निकाल
(घोषित दि. 28.09.2016 व्दारा श्रीमती एम.एम.चितलांगे, सदस्य)
तक्रारदार हिने सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये गैरअर्जदार यांनी विमा रक्कम न देऊन सेवा देण्यात त्रुटी ठेवली आहे त्याकरीता विमा रक्कम व नुकसान भरपाई मिळणेकामी दाखल केली आहे.
तक्रारदार हिची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे.
तक्रारदार लिलावती ही लोधीमोहल्ला जालना येथील रहिवासी आहे. तिला अजय व विजय नावे दोन अज्ञान मुले आहेत. गैरअर्जदार ही विमा कंपनी आहे. तक्रारदार हिचे पती राजू अन्ना खरात हे सचिदानंद हार्डवेअर व वास्तू भंडार चंदनझिरा जालना येथे कामावर होते. तक्रारदार हिच्या पतीने गैरअर्जदार विमा कंपनीकडून सर्व सुरक्षा पॉलीसी घेतली होती सदर पॉलीसीचा कालावधी हा दि.22.02.2013 ते 21.02.2015 असा होता. सर्व सुरक्षा विमा पॉलीसी अंतर्गत विमा धारकास अपघाती निधन झाल्यास विमा पॉलीसीमध्ये नॉमिनी म्हणून नमुद केलेल्या व्यक्तीस त्याचा लाभ मिळतो.
तक्रारदार हिचे पती राजू अन्ना खरात हे दि.07.01.2015 रोजी स्वतःच्या मोटार सायकलवरुन जालना ते औरंगाबाद जात असताना हॉटेल इंद्रायणी, जालना जवळ एस.टी.बस क्र.एम.एच.बीटी-1960 हिने भरधाव वेगात येऊन तक्रारदार हिच्या पतीच्या मोटार सायकलला मागून धडक दिली त्यामुळे त्याच्या डोक्याला जबर मार लागला. त्याला सिव्हील हॉस्पीटल जालना येथे शरीक करण्यात आले परंतू राजू अन्ना खरात हयाची प्रकृती नाजूक असल्याकारणाने जालना येथील सिव्हील हॉस्पीटल येथील डॉक्टरांच्या सांगण्यावरुन औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात शरीक करण्यात आले. तेथे उपचार घेत असताना दि.12.01.2015 रोजी राजू अन्ना खरात हे मयत झाले. सदर घटनेची पोलीस स्टेशन चंदनझिरा जालना येथे गुन्हा क्र.1/2015 म्हणून नोंद केली आहे. मयताचा मरणोत्तर पंचनामा व मृतदेहाचे शवविच्छेदन केले.
तक्रारदार हिने पतीच्या अपघाती निधनानंतर सर्व सुरक्षा विमा पॉलीसी अंतर्गत विमा रक्कम रु.2,00,000/- मिळणेकामी विमा प्रस्ताव दाखल केला. गैरअर्जदार यांच्या पत्रानुसार तक्रारदार हिने कागदपत्रांची पुर्तता केली आहे, तरी सुध्दा गैरअर्जदार यांनी तक्रारदार हिला विमा रक्कम न देऊन सेवा देण्यात त्रुटी ठेवली आहे म्हणून तक्रारदारास मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला. तक्रारदार हिने सर्व सुरक्षा विमा पॉलीसी अंतर्गत रक्कम रु.2,00,000/- तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/- मिळण्याची विनंती केली आहे. सबब तक्रारदार यांची तक्रार मंजूर करण्यात यावी.
गैरअर्जदार हे मंचासमोर हजर झाले त्यांनी आपले लेखी निवेदन नि.क्र.7 अन्वये दाखल केले. लेखी निवेदनासोबत राहूल श्रींगारपूर व्यवस्थापक, एच.डी.एफ.सी.अॅग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी यांचे शपथपत्र नि.क्र.8 अन्वये दाखल केले. गैरअर्जदार यांनी तक्रारीतील परिशिष्ट क्र.2 वगळता उर्वरीत मजकूर परिशिष्टनिहाय नाकारलेला आहे. गैरअर्जदार यांचे कथन की, तक्रारदार हिचा विमा प्रस्ताव लिलावतीच्या नावे दाखल केला परंतू विमा पॉलीसीनुसार नॉमिनी चे नाव निलाबाई आहे. तक्रारदारास वेळोवेळी पत्रान्वये पॉलीसीवरील नॉमिनीचे नाव बदलण्याकरीता कळवून सुध्दा तक्रारदार हिने सदर कागदपत्रांची पुर्तता केली नाही त्यामुळे तक्रारदाराचा विमा दावा विचारात घेतला नाही. गैरअर्जदार यांनी तक्रारदारास कोणतीही सेवा देण्यात त्रुटी ठेवली नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात यावी.
तक्रारदार हिने तक्रारीसोबत नि.क्र.2 अन्वये कागदपत्र दाखल केले. तक्रारदार हिने आपले पुराव्याचे शपथपत्र नि.क्र.10 अन्वये दाखल केले. तसेच नि.क्र.11 अन्वये दि.23.09.2016 रोजीचे 100/- रु. स्टॅम्प पेपरवर शपथपत्र दाखल केले. गेरअर्जदार याने नि.क्र.7 अन्वये लेखी निवेदन व नि.क्र.8 अन्वये शपथपत्र दाखल केले. तक्रारदार व गैरअर्जदार यांच्या वकीलाचा युक्तीवाद लक्षात घेतला. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1) गैरअर्जदार याने तक्रारदारास द्यावयाच्या
सेवेत त्रुटी ठेवली आहे काय? होय.
2) तक्रारदार ही तक्रारीतील मागणी मिळण्यास
पात्र आहे काय? होय.
3) आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमीमांसा
मुद्दा क्र.ः- 1 व 2 तक्रारदार यांच्या वकीलांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार हिच्या मयत पतीने गैरअर्जदाराकडून सर्व सुरक्षा विमा पॉलीसी घेतली होती त्याकामी विमा हप्तापोटी रक्कम रु.766/- चा भरणा गैरअर्जदाराकडे केला. विमा पॉलीसीचा कालावधी हा दि.22.02.2013 ते 21.02.2015 असा आहे. तक्रारदार हिने पतीच्या अपघाती निधनानंतर सर्व सुरक्षा विमा पॉलीसी अंतर्गत विमा रक्कम रु.2,00,000/- मिळणेकामी गैरअर्जदाराकडे विमा दावा दाखल केला. तक्रारदार हिने गैरअर्जदार यांच्या मागणीनुसार आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता केली आहे तरी देखील गैरअर्जदार यांनी तक्रारदारास अद्यापपावेतो विम्याची रक्कम अदा केली नाही. त्यामुळे तक्रारदार ही सदरील रकमेपासून वंचित राहीली आहे. तक्रारदारास मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला. गैरअर्जदार यांनी तक्रारदार हिचा विमा दावा बंद करुन व विमा रक्कम न देऊन सेवा देण्यात त्रुटी ठेवली आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात यावी.
गैरअर्जदार यांच्या वकीलांनी असा युक्तीवाद केला की, विमा प्रस्ताव हा लिलावतीच्या नावाने दाखल केला आहे परंतू विमा पॉलीसीनुसार नॉमिनीचे नाव निलाबाई आहे. तक्रारदार वेळोवेळी पत्रान्वये कळवून योग्य कागदपत्रांसह लिलावती व निलाबाई हि एकच व्यक्ती आहे असे बदल करण्यास सांगितले, तरी देखील तक्रारदार हिने कोणतीही दखल घेतली नाही व योग्य त्या कागदपत्रांची पुर्तता केली नाही. त्यामुळे तक्रारदार हिचा विमा दावा बंद करुन सेवा देण्यात त्रुटी ठेवली असे म्हणता येणार नाही. सबब तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात यावी.
या मंचाने तक्रारदार याने दाखल केलेले कागदपत्र व पुराव्याचे शपथपत्राचे अवलोकन केले. तसेच गैरअर्जदार यांचा लेखी जबाब व त्यासोबतचे शपथपत्र याचे अवलोकन केले. वर नमुद केलेला युक्तीवाद लक्षात घेतला. त्यावरुन तक्रारदार लिलावती हिच निलाबाई आहे काय हे पाहणे गरजेचे आहे. तक्रारदार हिने पतीच्या अपघाती निधनानंतर सर्व सुरक्षा विमा पॉलीसी अंतर्गत विमा रक्कम मिळणेकामी गैरअर्जदाराकडे विमा प्रस्ताव दाखल केला होता. त्या प्रस्तावामध्ये मयत विमा धारकाची नॉमिनी म्हणून नमुद केलेले आहे. सदर विमा प्रस्ताव गैरअर्जदार यांना प्राप्त झालेला आहे. विमा प्रस्तावाची छायांकित प्रत तक्रारदार हिने मंचासमोर दाखल केली आहे. विमाधारक राजू अन्ना खरात हा दि.07.01.2015 रोजी स्वतःच्या मोटार सायकलवरुन जालना ते औरंगाबादकडे जात असताना हॉटेल इंद्रायणी, जालनाच्या जवळ एस.टी.बस क्र.एम.एच.14 बीटी-1960 ही भरधाव वेगात येऊन तक्रारदार हिच्या पतीच्या मोटार सायकलला मागून धडक दिली त्यामुळे तक्रारदाराच्या पतीच्या डोक्याला जबर मार लागला. औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान दि.12.01.2015 रोजी त्याचा मृत्यू झाला असे नमुद केलेले आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पोलीस पेपरचे, मरणोत्तर पंचनामा व मृतदेहाचे शवविच्छेदन अहवाल यांचे अवलोकन केले असता मयत राजू अन्ना खरात हयाचा अपघात होऊन डोक्याला जबर मार लागल्यामुळे मयत झाला ही बाब सिध्द होते. या बाबी विषयी गैरअर्जदार याने कोणताही आक्षेप घेतला नाही.
तक्रारदार हिने पतीच्या अपघाती निधनानंतर सर्व सुरक्षा विमा पॉलीसी अंतर्गत विमा रक्कम मिळणेकामी विमा दावा दाखल केला. सदरील दावा गैरअर्जदार यांनी विमा पॉलीसीनुसार नॉमिनी नाव निलाबाई आहे व विमा दावा हा लिलावतीच्या नावे दाखल आहे. गैरअर्जदार यांच्या मागणीनुसार तक्रारदार हिने लिलावती हिच निलाबाई ओ असे दर्शविण्याकरीता 100/- रु.च्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र दाखल केले त्यासोबत आधार कार्डची छायांकित प्रत जोडली आहे. सदरील शपथपत्र कुरिअरद्वारे गैरअर्जदार यांना पाठविले आहे. कुरिअरची मूळ पावती, शपथपत्राची छायांकित प्रत मंचासमोर दाखल केली आहे. सदरील शपथपत्रावर गैरअर्जदार यांनी कोणताही आक्षेप घेतला नाही. सदरील शपथपत्राचे मंचाने अवलोकन केले असता त्यामधील तक्रारदार हिचे छायाचित्र व आधार कार्डवरील छायाचित्र यामध्ये विभिन्नता असल्याची शंका आली. या बाबीचे निरासन करण्याकरीता तक्रारदार हिने दि.23.09.2016 रोजीचे रक्कम रु.100/- या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र नोटराईज्ड करुन मुळ प्रत मंचासमोर दाखल आहे ते लक्षात घेतले असता तक्रारदार लिलावती हिच निलाबाई आहे असा निष्कर्ष काढणे उचित होईल.
तक्रारदार हिने मोटार अपघात दाव्याची प्रमाणित सत्यप्रत तक्रारीसोबत दाखल केली त्याचे अवलोकन केले असता सदरील दाव्यावर वादी म्हणून निलावती असे निदर्शनास येते. सदरील दाव्यामध्ये वादी निलावतीची स्वाक्षरी म्हणून निशाणी अंगठाआहे. तदनंतर दाव्यातील वादी हिने न्यायालयाच्या आदेशानुसार नावात दुरुस्ती केली. दुरुस्ती दाव्याची प्रमाणित सत्यप्रत मंचासमोर दाखल केली त्याचे अवलोकन केले असता त्यावर वादीच्या स्वाक्षरीच्या ठिकाणी वादीने स्वतःची सही केली आहे. यावरुन मंचाच्या मते मोटार अपघात दावा दाखल करतांना तक्रारदार हिच्या हाताला इजा झाली असेल असे ग्राहय धरण्यास हरकत नाही. सदरील वस्तूस्थितीवर गैरअर्जदार यांनी कोणताही आक्षेप घेतला नाही.
मयत विमा धारकाने सर्व सुरक्षा विमा पॉलीसी गैरअर्जदार विमा कंपनीकडून घेतली होती, सदर पॉलीसी अंतर्गत अपघाती निधनाबददल रक्कम रु.2,00,000/- द्यावयाची तरतुद केली आहे. तक्रारदार हिने गैरअर्जदाराच्या मागणीनुसार कागदपत्रांची परिपुर्तता केली होती तरी गैरअर्जदार यांनी त्याची योग्य दखल न घेऊन व त्यावर योग्य कार्यवाही न करता विमा दावा बंद करुन तक्रारदारास द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली आहे असे या मंचाचे मत आहे.
वरील सर्व बाबीचा विचार करता तक्रारदार ही मयत विमा धारकाची नॉमिनी असून सर्व सुरक्षा पॉलीसी अंतर्गत विमा रक्कम रु.2,00,000/- मिळण्यास पात्र आहे. तक्रारदार हिचा विमा दावा बंद केल्यामुळे तक्रारदार हिस मानसिक व शारिरिक त्रास झालेला आहे त्याबाबत रक्कम रु.3,000/- व तक्रारीचा खर्च रक्कम रु.1,000/- मिळण्यासपात्र आहे तक्रारदाराची तक्रार मंजूर होण्यास पात्र आहे सबब मुददा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
सबब मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजुर करण्यात येते.
2) गैरअर्जदार विमा कंपनी यांनी तक्रारदारास सर्व सुरक्षा विमा पॉलीसी अंतर्गत
अपघाती निधनाबददल रक्कम रु.2,00,000/- निकाल कळाल्यापासून 30
दिवसाच्या आत द्यावे. सदर रक्कम विहीत मुदतीत न दिल्यास संपूर्ण
रकमेवर तक्रार दाखल दिनांकापासून ते पूर्ण रक्कम वसूल होईपावेतो
द.सा.द.शे.9 टक्के प्रमाणे व्याज द्यावे.
3) गैरअर्जदार विमा कंपनी यांनी तक्रारदारास झालेल्या शारीरिक मानसिक
त्रासापोटी रक्कम रु.3,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/-
द्यावे.
श्रीमती एम.एम.चितलांगे श्री. सुहास एम.आळशी श्री. के.एन.तुंगार
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना