(घोषित दि. 13.11.2014 व्दारा श्रीमती. नीलिमा संत, अध्यक्ष)
प्रस्तुत तक्रार तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत सेवेतील कमतरतेसाठी केलेली आहे. तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हे जालना येथील कायम स्वरुपी रहिवासी आहेत. ते अशिक्षीत असुन ते मोलमजुरी करुन कुटूंब चालवितात. गैरअर्जदार हे नागरीकांकडून ठेवी स्विकारुन कर्ज देणे घेण्याचा व्यवसाय करणारी खाजगी व्यक्तीगत संस्था आहे. तक्रारदारांनी गैरअर्जदार यांच्या बॅंकेत स्वत:चे बचत खाते क्रमांक 13/20604 उघडले होते. वरील खात्यात दिनांक 31.03.2011 रोजी एकूण 10498.50 एवढी रक्कम शिल्लक होती. दिनांक 21.05.2011 रोजी संदीप सोनूने या व्यक्तीने रुपये 6,000/- काढल्याची नोंद खाते पुस्तकात करण्यात आली. तक्रारदार म्हणतात की, याची माहिती तक्रारदारांना दिनांक 29.03.2014 रोजी झाली. बॅंकेतील व्यवहारामध्ये ग्राहकांनी पैसे काढतांना बचत खाते पुस्तिका (Pass-book) आवश्यक असते. असे असतांना गैरअर्जदार बॅंकेने वरील नियमांचे पालन केलेले नाही. गैरअर्जदार यांनी वरील व्यक्तींना रक्कम काढल्याची लेखी अथवा तोंडी माहिती देखील दिली नाही. तक्रारदारांनी कोणालाही कधीही Withdrawal Slip व्दारे रक्कम काढावयास सांगितलेले नाही. गैरअर्जदारांच्या निष्काळजीपणामुळे तक्रारदारांना वरील प्रकारे नुकसान सोसावे लागले व त्यासाठी गैरअर्जदार बॅंक जबाबदार आहे. म्हणून तक्रारदारांनी ही तक्रार दाखल केलेली आहे व तक्रारी अंतर्गत ते त्यांच्या खात्यातून बेकायदेशीपणे काढलेली रक्कम रुपये 6,000/-, शारिरीक त्रास खर्च रुपये 2,000/-, तक्रार खर्च रुपये 5,000/- अशी मागणी करत आहेत.
तक्रारदारांनी आपल्या तक्रारी सोबत तक्रारदारांचे बचत खाते पुस्तकांची छायांकीत प्रत तसेच त्यांना गैरअर्जदारांनी दिलेली कायदेशीर नोटीसची प्रत अशी कागदपत्र दाखल केली आहेत.
गैरअर्जदार मंचा समोर हजर झाले. त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केला. त्यांच्या जबाबानुसार तक्रारदारांचे त्यांचेकडे बचत खाते आहे हे मान्य आहे. तक्रारदारांनी बॅंकेत रक्कम काढणे व जमा करणे यासाठीच्या को-या पावत्या बॅंकेतून घेतल्या होत्या. दिनांक 21.05.2011 रोजी तक्रारदारांना संदीप सोनूने नावाच्या व्यक्तीला रुपये 6,000/- काढण्यासाठी Withdrawal Sleep भरुण व स्वाक्षरी करुन पासबुक सह पाठविले. त्या प्रमाणे बॅंकेने त्यांना रक्कम दिली. बॅंकेच्या नियमानुसार रक्कम रुपये 20,000/- पेक्षा कमी असेल तर Withdrawal Slip सोबत पासबुक असेल तेंव्हा अशी रक्कम देता येते.
