.पाच लाख मात्र)निर्धारित करुन तेवढी जोखीम जाबदारानी स्विकारली आहे. अपघातग्रस्त वाहन संपूर्ण 100 टक्के नुकसानग्रस्त झालेचे जाबदाराना मान्य आहे व नि.21 प्रमाणे नि.16 चे सर्व्हेअर श्री.नितीन जोशी मान्य करतात की, 'या ठिकाणी वाहनाची किंमत ही रु.5,00,000/- आहे व ही रक्कमच देय असते. ही बाब जाबदारानासुध्दा मान्य आहे'. त्यामुळे याठिकाणी सदर प्रकरणी अपघातग्रस्त वाहनाची नुकसानी रु.5,00,000/-(रु.पाच लाख मात्र)जाबदाराकडून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत मंच आला आहे. जाबदार हे त्यांचे आक्षेप ठोस पुराव्यानिशी शाबीत करु शकलेले नाहीत. परंतु तक्रारदारानी त्यांची तक्रार ठोस पुराव्यानिशी व जाबदारांच्या पुराव्यातील उणीवा, त्रुटी, खोटेपणा दाखवून देऊन त्यांची तक्रार शाबित केली आहे. वास्तविक तक्रारदारांचा वाहन अपघात नुकसानभरपाई दावा योग्य व कायदेशीर असताना तो देणेसाठी निरनिराळी थातुरमातुर कारणे दाखवून ती सुध्दा अपघात झालेपासून दीड वर्षानी तक्रारदाराना त्यांचा विमा दावा नाकारलेचे कळविले. त्यामुळे तक्रारदाराला नाईलाजाने कोर्टकचेरी करावी लागली. मार्च 2012 पासून 3 वर्षे वाहन उपभोगापासून त्यांना वंचित रहावे लागले, मंचामध्ये हेलपाटे घालावे लागले त्यामुळे त्यांना निःसंशयरित्या मानसिक, शारिरीक त्रासास सामोरे जावे लागले आहे हे पूर्णतः शाबीत होते. त्यामुळे तक्रारदार हा वाहन नुकसानभरपाईपोटी रक्कम रु.5,00,000/- त्यावर अपघात तारखेपासून म्हणजे दि.20-3-2012 पासून द.सा.द.शे.10 टक्के व्याजाने मानसिक, शारिरीक त्रासापोटी रु.40,000/-, अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- वाहन पार्किंगची रक्कम दि.1-2-2014 अखेर रु.82,500/- व त्यापुढील रक्कम जाबदाराकडून मिळणेस पात्र असल्याच्या निष्कर्षाप्रत हा मंच आला आहे.
6. वरील सर्व कारणमीमांसा व विवेचन याना अधीन राहून खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येतात-
-ः आदेश ः-
1. तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर करणेत येते.
2. जाबदारानी तक्रारदारांच्या कायदेशीर देय असलेला अपघात वाहन नुकसान भरपाई दावा क्षुल्लक, असमर्थनीय, बेकायदेशीर कारणानी नाकारुन तक्रारदारास सदोष सेवा दिली असल्याचे घोषित करणेत येते.
3. जाबदारांनी विषयांकित वाहन क्र. MH-45-A-1400 या वाहनाच्या (टोटल लॉस) अपघाती नुकसानीपोटी रक्कम रु.5,00,000/- (रु.पाच लाख मात्र) त्यावर वाहन अपघात तारीख दि.21-3-2012 पासून द.सा.द.शे.10 टक्के दराने होणारे संपूर्ण रक्कम फिटेपर्यंतचे रकमेसह होणारी रक्कम सदर आदेश प्राप्त झालेपासून चार आठवडयाचे आत तक्रारदाराना अदा करावी.
4. जाबदाराने तक्रारदाराना दि.1-2-2014 अखेरची वाहन पार्किंगची रक्कम रु.82,500/-(रु.ब्याऐंशी हजार पाचशे मात्र) व दि.2-2-2014 पासून पुढील होणारी पार्किंग खर्चाची रक्कम आदेश प्राप्त झालेपासून चार आठवडयाच आत तक्रारदाराना अदा करावी.
5. जाबदाराने तक्रारदाराना शारिरीक, मानसिक त्रासापोटी रु.40,000/-(रु.चाळीस हजार मात्र) व अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- आदेश प्राप्त झालेपासून चार आठवडयाचे आत अदा करावी.
6. जाबदारानी विहीत मुदतीत आदेशाचे पालन न केल्यास तक्रारदाराना त्यांचेविरुध्द कलम 25 व 27 प्रमाणे दाद मागणेची मुभा राहील.
7. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
8. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि.17-4-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.