निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 18/11/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 02/12/2010 तक्रार निकाल दिनांकः- 08/04/2011 कालावधी 04 महिने 06 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B.
सदस्या. सदस्या. सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. व्दारकादास पिता लक्ष्मीनारायण अबोटी व्दारका. अर्जदार वय 67. धंदा. सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी. अड.एस.डी.अबोटी. रा.सिव्हील हॉस्पीटल जवळ. परभणी विरुध्द 1 द मॅनेजर. गैरअर्जदार साऊथ सेंट्रल रेल्वे सिकंद्राबाद. अड.ए.जी.सोनी. 2 द ऑफिस ऑफ द साऊथ सेंट्रल रेल्वे. परभणी जंक्शन.परभणी.रेल्वे स्टेशन. जि.परभणी 431 401 ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा. श्रीमती अनिता ओस्तवाल.सदस्या .) गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, दिनांक 26/06/2010 रोजी अर्जदाराच्या मुंबई येथील मोठया भावाचे निधन झाले.त्या कारणास्तव अर्जदारास व त्यांच्या पत्नीस मुंबई येथे जाण्यासाठी दिनांक 27/10/2010 रोजीचे टिकीट क्रमांक 09030625 राखीव केले.ते टिकीट गाडी क्रमांक 516 जे दौंड पॅसेंजरचे मनमाड पर्यंत होते. तेथून पुढे गाडी क्रमांक 2118 चे दिनांक 28/10/2010 चे टिकीट राखीव केले.अर्जदाराने हे टिकीट परभणी स्टेशनहून परभणी ते मुंबई असे सलग घेतले होते. व अर्जदार व त्यांच्या पत्नी वरीष्ठ नागरीक असल्यामुळे त्यांना उपरोक्त टिकीट सवलतीत मिळाले. पुढे दिनांक 27/10/2010 रोजी अर्जदाराने दिनांक 08/11/2010 रोजीच्या मुंबई परभणी या परतीच्या प्रवासासाठी टिकीट फॉर्म भरुन दिला.अर्जदार व त्याच्या पत्नीला वरीष्ठ नागरिकच्या कोटयात वेगवेगळया कोचचे टिकीट उपलब्ध असल्यामुळे आरक्षण अधिका-याने अर्जदारास सांगितले असता अर्जदाराने त्यास मान्यता दर्शविली. परंतु आरक्षण अधिका-याने नजरचुकीने अर्जदारास एक टिकीट दिनांक 08/11/2010 चे तर दुसरे टिकीट दिनांक 08/01/2011 रोजीचे दिले. पुढे दिनांक 08/11/2010 रोजी अर्जदार हा त्याच्या पत्नीच्या सोबत देवगीरी एक्सप्रेस मध्ये परभणी येण्यासाठी चढला.असता त्याचा बर्थक्रमांक अन्य व्यक्तीला देण्यात आलेला होता.त्याने हि बाब संबंधित टिकीट निरीक्षकास निदर्शनास आणून दिली.असता अर्जदाराचे टिकीट हे दिनांक 08/01/2011 चे असल्याचे निदर्शनास आले.अर्जदाराने सर्व घटनाक्रम टिकीट निरीक्षकास सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने अर्जदाराचे काहीही ऐकुन न घेता त्यांना खाली उतरविण्यात आले. अर्जदार हा ब्लडप्रेशरचा रुग्ण असून ज्येष्ठ नागरीक आहे. तसेच अर्जदारास त्याच्या पत्नीशी संपर्क ही साधू न दिल्यामुळे दोघांची ही अवस्था बिकट झाली होती व या घटनेचा प्रचंड मनस्ताप अर्जदारास झाला. म्हणून अर्जदाराने मंचासमोर तक्रार दाखल करुन गैरअर्जदाराने मानसिक, शारीरिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- व सेवात्रुटीपोटी रक्कम रु.10,00/- अर्जदारास द्यावे. अशा मागण्या मंचासमोर केल्या आहेत. अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपत्र नि.2 वर व पुराव्यातील कागदपत्र नि 4/1 ते नि.4/5 मंचासमोर दाखल केले. मंचाची नोटीस गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 ला मिळाल्यानंतर त्यांनी लेखी निवेदन नि.13 वर दाखल करुन अर्जदाराचे कथन बहूतअंशी अमान्य केले आहे.गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, आरक्षण अधिका-याने दिलेले टिकीट तपासून पाहण्याची अर्जदाराने तसदी घेतली नाही, यावरुन अर्जदाराचा हलगर्जीपणाच दिसून येतो गैरअर्जदाराचे पुढे म्हणणे असे की, देवगिरी एक्सप्रेस या रेल्वे मध्ये इंटरपासची सुविधा असल्यामुळे अर्जदारास त्याच्या पत्नीला दुस-या कोचमध्ये जाऊन भेटणे सहज शक्य होते व पत्नीच्या बर्थवर अर्जदार अडजेस्टही करु शकला असता म्हणून अर्जदाराने गैरअर्जदारावर केलेले आरोप धादांत खोटे आहेत.व रेल्वे अधिका-यानी अपमानास्पद वागणुक देवुन रेल्वेतून अर्जदारास उतरविले या संबंधीचा पुरावा दाखल न करता मंचाची सहानुभूती मिळविण्यासाठी अर्जदाराने कल्पोकल्पीत आरोप गैरअर्जदारावर केले आहेत.म्हणून अर्जदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी.अशी विनंती गैरअर्जदाराने मंचासमोर केली आहे. दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर. 1 गैरअर्जदाराने अर्जदारास त्रुटीची सेवा दिली आहे काय ? होय. 2 अर्जदार कोणती दाद मिळणेस पात्र आहे ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्दा क्रमांक 1 व 2 अर्जदाराच्या थोरल्या भावाचे दिनांक 26/10/2010 रोजी मुंबई येथे निधन झाले त्यामुळे अर्जदार त्याच्या पत्नीसह मुंबई दिनांक 27/10/2010 रोजी येथे जाण्यासाठी व तिथून पुन्हा परभणी येथे येण्यासाठी टिकीट आरक्षीत करण्यसाठी फॉर्म भरुन दिला परभणी ते मुंबई प्रवासासाठीचे टिकीटा बद्दल कोणताही विवाद नव्हता परंतु मुंबई ते परभणी परतीच्या टिकीटाचा वाद आरक्षण अधिका-यांच्या निष्काळजीपणामुळे निर्माण झाला आरक्षण अधिका-याने अर्जदाराच्या पत्नीस दिनांक 08/11/2010 रोजीचे तर अर्जदारास दिनांक 08/01/2011 रोजीचे टिकीट दिले.त्यामुळे अर्जदारास बराच मनस्ताप झाला अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे.यावर गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, अर्जदाराने टिकीट तपासून पाहिले नाही ही त्याची चुक आहे. त्यासाठी गैरअर्जदाराच्या आरक्षण अधिका-याला जबाबदार धरता येणार नाही.निर्णयासाठी महत्वाचा मुद्दा असा की, गैरअर्जदाराने अर्जदारास वेगवेगळया तारखेचे टिकीट देवुन त्रुटीची सेवा दिली आहे काय ? याचे उत्तर होकारार्थी द्यावे लागेल. अर्जदाराने मंचासमोर नि.4/2 व नि.4/3 वर मुंबई ते परभणी टिकीटांची झेरॉक्स प्रत मंचासमोर दाखल केली आहे.त्याची पडताळणी केली असता एक टिकीट दिनांक 08/01/2011 रोजीचे तर दुसरे टिकीट दिनांक 08/11/2010 रोजीचे दिसते. ही बाब नक्कीच गैरअर्जदार रेल्वेच्या आरक्षण अधिका-यांचा हलगर्जीपणा दर्शविण्यास पुरेशी आहे.पुढे गैरअर्जदाराने असा बचाव घेतला आहे की, अर्जदाराने टिकीट तपासून घ्यावयास हवे होते, परंतु अर्जदाराच्या मोठया बंधुचे निधन झालेले असल्यामुळे अर्जदार व त्याच्या पत्नीस तातडीने मुंबईला जाणे गरजेचे होते. व अर्जदाराच्या मनस्थीतीचा विचार करता परतीचे दोन्ही टिकीट बारकाईने अर्जदाराने तपासात बसणे शक्य नव्हते. परंतु गैरअर्जदारासाठी अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली होती की, त्याने टिकीट फॉर्म वरचे तपशिल न पाहता दोन वेगळया तारखे टिकीट अर्जदारास दिले.याचे स्पष्टीकरण गैरअर्जदाराने मंचासमोर द्यावयास हवे होते.परंतु गैरअर्जदाराने लेखी निवेदनाच्या पुष्टयर्थ शपथपत्र देखील मंचासमोर दाखल करण्याची तसदी घेतलेली नाही.त्यामुळे त्याने घेतलेला बचाव अधारहीन आहे प्रवाशांना विनाकारण झालेल्या मनस्तापा बद्दल गैरअर्जदाराने वास्तविक पाहता क्षमा मागावयास हवी होती.किमानपक्षी दिलगिरी तरी व्यक्त करावयास काहीच हरकत नव्हती.असे मंचास वाटते.म्हणून वरील सर्व बाबींचा सारासार विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोंत. आदेश 1) अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2) गैरअर्जदार रेल्वेने निकाल कळाल्यापासून 30 दिवसांच्या आत सेवात्रुटी पोटी व त्या अनुषंगाने झालेल्या मानसिक त्रासापोटी एकुण रक्कम रु.3,000/- अर्जदारास द्यावे. 3) दोन्ही पक्षांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल . सौ.सुजाता जोशी. श्री. सी.बी. पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |