न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. प्रस्तुत प्रकरण हे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, सोलापूर येथील मूळ तक्रार क्र. 249/2014 जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, सोलापूर या आयोगाने दि. 2/11/2017 रोजी न्यायनिर्णीत केले होते. सदर आदेशाविरुध्द वि.प. यांनी मे. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, परिक्रमा खंडपीठ, पुणे यांचेकडे प्रथम अपिल क्र. 1362/2017 दाखल केलेले होते. सदरच्या अपिलामध्ये मे. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, परिक्रमा खंडपीठ, पुणे यांनी दि. 12/03/2020 रोजी आदेश पारीत केला असून जिल्हा आयोग, सोलापूर यांचा आदेश रद्दबातल करण्यात येवून सदरचे प्रकरण/तक्रारअर्ज हा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, कोल्हापूर येथे सुनावणीसाठी दाखल करावे असे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारअर्ज दि. 11/11/2020 रोजी या आयोगात दाखल केला आहे. सदर तक्रारअर्ज क्र. 399/2020 दाखल करुन याकामी वि.प. यांना नोटीस काढणेत आली. सदर नोटीस प्राप्त झालेवर याकामी वि.प.क्र.1 व 2 तर्फे अॅड उमेश माणगांवे यांनी तसेच तक्रारदारतर्फे अॅड एस.एम.भोसले यांनी वकीलपत्र दाखल केले. तदनंतर तक्रारदारतर्फे लेखी युक्तिवाद दि. 4/01/2021 रोजी दाखल केला. दि. 4/02/2022 रोजी तक्रारदार यांनी स्थापत्य अभियंता महेशकुमार बलभीम गायकवाड, कन्सल्टींग सिव्हील इंजिनिअर व लिफ्ट इरिगेशन डिझायनर यांना साक्षी समन्स काढणेसाठी व अर्जात नमूद कागदपत्रे याकामी दाखल करणेसाठी अर्ज दिला. सदरचा अर्ज आयोगाने मंजूर केला. सदर साक्षीसमन्स साक्षीदारास मिळाल्यावर महेशकुमार गायकवाड यांनी हजर होवून याकामी सर्व कागदपत्रे पूर्वीच याकामी दाखल केली असून ती खरी असून मला याव्यतिरिक्त काही सांगणेचे नाही अशी पुरसीस दाखल केली तसेच याकामी कोर्ट कमिशनर आर.बी.प्रधान यांनीही साक्षीसमन्स प्रमाणे हजर होवून सदर कामी यापूर्वीच कोर्ट कमिशन अहवाल दाखल केला असून याव्यतिरिक्त काहीही/कोणताही अहवाल देणेचा नाही अशी पुरसीस दाखल केली आहे.
2. या कामातील तक्रारअर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे –
तक्रारदाराने वि.प. यांनी उत्पादित 5 इंची आकाराचे 1068 पी.व्ही.सी. पाईप रु. 11,00,000/- मध्ये त्यांचे शेती बागायती करण्यासाठी इस्लामपूर ते माणकी पर्यंत पाईप टाकण्यासाठी विकत घेतले. तक्रारदाराने वि.प. यांना डिमांड ड्राफ्टद्वारे रु. 7,00,000/- व रोख रु.4,00,000/- पाईपच्या किंमतीपोटी दिले. वि.प. यांनी पाईपमध्ये काहीदोष निघाल्यास ते बदलून देण्याची हमी दिली. तक्रारदाराने तज्ञाकडून घेतलेल्या लेआऊट प्लॅनप्रमाणे जून 2012 मध्ये तज्ञ सिव्हील इंजिनिअर यांचे मार्गदर्शनाखाली इस्लामपूर ते माणकी पर्यंत पाईप लाईन टाकली. त्यात सॉकेटमधून पाण्याची गळती होत होती. त्यामुळे तक्रारदाराला बागायती शेती करता आली नाही. तक्रारदाराने तज्ञ सिव्हील इंजिनिअर यांचेकडून सदर पाईपलाईनची तपासणी करुन घेतली. तपासणी अहवालानुसार वि.प. कडून खरेदी केलेले पाईप हे सदोष होते व त्याचे आयुर्मान फार कमी होते. पाईपमधील दोष वि.प. ला कळविण्यात आले. त्यावर वि.प. यांनी गळती काढण्यासठी व दुरुस्तीसाठी रु. 1,50,000/- देण्याचे कबूल केले. परंतु हमीप्रमाणे पाईप बदलून दिले नाहीत तसेच रु.1,50,000/- हे सर्कीटमधील गळती दुरुस्तीकरिता पुरेसे नव्हते. कारण संपूर्ण पाईप लाईनमधून गळती होत होती. तक्रारदाराने दुरुस्तीकरिता रु. 5,00,000/- खर्च केला. पाईप सॉकेटमधून पाण्याची गळती होत असल्यामुळे तक्रारदाराला बागायती पिक घेता आले नाही. म्हणून तक्रारदाराचे नुकसान झाले. तक्रारदाराने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, माणकी यांचेकडून रु. 9,40,000/- व रयत बॅकेकडून रु. 5,55,000/- शेती गहाण ठेवून कर्ज घेतले. त्यावर तक्रारदाराला रु. 2,00,000/- व्याज भरावे लागत होते, पण तो ते भरु शकला नाही. सदोष पाईपमुळे त्याला उत्पन्न न घेता आल्यामुळे त्याला ते भरता आले नाही. अशा पध्दतीने तक्रारदाराला वि.प. ने दिलेल्या सदोष पाईपमुळे नुकसान झाले आहे. म्हणून तक्रारदाराने दि. 7/4/2014 व दि. 15/7/12 रोजीच्या पत्रान्वये वि.प. ला कळवून पाईप बदलून देण्याची किंवा पाईपच्या खरेदीची किंमत परत मिळण्याची विनंती केली. परंतु वि.प. कडून कोणतेही उत्तर मिळाले नाही. अशा पध्दतीने वि.प. ने तक्रारदारास सदोष पाईपची विक्री करुन सेवेत त्रुटीपूर्ण व्यवहार व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे. म्हणून तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
3. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून पाईपची किंमत व पाईप लाईन टाकण्यासाठी आलेला खर्च व नुकसान असे एकूण रु. 19,00,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.20,000/- मिळावेत अशी विनंती केली आहे.
4. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी कागदपत्रे तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
5. वि.प.क्र.1 व 2 यांनी सदरकामी म्हणणे/कैफियत व अॅफिडेव्हीट तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. वि.प. यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प.यांनी तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) तक्रारदार व वि.प. यांचेमध्ये झालेला व्यवहार हा इचलकरंजी येथे झालेला असून तक्रारदाराने पाईप खरेदीची रक्कम वि.प. यांना इचलकरंजी येथे दिलेली आहे. तसेच पी.व्ही.सी. पाईप अन्य साहित्याची डिलीव्हरी इचलकरंजी येथे दिलेली असल्यामुळे तक्रार या मंचासमोर चालू शकत नाही.
iii) तक्रारदाराने पाईप खरेदी करतेसमयी वि.प. यांनी तक्रारदाराला पाईपलाईन फिटींग कोणत्या पध्दतीने करावयाचे आहे, त्याबाबतचे प्रात्यक्षिक दाखविले होते. तक्रारदाराने वि.प. यांनी पुरवठा केलेल्या लगतच्या शेतक-याकडे प्रत्यक्ष भेट देवून वि.प. यांनी पुरविलेले पी.व्ही.सी पाईप व अन्य साहित्य यांची गुणवत्ता व दर्जा याची खात्री करुन घेतल्यानंतरच वि.प. कडून पी.व्ही.सी. पाईप खरेदी केले होते. पाईप फिटींगच्या वेळी पाईपचे सॉकेट काळजीपूर्वक व व्यवस्थित न बसविल्यास त्यामुळ लिकेज होण्याची शक्यता असल्याची बाब तक्रारदाराला समजावून सांगितली होती. तसेच तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे पाईप लाईन करण्याची सूचना दिलेली होती. परंतु तक्रारदाराने वि.प. यांच्या कोणतही प्राधिकृत टेक्निशिअन यांना माहिती न देता स्थानिक पातळीवर अपूरी माहिती असणा-या कर्मचा-याकडून सदर पाईप फिटींग करुन घेतली होती. वि.प ने सुध्दा टेक्नीशिअन मार्फत तक्रारदाराच्या शेत जमीनीमध्ये जावून पाईपलाईनची पाहणी केली असता दोन पाईप जोडणारे सॉकेट व्यवस्थितरित्या फिटींग केले नसल्याचे व त्यामध्ये असणा-या फट-वजा जागेतून गळती होत असल्याचे वि.प. चे निदर्शनास आले. वि.प. चे विक्री प्रतिनिधी सदानंद यादव यांचे समोर तक्रारदाराला खात्रीशीररित्या पटवून दिल्यानंतर तक्रारदाराने पाईप फिटींगचे वेळेस त्यांचेकडून झालेला हलगर्जीपणा व निष्काळजीपणा कबूल केला होता. वि.प. चे विक्री प्रतिनिधी हे तक्रारदाराचे जवळचे व संबंधीत इसम असल्यामुळे तक्रारदार व सदानंद यादव यांच्या विनंतीवरुन तक्रारदाराने कोणतेही नुकसान होवू नये या एकमेव प्रामाणिक हेतूने तक्रारदाराला पुन्हा नवीन सॉकेट व त्याकरिता लागणारे सोल्युशन व लेबरवर्क याकरिता रु.1,50,000/- अदा केले व पाईप फिटींग तज्ञ इसमामार्फत करुन घेण्याचे कबूल केले ही बाब तक्रारदाराने मंचापासून लपवून ठेवलेली आहे.
iv) पाईप खरेदी केल्यानंतर वि.प कंपनीतून वाहतुकीकरिता बाहेर पडताच सदर पी.व्ही.सी. पाईपची सर्व जबाबदारी ही तक्रारदाराची होती व तशी अट तक्रारदाराने मान्य केली होती. त्यामुळे तक्रारदाराची पी.व्ही.सी. पाईप खराब असल्याचा आक्षेप घेतलेला नाही. याउलट पाईप जोडणीकरिता ज्या पध्दतीने सॉकेटद्वारे पाईप जोडणे जरुरीचे होते, त्याची कोणतीही काळजी तक्रारदाराने घेतलेली नाही. त्यामुळे तक्रारदाराच्या स्वतःच्या चुकीच्या कृत्यामुळे झालेल्या चुकीकरिता नुकसान भरपाई देण्यास वि.प. जबाबदार नाहीत.
v) वि.प. ने तक्रारदारास पी.व्ही.सी. पाईप लाईन, सॉकेट इ. चा पुरवठा केला असून वि.प. कडून कोणत्याही सेवेत कसूर झालेला नाही. तक्रारदाराने दिलेल्या पत्रास प्रतिसाद म्हणून वि.प. ने भेट देवून तक्रारदाराच्या चुकीच्या तक्रारीचे निवारण केलेले होते. तथापि तक्रारदाराच्या विनंतीवरुन व मानवतेच्या दृष्टीकोनातून रु.1,50,000/- वि.प. यांनी तक्रारदारास दिलेले आहेत. तक्रारदार हा वि.प. कडून अवास्तव व भरमसाठ रकमेची मागणी करीत आहे. वि.प. कडून पाईप खरेदी केलेनंतर तक्रारदाराने शेत जमीनीस पाणी पुरवठा करुन उत्पन्न घेतलेले आहे. म्हणून तक्रारदाराचे कुठलेही नुकसान झालेले नाही.
vi) वि.प. कंपनी ही कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर तसेच कर्नाटकमधील विविध जिल्हयांमध्ये नावाजलेली कंपनी असून पी.व्ही.सी. पाईप व्यवसायामध्ये नावलौकीक झालेला आहे. वि.प. विरुध्द आजपर्यंत पी.व्ही.सी. पाईप संबंधी कोणतीही तक्रार झालेली नाही. तक्रारदार यांनी जी पी.व्ही.सी. पाईप लाईन वि.प.कडून खरेदी घेतलेली आहे, तशाच स्वरुपाच्या, गुणवत्तेच्या व दर्जाच्या पी.व्ही.सी. पाईप तक्रारदाराचे आसपासचे शेतक-यांना सुध्दा पुरवठा केलेला आहे. परंतु त्यांची कुठलीही तक्रार आलेली नाही. तक्रारदाराने वि.प. च्या नावलौकीकास बाधा आणण्याच्या हेतूने खोटी तक्रार दाखल केलेली आहे. सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
6. वर नमूद तक्रारदार व वि.प. क्र.1 व 2 यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | सदरचा तक्रारअर्ज या आयोगात चालणेस पात्र आहे काय ? किंवा सदरचा अर्ज न्यायनिर्गत करणेचे अधिकारक्षेत्र या आयोगास आहेत काय ? | होय. |
2 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | नाही. |
3 | प्रस्तुत तक्रारीस Non-joinder of necessary party या तत्वाची बाधा येते काय ? | होय. |
4 | वि.प. यांनी तक्रारदारांना सदोष पाईपची विक्री करुन सेवेत त्रुटी केली आहे काय ? तसेच अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे काय ? | नाही. |
5 | तक्रारदार मागणीप्रमाणे नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | नाही. |
6 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
7. वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे कारण सदर तक्रारदाराने वि.प.क्र.1 व 2 यांचेकडून वादातील पाईप खरेदी विक्रीचा पूर्ण व्यवहार हा इचलकरंजी जि. कोल्हापूर येथे केलेला आहे. तसेच मालाची डिलीव्हरी ही इचलकरंजी मधूनच केली असून वि.प. यांचे ऑफिस सुध्दा इचलकरंजी जि. कोल्हापूर येथे आहे. या सर्व बाबींचा ऊहापोह मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, सोलापूर यांनी दिलेल्या न्यायनिर्णयात केलेला आहे. तसेच तक्रारदार व वि.प. यांनाही सदर नमूद बाबी मान्य आहेत. त्याचप्रमाणे मे. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, परिक्रमा खंडपीठ, पुणे यांनी पहिले अपिल क्र. 1362/2017 मध्ये अधिकारक्षेत्राबाबत निर्देश देवून तक्रारदाराची सदरची तक्रार या आयोगात दाखल करणेचे निर्देश दिलेले आहेत.
सबब, वरील सर्व बाबींचा ऊहापोह करता सदरचा तक्रारअर्ज या आयोगात चालणेस पात्र असून सदर तक्रार न्यायनिर्गत करणेचे अधिकारक्षेत्र या आयोगास आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
8. वर नमूद मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही नकारार्थी दिले आहे कारण तक्रारदाराचे वकीलांनी वि.प.क्र.1 व 2 यांचेकडून वादातील पाईप खरेदी केल्या आहेत ही बाब तक्रारदाराने दाखल केले टॅक्स इन्व्हॉईसवरुन स्पष्ट होते. पण वि.प. यांनी असा आक्षेप नोंदविला आहे की, तक्रारदाराने तक्रारअर्जात नमूद केलेल्या पाईप या तक्रारदार यांनी खरेदी केल्या नाहीत तर तक्रारदाराचे वडीलांनी निवृत्ती रणनवरे यांनी खरेदी केल्या आहेत व सदर निवृत्ती रंगनाथ रणनवरे हे तक्रारअर्ज दाखल करणेपूर्वीच मयत झाले असून त्यांचे सर्व वारसांनी तक्रार दाखल केलेली नाही. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार चालू शकत नाही. तसेच तक्रारदाराने वि.प बरोबर केलेल्या पत्रव्यवहारावरुन दिसून येते की, निवृत्ती रंगनाथ रणनवरे (तक्रारदाराचे वडील) यांचा मृत्यू दि. 20/5/2013 रोजी झाला म्हणजेच तक्रार दाखल करण्यापूर्वी झाला आहे. नमूद निवृत्ती रंगनाथ रणनवरे यांच्या मृत्यूनंतर तक्रारदाराने पाईपलाईन संबंधीत वि.प. बरोबर जो पत्रव्यवहार केला यावरुन असे स्पष्ट होते की, निवृत्ती रंगनाथ रणनवरे यांना आणखी दोन मुले आहेत, परंतु त्यांना तक्रारदाराने याकामी तक्रारअर्जामध्ये तक्रारदार म्हणून पक्षकार केलेले नाही. तसेच वि.प. म्हणूनही सामील केले नाही. कागदपत्रांवरुन हे स्पष्ट होते की, निवृत्ती रणनवरे यांना तीन मुले आहेत व इतर वारस आहेत. असे जरी असले तरीही ग्राहक संरक्षण कायद्यात ग्राहक या संज्ञेची व्याख्या दिली आहे. त्याप्रमाणे जर ग्राहकाचा मृत्यू झाला असेल तर त्याचे कायदेशीर वारस किंवा प्रतिनिधी हे तक्रार दाखल करु शकतात. त्यातील तक्रारदार हा मयत निवृत्ती रंगनाथ रणनवरे यांचा मुलगा आहे. त्यामुळे प्रतिनिधी या नात्याने त्यास तक्रार दाखल करणेचा अधिकार आहे. असे गृहीत धरले तरीही याकामी तक्रारदार यांना तक्रार दाखल करणेचे प्रतिनिधी म्हणून इतर वारसांनी अधिकारपत्र दिलेचे स्पष्ट होत नाही व तसे अधिकारपत्र किंवा प्रतिनिधी म्हणून तक्रारअर्ज दाखल करणेस व चालवणेस परवानगीचा अर्ज दिला नाही व परवानगी घेतली नाही. तसेच सदर सर्व वारसदारांचे वतीने ही तक्रार दाखल करीत आहे असा कोणताही उल्लेख तक्रारअर्जात तक्रारदाराने केलेला नाही. तसेच तक्रारदार यांनी सदर तक्रार दाखल करताना तक्रारदाराचे वडील निवृत्ती रणनवरे यांच्या सर्व वारसदारांना याकामी तक्रारदार म्हणून सामील करणे आवश्यक होते पण तसे तक्रारदाराने केलेले नाही. अथवा सर्व वारसदारांचे प्रतिनिधी म्हणून तक्रारदाराला अधिकार दिलेबाबत नमूद केलेले नाही किंवा तसे वारसांनी दिलेले अधिकारपत्र तक्रारदारांनी दिलेले नाही. म्हणजेच तक्रारदार हे एकटेच वि.प. चे ग्राहक होवू शकत नाहीत. तक्रारदाराला सदर तक्रार एकटयाने दाखल करणेचा अधिकार नाही असे या आयोगाचे मत आहे.
9. तक्रारदाराने तक्रारअर्जात सर्व वारसदारांना पक्षकार म्हणून सामील केलेले नाही व तक्रारदाराने एकटयाने कोणत्याही अधिकारपत्राशिवाय अथवा प्रतिनिधी असलेचा कोणताही उल्लेख तक्रारअर्जात न करता सदर तक्रारअर्ज दाखल केला आहे हे स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदार हे वि.प. चे ग्राहक होत नसून या तक्रारअर्जास Non-joinder of necessary party या तत्वाची बाधा येते. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे याकामी तक्रारदाराने पाईपलाईन जोडणी करणा-या व्यक्तीस आवश्यक पक्षकार म्हणून सामील करणे आवश्यक होते. कारण पाईपलाईन जोडणी करणारा व्यक्ती व सॉकेट जोडणारी व्यक्ती ही तांत्रिकदृष्टया सक्षम होती किंवा नाही हे समजून येत नाही असे कोर्ट कमिशन अहवालात नमूद आहे. त्याचप्रमाणे गळतीचे ठिकाणी सॉकेट फिटींग व्यवस्थित झाले नसलेचे कोर्ट कमिशनर यांचे निदर्शनास आलेचे म्हटले आहे. म्हणजेच श्री आर.बी.प्रधान कोर्ट कमिशनर यांचे कमिशन अहवालाचे अवलोकन करता याकामी पाईप फिटींग करणारी व्यक्ती किंवा सॉकेट जोडणारी व्यक्ती यांना आवश्यक पक्षकार म्हणून सामील करणे आवश्यक होते असे या आयोगाचे मत आहे. परंतु तक्रारदाराने तसे केलेले नाही हे स्पष्ट होते. म्हणजेच सदर तक्रारअर्जास Non-joinder of necessary party या तत्वाची बाधा येते. म्हणून आम्ही मुद्दा क्र.3 चे उत्तर होकारार्थी दिले आहे.
10. वर नमूद मुद्दा क्र.4 व 5 चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत कारण याकामी श्री आर.बी.प्रधान यांचे मार्फत कोर्ट कमिशन झाले असून त्याचे कोर्ट कमिशन अहवालाचे अवलोकन करता पपींग मोटार जवळ एक नॉन रिटर्न व्हाल्व आणि काही एअर व्हाल्व चालू असलेचे व काही एअर व्हाल्व बंद असल्याचे निदर्शनास आले व प्रेशर रिलीफ व्हाल्व बसविला नसलेचे दिसून आले. तक्रारदाराचे सांगणेप्रमाणे गळती असले ठिकाणी जागा खोदून पाहिली असता सदरची पाईपलाईन सॉकेटमधून गळत असलेचे निदर्शनास आले. तसेच पाईपचे सॉकेटमध्ये व्यास व लांबी यांचेमध्ये विसंगती दिसून येते व इतर सर्व पाईप्स चांगले आहेत. तसेच याबाबतचा कोर्ट कमिशनर रिपोर्ट सोबत दाखल केला आहे. पूर्ण पाईपलाईनचे काम झालेवर त्या पाईपलाईनमध्ये गळतीचे प्रमाण जादा दिसत असलेचे तक्रारदाराने पाईपलाईनच्या पंपींग स्टेशनपासून अंदाजे 70 टक्के लांबीच्या ठिकाणी पाण्याचे स्टोअरेज बांधून पाणीसाठा करुन तेथून पाणी लिफ्ट केलेले आहे असे दिसते.
11. तसेच गळतीचे ठिकाणी सॉकेट फिटींग व्यवस्थित झाले नसलेचे माझे निदर्शनास आले. तसेच गळतीच्या ठिकाणी कोणत्या गुणवत्तेचे सॉल्वंट सिमेंट (सोल्युशन) ने जोडले आहे याबाबत समजून येत नाही. त्याकरिता सॉल्वंट सिमेंट (सोल्युशन) ची केमिकल टेस्ट करणे व त्याचा अहवाल घेणे गरजेचे वाटते. तसेच सदर सॉकेट जोडणारा व्यक्ती हा तांत्रिकदृष्टया सक्षम होता किंवा नाही हे समजून येत नाही असे कोर्ट कमिशन अहवालात नमूद आहे.
12. तक्रारदार यांनी सदरच्या पाईप फिटींग करतेवेळी पंपींग स्टेशनसाठी 12.5 एच.पी. ची मोटार पंपसेट बसविणे आवश्यक असलेचा प्लॅन इस्टीमेट इंजिनिअर श्री गायकवाड यांनी दिला असताना 15 एच.पी. ची मोटर तक्रारदाराने बसविली असलेचे निदर्शनास आले. त्यामुळे जादा एच.पी. ची मोटर बसविलेमुळे पाण्याचे डिस्चार्ज वाढू शकतो, त्यामुळेही लिकेज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तक्रारदार यांना इंजिनिअर गायकवाड यांनी दिले तांत्रिक अहवालाची प्रत या रिपोर्टसोबत जोडली आहे. वर नमूद कोर्ट कमिशनर श्री आर.बी.प्रधान यांनी दिले कोर्ट कमिशन अहवालाचे काळजीपूर्वक अवलोकन करता याकामी पाईपलाईन करताना प्रेशर रिलीफ व्हाल्व बसविला नसलेचे दिसून येते. तसेच सदरची पाईप लाईन ही सॉकेटमधून गळत असलेचे कोर्ट कमिशनर यांना दिसून आले व गळतीचे ठिकाणी सॉकेटमध्ये व्यास व लांबी यात विसंगती असल्याचे व इतर सर्व पाईप्स चांगल्या असलेचे नमूद केले आहे.
13. तसेच कोर्ट कमिशनरचे अहवालानुसार सॉकेट फिटींग व्यवस्थित झाले नसलेचे स्पष्ट होते. याकामी कोर्ट कमिशनर यांनी त्यांचे कमिशनर अहवालात नमूद केले आहे की, गळतीचे ठिकाणी कोणत्या गुणवत्तेचे सॉल्वंट सिमेंट (सोल्युशन) ने जोडणी केली आहे हे समजून येत नाही. त्याकरिता सॉल्वंट सिमेंट (सोल्युशन) ची केमिकल टेस्ट करणे व त्याचा अहवाल घेणे गरजचे वाटते. असे नमूद करुनही तक्रारदार यांनी सॉल्वंट सिमेंट (सोल्युशन) ची केमिकल टेस्ट करुन घेतलेली नाही. तक्रारदाराने वि.प. कडून सॉल्वंट सिमेंट (सोल्युशन) खरेदी केलेले नाही तशी त्याची केसही नाही. कोर्ट कमिशन अहवाल प्राप्त झालेनंतर तक्रारदाराचे ताब्यात असणारे वापरलेले सॉल्वंट सिमेंट (सोल्युशन)ची केमिकल तपासणी ग्राहक संरक्षण कायदा कलम 13(1)क) प्रमाणे करुन घेणेची जबाबदारी तक्रारदारवर होती. तरीही तक्रारदार यांनी सदर सॉल्वंट सिमेंट (सोल्युशन) ची केमिकल तपासणी केलेली नाही. म्हणजेच तक्रारदाराने वापरलेले सॉल्वंट सिमेंट (सोल्युशन) हे कोणत्या गुणवत्तेचे होते, ते सॉकेटची जोडणी करणेस योग्य दर्जेदार होते किंवा नाही ही बाब सिध्द केलेली नाही. तसा कोणताही केमिकल तपासणी अहवाल तक्रारदाराने याकामी आणलेला नाही. त्यामुळे वि.प. ने तक्रारदाराला विक्री केलेली पाईप्स निकृष्ट दर्जाचे होते असा अंदाज काढणे न्यायोचित वाटत नाही. श्री आर.बी. प्रधान यांनी दिले कोर्ट कमिशन अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे की, पाईप फिटींग करतेवेळी पंपींग स्टेशनसाठी 12.5 एच.पी. ची मोटर/पंपसेट बसविणे आवश्यक असलेचा प्लॅन व इस्टिमेट इंजिनिअर गायकवाड यांनी तक्रारदाराला दिला होता. असे असतानाही तक्रारदार यांनी 15 एच.पी. ची मोटर बसविलेचे निदर्शनास आले. त्यामुळे जादा एच.पी.ची मोटार बसविल्यामुळे पाण्याचा डिस्चार्ज वाढू शकतो व त्यामुळेही लिकेज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर गायकवाड इंजिनिअर यांनी तक्रारदाराला दिलेल्या प्लॅन व इस्टीमेटची प्रत कोर्ट कमिशन अहवालासोबत कोर्ट कमिशनर यांनी जोडली आहे.
14. वरील श्री प्रधान यांनी दिले कोर्ट कमिशन अहवालाचे अवलोकन करता व तक्रारदार व वि.प. ने दाखल केले सर्व कागदपत्रे यांचे अवलोकन करता वि.प. ने तक्रारदाराला निकृष्ट दर्जाची पाईप विक्री केली ही बाब तक्रारदाराने सबळ पुराव्यांसह सिध्द केलेली नाही. सबब, मुद्दा क्र.4 व 5 चे उत्तर आम्ही नकारार्थी दिले आहे.
सबब, वरील सर्व बाबींचा ऊहापोह करता याकामी तक्रारदाराने तक्रारअर्जात नमूद बाबी पुराव्यांसह सिध्द केलेल्या नाहीत व वि.प. ने तक्रारदाराला निकृष्ट दर्जाची पाईपची विक्री करुन सदोष सेवा दिली ही बाब तक्रारदाराने सबळ पुराव्यांसह सिध्द केलेली नाही. सबब, याकामी तक्रारदार हे वि.प. यांचेकडून कोणतीही नुकसान भरपाई मिळणेस पात्र नाहीत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
15. सदरकामी आम्ही मे. वरिष्ठ न्यायालयांच्या खालील नमूद न्यायनिवाडे व त्यातील दंडकांचा आधार घेतला आहे.
- 1985 Legal Engle (Raj.) 563
In the Rasthan High Court
Jugal Kishor Vs. Ram Blex & Others
- Supreme Court of India
M/s National Seeds Corporation Ltd.
Madhusudan Reddy & Anr.
Head Note : The District Forum could not have adjudicated upon the complaints filed by the respondents and awarded compensation to them without following procedure prescribed under Sec. 13(1)(c) of Consumer Act.
सबब, प्रस्तुत प्रकरणी वि.प. यांनी तक्रारदार यांना निकृष्ट दर्जाच्या पाईप्स विक्री करुन सदोष सेवा दिली ही बाब सबळ पुराव्यांसह तक्रारदार सिध्द करु शकलेले नाहीत. सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येतो.
2) खर्चाबाबत आदेश नाहीत.
3) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.