जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/174 प्रकरण दाखल तारीख - 28/07/2009 प्रकरण निकाल तारीख – 21/10/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते - सदस्य तेजाबाई भ्र.राजेश बंडेवार, अर्जदार. वय वर्षे धंदा घरकाम, रा.लोहा ता.लोहा जि.नांदेड. विरुध्द. 1. मुख्य व्यवस्थापक, फिनोमेनल हेल्थ केअर सर्व्हीसेस लि, गैरअर्जदार. 101/अ, दिव्यासस्मृती, लिंक रोड, मलाड(वेस्ट), 2. फिनोमेनल हेल्थ केअर सर्व्हीसेस लि, मार्फत डिव्हीलजनल मॅनेजर शाखा गुरुकृपा कॉम्प्लेक्स महावीर चौक,नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.बी.व्ही.भुरे. गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.पी.बी.अयाचीत. निकालपञ (द्वारा-मा.सतीश सामते,सदस्य) गैरअर्जदार फिनोमेनल हेल्थ केअर सर्व्हीसेस यांच्या सेवेच्या त्रुटीबद्यल अर्जदार यांनी आपली तक्रार खालील प्रमाणे नोंदविली आहे. अर्जदार ही मयत राजेश लालया बंडेवार यांची पत्नी असुन लोहा येथील रहीवाशी आहेत. मयत राजेश लालया बंडेवार यांनी दि.18/10/2007 मध्ये गैरअर्जदार यांचेकडे जॉईंट इकॉनॉमी प्लॅन अंतर्गत योग्य ती पुर्ण रक्कम एकदाच भरुन नऊ वर्षाच्या कालावधीसाठी जी.एम.ए. 19157192007 या मेंबरशिपद्वारे विमा पॉलिसी घेतली होती. या पॉलिसीत मयताची पत्नी म्हणजे अर्जदार ही नॉमिनी आहे. दि.14/01/2009 रोजी एक वाहन अपघातात मयत राजेश हे जीपने जात असतांना लोहा ते गंगाखेड रोड मालेवाडी पाटीजवळ समोरुन येणा-या ट्रकने जीपला धडक दिली व त्यात अर्जदाराचे पती जागेवर मरण पावले याबाबत पोलिस स्टेशन गंगाखेड येथे गुन्हा 6/2009 याप्रमाणे नोंदविण्यात आला व घटनास्थळ पंचनामा केला गेला, सोबत एफ.आय.आर. पी.एम.रिपार्ट, इनक्वेस्ट पंचनामा व इ कागदपत्र दाखल केलेले आहे. गैरअर्जदारांना मृत्युची सुचना दिल्यानंतर क्लेम दाखल केले पण गैरअर्जदार तो क्लेम दिला नाही म्हणुन दि.30/04/2009 रोजी क्लेम पेपर दाखल केल्याच्या नंतर ती उशिरा दाखल करण्यात आले म्हणुन क्लेम नामंजुर केला. अर्जदार ही आपल्या पतीच्या मृत्युनंतर दुःखात होती व पॉलिसीबद्यल तीला माहीती नव्हती व ती स्वतः अडाणी आहे हे गैरअर्जदारांना सांगुन सुध्दा त्यांचे म्हणणे त्यांनी ऐकले नाही. गैरअर्जदारांनी त्रुटीची सेवा दिली व विम्याची रक्कम रु.1,00,000/- दिले नाही म्हणुन दि.14/09/2001 पासुन 12 टक्के व्याज व मानसिक त्रासाबद्यल रु.25,000/- व दावा खर्च रु.5,000/- गैरअर्जदाराकडुन मिळावेत असा आदेश व्हावा म्हणुन ही तक्रार दाखल केलेली आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे वकीला मार्फत हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. त्यात कंपनीचा मुख्य व्यवसाय हा तिच्या होणा-या सभासदाना आरोग्या विषयी सोयी व सुविधा पुरविण्याचा असुन गैरअर्जदार यांनी सभासदांचा आरोग्य विषयक विमा तसेच अपघाती विमा ओरएंटंल इंशुरन्स कंपनी यांचेकडे उतरविला असुन सभासदांना सदरील कंपनीचे नियम व अटी या अंतर्गत दिले आहे. अर्जंदाराच्या मयत पतीचे अपघाती मृत्यु झाल्यानंतर याबाबतची माहीती व आवश्यक कागदपत्र वेळेतच म्हणजे नियमाप्रमाणे 30 दिवसात त्यांनी दाखल केली नाही. त्यामुळे त्यांचा दावा संशयास्पद असुन तो फेटाळण्याच्या योग्यतेचा आहे, असे म्हटले आहे. अर्जदार त्यांचे म्हणणे योग्य त्या पुराव्यानीशी व कागदपत्रानीशी सिध्द केले पाहीजे अर्जदार यांनी मागीतलेली रक्कम ही बेकायदेशिर असुन गैरअर्जदार कंपनीला बदनाम करण्याच्या दृष्टीने करण्यात आली म्हणुन अर्जदाराची मागणी फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केले तसेच गैरअर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकार यांनी दाखल केलेली दस्तऐवज बारकाईने तपासुन व वकीला मार्फत केलेला युक्तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. गैरअर्जदार यांच्या सेवेतील त्रुटी सिध्द होते काय? होय. 2. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे. मुद्या क्र. 1 अर्जदार यांनी फिनॉमेनल हेल्थ केअर सर्व्हीसेस यांचेकडे जी.एम.ए.19157192007 ही मेंबरशिप प्रमाणपत्र घेतले आहे त्याची सत्यप्रत दाखल केली आहे. याप्रमाणे मयत राजेश यांची नॉमीनी म्हणुन त्यांच्या पत्नीचे नांव तेजाबाई यांच्या नांवाचा उल्लेख आहे. ही आरोग्य विषयक पॉलिसी जरी असली तरी गैरअर्जदार यांनी आपल्या लेखी म्हणण्यात अपघाता बाबत त्यांच्या सभासदांना संरक्षण देण्याचे हेतुने त्यांनी अपघाती निधनाबद्यल ओरीएंटल इंशुरन्स कंपनीकडुन पॉलिसी घेऊन संरक्षण कव्हर केलेले आहे. यात अपघातात मृत्यु झाल्यास त्यांच्या सभासदांना रु.1,00,000/- देण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. गैरअर्जदार यांनी या प्रकरणांत मृत्यु दावा मिळण्यास ओरीएंटल इंशुरन्स कंपनी यांना पार्टी करता आले असते परंतु त्यांच्या नांवाचा उल्लेख करुन देखील त्यांनी त्यांना पार्टी करुन घेतलेले नाही असो गैरअर्जदारांनी अपघाताच्या रक्कमेबद्यल जबाबदारी घेतलेली असल्यामुळे आता ती रक्कम त्यांनी द्यावी किंवा ओरीएंटल इंशुरन्स कंपनीकडुन वसुल करुन द्यावी ही त्यांची बाब आहे. अर्जदारांनी दि. 27/04/2009 रोजीचे अर्जदारांच्या नांवे लिहीलेले गैरअर्जदार यांचे मुंबई ऑफिसचे पत्र दाखल केलेले आहे. या पत्रात अनुक्रमांक 3 वर Claim papers submitted after the stiputated 30 days असे म्हणुन क्लेम नामंजुर केलेले आहे. हा पॉलिसीतील नियम जरी असला तरी तो मॅडेटरी व बंधनकारक नाही. क्लेम दाखल करण्यास उशिर झाल्याचे कारण अर्जदारांनी आपल्या तक्ररीत स्पष्टपणे सांगीतलेले आहे की, हे विधवा बाई अडाणी असुन तिला पॉलिसीबद्यल माहीती नव्हती ती दुःखात असल्या कारणाने 30 दिवसात कंपनीने क्लेम दाखल करण्यास तीच्याकडुन अपेक्षित नव्हते म्हणुन हा उशिर होण सहाजिक आहे. या करीता तीला विलंब माफी दिला जाऊ शकले असते, कंपनीक काहीही विचार न करता क्लेम नामंजुर केले जे की, चुकीचे असुन आपल्या जबाबदारी झटकण्याचा प्रकार आहे. मृत्युबद्यल अर्जदारानी एफ.आय.आर., पोलिस पंचनामा, पी.एम.रीपोर्ट इनक्वेस्ट पंचनामा इ.कागदपत्र दाखल केलेले आहे. या कागदपत्रावरुन मयत राजेश यांचा मृत्यु अपघातामध्ये झाला हे सिध्द होते. त्यामुळे अपघाती मृत्युबद्यल विमा संरक्षण असलेली रक्कम रु.1,00,000/- गैरअर्जदार यांनी अर्जदाराला देणे बंधनकारक आहे व त्यावर व्याजही दिले पाहीजे. त्याबाबत विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदाराची तक्रार मंजुर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी एकत्रितरित्या व संयुक्तीकरित्या हा निकाल लागल्या पासुन 30 दिवसांच्या आंत विम्याची रक्कम रु.1,00,000/-( अक्षरी रु.एक लक्ष फक्त) व त्यावर दि.27/04/2009 पासुन 9 टक्के व्याजाने पुर्ण रक्कम मिळेपर्यंत व्याजासहीत द्यावे. 3. मानसिक त्रासाबद्यल रु.5,000/- व दावा खर्चाबद्यल रु.1,000/- मंजुर करण्यात येतात. 4. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्य गो.प.निलमवार, लघूलेखक. |