::: नि का ल प ञ ::: (मंचाचे निर्णयान्वये,श्री.अनिल एन.कांबळे,मा.अध्यक्ष) (पारीत दिनांक :10.02.2012) 1. अर्जदाराने, प्रस्तुत तक्रार ग्राहक सरंक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत, गै.अ. यांचे विरुध्द दाखल केलेली आहे. अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
2. तक्रारकर्ता हा रा.गणेशपुरी त. ब्रम्हपुरी जि.चंद्रपूर येथील रहिवासी असुन, तक्रारकर्ताची आई श्रीमती इंदिरा ऊर्फ गयाबाई ढोरे यांचे मालकीची शेतजमीन मौजा शिवनी (बु.) ता.आरमोरी जि. गडचिरोली येथे सर्व्हे नं. 188 क्षेञफळ एकूण 0.58 हे.आर जमा 1.65 आहे. तक्रारकर्ताची आई शेतकरी होती. शेतातील उत्पन्नावर, आई कुटूंबाचे पालन पोषण करीत होती. 3. विरुध्द पक्ष 1 हे विमा कंपनी असुन विरुध्द पक्ष 2 ही विमा सल्लागार कंपनी आहे. शासनाच्या शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजने अंतर्गत रु.1,00,000/- चा विमा, विरुध्द पक्ष 3 तर्फें उतरविण्यात आला होता. दि.07/08/2007 रोजी तक्रारकर्ताची आई गावच्या तलावावर कपडे धुण्यास गेली असता पाण्यात बुडून मरण पावली. तक्रारकर्ताची आई शेतकरी असल्याने शासनातर्फे तक्रारकर्ताची आईचा शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा काढला असल्याने, विरुध्द पक्ष 1 कडून रु.1,00,000/- चा विमा रकमेसाठी पाञ होता. तक्रारकर्ताची आईचे अपघाती मृत्यु झाल्याने विरुध्द पक्ष 2 व 3 तर्फे विरुध्द पक्ष 1 कडे रितसर अर्ज केला. तक्रारकर्ताला दावा मंजुर केला किंवा नाही हे चार वर्षा पासुन सांगीतले नाही. शेवटी तक्रारकर्ताने वकीलामार्फत दि.07/10/2011 ला सर्व विरुध्द पक्षांना नोटीस पाठवून भुगतान सात दिवसात करण्याचे कळविले. विरुध्द पक्षाकडून उत्तर आले नाही. तसेच विमा दाव्याचे भुगतान केले नाही. त्यामुळे विरुध्द पक्ष हे सेवेत ञुटी देत आहेत. दाव्याबाबत काहीही कारण सांगत नसल्याने अनुचित व्यापार पध्दत अवलंबत आहे.
4. विरुध्द पक्ष 1 व 3 मुळे तक्रारकर्ताला मानसीक ञास झाला. विरुध्द पक्ष यांनी शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजने अंतर्गत दाव्याची रक्कम दिली नाही. त्यामुळे विमा दाव्याची रक्कम रु.1,00,000/-मिळण्याकरीता विरुध्द पक्षाकडे प्रस्ताव दिल्या पासुन म्हणजे दि.07/09/2007 पासुन द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह देण्याचा आदेश दयावे. तसेच मानसीक, शारीरिक व आर्थिक ञासापोटी रु.20,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.10,000/- विरुध्द पक्ष 1, 2 व 3 यांना आदेश दयावे अशी मागणी केली आहे.