तक्रारदारांनी दिनांक 09.11.2011 रोजी लेखी तक्रार गैरअर्जदार बॅंकेकडे केली होती. त्या अनुषंगाने बॅंकेने रितसर चौकशी केली. संबंधिताचे जाबाब नोंदविले. त्यातून तक्रारदारांची तक्रार खोटी असल्याचे निष्पन्न झाले. तसे पत्र गैरअर्जदार यांच्या मुख्य शाखे तर्फे तक्रारदारांना देण्यात आले. तक्रारदारांनी दिनांक 28.04.2014 रोजी गैरअर्जदारांना खोटी नोटीस पाठविली. तक्रारदारांनी तक्रारीत Withdrawal Slip वरील त्यांची सही नाकारलेली नाही.
तक्रारदारांचा तक्रारी अर्ज ग्राहक संरक्षण कायद्यानुसार मुदतबाह्य आहे व त्या मुद्दयावर देखील तक्रार फेटाळणे योग्य आहे. तक्रारदार स्वच्छ हाताने मंचात आलेला नाही. त्यामुळे तक्रारदारांची तक्रार फेटाळण्यात यावी.
गैरअर्जदारांनी आपल्या जबाबा सोबत खाते उघडण्याचा फॉर्म, तक्रारदारांनी दिलेली Withdrawal Slip, तक्रारदारांचा दिनांक 09.11.2011 रोजीचा तक्रार अर्ज व गैरअर्जदारांच्या मुख्य शाखेने तक्रारदारांची तक्रार फेटाळली आहे त्या बाबतचे तक्रादारांना दिलेले पत्र अशी कागदपत्र दाखल केली आहेत.
तक्रारदारां तर्फे विव्दान वकील श्री.सि.ए.कुरील व गैरअर्जदार यांचे तर्फे विव्दान वकील श्री. व्ही.एस.कारंडे यांचा युक्तीवाद ऐकला. दाखल कागदपत्रांचा अभ्यास केला. त्यावरुन खालील मुद्दे मंचाने विचारात घेतले.
मुद्दे निष्कर्ष
1.तक्रारदारांची तक्रार मुदतीत आहे का ? नाही
2.काय आदेश ? अंतिम आदेशा नुसार
कारणमिमांसा
गैरअर्जदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रात तक्रारदारांना त्यांनी लिहीलेले दिनांक 09.11.2011 चे पत्र आहे. त्यात त्यांना दिनांक 21.05.2011 रोजी त्यांच्या खात्यातून रुपये 6,000/- संदीप सोनूने यांच्या नावाने काढले गेले अशी तक्रार केलेली दिसते. तसेच ही त्यांची तक्रार फेटाळल्या बाबतचे दिनांक 04.02.2012 चे पत्र देखील आहे. त्यावर Received म्हणून तक्रारदारांची स्वाक्षरी आहे. वरील दोनही कागदपत्रांवरुन तक्रारदारांना दिनांक 09.11.2011 रोजी किंवा त्या पूर्वी वरील वादग्रस्त व्यवहारा बद्दल माहिती झाल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदारांच्या पक्षात तक्रारीस कारण दिनांक 09.11.2011 रोजी घडले आहे. म्हणजेच तक्रारदारांनी तक्रार दिनांक 09.11.2013 पर्यंत दाखल करावयास हवी होती. परंतू तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार दिनांक 05.06.2014 रोजी म्हणजेच सुमारे सात महिने उशीराने दाखल केली आहे. त्याबाबतचे कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण तक्रारदारांनी दिलेले नाही अथवा विलंब माफीचा अर्जही केलेला नाही. तक्रारदार तक्रारीत म्हणतात की, त्यांना घटनेची माहिती दिनांक 29.03.2014 रोजी झाली. परंतू वर उल्लेख केलेल्या दोन कागदपत्रांवरुन तक्रारदारांना दिनांक 09.11.2011 रोजीच या बाबत माहिती झाली ही गोष्ट स्पष्ट आहे. अशा परिस्थितीत तक्रारदारांची प्रस्तुत तक्रार मुदतबाह्य आहे. म्हणून फेटाळणे योग्य ठरेल असा निष्कर्ष मंच काढत आहे.
म्हणून मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
- खर्चा बाबत आदेश नाहीत.