निकाल
(घोषित दि. 06.02.2015 व्दारा श्री.सुहास एम.आळशी, सदस्य)
अर्जदार हिने तिच्या तक्रार अर्जात असे नमुद केले आहे की, तक्रारदार ही मौजे अकोलादेव ता.जाफ्राबाद जि.जालना येथील रहिवाशी असुन, ती शेती करते. अर्जदार हिचा मुलगा नामे राजू प्रभाकर कदम हा दिनांक 15.05.2010 रोजी लग्नावरुन मॅटेडोअर क्रमांक एम.एच.04 एफ – 5517 ने परत येत असतांना सातगाव भुसारी ते हातनी या रस्त्यावर सदर मॅटेडोअर पलटी होऊन राजू यास मार लागल्यामुळे तो जागीच मरण पावला. त्यानंतर त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथे नेले असता संबंधित डॉक्टने त्याला मृत घोषित केले. त्यानंतर त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर पोलीस स्टेशन रायपूर ता.जि.बुलढाणा यांनी सदर अपघाता बाबत गुन्हा क्रमांक 113/2010 नुसार कलम 304 (अ) 279, 337, 338 भा.द.वि दिनांक 15.05.2010 अन्वये सदर मॅटेडोअर चालकावर गुन्हा दाखल केला व घटनास्थळ पंचनामा केला. सदरचा अपघात हा ड्रायव्हरच्या भरधाव व निष्काळजीपणाने गाडी चालविल्यामुळे झाला. अर्जदार हिने तिच्या अर्जात म्हटले आहे की, राजू हा शेतकरी होता तसेच त्याचे नावे मौजे अकोलादेव येथे गट नंबर 504 मध्ये शेत जमीन होती. सदर शेत जमीनीचा फेरफार क्रमांक 2333 दिनांक 19.01.2008 असा असून सदर अर्जासोबत 7/12 चा उतारा दाखल केला आहे. त्याच प्रमाणे अर्जदार हिने नि.3/13 वर राजेंद्र ऊर्फ राजू प्रभाकर कदम व राजू प्रभाकर कदम ही एकच व्यक्ती असल्या बाबत शपथपत्र दाखल केलेले आहे.
महाराष्ट्र शासनाने शेतक-यांकरीता शेतकरी अपघात विमा योजना काढल्याने मयत राजू हा सुध्दा सदर योजनेस पात्र होता. सदर विमा योजनेचा हप्ता हा शासनाने प्रतिपक्ष क्रमांक 2 यांना पुरविलेला आहे. अर्जदार हिने कृषी अधिकारी यांच्याकडे विहीत मुदतीमध्ये विमा प्रस्ताव दाखल केला होता व कृषी अधिकारी यांनी सदर प्रस्ताव योग्य त्या कार्यवाहीस्तव प्रतिपक्ष क्रमांक 1 व 2 यांचेकडे दाखल केला. परंतू प्रतिपक्ष क्रमांक 2 यांनी सदर विमा प्रस्तावावर कोणताही निकाल दिलेला नाही. अर्जदार हिने तिच्या अर्जात असे म्हटले आहे की, प्रतिपक्ष क्रमांक 1 यांनी विमा प्रस्ताव प्रतिपक्ष क्रमांक 2 यांचेकडे दिल्यावर त्यांनी अर्जदार हिला दिनांक 31.12.2010 रोजी अपूर्ण कागदपत्र दिल्या बाबतचे पत्र अर्जदार हिला दिले व विमा दावा देण्यास टाळाटाळ केली याबाबत प्रतिपक्ष क्रमांक 1, 2, 3 यांना नोटीसेस काढण्यात आल्या.
प्रतिपक्ष क्रमांक 3 हे प्रकरणात हजर न राहील्याने त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
तसेच प्रतिपक्ष क्रमांक 1 कबाल इन्शुरंन्स यांनी प्रकरणात त्यांचे म्हणणे दाखल केले व अर्जदार हे त्यांचे ग्राहक नसल्याबाबत अर्जदाराचा दावा नामंजूर करण्यात यावा अशी विनंती केली. तसेच त्यांच्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ त्यांनी महाराष्ट्र शासन निर्णय सन 2009 – 2010 व औरंगाबाद खंडपीठचा आदेश जोडला आहे.
तसेच प्रतिपक्ष क्रमांक 2 यांनी प्रकरणात लेखी जबाब व युक्तीवाद दाखल केला. प्रतिपक्ष क्रमांक 2 यांच्या म्हणण्यानुसार अर्जदार हिने विमा दाव्या सोबत आवश्यक ती कागदपत्र दाखल केली नाहीत. तसेच अर्जदार हिने वैध कालावधीतील ड्रायव्हींग लायसन्स दाखल केलेले नाही असे म्हटले आहे. तसेच अर्जदार हिचा मयत मुलगा राजू यांनी विमा कंपनीच्या अटी व शर्तीचा भंग केला आहे असे त्यांच्या जबाबात म्हटले आहे. त्याच प्रमाणे अपघाताच्या कालावधीत मयत राजू हा शेतकरी नव्हता व शेतकरी असल्या बाबतचा पुरावा अर्जदार ही सादर करु शकली नाही, या कारणांनी अर्जदार हिचा विमा दावा फेटाळण्याची मागणी केली आहे.
तक्रारदाराच्या वतीने अॅड पी.एम.परिहार व प्रतिपक्ष क्रमांक 2 यांचे वतीने अॅड संदीप देशपांडे यांचा सविस्तर युक्तीवाद ऐकला. दाखल कागदपत्र व दोनही पक्षाच्या युक्तीवादावरुन खालील मुद्दे मंचाने विचारात घेतले.
मुद्दे निष्कर्ष
1.प्रतिपक्ष क्रमांक 2 यांनी तक्रारदाराना
द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे का ? होय
2.काय आदेश ? अंतिम आदेशा नुसार
कारणमीमांसा
मुद्दा क्रमांक 1 साठी – अर्जदार हिचा मुलगा नामे राजू प्रभाकर कदम हा दिनांक 15.05.2010 रोजी लग्नावरुन मॅटेडोअर क्रमांक एम.एच.04 एफ – 5517 ने परत येत असतांना सातगाव भुसारी ते हातनी या रस्त्यावर सदर मॅटेडोअर पलटी होऊन राजू यास मार लागल्यामुळे तो जागीच मरण पावला ही बाब अर्जदार हिने दाखल केलेल्या नि.3/3 व 3/4, 3/5 या दस्तऐवजांवरुन तसेच जिल्हा शल्य चिकीत्सकांनी दिलेल्या नि.3/6 वरील पोस्ट मार्टम रिपोर्ट वरुन दिसुन येते. अर्जदार हिचा मुलगा दिनांक 15.05.2010 रोजी मयत झाल्यानंतर अर्जदार हिने प्रतिपक्ष क्रमांक 2 यांच्याकडे जिल्हा कृषी अधिकारी यांच्या मार्फत प्रस्ताव दाखल केला. तसेच प्रतिपक्ष क्रमांक 2 यांनी सदर प्रस्तावाबाबत अर्जदार हिला नि.3/1 नुसार पत्र पाठविले. तसेच अपुर्ण कागदपत्र असल्यामुळे व ड्रायव्हिंग लायसन्स अपघाताच्या वेळी वैध नसल्यामुळे अर्जदार हिचा विमा दावा देऊ शकत नसल्याबद्दल दिनांक 31.12.2010 रोजी पत्र पाठविले. परंतु अपुर्ण कागदपत्र कोणते आहेत याचा कोणताही उल्लेख त्यांच्या पत्रामध्ये दिलेला नाही. त्याच प्रमाणे राजू प्रभाकर कदम याचा दिनांक 15.05.2010 रोजी लग्नावरुन मॅटेडोअर क्रमांक एम.एच.04 एफ – 5517 ने परत येत असतांना अपघात झाला, त्यावेळी सदरचे वाहन हे राजू चालवित नव्हता तर ते वाहन सदर मॅटेडोअरचा वाहन चालक शेख अशफाक शेख मुन्शी हा चालवित होता. वास्तविक पाहता राजू प्रभाकर कदम हा मागे बसलेला असतांना व वाहन चालवित नसतांना ड्रायव्हिंग लायसन्सचे मुद्यावर त्याचा विमा दावा न देण्याचा कोणताही प्रश्न उपस्थित होत नाही. त्याच प्रमाणे नि.3/10 वरील 7/12 चे अवलोकन केले असता राजू (राजेंद्र प्रभाकर कदम) याचे नावे 0.41 आर एवढी जमीन दर्शविलेली आहे. त्याच प्रमाणे अर्जदार हिने सदर प्रकरणात राजू याचे नावे असलेल्या जमीनीचा फेरफार क्रमांक 2333 दिनांक 18.02.2008 हा दाखल केला आहे. तसेच सदर प्रकरणात अर्जदार हिने जो नि.3/10 वरील 7/12, हा दाखल केलेला आहे, यावरुन मयत राजू (राजेंद्र) याचे नावे मौजे अकोलादेव ता.जाफ्राबाद जि.जालना येथे शेत जमीन आहे असे दिसुन येते. तसेच राजू (राजेंद्र) याच्या मृत्यूची तारीख हि दिनांक 15.05.2010 अशी आहे. त्यामुळे अपघात झाला त्या काळात राजू (राजेंद्र) याचे नावे शेत जमीन होती. त्यामुळे अर्जदार ही शेतकरी अपघात विमा घेण्यास पात्र ठरते. तसेच पोस्ट मार्टम रिपोर्ट पाहता राजू (राजेंद्र) याचा मृत्यू अपघातात डोक्याला मार लागल्याने झाल्याचे दिसुन येते. तसेच अर्जदार हिने सदर प्रकरणात नमुना 6 क चा उतारा नि.17/1 वर दाखल केलेला आहे त्यावर वारस म्हणून अर्जदार व प्रभाकर कदम यांचे नाव आहे. अर्जदार हिचे पती व मयत राजू (राजेंद्र) याचे वडील प्रभाकर नामदेव कदम यांनी नि.17/2 वर शपथपत्र दाखल केलेले आहे. त्यानुसार त्यांनी अर्जदारास सदर विमा दाव्याची रक्कम देण्यास नाहरकत दिली आहे. वरील संपूर्ण मुद्दयाचे अवलोकन करता प्रतिपक्ष क्रमांक 2 यांनी अर्जदाराचा विमा दावा नाकारण्याचे कोणतेही कारण नव्हते असे या मंचाचे मत आहे. त्यामुळे मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देऊन हे मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- प्रतिपक्ष क्रमांक 2 यांनी अर्जदार हिला राजू (राजेंद्र) प्रभाकर कदम याच्या विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) तिने दावा दाखल केल्या पासून म्हणजे दिनांक 16.08.2014 पासून 9 टक्के व्याज दरासह द्यावी.
- प्रकरणाचा खर्च रुपये 2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त) प्रतिपक्ष क्रमांक 2 यांनी अर्जदार हिला द्यावा.
- उपरोक्त आदेशाचे पालन आदेश दिनांका पासून 45 दिवसाचे आत करावे.