5. तक्रारकर्त्याने नि. 5 नुसार एकूण 15 झेरॉक्स दस्तऐवज दाखल केले. तक्रार दि.20/10/2011 ला स्विकृत करुन विरुध्द पक्षांना नोटीस काढण्यात आले. विरुध्द पक्ष क्रं. 1 हजर होवून नि. 10 नुसार लेखीउत्तर सादर केला. विरुध्द पक्ष 2 ने नि. 14 नुसार लेखीउत्तर पोस्टामार्फत पाठविला. विरुध्द पक्ष 3 यास नि. 7 नुसार नोटीस तामील होवूनही हजर झाला नाही. व आपले लेखी म्हणणे सादर केला नाही. त्यामुळे त्याचे विरुध्द दि.05/12/2011 ला प्रकरण एकतर्फा चालविण्यात यावे असा आदेश नि. 1 वर पारीत करण्यात आला. 6. गै.अ.क्रं. 1 नी निशानी 10 नुसार दाखल केलेल्या लेखीउत्तरात प्राथमिक आक्षेप घेतला की, शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत महाराष्ट्र शासनाने ञिसदस्यीय विमा पालीसी काढलेली होती व त्याचा निर्धारीत कालावधी दि.15/07/2006 ते दि.14/07/2007 पर्यंत मर्यादित होता. त्याअर्थी गै.अ.क्रं.1 यांनी नियमाप्रमाणे सर्व कायदेशीर बाबी विचारात घेवून अर्जदाराच्या मागणीला प्रतीसाद दिला नाही. 7. गै.अ.क्रं.1 यांनी लेखउत्तरात पुढे असेही म्हणणे सादर केले की, विमा पॉलिसीचा वैद्य कालावधी दि.15/07/2006 ते दि.14/07/2007 पर्यंत होती. याअर्थी दि.07/08/2007 रोजी झालेल्या मृत्युबद्दल नुकसान भरपाई देण्याची कोणत्याही प्रकारची जबाबदारी गै.अ. क्रं. 1 वर राहत नाही. त्यामुळे गैरवाजवी, बेकायदेशीर मागणीचा विचार करण्याचा प्रश्नच उदभवत नाही. अर्जदाराच्या तक्रारीतील संपूर्ण मजकुर माहीती अभावी नाकबुल व आमन्य आहे. अड. श्री.उदय क्षिरसागर यांचे कडून नोटीस प्राप्त झाला ही बाब मान्य व कबुल आहे. परंतु पॉलिसीच्या वैधते अभावी नोटीसावर विचार करण्याचा प्रश्नच उदभवत नाही. अर्जदाराने विमा पॉलिसी वैध नाही ही बाब माहीत असुनही कायदेशीर सल्लागाराच्या मदतीने खोटा दावा कोर्टापुढे सादर केला आहे. व गै.अ.ला मानसीक, शारीरिक, आर्थिक ञास व हानी पोहचविली आहे. म्हणून तक्रार संपूर्ण खर्चासह व दंडासह खारीज होण्यास पाञ आहे. करीता नैसर्गिक न्यायाच्या दृष्टिने खर्चासह खारीज करण्यात यावी. 8. गै.अ.क्रं. 2 ने नि. 14 अन्वये पोष्टामार्फत विना शपथपञावर लेखीउत्तर पाठविले आहे. त्यात कथन केले आहे की, तक्रारदार हे आमचे ग्राहक होवूच शकत नाही. परंतु ज्या विमा कंपनीने राज्य शासनाकडून विमा क्लेम स्विकारुन जोखीम स्विकारली आहे त्याचे ग्राहक होवू शकतात. केवळ मध्यस्त सल्लागार आहोत व शासनास विना मोबदला साहय करतो.
