निकालपत्रः- श्रीमती सुमन प्र.महाजन, अध्यक्षा ठिकाणः बांद्रा निकालपत्र तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप खालीलप्रमाणेः- तक्रारदाराने दि.21.11.2009 रोजी नेहमीप्रमाणे सामनेवाले यांचे मुलूंड येथील फुड बाझार, आर मॉलमध्ये रु.1,855/- चा किराणा सामान खरेदी केला, त्यात पाच लिटरचा एटलसो कंपनीचा कुकरही होता. योजनेखाली त्या कुकरची किंमत 426/- अशी होती. आर मॉलमधून बाहेर पडताना त्याला तीन रेग्युलर प्लॅस्टिक कॅरिबॅग व एक बी-68 ची कापडी बॅग देण्यात आली. त्यापैकी, कापडी बॅग व कुकर असलेली प्लॅस्टिक बॅग होम डिलेव्हरी सेक्शनमध्ये दिल्या व दोन बॅग तक्रारदार स्वतः घरी घेऊन आला. होम डिलेव्हरीचे सामान त्याने त्याची जवळची नातेवाईक सौ.प्रभा, जिच्या बरोबर तो रहात असतो तिच्या नावांवर मागविला. 2 दि.22.11.2009 रोजी होम डिलेव्हरीच्या वेळी फक्त बी-68 ची कापडी बॅगची डिलेव्हरी दिली, मात्र कुकर आणला नाही. म्हणून तक्रारदाराने त्याच दिवशी मॉलमध्ये संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु संपर्क होऊ शकला नाही. दि.23.11.2009 रोजी संध्याकाळी सहा वाजता तक्रारदार मॉलमध्ये गेला व कुकरची मागणी केली. परंतु त्याला सांगण्यात आले की, कुकर सारख्या वस्तुची ते होम डिलेव्हरी देत नाही. त्यांनी हेही नाकारले की, तक्रारदार दि.21.11.2009 रोजी मॉलमध्ये आले होते. त्यांनी त्यांचे सिक्युरिटी ऑफीसर यांचा मोबाईल नंबर दिला व दुस-या दिवशी फोन करण्यास सांगितले. 3 सामनेवाले कुकर देत नाहीत हे समजल्यावर तक्रारदाराने दि.12.12.2009 रोजी सामनेवाले यांचेकडे लेखी तक्रार पाठविली. दि.25.01.2010 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठविली. दि.25.02.2010 रोजी पुन्हा तिच नोटीस पाठविली. सामनेवाले मॉलचे मॅनेजर- श्री. अनिरुध्द यांच्या फोनवरील विनंतीवरुन तक्रारदार वकीलांना घेऊन मॉलमध्ये गेला व खर्चासहीत कुकरची मागणी केली परंतु त्यांनी सांगितले की, वरीष्ठांशी बोलून कळवितो. मात्र, त्यांचा फोन आला नाही. त्यांनी वकीलामार्फत पत्र पाठविले व तक्रारदार ब्लॅकमेल करीत आहे असा आरोप केला. त्यांनी फक्त कुकर देऊ केला. म्हणून तक्रारदाराने सदरची तक्रार दाखल केली. त्याच्या सामनेवाले याचेकडून खालीलप्रमाणे मागण्या आहेत. (1) त्याला झालेल्या खर्चाबद्दल रु.15,000/- मिळावेत. (2) मानसिक त्रासापोटी नुकसान भपाई रु.40,000/- मिळावी. (3) शारिरीक त्रासापोटी रु.40,000/- नुकसान भरपाई मिळावी. 4 सामनेवाले यांना या तक्रारीची नोटीस मिळूनही ते हजर झाले नाहीत म्हणून त्यांच्या विरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्यात आले. तक्रारदाराने त्याचे पुरावा शपत्रपत्रं व खालील कागदपत्रं दाखल केली. अ दि.21.11.2009 चे बिल ब बासमती तांदूळ व कुकरचे बिल क होम डिलेव्हरची पावती ड तक्रारदार व सामनेवाले यांच्यात झालेला पत्रव्यवहार 5 तक्रारदाराचा युक्तीवाद ऐकून व कागदपत्रं वाचून मंचाचे असे मत आहे की, तक्रारदाराने हे सिध्द केले आहे की, त्याने दि.21.09.2009 रोजी सामनेवाले यांच्या मॉलमध्ये सामान खरेदी केला होता. त्यामध्ये पाच लिटरचा एटलसो कंपनीचा कुकर होता. त्या कुकरीची किंमत योजनेखाली रु.426/- होती. बी-68 कापडी बॅग व कुकरची होम डिलेव्हरी द्यायची होती. मात्र सामनेवाले यांनी कुकरची होम डिलेव्हरी दिली नाही. त्याने मॉलमध्ये जाऊन व त्यांचेशी पत्रव्यवहार करुन कुकुरची मागणी केली. परंतु सामनेवाले यांनी कुकर दिला नाही म्हणून त्याला वकीलामार्फत नोटीस पाठवावी लागली. त्याने कुकर व खर्चाची मागणी केली. मात्र सामनेवाले यांनी खर्च देण्याचे नाकारले. तक्रारदाराकडून कुकरचे पैसे घेऊन त्याला कुकर न देणे ही सामनेवाले यांचे सेवेत न्यूनता आहे त्यामुळे तक्रारदाराला मानसिक व शारिरीक त्रास झाला व त्याला आर्थिक नुकसानही झाले. तक्रारदाराला कुकर व नुकसान भरपाई देण्यास सामनेवाले जबाबदार आहेत. मंचाच्या मते खालील आदेश न्यायाच्या हिताच्या दृष्टीने योग्य आहे. आदेश (1) तक्रार क्र.271/2011 अंशतः मंजूर करण्यात येते. (2) सामनेवाले यांनी तक्रारदाराला रु.3,000/- नुकसान भरपाई द्यावी व या तक्रारीचा खर्च रु.2,000/- द्यावा आणि स्वतःचा खर्च सोसावा. (3) आदेशाच्या प्रमाणित प्रतीं दोन्हीं पक्षकारांना विनामूल्य पाठविण्यात याव्या.
| [HONABLE MR. G L Chavan] Member[HONABLE MRS. S P Mahajan] PRESIDENT | |