(मंचाचे निर्णयान्वये – सौ. व्ही. एन. देशमुख, अध्यक्षा)
-- आदेश --
(पारित दिनांक 07 मे 2004)
अर्जदाराने सदरची तक्रार त्याच्या विमाकृत म्हशीच्या रकमेबाबत दाखल केली आहे.
अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे –
अर्जदाराने गैरअर्जदार नं. 2 यांचेकडून कर्जाऊ रक्कम घेऊन आय.आर.डी.पी. योजनेंतर्गत एक म्हैस खरेदी केली. सदरची म्हैस गैरअर्जदार नं. 1 यांचेकडे दिनांक 20.04.2001 ते 19.04.2006 या कालावधीकरिता रुपये 10,000/- रकमेसाठी विमाकृत केली. सदर म्हशीचा बिल्ला क्रं. 2983 असा होता. हा बिल्ला मे 2001 मध्ये गाहाळ झाला. अर्जदाराने गैरअर्जदार नं. 2 यांना दिनांक 25.05.2001 रोजी त्याबाबत सूचना दिली. परंतु गैरअर्जदार नं. 2 यांनी त्यांच्या अधिकृत अभिकर्त्याद्वारा पुन्हा बिल्ला (retagging)लावून दिला नाही. सदर म्हैस दिनांक 17.10.2001 रोजी मरण पावली. अर्जदार यांनी म्हशीचे सर्व आवश्यक ते कागदपत्र गैरअर्जदार नं. 2 यांचेकडे सुपूर्द केले. गैरअर्जदार नं. 2 यांनी अर्जदाराचा दावा अर्ज व सर्व कागदपत्रे गैरअर्जदार नं. 1 यांचेकडे पाठविली. परंतु गैरअर्जदार नं. 1 यांनी आजतागायत अर्जदाराचा दावा अर्ज निकाली काढला नाही, अथवा त्याला विमा रक्कम रुपये 10,000/- देखील दिली नाही. करिता अर्जदाराने रुपये 10,000/-त्यावरील 12%व्याजाने मिळावेत अशी मंचास विनंती केली आहे. आपल्या तक्रारी पृष्ठयर्थ अर्जदाराने निशाणी क्रं. 2 अन्वये स्वतंत्र हलफनामा दाखल केला असून निशाणी क्रं. 4 अन्वये विमा पॉलिसी व बिल्ला हरविल्याबाबतचे पत्र मंचासमोर दाखल केले आहे.
गैरअर्जदार नं. 2 यांनी आपले उत्तर निशाणी क्रं. 10 अन्वये दाखल केले असून अर्जदाराने आय.आर.डी.पी. योजनेंतर्गत कर्जाऊ रुपये 10,000/- घेतल्याचे मान्य केले आहे. तसेच अर्जदाराने दि.25.05.01 रोजी बिल्ला हरवल्याबाबत कळविल्याचे देखील नमूद केले असून पुन्हा बिल्ला लावण्याची जबाबदारी मात्र विमा कंपनीची असल्याने सदर प्रकरणी त्यांची कोणतीही जबाबदारी नाही, अथवा सेवेतील तृटीही नसल्यामुळे त्यांचे विरुध्द तक्रार खारीज करण्याची मंचास विनंती केली आहे.
गैरअर्जदार नं. 1 यांनी निशाणी क्रं. 16 अन्वये आपले उत्तर मंचासमोर दाखल केले असून बिल्ल क्रं. 2983 असलेल्या म्हशीचा विमा त्यांचे कंपनीकडून काढण्यात आल्याची बाब मान्य केली आहे. परंतु सदर बिल्ला हरवला याबाबत अर्जदाराने कोणतीही सूचना दिल्याचे मात्र नाकारले आहे. दिनांक 17.10.2001 रोजी म्हैस मरण पावली त्यावेळी तिच्या कानास बिल्ला नव्हता ही बाब नमूद केली असून सदर म्हशीची सर्व कागदपत्रे गैरअर्जदार नं. 2 यांनी त्यांचेकडे पाठवल्याचे अमान्य केले आहे. मरण पावलेली म्हैस ही विमाकृत असल्याबाबत गैरअर्जदार नं. 1 यांनी अमान्य केले असून अर्जदाराच्याच बेजबाबदारपणामुळे सदर म्हशीस पुन्हा बिल्ला लावण्याची खबरदारी न घेतल्यामुळे ‘‘नो टॅग नो क्लेम’’ या तत्वानुसार अर्जदार विमा रक्कम मिळण्यास पात्र ठरत नाही असे स्पष्ट केले असून अर्जदाराची तक्रार खारीज करण्याची मंचास विनंती केली आहे. आपल्या उत्तरापृष्ठयर्थ गैरअर्जदार नं. 1 यांनी गैरअर्जदार नं. 2 यांचेसोबत केलेल्या पत्रव्यवहाराची कॉर्बन प्रत मंचासमोर दाखल केली आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांच्या विद्यमान वकिलांचे तोंडी युक्तिवाद व मंचासमोर दाखल केलेल्या सर्व कागदपत्रावरुन मंचाचे निकष खालीलप्रमाणे आहेत.
अर्जदाराने नमूद केल्याप्रमाणे त्याच्या विमाकृत म्हशीचा बिल्ला मे 2001 मध्येच हरवल्याचे दिसून येते. त्याबाबत त्याने गैरअर्जदार नं. 2 यांना दिनांक 25.5.2001 रोजी कळविले. व सदर म्हैस दिनांक 17.10.2001 रोजी मरण पावली. म्हणजेच बिल्ला हरवल्यानंतर 5 महिन्यांचा कालावधी लोटला तरीही अर्जदाराने सदर म्हशीस पुन्हा बिल्ला लावून घेण्याची खबरदारी घेतली नाही हेच स्पष्ट दिसून येते. अर्जदाराने याबाबतची सूचना बँकेला दिली असली तरी गैरअर्जदार नं. 2 यांनी गैरअर्जदार नं. 1 यांना मात्र याबाबत सूचना दिली अथवा नाही. याविषयी कोणतेही स्पष्टीकरण गैरअर्जदार नं. 2 यांनी दिलेले नाही. तसेच विमाकृत म्हैस व मरण पावलेली म्हैस ही एकच असल्याबाबत देखील कोणताही कागदोपत्री ठोस पुरावा अर्जदार याने मंचासमोर दाखल केलेला नाही. गैरअर्जदार नं. 1 यांनी याबाबत साशंकता व्यक्त केल्यानंतर त्याबाबतचा पुरावा देण्याची जबाबदारी ही निश्चितच अर्जदाराची होती. परंतु अर्जदाराने मात्र याबाबत गैरअर्जदार यांचेशी पत्रव्यवहार करुन कोणताही पाठपुरावा केल्याचे दिसून येत नाही. गैरअर्जदार नं. 1 यांनी दिलेल्या दि.15.6.2001 च्या पत्रामध्ये याबाबत स्पष्ट उल्लेख करुन देखील गैरअर्जदार नं. 2 यांनी अर्जदारास कळवून कोणतीही खबरदारी घेतल्याचे दिसून येत नाही. करिता सदर विमा रक्कम मिळण्यास गैरअर्जदार नं. 1 यांना जबाबदार ठरविता येणार नाही असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन अर्जदाराने बिल्ला हरवल्याबाबत बँकेला कळविल्याचे दिसून येत असले तरी, त्याबाबतची पुढील कार्यवाही अर्जदारानेच केल्याचे दिसून येत नाही. विमा रक्कम देण्याची जबाबदारी ही गैरअर्जदार नं. 1 यांची असल्यामुळे गैरअर्जदार नं. 2 यांना देखील जबाबदार धरता येणार नाही. बिल्ला हरविलेलीच म्हैस विमाकृत असल्याबाबत साशंकता निर्माण होत असल्यामुळे अर्जदार कोणतीही विमा रक्कम मिळण्यास पात्र ठरत नाही असे मंचाचे स्पष्ट मत आहे. करिता मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
अं ती म आ दे श
1 अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येते.
2 खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.