श्री. प्रदीप पाटील, सदस्य यांचे कथनानुसार.
1. तक्रारकर्ती ही अय्याज हुसेन यांची पत्नी असून तिला 5 व 9 वर्षांची दोन मुले आहेत. वि.प.क्र. 1 हे सरकारी रुग्णालय असून, वि.प.क्र. 2 हे वैद्यकीय अधिकारी आहेत. तक्रारकर्ती हिने दि.12.03.2013 रोजी वैद्यकीय तपासणीसाठी वि.प. यांच्या रुग्णालयात गेली असता तेथील स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांनी तिची तपासणी करुन घेतली, त्यावेळी त्या डॉक्टरांनी तक्रारकर्ती ही गर्भवती असून 7 महिन्यांनतर तिला परत तपासणीकरीता येण्यास सांगितले. त्यावेळी तिला प्रसूती निदानासाठी दुस-या प्रसुती तज्ञ डॉक्टरांकडून इतर सर्व आवश्यक तपासण्या व चाचण्या करण्यास सांगितले. तक्रारकर्तीला त्यावेळी पाठीचे दुखणे, उलट्या, मळमळ व इतर अनुषंगिक त्रास होत होते. त्यामुळे पुन्हा 20.07.2013 ला वि.प.क्र. 1 च्या रुग्णालयात तपासणीकरीता गेली, त्यावेळी तेथे उपस्थित स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांनी तिला वैद्यकीय तपासण्या करण्यास सांगितले. तक्रारकर्त्यांनी आवश्यक त्या सर्व चाचण्या पूर्ण केल्यानंतर वि.प.क्र. 1 च्या रुग्णालयात सर्व चाचणी अहवाल दाखविण्यास गेली. त्यावेळी तक्रारकर्तीला तेथे उपस्थित स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांनी सांगितले की, तिला गर्भधारणा झालेली नाही आणि तक्रारकर्तीला काही औषधोपचार सांगितले. त्यावेळी तक्रारकर्तीने स्त्री रोग तज्ञाला ती सहा महिन्याची गर्भवती असल्याचे वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. तक्रारकर्तीला उध्दट व उर्मटपणाची वागणूक दिल्याने तक्रारकर्ती दुखावल्या गेली व तिच्या शंकेचे निरसन न झाल्याने तिला शेवटी खाजगी वैद्यकीय तज्ञाकडे जावे लागले. त्यांनी आवश्यक त्या चाचण्या केल्यानंतर असे निदर्शनास आले की, गर्भाशयात असलेल्या fetus/गर्भाचा मृत्यु झालेला आहे आणि त्यामुळे गर्भाशयाला संसर्ग होऊन त्यावर त्याच्यामुळे सुज आलेली आहे. हे सगळे ऐकल्यानंतर तक्रारकर्तीला मानसिक धक्का बसला. त्यानंतर तक्रारकर्तीने मातृ सेवा संघात 20.07.2013 रोजी पुन्हा वैद्यकीय तपासणीकरीता गेली असता सांगितले की, गर्भाशयात वाढत असलेले मुल अगोदरच मृत झालेले आहे. तक्रारकर्तीने मातृ सेवा संघात दोन दिवस औषधोपचार करुन मृत गर्भाला बाहेर काढले. तक्रारकर्तीच्या म्हणण्याप्रमाणे वि.प.क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्तीची योग्यप्रकारे तपासणी व उपचार न करता तिच्या गर्भाशयात वाढत असलेल्या बाळाचा मृत्यु झाला व त्यामुळे तिला मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला. तक्रारकर्तीच्या म्हणण्याप्रमाणे वि.प. यांची कृती ही ग्राहक संरक्षण कायद्याचे अंतर्गत त्रुटीपूर्ण सेवा येत असल्याने तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचासमोर दाखल केली.
2. सदर तक्रार स्विकृतीच्या मुद्यावर सुनावणीकरीता आल्यानंतर तक्रारकर्तीच्या अधिवक्त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. तसेच त्यांनी तक्रारीसोबत दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता मंचाचे विचारार्थ खालील मुद्दे उपस्थित झाले.
मुद्दे निष्कर्ष
- वि.प. यांनी त्रुटीपूर्ण सेवा दिलेली आहे काय नाही.
- आदेश तक्रार अस्वीकृत.
-कारणमिमांसा-
3. सदर प्रकरणी तक्रारकर्तीने तिच्या तक्रारीचे समर्थनार्थ जे दस्तऐवज दाखल केलेले आहेत, त्यांचे अवलोकन केले असता दस्तऐवज क्र. 1 नुसार 12 मार्च 2013 ला तक्रारकर्तीने केवळ वि.प.क्र. 1 कडे नोंदणी केल्याचे निदर्शनास येते. कारण सदर दस्तऐवजावर कुठल्याही डॉक्टरांनी/वैद्यकीय अधिका-यांनी तपासणी केल्याचे वा औषधोपचार केल्याचे दिसून येत नाही. सदर दस्तऐवज दिनांक, नोंदणी क्रमांक व नाव टाकलेला कोरा दस्तऐवज आहे.
दस्तऐवज क्र. 2 हा दि.20 जुलै 2013 चा असून त्यावर नोंदणी क्रमांक व रोगलक्षणामध्ये UPT-Negative नमूद आहे व रुग्णाचे नाव फरजाना अयाज असे नमूद आहे. सदर दस्तऐवज तक्रारकर्तीच्या नावावर दिसून येत नाही. दि.20.07.2013 चे दस्तऐवज क्र. 3 असून त्यावर तक्रारकर्तीने पुरविलेली वैयक्तीक माहिती नमूद केल्याचे त्यावरुन दिसून येते. दस्तऐवजाच्या शेवटी रक्तगट नमूद असून सिकल सेलची तपासणी केल्याचे नमूद आहे. दस्तऐवजाच्या सर्वात शेवटी पुनर्भेट/दिनांक 24.08.2013 लिहिलेला आहे. तक्रारकर्तीच्या म्हणण्यानुसार तिने वि.प.ला वारंवार सांगूनही ती गर्भवती आहे, तरीही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले या तिच्या म्हणण्याला तिने कोणताही आधार सादर केलेला नाही. कारण दस्तऐवज क्र. 3 नुसार प्रसूतिचा अपेक्षित दिनांक EDD 12.11.2013 नमूद केल्याचे निदर्शनास येते.
दस्तऐवज क्र. 4 वर दि.20.07.2013 चा धृव डिजिटल एक्स-रे व कलर डॉपलर सोनोग्राफी अणि मॅमोग्राफी यांचा तक्रारकर्तीचा Pregnancy अहवाल असून त्यात त्यांनी “Foetal cardiac activity and movements are not seen.” असे लिहिले आहे. सदर चाचणी डॉ. सायरा कमाल (एम.डी.) यांचे सांगण्यावरुन करण्यात आल्याचे दिसून येते. तक्रारकर्तीने तिच्या तक्रारीत वि.प. यांचे सांगण्यावरुन तिने चाचणी केली असे म्हटले आहे. परंतू प्रत्यक्षामध्ये वि.प. यांनी अशी चाचणी करुन येण्याबाबत कुठेही नमूद केलेले नाही. दस्तऐवज क्र. 24 ते 26 हे गझाला नक्वी नावाच्या व्यक्तीचे केवळ रक्त तपासणी असून त्यात शर्करा, हिमोग्लोबीन, डब्ल्युबीसी व इतर चाचण्या केलेल्या असून त्या मातृ सेवा संघ यांचे सांगितल्यावरुन केल्या असल्याचे या दस्तऐवजावर नमूद आहे. मंचाच्या मते त्यांचा संबंध वि.प. यांचेसोबत जोडल्या जाऊ शकत नाही. त्यानंतर तक्रारकर्तीने मातृ सेवा संघामध्ये औषधोपचार केलेले आहेत व मृत बाळाला काढून टाकण्यात आल्याचे दस्तऐवज दाखल केले आहे.
त्यानंतर तक्रारकर्तीने वि.प.ला कायदेशीर नोटीस बजावल्याचे दिसून येते. परंतू वि.प. यांनी सदर नोटीसला दिलेल्या उत्तरामध्ये UPT चाचणीचा अहवाल तक्रारकर्तीने त्यांना दाखविल्याचे नाकारले आहे आणि तक्रारकर्ती खाजगी डॉक्टरांचे उपचार घेत होती हे त्यावरुन स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारकर्तीने सदर UPT चाचणी केली किंवा नाही याबाबत स्पष्टता दिसून येत नाही. मंचाच्या मते म्हणूनच UPT चाचणीनंतर कुठलेही औषधोपचार वि.प.ने नमूद केल्याचे सदर वि.प.चे दस्तऐवजावर दिसून येत नाही. एकूण संपूर्ण प्रकरणांचे अवलोकन केले असता तक्रारकर्ती केवळ वि.प.कडे नोंदणी करुन खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे स्पष्ट होते व तक्रारकर्तीने स्वतः ही बाब आपल्या तक्रारीत नमूद केली आहे. अशा परिस्थितीमध्ये वि.प. यांनी तक्रारकर्तीला औषधोपचारात किंवा तपासणीमध्ये निष्काळजीपणा केला किंवा त्रुटीपूर्ण सेवा दिली हे स्पष्ट होत नाही. म्हणून तक्रारकर्तीची तक्रार सदर प्रकरणी स्विकृत होण्यास पात्र नाही असे मंचाचे मत आहे. उपरोक्त निष्कर्षावरुन मंच सदर प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
1) तक्रारकर्तीची तक्रार स्विकृतीच्या मुद्यावर खारिज करण्यात येते.
2) तक्रारकर्तीने तक्रारीचा खर्च स्वतः सोसावा.