(घोषित दि. 31.05.2013 व्दारा श्रीमती नीलिमा संत,अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
सदरच्या कामात तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदाराने गैरअर्जदाराकडून दिनांक 08.09.2010 रोजी ड्रीम लाईफ पेन्शनप्लस पॉलसी घेतली होती. त्यासाठी 50,000/- रुपयाचा चेक कंपनीला दिला तो कंपनीला मिळाला. परंतू गैरर्जदाराने अद्यापपर्यंत त्यांना पॉलीसी पाठविलेली नाही. तक्रारदाराने दिनांक 25.07.2011 रोजी पत्र पाठवून पॉलीसीची मागणी केली. परंतू गैरअर्जदारांनी त्याचे उत्तर पाठविले नाही अथवा पॉलीसी देखील इश्यु केली नाही. म्हणून तक्रारदारांची तक्रार आहे. सदरच्या तक्रारीद्वारे ते गैरअर्जदारांनी त्यांच्या पक्षात पॉलीसी इश्यु करावी व त्यांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासापोटी रुपये 20,000/- व कॉस्ट रुपये 10,000/- द्यावेत अशी मागणी करतात.
गैरअर्जदार या मंचासमोर हजर झाले, त्यांनी सदरची तक्रार चालविण्याचा या मंचाला अधिकार नाही या प्राथमिक मुद्दयावर तक्रार फेटाळावी असा अर्ज केला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सदरच्या पॉलीसीच्या प्रपोजल फॉर्मवर तक्रारदाराने औरंगाबाद येथे स्वाक्षरी केली आहे. पॉलीसीबाबत तक्रारदारांना सर्व माहिती औरंगाबाद येथील कार्यालयातच दिली गेली आहे व त्यावर तक्रारदारांनी औरंगाबाद येथे स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे या मंचाच्या अधिकार क्षेत्रात सदरच्या तक्रारीस कोणतेही कारण घडलेले नाही. तसेच सदर गैरअर्जदारांची शाखा जालना येथे नाही. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार या प्राथमिक मुद्यावर फेटाळण्यात यावी. सदरच्या अर्जावर तक्रारदारांनी म्हणणे दाखल केले. ते म्हणणात की, तक्रारदार जालन्याचा रहिवाशी आहे व त्यांनी प्रिमियमचा चेक बँक ऑफ महाराष्ट्र, जुना जालना, जालना या बँकेचा दिला म्हणून या मंचाला सदरची तक्रार चालविण्याचा अधिकार आहे.
सदरच्या अर्जावर तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.लोमेश खरात व गैरअर्जदाराचे विद्वान वकील श्री.अजय व्यास यांचा युक्तीवाद ऐकला. दाखल कागदपत्रांचा अभ्यास केला. गैरअर्जदाराने दाखल केलेल्या प्रपोजल फॉर्मवर तक्रारदाराची सही आहे व ती औरंगाबाद येथे केल्याचा उल्लेख आहे. तक्रारदारानी दिलेल्या तक्रारीत गैरअर्जदार यांचा पत्ता औरंगाबाद येथेच आहे व त्यांची जालना येथे शाखा नाही अशा परिस्थितीत केवळ प्रिमियमचा चेक जालना येथील बँकेचा आहे या मुद्दयावर या मंचाला सदरची तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र प्राप्त होत नाही. असे या मंचाचे मत आहे.
सबब मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
सदरीची तक्रार चालविणे या मंचाच्या कार्यक्षेत्रात येत नाही म्हणून सदरची तक्रार
प्राथमिक अवस्थेत फेटाळण्यात येत आहे..