Dated the 16 Aug 2016
न्यायनिर्णय
द्वारा- सौ.स्नेहा एस.म्हात्रे...................मा.अध्यक्षा.
1. तक्रारदार यांचे वय-56 वर्षे आहे. सामनेवाले नं.1 ही इन्शुरन्स कंपनी असुन त्यांचे रजिस्टर्ड ऑफीस एलफीस्टन रोड, मुंबई-13 येथे आहे. सामनेवाले नं.2 हे सदर इन्शुरन्स कंपनीचे मॅनेजर आहेत.(घोडबंदर ठाणे शाखा) तक्रारदार यांना सामनेवाले यांचे सेल्स एक्झिक्युटिव्ह श्री.संजीव अरोरा यांनी जुलै-2012 मध्ये एक पॉलीसी BSLI Vision Plan- GSB Pay 18 ही घेण्याबाबत सुचविले, सदर पॉलीसी देतांना कंपनीच्या सदर सेल्स एक्झिक्युटिव्ह यांनी तक्रारदार यांना त्यांच्या आय.सी.आय.सी.आय. पॉलिसी वर रु.45,000/- बोनस देण्यात येईल असे सांगितले, व बोनस मिळाल्यानंतर, तक्रारदार सामनेवाले नं.1 कडून घेतलेली पॉलीसी रद्द करु शकतात, व त्यांना सदर नविन पॉलीसीच्या प्रिमियमची रक्कम रु.25,000/- परत करण्यात येईल, व जर तक्रारदार यांना पॉलीसी चालू ठेवावयाची असेल तर केवळ 5 वर्षापर्यंत रु.25,000/- चा प्रिमियम भरावा लागेल, असे सांगितल्याने सामनेवाले यांच्या सेल्स एक्झिक्युटिव्हवर विश्वास ठेऊन तक्रारदार यांनी BSLI Vision Plan- GSB Pay 18 ही 005678288 हया क्रमांकाची पॉलीसी सामनेवाले यांचेकडून घेतली व ता.27.07.2012 रोजी धनादेशाव्दारे सामनेवाले नं.1 यांना तक्रारदार यांनी रु.25,000/- ची प्रिमिअमची रक्कम अदा केली. (Exh-A Proposal form, Exh-B Payment Details) तक्रारदार यांना सदर पॉलीसीची कागदपत्रे पॉलीसी घेतल्यानंतर तब्बल चार महिन्यानंतर म्हणजे ता.11.11.2012 रोजी देण्यात आली, व त्यामध्ये सदर पॉलीसीचा कालावधी पच वर्षाऐवजी 18 वर्षांचा नमुद केलेला तक्रारदार यांना आढळला. (Exh-C Policy Papers) तक्रारदार यांनी ताबडतोब याबाबत सामनेवाले यांचेकडे BSLI-P-2012 -003798 क्रमांकान्वये तक्रार नोंदवली, त्याची तक्रारदार यांना ता.23.11.2012 रोजी सामनेवाले यांचेकडून सदर तक्रार नोंदविल्याची पोचही देण्यात आली. (Exh-D) तक्रारदार यांनी पॉलीसीच्या कालावधीबाबत चुकीची माहिती देऊन तक्रारदार यांची फसवणूक केल्याबद्दल सामनेवाले यांचेकडे अनेकवेळा पत्रव्यवहार केला तो अभिलेखात उपलबध आहे. तसेच तक्रारदार हे वयस्कर असल्याने अजुन 18 वर्षे प्रिमिअम भरु शकत नाही असे तक्रारदार यांनी कळविले. शेवटी तक्रारदार यांनी स्वतः सामनेवाले नं.2 यांचे कार्यालयात सदर प्रकाराबाबत योग्य ती कार्यवाही होण्यासाठी ता.17.05.2013 रोजी भेट दिली, सामनेवाले यांनी तक्रारदाराशी याबाबत केलेला पत्रव्यवहार ता.01.10.2013 (पान क्रमांक-25) याचे अवलोकन केले असता, सामनेवाले यांनी तक्रारदार यांना त्यांच्या पॉलीसीची रक्कम परत देण्यास नकार दिल्याचे दिसुन येते. परंतु तक्रारदार यांची पॉलीसी पाच वर्षांच्या कालावधीसाठी बदलून देण्याची तयारी दाखवली. परंतु अदयापपर्यंत त्याबाबत काहीच कार्यवाही केलेली नाही, तक्रारदार यांनी त्यानंतरही अनेकवेळा सामनेवाले यांना त्यांच्या सेल्स इक्झिक्युटिव्ह यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन, तक्रारदार यांची फसवणूक केल्याबद्दल नमुद करुन तक्रारदार यांनी सदर पॉलीसीबाबत भरलेली प्रिमिअमची रक्कम रु.25,000/- परत मागितली, त्याबाबत तक्रारदार यांनी सामनेवाले यांना ता.03.03.2014 रोजी नोटीसही बजावली परंतु सामनेवाले यांनी तक्रारदार यांना कोणताच प्रतिसाद दिला नाही अथवा तक्रारदाराच्या प्रिमिअमची रक्कमही (रु.25,000/-) तक्रारदार यांना परत केली नाही, व सामनेवाले यांनी तक्रारदार यांना त्यांच्या पॉलीसीचा कालावधी बदलून देण्याबाबत ता.01.10.2013 (पान क्रमांक-25) रोजी मेल पाठविला आहे. यावरुन सामनेवाले यांनी तक्रारदाराशी पाच वर्षांच्या कालावधीसाठी पॉलीसी देण्याचे कबुल केले होते ही बाब सिध्द होते. यावरुन सामनेवाले यांनी तक्रारदार यांना अनुचित प्रथेचा अवलंब करुन सदर पॉलीसी तक्रारदार यांना घेण्यास भाग पाडले हे दिसुन येते. शिवाय पॉलीसी घेतल्यानंतर तब्बल 4 महिन्यानंतर अनेकवेळा तक्रारदार यांनी विचारणा केल्यानंतर सामनेवाले यांनी तक्रारदार यांना पॉलीसीचे पेपर्स दिले तोपर्यंत तक्रारदाराचा Free look Period देखील संपला होता. यावरुन सामनेवाले यांनी तक्रारदार यांना अनुचित प्रथेचा वापर करुन सदर पॉलीसी विकली असल्याने तक्रारदारप्रती सदोषपुर्ण सेवा दिल्याचे सिध्द होते.
2. सामनेवाले यांना सुनावणीची नोटीस प्राप्त होऊनही ते गैरहजर राहिल्याने प्रस्तुत तक्रार ही सामनेवाले यांचे विरुध्द एकतर्फा चालविण्यात येत असल्याने तक्रारदार यांनी दाखल केलेल्या उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे प्रस्तुत तक्रारीत निर्णय देण्यात आला आहे ही बाब सर्वप्रथम स्पष्ट करण्यात येते.
3. सबब, सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदार यांना सदर पॉलीसी क्रमांक-005678288 बाबत घेतलेली प्रिमियमची रक्कम रु.25,000/- आदेश पारित तारखेपासुन दोन महिन्यांत परत करावी. तक्रारदार यांना सदर पॉलीसीचा कालावधी चुकीचा नमुद करुन प्रत्यक्षात 18 वर्षांच्या कालावधीची पॉलीसी तक्रारदार यांना विकल्याने पॉलीसीचे पैसे परत मिळवण्यासाठी सामनेवाले यांचे कार्यालयात खेपा घालणे, तसेच अनेकवेळा ई-मेलव्दारे, पत्राव्दारे सामनेवाले यांचेशी संपर्क करणे इत्यादि बाबींमुळे तक्रारदार यांना जो मानसिक त्रास झाला त्याची नुकसानभरपाई म्हणून सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदार यांना रक्कम रु.3,000/- (अक्षरी रुपये तीन हजार) व ग्राहक मंचात तक्रार दाखल करावी लागल्याने झालेल्या न्यायिक खर्चापोटी रु.2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार) सामनेवाले नं.1 यांनी आदेश पारित तारखेपासुन दोन महिन्यांत दयावेत.
उपरोक्त चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येतो.
- आदेश -
1. तक्रार क्रमांक-367/2014 अंशतः मंजुर करण्यात येते.
2. सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदार यांच्या पॉलीसीच्या प्रिमिअमची रक्कम रु.25,000/-
(अक्षरी रुपये पंचवीस हजार) आदेश पारित तारखेपासुन दोन महिन्यांत तक्रारदार यांना
परत करावी, सामनेवाले नं.2 यांनी त्याबाबत आवश्यक कायदेशीर बाबींची पुर्तता करण्यास
सहकार्य करावे.
3. सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.3,000/- (अक्षरी रुपये
तीन हजार), तसेच न्यायिक खर्चापोटी रु.2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार) आदेश पारित
तारखेपासुन दोन महिन्यांत दयावे.
4. आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.
5. तक्रारीचे अतिरिक्त संच असल्यास तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
ता.16.08.2016
जरवा/