निकाल
(घोषित दि. 27.09.2016 व्दारा श्री.के.एन.तुंगार, अध्यक्ष)
ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये तक्रार.
तक्रारदार हा ट्रॅक्स क्रुझर या चारचाकी वाहनाचा मालक आहे. त्याचा नं.एम.एच.21-व्ही-0115 आहे. त्याचा विमा गैरअर्जदार यांच्याकडे दि.27.11.2014 ते 26.11.2015 या कालावधीकरता उतरविलेला होता. दि.29.04.2015 रोजी सदर वाहनाचा अपघात झाला त्यावेळी तक्रारदाराच्या परवानगीने सदर वाहनातून तक्रारदाराचे नातेवाईक लग्न समारंभाहून परत येत होते, सदर वाहन चालविणा-या ड्रायव्हरजवळ वैध परवान्याचे लायसन्स होते. अपघातात संपूर्ण वाहनाचे नुकसान झाले म्हणून तक्रारदार याने वाहनाची दुरुस्ती करुन मिळण्याकरता विमा दावा दाखल केला. तक्रारदार याने विमा दावा दाखल करण्याकरता आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची पुर्तता केली. अंदाजे दुरुस्ती खर्च रु.62000/- व सुटया भागाचा खर्च रु.4,01,645/- आहे. एकूण खर्च रु.4,63,645/- होता. तक्रारदार हा एक वृध्द गृहस्थ आहे. नादुरुस्त वाहनाच्या दुरुस्तीकरता भरमसाठ खर्च लागणार होता त्यामुळे त्याने त्याचा विमा दावा लवकरात लवकर मंजूर करावा अशी विनंती केली. विमा दावा दाखल झाल्यानंतर दि.16.02.2015 रोजी तक्रारदाराचा विमा प्रस्ताव गैरअर्जदार यांनी नामंजूर केला व कळविले की, तक्रारदाराचे वाहन व्यावसायीक कारणाकरता वापरले जात होते. सदर कारण हे विम्याच्या अटी व शर्तीचा भंग करणारे आहे. विमा प्रस्ताव दाखल केल्यानंतर गैरअर्जदार यांनी अॅक्सीडेंटचा सर्वे सुध्दा दि.25.05.2015 रोजी करुन घेतलेला आहे. वरील कारणास्तव तक्रारदार यांनी हा तक्रार अर्ज दाखल केला आहे आणि अशी विनंती केली आहे की, त्यांचा तक्रार अर्ज मंजूर करावा आणि नुकसान भरपाई म्हणून रु.8,13,645/- मंजूर करावे तसेच त्यावर 12 टक्के प्रमाणे व्याज देण्यात यावे.
गैरअर्जदार हे वकीलामार्फत हजर झाले त्यांनी सविस्तर लेखी जबाब दिला. गैरअर्जदार यांच्या म्हणण्याप्रमाणे सदर वाहन तक्रारदाराच्या नातेवाईकांच्या कब्जात नव्हते. सदर वाहन नातेवाईकांच्या कब्जात देण्याकरता तक्रारदाराची परवानगी ही नव्हती. जरी परवानगी असेल तरी सदर परवानगी तक्रारदाराच्या नातेवाईकांच्या लग्नाकरीता घेण्यात आली होती हेही म्हणणे चुक आहे. सदर वाहनाचा अंदाजे दुरुस्ती खर्च रु.4,63,645/- असल्याचे कथन चुक आहे. गैरअर्जदार यांनी तक्रारदाराच्या वाहनाचा विमा काही अटी व शर्ती वर घेतला होता. सदर विम्याचा कालावधी दि.27.11.2014 ते 26.11.2015 असा होता. विम्याची मुख्य अटी व शर्ती मध्ये सदर वाहनाचा वापर भाडयाने किंवा सामान वाहतुकीकरता करु नये. तसेच रेसींगकरता व इतर दर्शविलेल्या कामाकरता करु नये असा स्पष्ट उल्लेख होता. तक्रारदार याने स्वतःहून विमा घेतेवेळी सदर वाहनाची किंमत रु.1,60,000/- असल्याचे लिहून दिलेले आहे. दि.28.04.2015 रोजी तक्रारदार याने विमा पॉलीसीच्या अटी व शर्तीचा भंग केलेला आहे. तक्रारदार याने विमा उतरविलेले वाहन विजय रावसाहेब जाधव यांना लग्नकार्य करता वापरण्याकरता भाडयाने दिले. लग्नाहून परत येत असताना अंदाजे सायंकाळी 5.00 वाजण्याच्या सुमारास सदर वाहनाचा अपघात झाला. घटनेच्या दुस-या दिवशी तक्रारदार याने अपघाताची माहिती गैरअर्जदार यांना दिली. दि.22.05.2015 रोजी तक्रारदार याने विमा रक्कम मागणीचा दावा दाखल केला. दि.08.07.2015 रोजी सर्वेअरने सर्वे केला व अपघातातील वाहनाचे नुकसान रु.2,25,590/- चे झाल्याचे कळविले. अशा परिस्थितीत तक्रारदार यांने अटी व शर्तीचा भंग केल्यामुळे तक्रारदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा अशी विनंती गैरअर्जदार यांनी केलेली आहे.
तक्रारदार व गैरअर्जदार यांनी आपआपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ आवश्यक कागदपत्रांच्या नक्कला ग्राहक मंचासमोर सादर केलेल्या आहेत.
विमा कंपनीने दोन मुद्यावर तक्रारदाराच्या तक्रार अर्जास प्रखर विरोध केलेला आहे. विमा देतेवेळी ज्या अटी व शर्ती तक्रारदार याचेवर लादल्या होत्या, त्याचा तक्रारदाराने भंग केला आहे. सदर विमा संरक्षणातील वाहन भाडयाने दिल्यास तक्रारदार यास विमा छत्र उपलब्ध होणार नाही असे विम्याच्या करारामध्ये स्पष्ट केलेले आहे ते तक्रारदार यास मान्य होते. परंतू सदर अटी मधून सुटका मिळावी म्हणून तक्रारदार याने (त्याच्या गाडीचा अपघात झाल्यानंतर) नातेवाईकाच्या लग्नाकरता त्याचे परवानगीने भाडे न घेता सदर वाहन दिले असे सांगून विमा दाव्याची भरमसाठ रक्कम मागितलेली आहे. या मुद्यावर तक्रारदार याने तीन साक्षीदारांची शपथपत्रे दाखल केलेली आहेत. पहिले शपथपत्र लहू संताराम गारखेडे, दुसरे शपथपत्र गणेश रावसाहेब जाधव यांचे आहे. तिसरे शपथपत्र अशोक तानाजी पवार यांचे आहे. या तिनही साक्षीदारांनी अपघातानंतर तात्काळ पोलीसांनी जबाब घेतला त्यावेळी तक्रारदाराचे वाहन भाडयाने घेऊन लग्नकार्य करता गेल्याचे सांगितले. परंतू ज्यावेळी असे निष्पन्न झाले की, भाडयाने वाहन घेतले असे सांगितले तर विम्याची रक्कम मिळणार नाही, त्यावेळी त्यांनी आपली जबानी बदलली आणि असे सांगण्याचा प्रयत्न केला की, संबंधित साक्षीदारांची अवस्था जखमी असल्यामुळे त्यांची मानसिक स्थिती त्यावेळी बरोबर नव्हती म्हणून त्यांनी त्यावेळी पोलीसांना अपघातातील वाहन भाडयाने घेतल्याचे सांगितले. परंतू नंतर त्यांनी सदर जबाबामध्ये असलेली त्रुटी दुरुस्त केली आहे. आमच्या मताने सुधारीत जबाब देणे ही पश्चात बुध्दी असून ती फक्त भरमसाठ रक्कम विमा कंपनीकडून विनासायास उकळण्याचे हेतुने आहे. तक्रारदार याने या तक्रार अर्जात त्याचे म्हणण्याप्रमाणे गाडीचे नुकसान रु.4,63,645/- झाल्याचे लिहीले असले तरी विनंतीनुसार रु.8,13,645/- ची मागणी केलेली आहे. आमच्या मताने ही पध्दत अत्यंत चुक आहे. तसेच आक्षेपार्ह आहे. अशा रितीने पोलीसांनी पुर्वी घेतलेल्या जबाबामध्ये ब-याच कालावधीनंतर सुधारणा करण्याकरता संबंधित साक्षीदारांचे वेगळे जबाब घेऊन स्वतःच्या फायदाचे जबाब मिळविणे ही अत्यंत आक्षेपार्ह गोष्ट आहे. अशा त-हेच्या पश्चात बुध्दीने मिळविलेल्या जबाबावर विश्वास ठेवून जर तक्रारदार यास विम्याची भरमसाठ रक्कम मंजूर केली तर तो चुक पायंडा होईल.
विमा कंपनीकडे ज्यावेळी तक्रारदार याने विमा उतरविला त्यावेळी त्याच्या गाडीची विमा किंमत रु.1,60,000/- असल्याचे स्पष्ट शब्दात लिहीलेले आहे. असे असल्यामुळे कायद्याने जास्तीत जास्त रु.1,60,000/- पर्यंत नुकसान भरपाईची मागणी मिळण्यास तक्रारदार पात्र ठरत होता परंतू त्याने तसे न करता अव्वाच्यासव्वा रक्कम नुकसान भरपाई म्हणून मागितलेली आहे. अर्थात पॉलीसीच्या अटी व शर्तीचा भंग केल्यामुळे तक्रारदार एकही पैसा नुकसान भरपाई म्हणून मिळविण्यास पात्र नाही ही गोष्ट वेगळी आहे.
सर्वेअरने जे लॉस असेसमेंटचे स्टेटमेंट बनविले ते मंचासमोर दाखल आहे त्याच्या शेवटच्या पानावर सर्वेअरने लिहीले आहे की, जर यदाकदाचित तक्रारदार हा कायद्याच्या तरतुदीनुसार विमा रक्कम मिळण्यास पात्र ठरला तर जास्तीत जास्त तो 97,885/- रु 09 पैसे इतकी रक्कम नुकसान भरपाई म्हणून मागू शकतो. या पार्श्वभूमीवर तक्रारदार याने मागणी केलेला विमा रकमेचा दावा स्विकारण्याजोगा नाही हे स्पष्ट होते.
वर चर्चा केलेल्या वस्तुस्थितीनुसार आमच्या मताने तक्रारदार हा कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळणेस पात्र नाही. त्यामुळे आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करतो.
आदेश
- तक्रारदार याचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येतो.
2) खर्चाबाबत आदेश नाही.
श्रीमती एम.एम.चितलांगे श्री. सुहास एम.आळशी श्री. के.एन.तुंगार
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना