// जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, अमरावती //
ग्राहक तक्रार क्रमांक : 167/2012
दाखल दिनांक : 29/11/2012
निर्णय दिनांक : 29/04/2015
श्री निळकंठ यादवराव घारोते
वय ६० वर्षे, प्रोप्रा. मे अमर अॅग्रो फुड प्रोडक्टस्
ऐ-16 एमआयडीसी अमरावती
रा. एकविरा कॉलणी, साई नगर
अमरावती ता.जि. अमरावती : तक्रारकर्ता
// विरुध्द //
- द मॅनेजिंग डायरेक्टर
ताजश्री अॅटो, डिलर अशोक लिलॅंड लि.
- , सेंट्रल एमआयडीसी रोड,
हिंगणा एमआयडीसी नागपुर -28
- श्री अशीश अडसोड,
मार्केटींग एक्झेक्युटीव
ताजश्री अॅटो, डिलर अशोक लेलॅंड लि.
रा. साई मंदिर जवळ, साई नगर
अमरावती : विरुध्दपक्ष
गणपूर्ती : 1) मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
2) मा. रा.कि. पाटील, सदस्य
ग्राहक तक्रार क्रमांकः 167/2012
..2..
तक्रारकर्ता तर्फे : अॅड. काकडे
विरुध्दपक्षा तर्फे : अॅड. लांडे
: : न्यायनिर्णय : :
(पारित दिनांक 29/04/2015)
मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
1. तक्रारदाराने हा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे या मंचा समोर सादर केला.
2. तक्रारदाराचे कथना प्रमाणे तो मे. अमर अॅग्रो फुड प्रोडक्टसचा मालक आहे. दि. १४.१०.२०१२ रोजी तो विरुध्दपक्ष क्र. 1 यांचेकडे वाहन खरेदी करण्यासाठी गेला होता. विरुध्दपक्ष क्र. 1 हे अशोक लेलॅण्ड लि. या वाहन उत्पादक कंपनीचे अधिकृत विक्रेता आहेत. दि. १४.१०.२०१२ रोजी विरुध्दपक्ष क्र. 1 कडून नविन Dost BS 111 LS (या वाहनास यापुढे सदरील वाहन असे संबोधण्यात येईल) या वाहनासाठी रु. ४,८४,४०५/- चे इन्वाईस घेतले व दि. १५.६.२०१२ रोजी त्याने या वाहनाची नोंद करण्यासाठी धनादेशाव्दारे रु. १०,०००/- विरुध्दपक्ष क्र. 1 यांचेकडे जमा केले. त्यानंतर दि. २०.७.२०१२ रोजी रु. ८७,२८५/- धनादेशाव्दारे या वाहनाच्या किंमतीच्या रक्कमे पैकी विरुध्दपक्ष क्र. 1 यांचेकडे जमा
ग्राहक तक्रार क्रमांकः 167/2012
..3..
केले. परंतु रु. ८७,२८५/- ची पावती विरुध्दपक्ष यांनी त्याला दिली नाही.
3. तक्रारदाराचे कथना प्रमाणे विरुध्दपक्ष क्र. 1 यांना वाहनाची राहिलेली किंमतकरीता सुंदरम फायनान्स लि. नागपुर यांचेकडून तक्रारदाराला कर्ज उपलब्ध करुन देण्याची कारवाई करावयाची होती व त्याबद्दल तक्रारदाराने त्यासाठी लागणारे सर्व कागदपत्र विरुध्दपक्ष क्र. 1 यांचेकडे दिले होते. विरुध्दपक्षाने तक्रारदाराला दि. २७.७.२०१२ पर्यंत वाहन ताबा देण्याचे ठरले होते परंतु तक्रार दाखल करे पर्यंत विरुध्दपक्षाने वाहन ताब्यात दिले नाही. अशा त-हेने विरुध्दपक्षाने अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करुन सेवेत त्रुटी केली. यासाठी तक्रारदाराने विरुध्दपक्ष यांना नोटीस पाठवून सदरील वाहन त्यास द्यावे किंवा तक्रारदाराकडून वाहनाच्या किंमती पोटी घेतलेली रक्कम रु. ९७,२८५/- परत करावे व त्यास झालेला मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रु. २५,०००/- तसेच नोटीस खर्च रु. ३,०००/- ची मागणी केली. नोटीस मिळूनही विरुध्दपक्षाने त्यास कोणताही प्रतिसाद दिला नाही म्हणून त्याने हा तक्रार अर्ज रु. ९७,२८५/- त्यावर दि. १४.१०.२०१२ पासुन व्याज तसेच नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केला.
