(घोषित दि. 23.01.2013 व्दारा श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्या)
तक्रारदारांचे पती श्री विलास रतिलाल राठोड यांच्या मालकीची शेत जमीन गट नंबर 259 मौ.पिंपरी तांडा ता.घनसावंगी येथे असून शेती करुन कुटूंबाची उपजिविका करतात, दूदैवाने दिनांक 27.08.2009 रोजी मोटार सायकलवर मागे बसून जात असताना ट्रकने धडक देवून झालेल्या अपघातात गंभीररित्या जखमी झाले. औरंगाबाद येथील हॉस्पीटल मध्ये उपचारा दरम्यान दिनांक 28.08.2009 रोजी मृत्यू पावले. पोलीस स्टेशन अंबड यांनी सदर अपघताची नोंद घेवून गुन्हा रजिस्टर्ड केला. तसेच घटनास्थळ पंचनामा साक्षीदारांचे जबाब घेतले.
तक्रारदारांनी पतीच्या मृत्यूनंतर गैरअर्जदार 1 व 2 यांचेकडे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा प्रस्ताव विहीत मूदतीत व आवश्यक कागदपत्रासहीत दाखल केला असून प्रलंबित आहे अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
गैरअर्जदार 1 यांच्या म्हणण्यानूसार तक्रारदारांचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर कागदपत्रांची पुर्तता करुन गैरअर्जदार 2 विमा कंपनीकडे दिनांक 10.12.2010 रोजी गैरअर्जदार 2 यांनी अपघाताचेवेळी विमेधारकाकडे वाहनाचा वैध परवाना नसल्याचे कारणास्ताव प्रस्ताव नामंजूर केला.
गैरअर्जदार 2 यांच्या म्हणण्यानूसार विमा पॉलीसीचा कालावधी दिनांक 15.08.2009 ते 14.09.2010 असून विमेधारकाचे नाव पॉलीसी इश्यू केलेल्या तारखेला 7/12 उता-यावर असणे आवश्यक आहे. पॉलीसी इश्यू केल्यानंतर 7/12 उता-यावर तक्रारदारांच्या पतीच्या नावाची नोंद झालेली नसल्यामूळे तक्रारदारांची तक्रार रद्द करण्यात यावी.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, गैरअर्जदार 1 व 2 यांचे लेखी म्हणणे यांचे सखोल वाचन केले. तक्रारदारांचे विद्वान वकील श्री पी.एम.परिहार व गैरअर्जदार यांची विद्वान वकील श्री संदीप देशपांडे यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारदारांचे पतीचा मृत्यू दिनांक 28.08.2009 रोजी झालेला असून सदरील शेत जमीन तक्रारदारांचे पती श्री विलास रतीलाल राठोड यांना त्यांचे वडील रतीलाल रामदास राठोड यांनी वाटणी पत्र क्रमांक 4632 दिनांक 10.07.2009 रोजी वाटणीपत्राद्वारे दिली आहे. म्हणजेच तक्रारदारांचे पती दिनांक 10.07.2009 रोजी सदर जमीनीचे मालक झाले असून तलाठयांनी दिनांक 26.08.2009 रोजी वाटणी पत्रावरुन फेरफार नोंद मंजूर केल्याचे दिसून येते. तसेच गैरअर्जदार 2 यांनी दिनांक 08.04.2011 रोजीच्या पत्रान्वये तक्रारदारांच्या पतीजवळ अपघाताचे वेळी वैध ड्रायव्हींग लायसेन्स नसल्यामुळे विमा प्रस्ताव नामंजूर केला आहे. तक्रारदारांचे पती पॉलीसी इश्यू केलेल्या तारखेला शेतकरी नसल्याबाबत सदर पत्रामध्ये नमूद नाही.
गैरअर्जदार 2 यांनी तक्रारदारांच्या पतीजवळ ड्रायव्हींग लायसन्स नसल्याचे कारणास्तव सदर प्रस्ताव नामंजूर केला आहे. मा राज्य आयोग, परिक्रमा खंडपीठ, औरंगाबाद यांच्या नॅशनल इन्शूरन्स कंपनी लि. विरुध्द ताराबाई मलीक प्रथम अपील नंबर 661/2012 ग्राहक तक्रार क्रमांक 596/2010 आदेश दिनांक 17.02.2012 निर्णयानुसार शेतकरी विमा अपघात योजने अंतर्गत विमा प्रस्तावामध्ये ड्रायव्हींग लायसन्स असण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे गैरअर्जदार 2 यांनी अयोग्य कारणास्तव तक्रारदारांचा विमा प्रस्ताव नामंजूर केल्याचे स्पष्ट होते असे न्याय मंचाचे मत आहे. अशा परिस्थितीत तक्रारदारांना सदर योजने अंतर्गत देय असलेली विमा लाभ रक्कम रुपये 1,00,000/- देणे उचित होईल असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे.
आदेश
- गैरअर्जदार 2 विमा कंपनीला आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा लाभ रक्कम रुपये 1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) आदेश मिळाल्या पासून तीस दिवसात द्यावी.
- वरील रक्कम विहीत मूदतीत अदा न केल्यास द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दारासहीत देण्यात यावी.
- खर्चा बाबत आदेश नाहीत.