श्री. एस.के.कापसे, मा. सदस्य यांचेनुसार
:- निकालपत्र :-
दिनांक 28 नोव्हेंबर 2011
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांनी दिनांक 22/7/2009 रोजी सिस्टीम मोबाईल, साळुंखे विहार रोड, पुणे यांचेकडून नोकीया हॅन्डसेट 3110 विकत घेतला होता. मार्च 2010 च्या दुस-या आठवडयात वॉरंटी कालावधीत मोबाईलची एल.सी.डी तुटली म्हणून तक्रारदार मोबाईल विक्रेत्यांकडे बदलून मिळण्यासाठी गेले. मोबाईल विक्रेत्यांनी नि:शुल्क दुरुस्ती करुन देण्यास नकार दिल्यामुळे तक्रारदार तो मोबाईल दुरुस्तीसाठी जाबदेणार यांच्याकडे घेऊन गेले. सदरची दुरुस्ती वॉरंटी मध्ये येत नसल्यामुळे दुरुस्तीसाठीचा खर्च तक्रारदारांना करावा लागेल असे जाबदेणार यांनी तक्रारदारांना सांगितले. जाबदेणार यांनी बदलून दिलेला पार्ट ओरिजिनल असेल असे सांगितल्यावरुन तक्रारदारांनी तो पार्ट जाबदेणार यांच्याकडून बदलून घेतला. नंतर तक्रारदार मोबाईल नोकीया सर्व्हिस सेंटर यांच्याकडे घेऊन गेले असता तो पार्ट डुप्लीकेट असल्याचे त्यांनी सांगितले. मोबाईल कॉर्नर – जाबदेणार यांनी नोकीया सर्व्हिस सेंटर यांना बदललेल्या पार्टची किंमत देण्याची तयारी दर्शविली, परंतू ही ग्राहकांची फसवणूक असल्याने तक्रारदारांनी त्यास नकार दिला. जाबदेणार यांनी अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केलेला असल्यामुळे तक्रारदारांनी सदरची तक्रार दाखल केली. तक्रारदारांनी तक्रारीसोबत शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली. तक्रारदारांनी जाबदेणार यांना दंड व्हावा व ती रक्कम चॅरिटी ऑर्गेनायझेशन ला देण्यात यावी अशी मागणी केली तसेच अॅडमिसीबल तक्रारीच्या खर्चाची मागणी केली.
2. जाबदेणार यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. तक्रारदार हे जाबदेणार यांचे ग्राहक नाहीत, जाबदेणार यांनी तक्रारदारांना सेवा दिलेली नाही. तक्रारदारांनी जे बील दाखल केलेले आहे त्यावर जाबदेणार यांच्या प्रोप्रायटरची सही नाही, कस्टमरचे नाव लिहीलेले नाही. तक्रारदार व जाबदेणार यांच्यात कथित व्यवहार झालेला नाही. तक्रारदारांनी जो अहवाल तक्रारीसोबत दाखल केलेला आहे तो नोकीया केअर/सर्व्हिस सेंटर यांच्या नेहमीच्या फॉरमॅट प्रमाणे नाही. तक्रारदार त्यांच्या मोबाईलचा एल.सी.डी पार्ट बदलण्यासाठी किती खर्च येईल हे विचारण्यासाठी जाबदेणार यांच्याकडे आले होते. जाबदेणार यांनी सांगितलेली खर्चाची रक्कम नोकीया केअर/सर्व्हिस सेंटर यांनी सांगितलेल्या रकमे एवढीच होती. तक्रारदारांनी रक्कम कमी करुन मागितली परंतू जाबदेणार यांनी त्यास नकार दिला त्यामुळे तक्रारदार व जाबदेणार यांच्यात कुठलाही व्यवहार झालेला नाही. तक्रारदारांनी तक्रारी सोबत दाखल केलेले बील कुठून आले हे जाबदेणार यांना माहित नाही. कस्टमरचे नाव बीलावर नमूद केलेले नाही. जाबदेणार यांची त्यावर सही नाही. रबरी शिक्का नाही. म्हणून तक्रार खर्चासह नामंजुर करण्यात यावी अशी विनंती जाबदेणार करतात.
3. तक्रारदारांनी रिजॉईंडर दाखल करुन जाबदेणार यांचा लेखी जबाब नाकारला.
4. जाबदेणार यांनी नोकीया केअर, एस.एस.रोड, धोबी घाट, पुणे येथे कार्यरत असलेल्या श्री. संतोष वीर, सेन्ट्रल मॅनेजर यांचे शपथपत्र तसेच नोकीया केअर कस्टमर कडून ज्या फॉरमॅट मध्ये माहिती लिहून घेते त्याची प्रत दाखल केली.
5. उभय पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचानी पाहणी केली. जाबदेणार लेखी जबाबात सदरहू पावती त्यांनी दिलेली नसल्याचे नमूद करतात. परंतू त्या पुष्टयर्थ्य त्यांनी त्यांच्या दुकानाची पावती कशा प्रकारची असते, दिनांक 12/3/2010 रोजी डिलीव्हरी चलन/इनव्हॉईस क्र.1391 वर कुठला व्यवहार झाला होता हे नमूद केलेले नाही, तसा पुरावाही दाखल केलेला नाही. तक्रारदारांनी “The Mobile Corner” यांचे डिलीव्हरी चलन/इनव्हॉईस क्र.1391 दिनांक 12/3/2010 दाखल केलेले असून त्यावरील पत्ता व प्रस्तूत तक्रारीतील जाबदेणार यांचा पत्ता एकच आहे, तसेच त्यात नोकीया 3110 रुपये 600/- असे नमूद केलेले आहे. पावती खाली मोबाईल कॉर्नर करिता प्रोपायटर असे नमूद करुन सही केलेली आहे. म्हणून ही पावती जाबदेणार यांनीच तक्रारदारांना दिलेली आहे असे मंचाचे मत आहे. तक्रारदारांनी तक्रारीसोबत दाखल केलेला अहवाल नोकीया केअर/सर्व्हिस सेंटर यांच्या नेहमीच्या फॉरमॅट प्रमाणे नाही, तो कशा पध्दतीचा असतो त्याची प्रत नोकीया केअर, एस.एस.रोड, धोबी घाट, पुणे येथे कार्यरत असलेल्या श्री. संतोष वीर, सेन्ट्रल मॅनेजर यांनी दाखल केलेल्या शपथपत्रासोबत दाखल करण्यात आलेली आहे. त्यामुळे तक्रारदारांनी दाखल केलेला अहवाल पुराव्या दाखल वाचता येणार नाही असे मंचाचे मत आहे. तक्रारदारांच्या मोबाईलची एल.सी.डी वॉरंटी कालावधीतच तुटली होती. जाबदेणार यांनी तक्रारदारांच्या मोबाईलचा दुरुस्त/बदलून दिलेला एल.सी.डी पार्ट दुरुस्तीनंतरही कार्यरत नव्हता ही जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे मत आहे. म्हणून जाबदेणार यांनी तक्रारदारांच्या मोबाईलचा एल.सी.डी पार्ट एक वर्षाच्या वॉरंटीसह बदलून दयावा असा मंच आदेश देतो. जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटीमुळे तक्रारदारांना निश्चितच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला असेल असे मंचाचे मत आहे. म्हणून जाबदेणार यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये 5,000/- दयावी असा मंच आदेश देतो. तक्रारदारांनी जाबदेणार यांना दंड व्हावा व ती रक्कम चॅरिटी ऑर्गेनायझेशन ला देण्यात यावी अशी मागणी केलेली आहे. परंतू तक्रारदारांची सदरची मागणी मान्य करणे न्याय होणार नाही असे या मंचाचे स्पष्ट मत आहे.
वर नमूद विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
[1] तक्रार मान्य करण्यात येत आहे.
[2] जाबदेणार यांनी तक्रारदारांच्या मोबाईलचा एल.सी.डी. पार्ट एक वर्षाच्या वॉरंटीसह आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत बदलून दयावा.
[3] जाबदेणार यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये 5,000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
[4] जाबदेणार यांनी तक्रारदारांना तक्रारीचा खर्च रुपये 500/- अदा करावा.
[5] आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.