रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग – रायगड.
तक्रार क्रमांक 69/2014 तक्रार दाखल दिनांक- 07/07/2014 तक्रार निकाली दिनांक 23-02-2015
श्री. अशोक कुमार गोंड,
रा. पूर्णिमा दीप सी.एच.एस.,
फ्लॅट नं. बी 001, प्लॉट नं. 77 / 78,
सेक्टर 8, न्यू पनवेल, जि. रायगड. ..... तक्रारदार
विरुध्द
दि मॅनेजिंग डायरेक्टर,
रिझ्यूम 2 एक्सेल कन्स्ल्टंटस प्रा. लि.,
ई - 14 बी, पहिला मजला, सेक्टर 8,
नोईडा – 201301. उत्तर प्रदेश. .... सामनेवाले
उपस्थिती - तक्रारदार स्वत: हजर.
सामनेवाले तर्फे विरुध्द एकतर्फा आदेश
समक्ष – मा. अध्यक्ष, श्री. उमेश वि. जावळीकर,
मा. सदस्य, श्री. रमेशबाबू बी. सिलीवेरी,
-: न्यायनिर्णय :-
(23/02/2015)
1. सामनेवाले यांनी तक्रारदारांच्या मुलास कराराप्रमाणे नोकरीविषयक सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याने तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारदारांच्या मुलाचे इंजिनिअरींगचे शिक्षण चालू असून त्यांस नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी सामनेवाले यांच्या योजनेमध्ये दि. 10/01/14 रोजी रक्कम रु. 1,900 नोंदणी फी व रु. 3,100/- HR Reference साठी गुंतवून नांव नोंदणी करण्यासाठी सामनेवाले यांनी तक्रारदारांस दूरध्वनी केला. त्याप्रमाणे तक्रारदाराने सामनेवाले यांचेकडे रक्कम रु. 1,900/- नोंदणी फी व रक्कम रु. 3,100/- HR Reference ID यासाठी भरले. त्यानंतर दि. 19/02/14 रोजी सामनेवाले यांनी तक्रारदाराच्या मुलाची वैयक्तीक माहिती व अनुभव, एका कंपनीच्या नोकरीसाठी निवडला असून त्यासाठी रक्कम रु. 7,634/- भरावेत असे सांगण्यात आल्याने तक्रारदाराने सदर रक्कम सामनेवाले यांना अदा केली. त्यानंतर दि. 12/03/14 रोजी पुन्हा एका मुलाखतीसाठी रक्कम रु. 10,500/- तक्रारदारांनी सामनेवाले यांना अदा केले. परंतु त्यानंतर सामनेवाले यांनी तक्रारदारांस काहीही प्रतिसाद न दिल्याने तक्रारदाराने दि. 28/05/14 रोजी सामनेवाले यांना नोटीस पाठवून प्रतिसाद देण्याची विनंती केली. तरीदेखील सामनेवाले यांनी काहीही प्रतिसाद न दिल्याने तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
3. सामनेवाले यांना मंचाची नोटीस प्राप्त होऊनदेखील ते मंचासमक्ष हजर न राहिल्याने त्यांचेविरुध्द एकतर्फा तक्रार चालविण्यात येते असे आदेश पारीत करण्यात आले. सदर आदेश आज रोजी अबाधित आहेत.
4. तक्रारदारांनी दाखल केलेली कागदपत्रे, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तीवादाचे अवलोकन केले असता, तक्रार निकाल कामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
मुद्दा | निष्कर्ष |
1. सामनेवाले यांनी तक्रारदारांच्या मुलास नोकरीविषयक सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. |
2. सामनेवाले तक्रारदारांना नुकसानभरपाई देण्यास पात्र आहेत काय ॽ | होय |
3. आदेश ? | तक्रार अंशत: मान्य. |
कारणमिमांसा :-
5. मुद्दा क्रमांक 1 - सामनेवाले यांचे व्यवसाय कौशल्याप्रमाणे त्यांनी तक्रारदारांच्या मुलाकडून नोंदणी रक्कम रु. 1,900/- स्विकारल्यानंतर सातत्याने अनेकविध कंपन्यांच्या जाहिरातीप्रमाणे तक्रारदारांच्या मुलास मुलाखतीस पाठविणे ही कायदेशीर जबाबदारी सामनेवाले यांची होती. त्याप्रमाणे केवळ दोन वेळा संधी देऊन तद्नंतर कोणताही प्रतिसाद न देणे ही बाब सेवासुविधा पुरविण्यामध्ये कसूर केल्याची बाब आहे. तक्रारदारांच्या मुलाची वैयक्तिक माहिती उपयुक्तपणे नोंदवून विशिष्ट पध्दतीने कंपनीकडे पाठवून मुलाखतीचे आयोजन करणे हे निश्चितच सामनेवाले यांनी सातत्याने करणे गरजेचे होते. परंतु ही जबाबदारी पार पाडण्यास सामनेवाले असमर्थ ठरल्याने सामनेवाले यांनी तक्रारदारांस सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब सिध्द होते. सबब, मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
6. मुद्दा क्रमांक 2 - सामनेवाले यांनी तक्रारदारांस कंपनीच्या मुलाखती आयोजित करुन देण्याबाबत कोणतेही विशेष प्रयत्न केले नाहीत. सामनेवाले यांनी प्रयत्न करावेत म्हणून तक्रारदारांनी सामनेवाले यांस नोटीस पाठवून देखील नोटीसला कोणतेही उत्तर सामनेवाले यांनी दिले नाही. सबब तक्रारदारांनी सामनेवालेकडे अदा केलेली रक्कम सामनेवाले यांनी वैयक्तिक वापराकरीता वापरुन तक्रारदारांचे आर्थिक नुकसान केल्याची बाब कागदोपत्री पुराव्यावरुन सिध्द होते. सबब, मुद्दा क्र. 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
7. वर नमूद निष्कर्षावरुन खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येतो.
-: अंतिम आदेश :-
1. तक्रार क्र. 69/2014 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदारांच्या मुलास कराराप्रमाणे नोकरीविषयक सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी तक्रारदारांस रक्कम रु. 23,184/- (रु. तेवीस हजार एकशे चौऱ्याऐंशी
मात्र) या आदेशप्राप्तीच्या दिनांकापासून 30 दिवसांत अदा करावेत.
4. सामनेवाले यांनी तक्रारदार यांस मानसिक त्रास व तक्रारखर्चापोटी एकत्रित रक्कम रु.
50,000/- (रु. पन्नास हजार मात्र) या आदेशप्राप्तीच्या दिनांकापासून 30 दिवसांत
द्यावेत.
5. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना तात्काळ पाठविण्यात याव्यात.
ठिकाण - रायगड-अलिबाग.
दिनांक – 23/02/2015.
(रमेशबाबू बी. सिलीवेरी) (उमेश वि. जावळीकर)
सदस्य अध्यक्ष
रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.