ग्राहक तक्रार क्रमांकः 167/2012
..4..
4. विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी निशाणी 17 ला त्यांचा लेखी जबाब दाखल केला ज्यात त्यांनी हे कबुल केले की, तक्रारदार यांना त्यांनी वाहनाचे रु. ४,८४,४०५/- चे कोटेशन दिले होते व तक्रारदाराने रु. १०,०००/- विरुध्दपक्ष क्र. 1 कडे वाहनाच्या बुकींग करीता जमा केले होते. त्यांचे कथनाप्रमाणे तक्रारदार हा थावरदास मेथानी याचेसह वाहन खरेदी करण्याकरीता आला होता त्यानंतर थावरदास मेथानी यांनी रु. ८७,२८५/- चा धनादेश क्र. २९७७९५ विरुध्दपक्ष क्र. 1 यांचेकडे जमा केला व वाहन हे त्यांच्या नावाने द्यावे असे सूचित केले. राहिलेल्या किंमतीच्या रक्कमेसाठी थावरदास मेथानी यांचे नावाने सुंदरम फायनान्स मार्फत कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले व सदरचे वाहनाचा ताबा हा थावरदास मेथानी याला देण्यात आला कारण विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तसे सांगितले होते. रु. ८७,२८५/- चा धनादेश हा थावरदास मेथानी यांनी दिला असल्याने व कर्ज प्रकरण त्याच्या नावाने करण्यात आल्याने वाहनाचा ताबा त्यास देण्यात आला. विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी विरुध्दपक्ष क्र. 1 कडील नोकरी सोडली आहे त्यामुळे त्यांनी सेवेत कोणतीही त्रुटी केली नसुन तक्रार अर्ज रद्द करण्यात यावा अशी मागणी केली. तक्रार अर्जात नमूद इतर बाबी विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी त्यांचे लेखी जबाबात नाकारल्या. त्यांचे
ग्राहक तक्रार क्रमांकः 167/2012
..5..
कथना प्रमाणे थावरदास मेथानी व तक्रारदार यांनी आपसात संगणमत करुन हा तक्रार अर्ज दाखल केला आहे. थावरदास मेथानी हे या प्रकरणात आवश्यक पक्षकार आहे व त्यांनी तसे न केल्याने हा तक्रार अर्ज रद्द करावा अशी विनंती विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी केली.
5. विरुध्दपक्ष क्र. 1 यांना नोटीस मिळूनही ते हजर न झाल्याने दि. २८.२.२०१३ रोजी निशाणी 1 वर त्यांच्या विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. त्यानंतर विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी निशाणी 27 ला अर्ज देवून त्यांच्या विरुध्द झालेला एकतर्फा आदेश रद्द करण्याची विनंती केली, जो दि. २५.११.२०१३ च्या आदेशान्वये नामंजूर करण्यात आला. या आदेशा विरुध्द विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी मा. राज्य आयोगात आरपी/14/2 दाखल केला. त्यातील दि. ३.२.२०१५ च्या आदेशाप्रमाणे विरुध्दपक्ष क्र. 1 यांचा लेखी जबाब निशाणी 43 ला दाखल करुन घेण्यात आला. विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी त्यांचा निशाणी 17 च्या लेखी जबाबात जे मुद्दे मांडले तेच मुद्दे विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी त्यांच्या लेखी जबाब निशाणी 43 मध्ये मांडून तक्रार अर्ज रद्द करावा अशी विनंती केली.
ग्राहक तक्रार क्रमांकः 167/2012
..6..
6. तक्रारदाराने निशाणी 17 च्या लेखी जबाबास निशाणी 22 ला प्रतिउत्तर दाखल केले. तसेच त्यानंतर विरुध्दपक्ष क्र. 1 यांच्या निशाणी 43 लेखी जबाबासाठी निशाणी 46 ला प्रतिउत्तर दाखल करुन लेखी जबाबात थावरदास मेथानी बद्दल जे कथन विरुध्दपक्ष यांनी केले ते त्यांनी नाकारले.
7. तक्रार अर्ज, लेखी जबाब, तक्रारदारा तर्फे अॅड. श्री. काकडे व विरुध्दपक्षा तर्फे अॅड. श्री. लांडे यांचा युक्तीवाद ऐकला त्यावरुन खालील मुद्दे विचारात घेण्यात आले.
मुद्दे उत्तरे
- विरुध्दपक्षाने सेवेत
त्रुटी केली आहे का ? .... होय
- थावरदास मेथानी हे या प्रकरणात
आवश्यक पक्षकार आहे का ? ... नाही
- तक्रारदार नुकसान भरपाई मिळण्यास
पात्र आहे का ? ... होय
- आदेश ? ... अंतीम आदेशा प्रमाणे
कारणमिमांसा ः-
8. विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांचा लेखी जबाब निशाणी 17 व 43 पाहता हया बाबी स्पष्ट होतात की, तक्रारदार
ग्राहक तक्रार क्रमांकः 167/2012
..7..
यांनी अमर फुड प्रोडक्सकरीता सदर वाहनाची बुकींग विरुध्दपक्ष क्र. 1 यांचेकडे केली होती. व त्यास दि. १५.६.२०१२ रोजी रु. १०,०००/- बुकींग रक्कम जमा केली होती, तसेच थावरदास मेथानी यांनी रु. ८७,२८५/- चा धनादेश क्र. २९७७९५ विरुध्दपक्ष क्र. 1 यांचेकडे दिला होता या दोन्ही रक्कमा सदरील वाहनाच्या किंमती पोटी मिळाल्याचे विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी कबुल केले. तसेच त्यांनी हे कबुल केले की, तक्रारदाराला सदरील वाहनाचे इन्वाईस रु. ४,८४,४०५/- चे दिल्यानंतर दि. १५.६.२०१२ रोजी त्यांनी बुकींग रक्कम रु. १०,०००/- धनादेशा व्दारे जमा केले होते.
9. वरील नमूद बाबी शाबीत करण्यासाठी तक्रारदाराने निशाणी 2 सोबत दस्त दाखल केले ते स्विकारण्यात येतात.
10. विरुध्दपक्ष यांचा युक्तीवाद असा आहे की, रु. ८७,२८५/- चा धनादेश क्र. २९७७९५ हा थावरदास मेथानी यांनी जमा केला व सुरुवातीला तक्रारदार हा मेथानी सोबत विरुध्दपक्षाकडे आला होता व त्यांच्या सांगण्यावरुन थावरदास मेथानीला वाहनाचा ताबा देण्यात आला. परंतु हे शाबीत करण्यासाठी विरुध्दपक्षाने कोणतेही दस्त दाखल केले नाही. केवळ थावरदास मेथानी यांनी रु. ८७,२८५/- चा धनादेश क्र. २९७७९५ जमा केला यावरुन वाहन
ग्राहक तक्रार क्रमांकः 167/2012
..8..
त्याला देण्याचे काही कारण नव्हते. विरुध्दपक्ष यांनी त्यांच्या लेखी जबाबात तो धनादेश थावरदास मेथानी यांच्या स्वतःच्या खात्यातील असल्याबद्दलचा कोणताही पुरावा दाखल केला नाही. या उलट तक्रारदाराने निशाणी 37 सोबत त्यांच्या खात्याचा उतारा दाखल केला, ज्यावरुन हे स्पष्ट होते की, सदरचा धनादेश हा तक्रारदाराने विरुध्दपक्ष क्र. 1 च्या नावाने दिलेला होता व तो विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी वटविल्यामुळे तक्रारदाराच्या खात्यातून ती रक्कम वजा करण्यात आली. याचा अर्थ रु. ८७,२८५/- हे तक्रारदाराने विरुध्दपक्ष क्र. 1 ला सदरील वाहनाच्या किंमती पोटी दिले होते. अशा परिस्थितीत विरुध्दपक्षाने थावरदास मेथानी यांचे शपथपत्र दाखल करणे आवश्यक होते, त्यावरुन हे सिध्द करता आले असते की, हा धनादेश थावरदास मेथानी यांच्या खात्याचा होता परंतु असे शपथपत्र विरुध्दपक्षाने का दाखल केले नाही याचे कारण विरुध्दपक्ष यांनी रेकॉर्डवर आणले नाही.
