-निकालपत्र–
(पारित व्दारा- श्री नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्य)
( पारित दिनांक-28 सप्टेंबर, 2016)
01. तक्रारकर्त्याने ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) बँके विरुध्द सेवेत कमतरता दिल्या बाबत दाखल केली आहे.
02. तक्रारीचे स्वरुप थोडक्यात खालील प्रमाणे-
तक्रारकर्ता हा नागपूर येथील स्थायी रहिवासी असून तो ठेकेदारीचा व्यवसाय करतो तसेच रोज मजुरीवर कामगार पुरविण्याचे काम करतो. तक्रारकर्त्याचे खाते विरुध्दपक्ष आय.डी.बी.आय. बँके मध्ये असून त्याचा खाते क्रं-51010200005098 असा आहे आणि ग्राहक आय.डी.क्रं-70046665 असा आहे आणि त्यामुळे तो विरुध्दपक्ष बँकेचा ग्राहक आहे.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, त्याला मजुरांच्या मजुरी पोटी धनादेश क्रं-94910 रक्कम रुपये-52,000/- चा मिळाला व त्याने तो चेक वटविण्यासाठी विरुध्दपक्ष क्रं-1) बँकेच्या खात्यात जमा केला परंतु सदर धनादेशाची रक्कम त्याचे खात्यात जमा झाली नाही म्हणून त्याने वेळोवेळी विरुध्दपक्ष क्रं-1) बँकेच्या शाखेत भेटी दिल्यात परंतु प्रत्येक वेळी टाळाटाळीची उत्तरे देण्यात येऊन अपमानजनक वागणूक देण्यात आली. मजुरांनी मजुरीसाठी तक्रारकर्त्या कडे तगादा लावला म्हणून तक्रारकर्त्याने नाईलाजाने दुसरी कडून व्याजाने रक्कम घेऊन मजुरांची मजुरी दिली. वारंवार भेटी देऊन पाठपुरावा केल्या नंतर विरुध्दपक्ष क्रं-1) बँकेनी तक्रारकर्त्यास तब्बल दोन वर्षा नंतर म्हणजे दिनांक-28/11/2011 रोजीचे पत्रान्वये त्याने जमा केलेला धनादेश गहाळ झाल्याचे कळविले. त्यावर तक्रारकर्त्याने दिनांक-17/12/2011 रोजीची कायदेशीर नोटीस विरुध्दपक्ष बँकेला पाठविली असता विरुध्दपक्ष बँकेनी नोटीसला दिलेल्या उत्तरात आश्चर्यजनक विधाने करुन गहाळ धनादेशा ऐवजी नविन धनादेश मागून घ्यावा असे सुचित केले.
तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, धनादेश गहाळ झाल्याची बाब त्वरीत विरुध्दपक्ष क्रं-1) बँकेच्या शाखेने त्यास कळवावयास हवी होती. मजुरांचे मजुरीचा धनादेश गहाळ झाल्याने त्याला दुसरी कडून व्याजाने रक्कम आणून मजुरी द्दावी लागली. विरुध्दपक्ष बँकेच्या दोषपूर्ण सेवेमुळे त्याला शारिरीक, मानसिक त्रास व आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
म्हणून त्याने विनंती केली की, विरुध्दपक्ष बँकेनी गहाळ झालेल्या धनादेशाची रककम रुपये-52,000/- तसेच मानसिक व शारिरीक त्रासा बद्दल रुपये-30,000/- आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-18,000/- असे मिळून एकूण रुपये-1,00,000/- वार्षिक 18 टक्के दराने व्याजासह तक्रारकर्त्याला देण्याचे आदेशित व्हावे.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) बँकेनी आपला लेखी जबाब एकत्रितरित्या नि.क्रं 08 खाली दाखल केला. त्यांचे लेखी उत्तरा नुसार तक्रारकर्त्याने कथीत गहाळ झालेला धनादेश त्यांचे बँकेत सन-2009 मध्ये वटविण्यासाठी जमा केला व त्यानंतर नोटीस दिनांक-17/12/2011 पर्यंत त्याने कोणतीही कार्यवाही न करता तो शांत बसला, त्यामुळे तक्रार मुदतबाहय असल्याचे कारणावरुन ती खारीज होण्यास पात्र आहे. तक्रारकर्त्याने जो धनादेश वटविण्यासाठी त्यांचे बँकेत जमा केला होता, तो धनादेश वैनगंगा क्षत्रीय ग्रामीण बँक, मोहाडी येथील दिलेला होता परंतु त्या बँकेला तक्रारकर्त्याने तक्रारीत प्रतीपक्ष केलेले नसल्याने तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. तक्रारकर्त्याचे खाते त्यांच्या बँकेत असल्याची बाब मान्य केली. तसेच त्याने धनादेश क्रं-94910 रक्कम रुपये-52,000/- वटविण्यासाठी त्याचे खात्यात जमा केल्याची बाब सुध्दा मान्य केली. तक्रारकर्त्याला त्यांचे बँके कडून अपमानजनक वागणूक दिल्या जात होती ही बाब अमान्य केली.
विरुध्दपक्ष बँकेनी पुढे असे नमुद केले की, तक्रारकर्त्याने वटविण्यासाठी त्याचे खात्यात जमा केलेला धनादेश स्थलांतरीत होत असताना (In transit) गहाळ झाला व त्याबद्दलचे पत्र त्यांनी दिनांक-28/11/2011 रोजी तक्रारकर्त्यास दिले, तत्पूर्वी अनेकदा धनादेश गहाळ झाल्याचे त्यास तोंडी कळविण्यात आले होते. तक्रारकर्त्याचे तक्रारीतील अन्य मजकूर नाकबुल करुन तक्रार खारीज करण्याची विनंती केली.
04. तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत दस्तऐवज यादी नुसार विरुध्दपक्ष क्रं-1) बँकेनी तक्रारकर्त्याला दिनांक-28/11/2011 रोजी पाठविलेले पत्र, बँकेचे खाते बुक, तक्रारकर्त्याने बँकेला पाठविलेली दिनांक-17/12/2011 ची नोटीस आणि बँकेने नोटीसला दिलेले दिनांक-04/01/2012 रोजीचे उत्तर अशा दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात. तसेच नि.क्रं-9 प्रमाणे लेखी युक्तीवाद दाखल केला.
05. विरुध्दपक्ष बँके तर्फे नि.क्रं-10 प्रमाणे लेखी युक्तीवाद दाखल करण्यात आला.
06. तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्ष बँकेचे उत्तर आणि प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवजांचे अवलोकन करण्यात आले, त्यावरुन खालील प्रमाणे मंचाचा निष्कर्ष देण्यात येतो-
::निष्कर्ष ::
07. तक्रारकर्त्याचे खाते विरुध्दपक्ष क्रं-1) आय.डी.बी.आय. बँकेच्या नागपूर येथील शाखे मध्ये असून त्याचा खाते क्रं-510102000005098 तर ग्राहक आय.डी.क्रं-70046665 असा आहे आणि ही बाब विरुध्दपक्ष बँकेनी सुध्दा मान्य केलेली आहे.
08. तक्रारकर्त्याने त्याला मजुरांच्या मजुरी पोटी मिळालेला धनादेश क्रं-94910 रक्कम रुपये-52,000/- वैनगंगा क्षत्रीय ग्रामीण बँक, मोहाडी या बँकेतून वटविण्यासाठी, विरुध्दपक्ष क्रं-1) बँकेच्या खात्यात दिनांक-02.09.2009 रोजी जमा केला होता परंतु सदर धनादेशाची रक्कम त्याचे खात्यात जमा झाली नाही म्हणून त्याने वेळोवेळी विरुध्दपक्ष क्रं-1) बँकेच्या शाखेत चौकशी केली परंतु विरुध्दपक्ष क्रं-1) बँकेच्या शाखेनी त्याला वेळोवेळी योग्य माहिती न देता टाळाटाळीची उत्तरे दिलीत आणि सरते शेवटी तब्बल 02 वर्षा नंतर तक्रारकर्त्याला दिनांक-28/11/2011 रोजीचे पत्रान्वये कळविले की, त्याने वटविण्यासाठी त्याचे खात्यात जमा केलेला धनादेश स्थलांतरीत होत असताना (In transit) गहाळ झालेला आहे. सदर बाब माहिती होताच तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष बँकेला दिनांक-17/12/2011 रोजीची कायदेशीर नोटीस पाठवून रुपये-1,00,000/- नुकसान भरपाईची मागणी केली. विरुध्दपक्ष बँकेनी नोटीसला दिलेल्या उत्तरात कळविले की, ज्या व्यक्ती कडून तक्रारकर्त्याला धनादेश प्राप्त झाला होता त्यांचे कडून पुन्हा तेवढयाच रकमेचा धनादेश प्राप्त करुन
तो बँकेत जमा करावा. विरुध्दपक्ष बँकेचे हे उत्तर कायदेशीर आणि न्यायोचित कितपत योग्य आहे असा प्रश्न मंचा समोरही निर्माण झालेला आहे. विरुध्दपक्ष बँकेनी गहाळ झालेल्या धनादेशाची माहिती तब्बल 02 वर्षा नंतर लेखी पत्रान्वये तक्रारकर्त्याला कळविलेली आहे, ही बाब स्पष्टपणे विरुध्दपक्ष बँकेनी तक्रारकर्त्याला दिलेली दोषपूर्ण सेवा असल्याचे दिसून येते, त्यामुळे तक्रारकर्ता हा शारिरीक, मानसिक त्रासा बद्दल तसेच आर्थिक नुकसानी बद्दल विरुध्दपक्ष बँके कडून नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
09. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश ::
(01) तक्रारकर्त्याची विरुध्दपक्ष क्रं-1) दि मॅनेजर, आय.डी.बी.आय.बँक, सिताबर्डी, नागपूर-12 आणि विरुध्दपक्ष क्रं-2) चिफ मॅनेजर,आय.डी.बी.आय.बँक, मुंबई-400005 यांचे विरुध्दची वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) आय.डी.बी.आय.बँके तर्फे संबधित अधिका-यांना आदेशित करण्यत येते की, विरुध्दपक्ष क्रं-1) बँके कडून गहाळ झालेला धनादेश क्रं-94910 ची रक्कम रुपये-52,000/- (अक्षरी रुपये बाव्वन हजार फक्त) आणि त्यावर धनादेश जमा केल्याचा दिनांक-02.09.2009 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने व्याज यासह येणारी रककम तक्रारकर्त्यास परत करावी.
(03) तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-15,000/- (अक्षरी रुपये पंधरा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-3000/- (अक्षरी रुपये तीन हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) बँकेनी तक्रारकर्त्यास द्दावेत.
(04) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) आय.डी.बी.आय.बँके तर्फे संबधित अधिका-यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.
(05) प्रस्तुत निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.