(घोषित दि. 22.09.2011 व्दारा श्री.डी.एस.देशमुख,अध्यक्ष) विमा कंपनीच्या सेवेत त्रुटी असल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. थोडक्यात तक्रारदाराची तक्रार अशी आहे की,त्याने त्याची मोटार सायकल क्रमांक एम.एच.21 झेड. 0025 चा गैरअर्जदार आय.सी.आय.सी.आय.लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीकडे दिनांक 27.08.2009 ते 26.08.2010 या कालावधीसाठी विमा उतरविलेला होता. दिनांक 08.10.2009 रोजी तक्रारदार मुलाला भेटण्यासाठी मत्स्योदरी विधी महाविद्यालयात गेले असता त्यांनी त्यांची मोटार सायकल पार्कींग सेंटरमध्ये लावली आणि ते महाविद्यालयात गेले. महाविद्यालयामधून ते परत पार्कींग सेंटरमध्ये आले असता त्यांना त्यांची मोटार सायकल त्या ठिकाणी नसल्याचे दिसले. म्हणून त्यांनी मोटार सायकलचा अनेक ठिकाणी शोध घेतला. परंतू मोटार सायकल सापडली नाही. म्हणून त्यांनी मोटार सायकल चोरीला गेल्याबाबत पोलिस स्टेशन कदीम जालना यांच्याकडे फिर्याद दिली. त्यावरुन पोलिसांनी गुन्हयाची नोंद करुन घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मोटार सायकल चोरीचा तपास केला. परंतू पोलिसांनी मोटार सायकलचा शोध लागला नाही. म्हणून पोलिसांनी न्यायालयात अंतिम अहवाल दाखल केला. मोटार सायकल चोरीला गेल्यानंतर तक्रारदारांनी विमा कंपनीला दिनांक 29.10.2009 रोजी घटनेची माहिती दिली आणि आवश्यक कागदपत्रांसह विमा दावा दाखल केला. परंतू विमा कंपनी विम्याची रक्कम देण्यास जाणीवपुर्वक टाळाटाळ करीत असून विमा कंपनीने त्यांचा विमा दावा विनाकारण प्रलंबित ठेवून त्रुटीची सेवा दिली. म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, त्यास विमा कंपनीकडून रुपये 48,149/- नुकसान भरपाई देण्यात यावी. गैरअर्जदार विमा कंपनीने लेखी निवेदन दाखल केले. गैरअर्जदारांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराचा विमा दावा संशयास्पद आहे. कारण तक्रारदाराने दाखल केलेल्या एफ.आय.आर. वर एफ.आय.आर. नोंदविल्याची तारीख 08.09.2009 अशी आहे आणि मोटार सायकल चोरीला गेल्याची घटना दिनांक 09.10.2009 रोजीची असल्याचे एफ.आय.आर.मध्ये नमूद केलेले आहे. तक्रारदाराने घटना आणि एफ.आय.आर. नोंदविल्या बाबतच्या तारखे बाबत योग्य खुलासा केलेला नाही आणि तक्रारदाराने विमा दाव्यासोबत आवश्यक कागदपत्र दाखल केलेले नसल्यामुळे त्यांचा विमा दावा प्रलंबित आहे. तक्रारदाराने त्यांना विमा कंपनीने त्रुटीची सेवा दिल्याबाबत तक्रारीमध्ये काहीही नमूद केलेले नाही. म्हणून ही तक्रार चालण्यास योग्य नाही आणि तक्रारदारास त्रुटीची सेवा दिलेली नसल्यामुळे ही तक्रार फेटाळावी अशी मागणी विमा कंपनीने केली आहे. दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात मुद्दे उत्तर 1.गैरअर्जदार विमा कंपनीच्या सेवेत त्रुटी आहे काय ? होय 2.आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे कारणे मुद्दा क्रमांक 1 – दोन्ही पक्षातर्फे युक्तीवाद करण्यात आला. तक्रारदाराच्या वतीने अड.शरद भालेराव आणि गैरअर्जदार विमा कंपनीच्या वतीने अड. पी.एम.परिहार यांनी युक्तीवाद केला. तक्रारदाराचे वाहन क्रमांक एम.एच.21 झेड. 0025 चा गैरअर्जदार विमा कंपनीकडे दिनांक 27.08.2009 ते 26.08.2010 या कालावधीसाठी विमा उतरविण्यात आला होता. ही बाब पॉलिसी नि. 3/7 वरुन दिसून येते. तक्रारदाराची सदर मोटार सायकल मत्स्योदरी विधी महाविद्यालयातून दिनांक 08.10.2009 रोजी चोरीला गेल्याचे एफ.आय.आर.नि. 3/12, अंतिम अहवाल नि. 3/13, घटनास्थळ पंचानामा नि.3/14 इत्यादी कागदपत्रांवरुन सिध्द् होते. तक्रारदाराने दाखल केलेल्या एफ.आय.आर.मध्ये एफ.आय.आर.नोंदविल्याचा दिनांक 08.09.2009 असा असून घटना दिनांक 08.10.2009 रोजीची असल्यामुळे तक्रारदाराची मोटार सायकल चोरीला गेल्याची घटना संशयास्पद असल्याचे गैरअर्जदार विमा कंपनीचे म्हणणे आहे. घटने बाबतचा विमा कंपनीचा संशय तथ्यहीन आहे. कारण एफ.आय.आर.नोंदविल्याबाबतच्या दिनांकामध्ये झालेली चुक ही तांत्रिक व मानवी चुक आहे. तक्रारदाराने दाखल केलेला एफ.आय.आर, घटनास्थळ पंचनामा आणि अंतिम अहवाल पाहता तक्रारदाराची मोटार सायकल दिनांक 08.10.2009 रोजी चोरीला गेल्याचे सिध्द् होते. तक्रारदाराची मोटार सायकल दिनांक 08.10.2009 रोजी चोरीला गेल्यानंतर तक्रारदाराने दिनांक 29.10.2009 रोजी गैरअर्जदार विमा कंपनीकडे विमा रक्कम मिळण्याबाबत अर्ज (नि.3/3) दाखल केला होता. सदर अर्ज तक्रारदाराने रजिस्टर पोष्टाने पाठविला होता. हि बाब पोष्टाची पावती नि.3/5 वरुन दिसून येते. तक्रारदाराने विमा दाव्यासोबत आवश्यक कागदपत्र दाखल केले नाही असे विमा कंपनीचे म्हणणे आहे. परंतू तक्रारदाराने विमा दाव्यासोबत कोणते आवश्यक कागदपत्र दाखल केले नाही याचा काहीही खुलासा विमा कंपनीच्या वतीने करण्यात आलेला नाही. तसेच विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा दावा प्राप्त झाल्यानंतर त्याच्या विमा दाव्यामध्ये कोणत्या त्रुटी आहेत किंवा कोणते कागदपत्र कमी आहेत, या विषयी कधीही पत्रव्यवहार केलेला नाही. यावरुन गैरअर्जदार विमा कंपनी जाणीवपुर्वक तक्रारदाराच्या विमा दाव्याबाबत निर्णय घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसते. तक्रारदाराची मोटार सायकल विमा कालावधीमध्येच चोरीला गेलेली असून तक्रारदार गैरअर्जदार विमा कंपनीकडून विमा रक्कम मिळण्यास पात्र आहे असे आमचे स्पष्ट मत आहे. गैरअर्जदार विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा दावा विनाकारण प्रलंबित ठेवल्याचे दिसत असून सदर बाब विमा कंपनीच्या सेवेतील त्रुटीच आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले. म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश - तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
- गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 आय.सी.आय.सी.आय.लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि.यांनी तक्रारदारास रक्कम रुपये 48,149/- (रुपये अठ्ठेचाळीस हजार एकशे एकोणपन्नास फक्त) निकाल कळाल्यापासून एक महिन्याच्या आत द्यावेत.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.
| HONABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe, MEMBER | HONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENT | HONABLE MRS. Rekha Kapdiya, MEMBER | |