तक्रारदार :- स्वत:
जाबदार क्र. 1 व 2 :- एकतर्फा
// निकालपत्र //
पारीत दिनांकः- 25/04/2014
(द्वारा- एस्.के. पाचरणे, सदस्य)
तक्रारदार श्री. घनशाम जगदीश शर्मा, राहणार निगडी, पुणे यांनी जाबदेणार सॅमसंग टी.व्ही. उत्पादक व विक्रेते यांच्याविरुध्द त्रुटीयुक्त सेवेबद्दल ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 12 अन्वये तक्रार अर्ज दाखल केला आहे. तक्रार अर्जातील संक्षिप्त मजकूर पुढीलप्रमाणे आहे.
2. तक्रारदार श्री. घनशाम शर्मा यांनी जाबदेणार क्र. 2 आर.के. ईलेक्ट्रॉनिक्स, निगडी, पुणे यांचेकडून दि. 22/11/2012 रोजी सॅमसंग एलईडी टी.व्ही. खरेदी केला. सदरच्या टी.व्ही. ची किंमत रु.47,500/- तक्रारदारांनी जाबदेणारांना दिली. त्यासाठी जाबदेणारांनी दि. 22/11/2012 रोजी टॅक्स ईनव्हाईस दिलेला आहे. टी.व्ही. खरेदी केल्यानंतर जवळपास 10 महिन्याच्या कालावधीतच काही तांत्रिक समस्या असल्याचे निदर्शनास आले. याबाबत तक्रारदारांनी दि. 1/9/2013 रोजी जाबदेणारांकडे तक्रार नोंदविली. त्यानंतर जाबदेणारांकडून एक टेक्नीशियन आला व त्यांनी कंपनीला चुकीचा अहवाल सादर केला की, तक्रारदाराचा टी.व्ही. दुरुस्त केला व तक्रारदाराची समस्या सोडविण्यात आली. परंतु त्यानंतरही तक्रारदाराचा टी.व्ही. दुरुस्त झालेला नव्हता, त्यावेळी टी.व्ही. वॉरंटी पिरीएड मध्ये होता.
त्यानंतर तक्रारदारांनी वारंवार मेलद्वारे व फोनद्वारे संपर्क साधूनही जाबदेणारांनी प्रतिसाद दिला नाही. तक्रारदारांना दि. 4/10/2013 रोजी जाबदेणारांकडून पत्र प्राप्त झाले, त्यात असा उल्लेख केला होता की, तक्रारदाराचा टी.व्ही. physically damage झालेला आहे व ही बाब वॉरंटीमध्ये कव्हर होत नाही. जाबदेणारांनी, तक्रारदारांना टी.व्ही. दुरुस्तीवर 20% डिस्काऊंट द्यायला तयार असल्याचे कळविले. जाबदेणारांची ही ऑफर स्विकारण्यास तक्रारदार तयार नव्हते. त्यानंतर तक्रारदारांनी दि. 8/11/2013 रोजी जाबदेणारांना पत्र पाठवून त्यांची तक्रार तात्काळ सोडविण्याची मागणी केली. तरीसुध्दा जाबदेणारांनी कोणतीही कार्यवाही केली नाही, ही जाबदेणारांच्या सेवेतील त्रुटी आहे म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल केला आहे.
तक्रारदार, जाबदेणारांकडून नादुरुस्त टी.व्ही. बदलून त्याच मेक मॉडेलचा नविन टी.व्ही. किंवा टी. व्ही. ची किंमत रु.47,500/- परत मागतात. मानसिक त्रासाबद्दल नुकसानभरपाई रु. 1,00,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.10,000/- आणि इतर दिलासा मागतात. तक्रारदारांनी तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ शपथपत्र व कागदपत्रे सादर केली आहेत.
3. जाबदेणार क्र. (1) व (2) यांना मंचाने पाठविलेली नोटीस प्राप्त होऊनही ते मंचासमोर हजर झाले नाहीत. म्हणून मंचाने जाबदेणार क्र. (1) व (2) यांच्याविरुध्द एकतर्फा सुनावणीचे आदेश पारीत केले.
4. प्रस्तुत प्रकरणी मंचासमोर सादर झालेले शपथपत्र, कागदपत्रे व तक्रारदाराचा युक्तिवाद मंचाने विचारात घेतला. जाबदेणारांना मंचासमोर म्हणणे सादर करण्याची संधी उपलब्ध असूनही त्यांनी आपले म्हणणे मांडले नाही, यावरुन त्यांची तक्रार अर्जाप्रतीची अनास्था दिसून येते. सॅमसंग एल.ई.डी. टी.व्ही. मध्ये वॉरंटी पिरीएड मध्येच समस्या निर्माण झालेली आहे. ही समस्या दूर करण्यासाठी तक्रारदारांनी जाबदेणारांना वारंवार मागणी करुनही जाबदेणारांनी समस्या दूर केली नाही. टी.व्ही. मधील समस्येबाबत तक्रारदारांनी, श्री. अनिल अण्णाजी पाटील, प्रोपरायटर व टेक्निशीयन, अनिल ईलेक्ट्रीकल व ईलेक्ट्रॉनिक्स आकुर्डी पुणे यांचा अहवाल पुरावा म्हणून सादर केलेला आहे. त्या अहवालानुसार, टी.व्ही. च्या स्क्रीन पॅनेलवर thin faulty line दिसते. ही समस्या स्क्रीन पॅनेलचे स्क्रू ओव्हर टाईट असल्यामुळे निर्माण झालेली आहे. टी.व्ही. मध्ये ब्रेकेज किंवा फिजिकल डॅमेज झाल्याचे आढळून येत नाही. टी.व्ही. मधील समस्या, तांत्रिक उत्पादकीय दोषांमुळे उद्भ्ावली असावी, असे त्यांचे मत आहे. अशाप्रकारे उत्पादकीय दोष असूनही जाबदेणारांनी वॉरंटी पिरीएडमध्ये तक्रारदारांना आवश्यक व योग्य सेवा पुरविली नाही, असा मंचाचा निष्कर्ष आहे. करिता, मंच आदेश देतो की, जाबदेणारांनी, तक्रारदारांना त्यांचा नादुरुस्त टी.व्ही. बदलून त्याच मेक व मॉडेलचा नविन टी.व्ही. द्यावा किंवा टी.व्ही. ची किंमत रु.47,500/- परत करावी. तक्रारदारांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल नुकसानभरपाई रु.3,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.2,000/- द्यावा.
5. वरील विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच पुढीलप्रमाणे आदेश पारीत करत आहे.
// आदेश //
1. तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
2. जाबदेणारांनी वैयक्तिक व संयुक्तपणे, तक्रारदारांना नादुरुस्त टी.व्ही. बदलून त्याच मेक व मॉडेलचा नविन टी.व्ही. द्यावा
किंवा
टी.व्ही. ची किंमत रु.47,500/- (रु. सत्तेचाळीस हजार पाचशे फक्त) परत करावी.
3. जाबदेणारांनी वैयक्तिक व संयुक्तपणे, तक्रारदारांना झालेल्या मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई रु.3,000/- (रु. तीन हजार फक्त) आणि तक्रार अर्जाचा खर्च रु.2,000/- (रु. दोन हजार फक्त) प्रदान करावा.
4. उपरोक्त आदेश क्र. (2) व (3) ची पूर्तता आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवडयात करावी.
4. निकालाच्या प्रती उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात याव्यात.