(घोषित दि. 28.12.2011 व्दारा श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्या)
तक्रारदारांनी रत्नप्रभा मोटर्स, जालना यांचेकडून महिंद्रा स्कार्पिओ हे वाहन खरेदी केले. सदर वाहन खरेदी करण्यासाठी मर्चन्ट को-ऑप बँक शाखा जालना यांचेकडून वित्त सहाय्य घेतलेले असून गैरअर्जदार यांचेकडे वाहनाचा विमा उतरविला आहे.
तक्रारदारांचे मित्र किरण संपतराव शिंघवी व त्यांचे कामावरील काशीनाथ निर्मळ यांनी महिंद्रा स्कार्पिओ गाडी खाजगी कामा निमित्य शिर्डी येथे घेवून गेले. दिनांक 14.06.2010 रोजी शिर्डीहून परत येत असताना वाहन चालक सुधाकर खरात यांचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे अपघात झाला. वैजापूर पोलीस स्टेशनला सुधाकर खरात यांचे विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला. तक्रारदारांनी स्कार्पिओ गाडी दूरुस्तीसाठी रत्नप्रभा मोटर्स यांचेकडे संपर्क केला असता गाडीचे चार ते साडेचार लाख रुपयांचे नूकसान झाल्याचे सांगितले.
तक्रारदारांनी गैरअर्जदार यांचेकडे गाडीच्या नूकसान भरपाई बाबत मागणी केली असता दिनांक 07.12.2010 रोजीच्या पत्रान्वये पॉलीसीतील अटींचा भंग केला या कारणास्तव विमा प्रस्ताव नामंजूर केला.
सदर प्रकरणात गैरअर्जदार हजर झालेले असून लेखी म्हणणे दिनांक 05.08.2011 रोजी दाखल केले. गैरअर्जदार यांच्या लेखी म्हणण्यानुसार तक्रारदारांनी वाहनाची विमा पॉलीसी गैरअर्जदार यांच्या औरंगाबाद शाखेकडून घेतलेली असून अपघातही औरंगाबाद हद्दीत झाल्यामुळे न्याय मंचाला सदर प्रकरण चालविण्याचा अधिकार नाही. गैरअर्जदार यांना तक्रादारांची महिंद्रा स्कार्पिओ गाडीची प्रायव्हेट कार पॅकेज पॉलीसी मान्य आहे. तक्रारदारांच्या गाडीला अपघात झाला तेव्हा तक्रारदारांनी सदर वाहन भाडे तत्वावर दिले होते. या बाबतचा इनव्हेस्टीगेशन रिपोर्ट, एफ.आय.आर. दाखल आहे. तक्रारदारांनी प्रायव्हेट कार पॅकेज पॉलीसी घेतलेली असून गाडीचा वापर व्यवसायाकरीता केलेला असल्यामूळे पॉलीसीच्या अटी व शर्तींचा भंग झाला आहे. या कारणास्तव तक्रारदारांचा विमा प्रस्ताव नामंजूर केला आहे.
तक्रारदारांची तक्रार दाखल कागदपत्र, गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे दाखल कागदपत्र यांचे सखोल वाचन केले. तक्रारदारांचे विद्वान वकील श्री विकास पिसूरे व गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांचे विद्वान वकील श्री संदीप देशपांडे यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारदारांनी महिंद्रा स्कार्पिओ एम.एच. 21 व्ही- 1551 या वाहनाची गैअर्जदार 1 यांच्याकडून प्रायव्हेट कार पॅकेज पॉलीसी 21.09.2009 ते 20.09.2010 या कालावधीची घेतल्याची बाब गैरअर्जदार यांना मान्य आहे. गैरअर्जदार यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदाराच्या गाडीला अपघात झाला त्यावेळी सदर गाडी भाडे तत्वावर दिल्याचे अपघाता संबंधित पोलीस पंचनामा व एफ.आय.आर. मध्ये नमूद केलेले आहे. गैरअर्जदार यांच्या इनव्हेस्टीगेशनी दिलेल्या अहवाला नुसार तक्रारदारांनी गाडी भाडे तत्वावर दिल्यामूळे पॉलीसीच्या अटी व शर्तीचा भंग झाला आहे. या कारणास्तव गैरअर्जदार यांनी तक्रारदारांच्या गाडीचा नूकसान भरपाईचा प्रस्ताव योग्य रित्या नामंजूर केला आहे. त्याच प्रमाणे तक्रारदारांनी वाहनाची विमा पॉलीसी गैरअर्जदार 1 औरंगाबाद शाखेतून घेतली आहे. तसेच वाहनाचा अपघात वैजापूर जि.औरंगाबाद येथे झालेला आहे. त्यामूळे सदर प्रकरण न्यायमंचाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही.
गैरअर्जदार यांनी समर्थनार्थ खालील न्याय निवाडयाचा आधार घेतला आहे.
IV (2009)CPJ 40 (SC)SONIC SURGICAL V/s NATIONALINSURANCE COMPANY LTD. (i)Consumer Protection Act, 1986 Section 17-Jurisdiction –Territorial - Fire broke out in godown at Ambala- Insurance policy taken at Ambala - Compensation claim made at Ambala – Contention regarding applicability of Amendment Act, 2003 not acceptable-‘branch office’in amended section means, branch office where cause of action arose - no part of cause of action arose in Chandigart- Consumer Commission, Chandigarh had no Jurisdiction to adjudicate.
वरील न्याय निवाडया नूसार ग्राहक संरक्षण कायदा कलम 17 (2) च्या सन 2003 मधील दुरुस्ती नूसार ब्रॅंच ऑफीस म्हणजे तक्रारदारांना तक्रार दाखल करण्यास कारण घडले तेथे तक्रार दाखल करता येते.
सदर न्याय निवाडयानूसार तक्रारदारांना सदरची तक्रार औरंगाबाद येथील न्याय मंचात दाखल करणे योग्य आहे. असे न्याय मंचाचे मत आहे.
वरील न्याय निवाडा सदर प्रकरणात लागू होतो असे न्याय मंच नम्रपणे नमूद करत आहे. तक्रारदारांनी वाहनाची विमा पॉलीसी गैरअर्जदार 1 यांचेकडे औरंगाबाद येथून घेतली असून वाहनाचा अपघात ता.वैजापूर जि.औरंगाबाद येथे झाल्यामूळे सदरची तक्रार न्याय मंचाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही.
सबब न्याय मंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात येते.
- खर्चा बाबत आदेश नाही.