(घोषित दि. 26.04.2013 व्दारा श्रीमती नीलिमा संत, अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हा वीरेगाव ता.भोकरदन जि.जालना येथील रहीवाशी होता तो दिनांक 08.12.2007 रोजी अचानक विहीरीत पडून मृत्यू पावला. पोलिस स्टेशनला अपघाती मृत्यूची नोंद क्रमांक 57/2007 अन्वये करण्यात आली. घटनास्थळ पंचनामा करुन पोलिसांनी मृतदेह भोकदन येथे पाठवला. तेथे शवविच्छेदन करण्यात आले व पाण्यात बुडल्यामुळे मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवाल सांगतो. मयत हा शेतकरी होता त्याचे नावे गट नंबर 78,110,128 मध्ये वीरेगाव येथे जमीन होती. महाराष्ट्र शासनाने शेतक-यांसाठी जी शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना राबवली होती तिचा कालावधी दिनांक 13.08.2007 ते 14.08.2008 असा होता. तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे शांताबाई (मयताची पत्नी) यांचे नावे विमा प्रस्ताव गैरअर्जदारांडे पाठवण्यात आला. दिनांक 23.07.2010 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी पत्र पाठवून काही कागदपत्रांची मागणी केली. (अर्जदारांची आई शांताबाई दिनांक 07.02.2009 रोजी मृत्यू पावली) सदरचे अर्जदार हेच मयत सुखदेव तसेच मयत शांताबाई यांचे वारस आहेत. त्याचे प्रमाणपत्र सोबत जोडलेले आहे. परंतू आजतागायत गैरअर्जदार क्रमांक 2 रिलायन्स इंडिया यांनी विमा प्रस्ताव मंजूर अथवा नामंजूर केलेला नाही. म्हणून तक्रारदार सदरच्या तक्रारीद्वारे मंचासमोर आले आहेत.
गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 हे मंचासमोर हजर झाले त्यांनी आपापला लेखी जबाब दाखल केला. गैरअर्जदार क्रमांक 1 कबाल यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदाराचा विमा प्रस्ताव अपूर्ण होता. त्या अंतर्गत तलाठयाचे प्रमाणपत्र, बँकेचे प्रासबुक, फेरफार उतारा, वयाचा दाखला व पोलिस अधिका-याची सही असलेला शव विच्छेदन अहवाल नव्हता.
परंतु पुर्तता झाली नाही म्हणून ‘अपूर्ण दावा’ असा शेरा मारुन त्यांनी प्रस्ताव दिनांक 21.06.2009 ला गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडे पाठवला. अर्जदार योग्य ती कागदपत्रे दाखल करु न शकल्याने गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी प्रस्ताव दिनांक 24.11.2010 रोजी बंद केला.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी आपल्या लेखी जबाबात म्हटले आहे की, त्यांना वर उल्लेख केलेली कागदपत्रे मिळाली नाहीत. विमा प्रस्ताव अपूर्ण कागदपत्रांसह मिळाला त्यामुळे तो दिनांक 24.11.2010 रोजी नाकारण्यात आला. त्यामुळे सदरची तक्रार नामंजूर करण्यात यावी.
अर्जदाराचे विद्वान वकील श्री.खरात व गैरअर्जदाराचे विद्वान वकील श्री.परिहार यांचा युक्तीवाद ऐकला. दाखल कागदपत्रांचा अभ्यास केला. विमा प्रस्ताव संपूर्ण कागदपत्रांसह आपल्याला प्राप्त झाला नाही असे गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण कागदपत्रांसह विमा प्रस्ताव पुन्हा गैरअर्जदार क्रमांक 2 यांचकडे पाठवणे उचित ठरेल असे मंचाचे मत आहे. सबब मंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
- तक्रारदार यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी संपूर्ण कागदपत्रांसह विमा प्रस्ताव आदेश मिळाल्यापासून साठ दिवसांचे आत गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडे पाठवावा.
- गैरअर्जदार क्रमांक 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आत विलंबाचा मुद्दा वगळून तो गुणवत्तेवर निकाली काढावा.
- खर्चाबाबत आदेश नाही .