निकाल
(घोषित व्दारा - श्री.सुहास एम.आळशी, सदस्य)
दि. 12.08.2016
तक्रारदार हा शेतकरी असून मौजे वानडगांव शिवारात गट नं.97 मध्ये त्याची 1 एकर 20 गुंठे शेतजमीन आहे. तक्रारदाराने गैरअर्जदार यांच्याकडून दि.20.11.2015 रोजी साडेबारा क्विंटल इतका कांदा रु.25,000/- मध्ये खरेदी केला व त्याची लागवड दि.20.11.2015 रोजी तक्रारदाराच्या शेतात केली. तक्रारदाराने गैरअर्जदार यांनी दिलेल्या कांद्याची लागवड त्यांच्या शेतामध्ये केल्यानंतर त्या कांद्याचे पीक निकृष्ट दर्जाचे असून काही रोपटे पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत आहेत अशी तक्रार दि.04.01.2016 रोजी जिल्हा कृषी अधिक्षक यांच्याकडे केली. त्यानुसार तालुका तक्रार निवारण समितीने मोका पाहणी व पंचनामा दि.16.01.2016 रोजी केला व त्या पंचनाम्यामध्ये कांद्याचे वजन 50 ते 60 ग्रॅम इतके अपेक्षित असताना 30 ते 35 टक्के कांद्याचे वजन 20 ते 30 ग्रॅम असल्याचे आढळून आले असा अहवाल दिला असल्याचे म्हटले असून तक्रारदाराने तक्रार अर्जासोबत तालुका कृषी अधिकारी यांचा अहवाल दाखल केला आहे. गैरअर्जदार यांनी निकृष्ट दर्जाचे कांदा बियाणे तक्रारदार यांना दिल्यामुळे त्यांचे नुकसान झाले असल्याचे म्हटले असून तक्रारदार यांनी त्यांच्या विनंती अर्जामध्ये गैरअर्जदार यांनी सेवेत त्रुटी दिल्याबाबत व मानसिक त्रास दिल्याबाबत रु.4,50,000/- गैरअर्जदाराकडून मिळावे अशी मागणी केलेली आहे. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत पायाभूत बियाणे पावती व संकरीत बियाणे करारनामा नं.2301, 7/12 चा उतारा, गैरअर्जदार यांना पाठविलेल्या नोटीसची प्रत, जिल्हा कृषी अधिकारी यांना दिलेल्या अर्जाची प्रत, तालुका तक्रार निवारण समितीचा क्षेत्रीय अहवाल व पंचनामा, गैरअर्जदार यांचे अंडरटेकिंग इत्यादी दस्त दाखल केले आहेत. तक्रारदाराने तक्रार दाखल करतेवेळी गैरअर्जदार यांचे नाव बेजो शितल रिसर्च प्रा.लि. मंठा चौफूली जालना, ता.जि.जालना असे टाकले होते व नंतर दुरुस्ती अर्ज देऊन गैरअर्जदार यांचे बदललेले नाव मॅनेजर, कलश सिडस प्रा.लि., मंठा चौफूली जालना, ता.जि.जालना अशी दुरुस्ती केली व याबाबत दोन्ही पक्षात वाद नाही.
गैरअर्जदार यांनी नि.6 वर त्यांचा लेखी जबाब दाखल केला आहे. त्या लेखी जबाबामध्ये त्यांनी ऑर्गनायझार परमेश्वर गावडे, तक्रारदार व गैरअर्जदार यांच्यामध्ये दि १९/०१/२०१६६ रोजी झालेला करार मान्य केला असून तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार ही वस्तुविक्री कायद्यांतर्गत येत असून तक्रारदाराने गैरअर्जदाराकडून घेतलेले बियाणे पुनर्विक्रीकरीता घेतले असून ही बाब व्यापारी प्रयोजनाची असल्याने तक्रारदार हा ग्राहक नाही व मंचाला सदर प्रकरण चालविण्याचा अधिकार नाही असे म्हटले आहे. तक्रारदाराने कांदा कंद पेरणीबाबत, मशागतीबाबत, पिकाची उगवण क्षमता, हवामान, सुर्यप्रकाश, जमीनीचे मातीचे परीक्षण याबाबत कोणताही अहवाल सादर केलेला नाही, असे म्हटले असुन कांदा कंदाबाबत कोणतीही गॅरंटी तक्रारदार याला देण्यात आली नसल्याचे नमुद केले आहे. तज्ञांचा कोणताही अहवाल प्रकरणात नाही. कमी वजनाचे कांदयाबाबत कोणतीही हमी गैरअर्जदार यांनी घेतली नाही, मशागत करण्याची व कांदा बियाणांची काळजी घेण्याची, सड व बुरशीचा प्रतिबंध करण्याची जबाबदारी तक्रारदाराची आहे, असे नमुद केले आहे. प्रकरणामध्ये गैरअर्जदार यांनी ऑर्गनायझर व तक्रारदार यांचेमधील करारनाम्याची प्रत दाखल केली आहे.
सदर प्रकरणात तक्रारदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या दस्तऐवजांचे व लेखी जबाबाचे अवलोकन केले असता खालील मुद्दे मंचासमक्ष विचारार्थ येतात.
मुददे उत्तर
1) तक्रारदार हा ग्राहक या संज्ञेमध्ये
आहे काय? होय.
2) तक्रारदार त्याची तक्रार सिध्द करु
शकला काय? नाही.
कारणमीमांसा
मुद्दा क्र. ः- 1 तक्रारदार यांनी जी तक्रार दाखल केलेली आहे, त्याबाबत तक्रारदार हे ग्राहक नाहीत व मंचाला त्यांचे प्रकरण चालविण्याचा अधिकार नाही असा मुद्दा उपस्थित केला आहे. तक्रारदार हा शेतकरी आहे व शेती हेच त्याचे उदरनिर्वाहाचे साधन आहे, त्याने गैरअर्जदार यांच्याकडुन जे कांदयाचे बियाणे घेतले ते गैरअर्जदार पुन्हा विकत घेणार असले तरी सदर व्यवसाय हा उदरनिर्वाहाकरीता करण्याचा त्याचा मानस होता. सदोष बियाणाबाबत शेतक-याने ग्राहक मंचाकडे फिर्याद दाखल केल्यास ती मंचाने दाखल करुन घ्यावी, अशा प्रकारचा न्यायनिवाडा मा. सुप्रिम कोर्ट यांनी मे. नॅशनल सीडस कार्पोरेशन वि.मधुसूदन रेड्डी आणि अन्य, ए.आय.आर,2012 या प्रकरणात दिला आहे. या तक्रारदाराचा उदरनिर्वाह शेतीवर आहे त्यामुळे तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 2 (1) (डी) (2) नुसार ग्राहक असुन त्याचे प्रकरण चालविण्याचा मंचास अधिकार आहे.
मुद्दा क्र. ः- 2 सदर प्रकरणामध्ये कांदयाचे बियाणे (कंद) निकृष्ट दर्जाचे असल्याची प्रमुख तक्रार तक्रारदार याने दाखल केलेली आहे. त्याकरीता त्याने पायाभूत करारनामा पावती क्र. 2301 दि. 20.11.2015 दाखल केली आहे. त्यामधील अट क्र. 3 चे अवलोकन केले असता शर्ती व अटीचे पालन न झाल्यास नापास झालेल्या बियाणाबाबत कोणतेही पेमेंट वापस केले जाणार नाही अशी अट तक्रारदाराने गैरअर्जदार यांचे बियाणाचा कार्यक्रम राबवित असताना मान्य केलेली आहे. तक्रारदार याने 30 ते 35 टक्के कांदा बियाणाचे वजन कमी असुन ते बियाणे सदोष असल्याने उत्पादनात घट झाल्याचे नमुद केले आहे. त्याने अध्यक्ष तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती जालना यांचा अहवाल दाखल केला असुन सदर पंचनामा तक्रारदार, त्यांचे प्रतिनिधी, गैरअर्जदार यांचे प्रतिनिधी व विक्रेता यांचे समक्ष दि. 25.01.2016 रोजी करण्यात आलेला आहे. या अहवालातील मुद्दा क्र. 18 मध्ये समितीने निष्कर्ष दिलेला असुन या निष्कर्षामध्ये कांदा रोपांवर सड व किड पडलेली असल्याचे नमुद केलेले असुन कांदा बियाणे सदोष असल्याचा कोठेही उल्लेख केलेला नाही किंवा बियाणे सदोष असल्यामुळेच घट आल्याचे स्पष्टपणे नमुद केलेले नाही तसेच सदर प्रकरणामध्ये कांदा बियाणे सदोष असल्याबाबतचा योग्य त्या प्रयोगशाळेचा तपासणी अहवाल दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे तक्रारदार त्याची तक्रार मा. मंचासमोर सिध्द करु शकला नाही. म्हणून त्याने मागणी केलेली नुकसान भरपाई देणे शक्य नाही. करीता मुद्दा क्र. 2 चे उत्तर नकारार्थी देऊन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार नामंजुर करण्यात येते.
2) खर्चाबाबत आदेश नाही.
श्री. सुहास एम.आळशी श्री. के.एन.तुंगार
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना