(घोषित दि. 22.08.2013 व्दारा श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्या)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदारांचे पती श्री.नारायण गुलाबराव काकडे हे शेतकरी असून, दिनांक 10.08.2010 रोजी घरी येताना इलेक्ट्रीक शॉक लागून मृत्यू पावले. सदर अपघाताची माहिती पोलीस स्टेशन सेवली येथे मिळाल्यानंतर अपघाती मृत्यूची नोंद ए.डी. 3/2010 अन्वये घेण्यात आली, साक्षीदारांचे जबाब घेवून मयताचे प्रेत पोस्टमार्टमसाठी शासकीय रुग्णालय मंठा येथे पाठविण्यात आले.
तक्रारदारांनी पतीच्या मृत्यूनंतर शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा प्रस्ताव विहीत मुदतीत तालुका कृषी अधिकारी यांचेकडे दाखल केला. कृषी अधिकारी यांनी गैरअर्जदार 1 व 2 यांचेकडे पाठवला. परंतू गैरअर्जदार 2 विमा कंपनीने दिनांक 31.12.2010 रोजी पत्रान्वये नामंजूर केला.
गैरअर्जदार 1 यांना ई-मेल द्वारे समन्सची बजावणी होवूनही गैरहजर असल्यामूळे दिनांक 17.08.2013 रोजी त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश न्यामंचाने पारित केला.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या म्हणण्यानूसार तक्रारदारांनी विहीत मूदतीत सदर घटनेबाबतची लेखी माहिती गैरअर्जदार 2 विमा कंपनीकडे दिली नाही. तसेच विमा प्रस्तावा सोबत अपूर्ण कागदपत्रे दाखल केली. त्यामुळे गैरअर्जदार 2 विमा कंपनीने तक्रारदारांच्या प्रस्तावाची फाईल बंद केली.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे यांचे सखोल वाचन केले. तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.पी.एम.परिहार व गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे विद्वान वकील श्री.संदीप देशपांडे यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारदारांचे पती श्री.नारायणराव गुलाबराव काकडे यांची सात बारा उता-यावर दिनांक 21.09.1999 पासून नोंद असल्याचे फेरफार क्रमांक 527 नूसार दिसून येते. त्याच प्रमाणे शवविच्छेदन अहवालानूसार त्यांचा इलेक्ट्रीक शॉंक लागून अपघाती मृत्यू झाल्याचे स्पष्ट होते.
गैरअर्जदार 2 विमा कंपनीने दिनांक 31.12.2010 रोजीच्या पत्रानूसार तक्रारदारांचा प्रस्ताव अपूर्ण कागदपत्रांच्या कारणास्तव नामंजूर केल्याचे दिसून येते. महाराष्ट्र शासनाने सदरची योजना शेतक-यांकरीता कल्याणकारी योजना राबवलेली असून अपूर्ण कागदपत्रांच्या कारणास्तव नामंजूर करणे उचित नाही तसेच सदर पत्रामध्ये कोणती कागदपत्रे अपूर्ण होती याबाबत खूलासा केलेला नाही. अशा परिस्थितीत गैरअर्जदार 2 विमा कंपनीने तक्रारदारांचा प्रस्ताव गुणवत्तेवर निकाली केलेला नसून तांत्रिक कारणास्तव नामंजूर केल्याचे दिसून येते. गैरअर्जदार 2 विमा कंपनीची सदरची कृती सेवेतील त्रुटी असल्याचे स्पष्ट होते. असे न्याय मंचाचे मत आहे.
तक्रारदारांचे पती शेतकरी असून त्यांचे अपघाती निधन झाल्याची बाब तक्रारीत आलेल्या पुराव्यानूसार स्पष्ट होत असल्यामूळे तक्रारदार सदर योजने अंतर्गत लाभ घेण्यास पात्र आहे. त्यामुळे गैरअर्जदार 2 विमा कंपनीने तक्रारदारांना शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत देय असलेली विमा लाभ रक्कम रुपये 1,00,000/- देणे उचित होईल असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब मंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
- गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीला आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा लाभ रक्कम रुपये 1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) आदेश मिळाल्या पासून 30 दिवसात द्यावी.
- वरील आदेश क्रमांक 1 मध्ये नमूद केलेली रक्कम विहीत मूदतीत अदा न केल्यास 9 टक्के व्याज दरासहीत द्यावी.
- ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
- खर्चा बाबत आदेश नाही.