11. दुसरा मुद्दा या ठिकाणी विचारात घ्यावा लागेल की, तक्रारदाराच्या सोबत वाहन खरेदीचा जो व्यवहार झाला तो जून २०१२ मध्ये झाला होता. विरुध्दपक्ष यांनी निशाणी 35 सोबत रु. ८७,२८५/- ची पावतीची झेरॉक्स प्रत दाखल केली जी थावरदास मेथानी यांचे नावाची असून ती दि. १३.७.२०१२ या तारखेची आहे.
ग्राहक तक्रार क्रमांकः 167/2012
..9..
त्यात धनादेश क्र. २९७७९५ बद्दलचा उल्लेख आहे. तक्रारदाराच्या कथना प्रमाणे त्यांनी हा धनादेश दि. २०.७.२०१२ रोजी विरुध्दपक्ष क्र. 1 यांचे नावाने दिला होता व त्याच्या पासबुक मधील नोंदीनुसार दि. २०.७.२०१२ रोजी तो धनादेश विरुध्दपक्ष क्र. 1 यांचे नावाने वटविण्यात आला असे असतांना विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी त्यापुर्वीच दि. १३.७.२०१२ रोजी थावरदास मेथानी यांचे नावाने या धनादेशाचा उल्लेख करुन पावती का दिली याचे समाधान कारक कारण विरुध्दपक्षाने या मंचासमोर आणले नाही. दुसरी बाब या ठिकाणी विचारात घ्यावी लागेल की, तक्रारदाराने रजिस्टर पोष्टाने दि. ६.१०.२०१२ रोजी विरुध्दपक्ष यांना नोटीस पाठवून तक्रार अर्जात नमूद केलेल्या बाबींचा उल्लेख केला होता. त्यावेळी ती नोटीस विरुध्दपक्ष यांना मिळाली असे गृहीत धरावे लागेल. असे असतांना विरुध्दपक्षाची जबाबदारी होती की, त्याने जे वाहन थावरदास मेथानी यांना दिले ते ही नोटीस मिळाल्या पुर्वी की, नंतर याचा खुलासा करणे आवश्यक होते. जर कर्ज प्रकरण हे थावरदास मेथानी यांचे नावाने करण्यात आले व सदरील वाहनाची बुकींग रक्कम रु. १०,०००/- व रु. ८७,२८५/- चा धनादेश हा तक्रारदाराने दिला होता तर विरुध्दपक्षाने सदरील वाहनाचा ताबा थावरदास मेथानी याला देण्यापूर्वी तक्रारदाराकडून त्यास हे वाहन मेथानी यांचे
ग्राहक तक्रार क्रमांकः 167/2012
..10..
ताब्यात देण्याची हरकत आहे किंवा नाही याची विचारणा करणे आवश्यक होते जे विरुध्दपक्षाने केलेले नाही. यावरुन असा निष्कर्ष काढण्यात येतो की, तक्रारदाराकडून रु. ९७,२८५/- सदरील वाहनाच्या किंमती पोटी घेवून सुध्दा विरुध्दपक्षाने ते वाहन तक्रारदारास न देता थावरदास मेथानी याला तक्रारदाराच्या परवानगी शिवाय दिलेले आहे व त्यामुळे त्यांनी सेवेत त्रुटी केलेली आहे. विरुध्दपक्षाने तक्रारदाराच्या नोटीस नंतर त्यास उत्तर देवून त्यांनी लेखी जबाबात जे कथन केले त्या बाबी तक्रारदाराच्या निदर्शनास आणल्या नाही. याचा अर्थ तक्रारदाराकडून वाहना पोटी घेतलेल्या किंमतीचा उपयोग विरुध्दपक्षाने स्वतःच्या फायद्यासाठी करुन घेतलेला आहे. त्यामुळे तक्रारदार हे या रक्कमेवर व्याज मिळण्यास पात्र होतो.
12. विरुध्दपक्षाने त्यांच्या लेखी जबाबात असे कथन केले की, वाहनाचे बुकींग करतांना तक्रारदार थावरदास मेथानी हे सोबत आले होते. थावरदास मेथानी यांनी रु. ८७,२८५/- चा धनादेश विरुध्दपक्ष क्र. 1 यांचेकडे आणुन दिले व सदरील वाहन त्याच्या नावाने द्यावे असे सूचित केले त्यामुळे थावरदास मेथानी हे या प्रकरणात आवश्यक पक्षकार असतांना सुध्दा तक्रारदाराने त्यांना या तक्रार अर्जात सामील करुन न घेतल्याने तक्रार अर्ज हा रद्द
ग्राहक तक्रार क्रमांकः 167/2012
..11..
करण्यात यावा. विरुध्दपक्षा तर्फे तसा युक्तीवाद करण्यात आला परंतु तो स्विकारता येत नाही कारण थावरदास मेथानी यांचा तक्रारदारा सोबत काय संबंध होता हे विरुध्दपक्षाने शाबीत केले नाही. वर नमुद केल्या प्रमाणे जर विरुध्दपक्षाने थावरदास मेथानी यांचे शपथपत्र दाखल केले असते तर खचितच हा मुद्दा ग्राहय झाला असता. त्यामुळे असा निष्कर्ष काढण्यात येतो की, थावरदास मेथानी हे या प्रकरणात आवश्यक पक्षकार नाही व त्यांना तक्रारदाराने सामील न केल्याने तक्रार अर्ज रद्द होऊ शकत नाही.
13. वरील विवेचनावरुन मुद्दा क्र. 1 ला होकारार्थी उत्तर देण्यात येते व मुद्दा क्र. 2 ला नकारार्थी उत्तर देण्यात येते. मुद्दा क्र. 1 व 2 ला दिलेल्या उत्तरामुळे तक्रारदार हा नुकसान भरपाई मिळण्यास पात्र ठरतो, त्यावरुन खालील आदेशा प्रमाणे तक्रार अर्ज विरुध्दपक्ष क्र. 1 विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येतो. कारण जो व्यवहार झालेला आहे तो विरुध्दपक्ष क्र. 1 शी झालेला आहे व विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी त्यांच्या लेखी जबाबात नमूद केल्या प्रमाणे आता ते विरुध्दपक्ष क्र. 1 यांच्या सेवेत नाही त्यामुळे त्यांच्या विरुध्द तक्रार अर्ज रद्द करण्यात येतो.
अंतीम आदेश
- तक्रारदाराचा अर्ज अंतशः मंजूर करण्यात येतो.
ग्राहक तक्रार क्रमांकः 167/2012
..12..
- तक्रारदाराने या आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 30 दिवसाचे आत विरुध्दपक्ष क्र. 1 यांना Dost B.S. 111 L.S. या वाहनाची रु. ४,८४,४०५/- किमतीपैकी रु. ९७,२८५/- वजा करुन राहिलेली रक्कम द्यावी व विरुध्दपक्ष क्र. 1 ने सदरील नविन वाहन तक्रारदारास द्यावे. असे न केल्यास
- विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारदाराला रु. ९७,२८५/- त्यावर दिनांक २०.७.२०१२ पासुन द.सा.द.शे. 6 टक्के व्याज दराने या निकालाची प्रत मिळाल्यापासुन 30 दिवसाचे आत द्यावे.
- विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारदाराला त्यांनी केलेल्या सेवेतील त्रुटीमुळे नुकसान भरपाई रक्कम रु. २०,०००/-तसेच या तक्रार अर्जाचा खर्च रु. ५,०००/- द्यावा व स्वतःचा खर्च स्वतः सोसावा.
- विरुध्दपक्ष क्र. 2 विरुध्द तक्रार अर्ज रद्द करण्यात येतो.
- आदेशाच्या प्रती दोन्ही पक्षांना विनामुल्य द्यावीत.
दि. 29/04/2015 (रा.कि. पाटील) (मा.के. वालचाळे)
SRR सदस्य अध्यक्ष