9. मयत गयाबाई किसन ढोरे गाव गणेशपुर तालुका ब्रम्हपुरी, जिल्हा चंद्रपूर सदरील प्रस्ताव हा आमच्या कार्यालयास प्राप्त न झाल्याने त्याविषयी आम्ही आपणास काही सांगण्यास असमर्थ आहोत. योग्य दोषी कडून कारण नसतांनाही तक्रारीस सामोरे जाण्यास भाग पाडल्याने हया अर्जाचा खर्च 5,000/- रु. देण्याचा आदेश व्हावा. व तक्रारीतुन निर्दोष मुक्तता करण्यात यावी अशी विनंती केली आहे. 10. गै.अ.क्रं. 3 ला नोटीस तामील होवून लेखीउत्तर सादर केला नाही. अर्जदाराने तक्रारीच्या कथना पृष्ठार्थ नि. 16 नुसार पुरावा शपथपञ सादर केला. तसेच नि. 17 च्या यादीनुसार एक शासन निर्णयाची प्रत दाखल केली. गै.अ. क्रं. 1 यांनी शपथपञ दयावयाचे नाही या आशयाची पुरसीस नि. 19 नुसार तसेच नि. 20 व 21 नुसार लेखीयुक्तीवाद व अतिरिक्त लेखीयुक्तीवाद दाखल केला. 11. अर्जदाराने दाखल केलेला दस्ताऐवज, शपथपञ व अर्जदाराचे वकीलांनी केलेल्या तोंडी युक्तीवादावरुन आणि गै.अ. यांचे लेखीयुक्तीवादावरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात. // कारणे व निष्कर्ष // 12. अर्जदार हा मृतक इंदिरा ऊर्फ गयाबाई ढोरे हीचा मुलगा असुन ती दि.07/08/07 रोजी गावातील तलावात कपडे धुण्यास गेली असता पाण्यात बुडून मृत्यु पावली. अर्जदार याने नि. 5, अ- 3 वर अकस्मात मृत्यु खबरी, इन्क्वेष्ट पंचनामा व घटनास्थळ पंचानाम्याची प्रत दाखल केली आहे. तसेच अ-4 वर पोस्टमार्टम रिपोर्ट सादर केली आहे. अर्जदाराने अ-5 वर मृत्यु प्रमाणपञाची प्रत देखील दाखल केली आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या दस्तऐवजावरुन इंदिरा ऊर्फ गयाबाई ढोरे हिचा पाण्यात बुडून मृत्यु झाला असे दाखल दस्ताऐवजा वरुन व पोस्टमार्टम रिपोर्ट वरुन सिध्द होतो. 13. अर्जदाराची आई मृतक इंदिरा ऊर्फ गयाबाई ढोरे हिचे नावाने मौजा शिवनी (बु) तलाठी साजा क्रं. 5 भूमापन क्र. 178 आराजी 0.58 हे.आर शेतजमीन होती. तक्रारीत असे अर्जदाराने म्हटले आहे. दस्त अ- 6 वर मृतकाचे गया ज. ऋषी ढोरे गणेशपुर असे दर्ज आहे. याच गट क्रमांकाच्या 7/12 चा उतारा अ- 7 वर दाखल केला आहे, त्यावर अर्जदार किशन ऋषी ढोरे याचे नावाची फेरफार घेण्यात आलेली आहे. अर्जदाराने दाखल केलेले दस्ताऐवज अ- 8 वर अधिकार अभिलेख पंजी व फेरफारची नोंदवही यांचे अवलोकन केले असता, त्यातही सौ.गया ऋषी ढोरे असे नाव नमुद आहे. या दस्तऐवजावरुन मृतक गया ऋषी ढोरे ही शेतकरी होती ही बाब सिध्द होतो. 14. अर्जदाराने तक्रारीत मृतक इंदिरा ऊर्फ गयाबाई ढोरे हीचा अपघाती मृत्यु झाल्याने, ती शेतकरी असल्याने महाराष्ट्र शासनाच्या योजने नुसार शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना अंतर्गत रु. 1,00,000/- नुकसान भरपाईची मागणी केली आहे. अर्जदाराने मृतक गयाबाई ढोरे हीचा अपघाती मृत्यु झाल्यानंतर नुकसान भरपाई मिळण्याकरीता विमा क्लेम सादर केला. परंतु क्लेम मिळाला नाही म्हणून तक्रार दाखल करुन नुकसान भरपाईची मागणी केली आहे. गै.अ. क्रं. 1 विमा कंपनीने लेखीउत्तरात असे कथन केले की, विमा पॉलिसीचा वैध कालावधी दि.15/07/2006 ते दि.14/07/2007 पर्यंत होता याबद्दल विमा पॉलिसीची प्रत नि. 11 च्या यादीनुसार दाखल केली आहे. मृतक गया ढोरे हीचा मृत्यु दि.07/08/2007 रोजी पाण्यात बुडून झाला. त्या कालावधीतीत विमा पॉलिसी ही वैध नव्हती त्यामुळे विमा क्लेम देण्याचा मुद्दा उपस्थित होत नाही. गै.अ. क्रं. 1 चा हा मुद्दा उपलब्ध रेकॉर्डवरुन ग्राहय धरण्यास पाञ आहे. अर्जदार याचे कथनानुसार शासनाने 12 जुलै 2007 ला शासन निर्णय घेऊन सदर योजना ची मुदत 15 जुलै ते 14 ऑगस्ट 2007 या एक महिण्याच्या कालावधी करीता मुदतवाढ दिली. याबद्दल अर्जदारने नि. 5 अ- 1 वर शासननिर्णयाची प्रत दाखल केली आहे. परंतु या शासननिर्णयाच्या आधारावर विमा पॉलिसी पुढील एक महिण्याकरीता काढण्यात आली हे दाखल दस्तऐवजावरुन सिध्द होत नाही. 15. अर्जदाराचे वकीलाने युक्तीवादात सांगितले की, शासननिर्णयानुसार एक महिण्याच्या मुदत वाढीच्या विमा प्रिमियमची रक्कम शासनातर्फं देण्यात आली परंतु ती रक्कम विमा कंपनीला मिळाली नाही. याबद्दल विमा कंपनीच्या अधिका-याचे शपथपञ दाखल केले नाही. अर्जदाराने आपली जबाबदारी गै.अ.क्रं. 1 वर लादण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तविक दस्त अ- 1 वर शासननिर्णयाव्दारे विमा प्रिमियमच्या रकमेची तरतुद केली आहे व ती प्रिमियमची रक्कम सहाय्यक संचालक, कृषि आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषीत केले असुन, पुणे कोषागारातुन रेखांकित धनादेशाव्दारे विमा कंपनीला अदा करावे असे त्यात नमुद केले आहे. याच शासननिर्णयानुसार वाढीव 1 महिन्याच्या कालावधीकरीता विमा प्रिमियम, विमा कंपनीला अदा करण्यात आल्याचे व वैध विमा कालावधीत आईचा मृत्यु झाल्याचे सिध्द करण्याचे जबाबदारी अर्जदाराची आहे. परंतु अर्जदाराने दाखल केलेल्या दस्तऐवजावरुन वैध विमा कालावधीत गयाबाई ढोरे हीचा मृत्यु झाला, हे सिध्द केले नाही तसेच शासनाकडून दि.07/08/2007 चे पूर्वी विमा कंपनीला प्रिमियम देण्यात आला असा कुठलाही दस्ताऐवज रेकॉर्डवर नाही. त्यामुळे गै.अ. यांनी सेवा देण्यात न्युनता केली हे सिध्द होत नाही. या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे.
16. गै.अ. यांनी लेखीउत्तरात विमा कालावधी वैध नसल्याचा आक्षेप घेऊनही अर्जदाराने कुठलेही वैध विमा पॉलिसी रेकॉर्डवर आणले नाही. यावरुन मृतक गयाबाई ढोरे हीचा मृत्यु वैध कालावधीतीत झालेला नसल्यामुळे विमा कंपनीने क्लेम दिला नाही. यात कोणतीही न्युनता किंवा अनुचित व्यापार पध्दत अवलंबली नाही. या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे.
17. एकंदरीत वरील कारणे व निष्कर्षावरुन आणि दाखल केलेल्या दस्तऐवजा वरुन तक्रार मंजुर करण्यास पाञ नाही. या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असल्याने तक्रार नामंजुर करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. // अंतिम आदेश // (1) अर्जदाराची तक्रार खारीज. (2) अर्जदार व गै.अ. यांनी आपआपला खर्च सहन करावा. (3) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी. दिनांक : 10/02/2012. |