(घोषित दि. 17.01.2014 व्दारा श्रीमती रेखा कापडिया, सदस्या)
गैरअर्जदार बँकेने दहावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत येणा-या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप देण्याचे जाहिर केले होते. अर्जदाराचा पाल्य गुणवत्ता यादीत प्रथम आल्यानंतर स्कॉलरशिप मिळण्यासाठी अर्ज केला होता. परंतु गैरअर्जदार यांनी स्कॉलरशिप न दिल्यामुळे अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार गैरअर्जदार यांनी 2012 मध्ये दहावी परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्याचे जाहिर केले होते. त्यांचा मुलगा अजिंक्य अग्रवाल हा गुणवत्ता यादीत आल्यामुळे गैरअर्जदार यांनी जाहिर केलेली स्कॉलरशिप मिळण्यासाठी दिनांक 26.07.2012 रोजी नोंदणी केली. त्याच प्रमाणे दिनांक 28.07.2012 रोजी गैरअर्जदार यांच्याकडे बचत खाते उघडले. गैरअर्जदार यांच्याकडे त्यांनी सांगितल्या प्रमाणे आवश्यक ती कागदपत्रे जमा केली. त्यानंतर स्कॉलरशिप बद्दल विचारणा केली असता बँकेने सर्व कागदपत्रे मुख्य कार्यालयात पाठविली असल्याचे सांगितले. गैरअर्जदार यांच्या तर्फे स्कॉलरशिप मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी सप्टेंबर 2012 मध्ये जाहिर झाली. त्यामध्ये अर्जदाराच्या मुलाचे नाव नसल्यामुळे त्यांनी गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे विचारणा केली. अर्जदाराची कागदपत्रे मुख्य कार्यालयात पाठविली नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. अर्जदाराने त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 यांना संपर्क साधून, त्यांचा मुलगा जालना जिल्हयातून दहावी परीक्षेत प्रथम आला असल्याचे व जालना येथून गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी त्यांची कागदपत्रे मुख्य कार्यालयात पाठविली नाहीत. म्हणून तो स्कॉलरशिप मिळण्यापासून वंचित राहिला हे निदर्शनास आणून दिले. गैरअर्जदार यांनी तरीही दखल न घेतल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. गैरअर्जदार यांनी स्कॉलरशिपची रक्कम व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारी सोबत स्कॉलरशिप योजनेचे पत्र, ऑनलाईन केलेला अर्ज, गुणवत्ता यादी, गैरअर्जदार यांच्याकडे दाखल केलेली कागदपत्रे इत्यादी कागदपत्रे मंचात दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्रमांक 1, 2 व 3 यांनी संयुक्तपणे दाखल केलेल्या लेखी जवाबानुसार त्यांनी दहावी परीक्षेत जिल्हयात गुणवत्ता यादीत येणा-या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप देण्याची योजना जाहिर केल्याचे मान्य केले आहे. अर्जदाराने त्यांच्याकडे स्कॉलरशिपसाठी अर्ज केल्याचे तसेच त्यांच्या बँकेत बचत खाते उघडल्याचेही त्यांना मान्य आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी तांत्रिक कारणामुळे अर्जदाराचा स्कॉलरशिप मिळण्यासाठी केलेला अर्ज मुख्य कार्यालयात पाठविला नाही. स्कॉलरशिप कोणास द्यावी हे ठरविण्याचा पूर्ण अधिकार त्यांचा असल्याचे सांगून गैरअर्जदार यांनी अर्जदार हे त्यांचे ग्राहक नसल्याचे म्हटले आहे. अर्जदार हे ग्राहक नसल्यामुळे त्यांची तक्रार खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन असे दिसून येते की,
महाराष्ट्र बँकेने 2012 मध्ये दहावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप देण्याची स्कीम जाहिर केली होती. गैरअर्जदार यांनी जाहिर केलेल्या या योजने अंतर्गत स्कॉलरशिपसाठी दिनांक 10.07.2012 ते 31.07.2012 या कालावधीत अर्जाची नोंदणी व कागदपत्रे दाखल करण्याचे अवाहन करण्यात आले होते. दहावी परीक्षेत प्रत्येक जिल्हयातून एस.एस.सी किंवा सी.बी.एस.सी परिक्षेत प्रथम येणा-या दोन विद्यार्थ्यांना रुपये 500/- प्रति महिना अशी रक्कम एक वर्ष देण्यात येणार असल्याचे पत्रावरुन दिसून येते. गैरअर्जदार यांनी देखील अशी योजना असल्याचे मान्य केले आहे.
अर्जदाराने दिनांक 28.07.2012 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे नोंदणी केली व योग्य ती कागदपत्रे दाखल केल्याचे कागदपत्रांवरुन स्पष्ट होते. गैरअर्जदारांना देखील अर्जदाराने कागदपत्रे गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे जमा केल्याचे मान्य आहे.
सप्टेंबर 2012 मध्ये गैरअर्जदार यांनी स्कॉलरशिप देण्यात येणा-या विद्यार्थ्यांची यादी जाहिर केली. या यादीचे निरीक्षण केले असता जालना जिल्हयातून फक्त एकाच विद्यार्थिनीचे नाव जाहिर करण्यात आलेले दिसून येते. गैरअर्जदार यांनी आपल्या जवाबात तांत्रिक कारणामुळे अर्जदाराच्या पाल्याचे नाव मुख्य कार्यालयात पाठविण्यात आले नसल्याचे म्हटले आहे. यावरुन अर्जदाराने कागदपत्रांची पूर्तता केली असून तो पात्र असताना फक्त तांत्रिक कारणाने त्याचा अर्ज मुख्य कार्यालयात पाठविला गेला नसल्याचे स्पष्ट होते. गैरअर्जदार यांनी कोणते तांत्रिक कारण होते याचा खुलासा आपल्या जवाबात केलेला नाही.
गैरअर्जदार यांनी अर्जदार हे त्यांचे ग्राहक नाही असे म्हटले आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या बँकेत स्कॉलरशिप योजने अंतर्गत बचत खाते उघडले आहे. सदरील बचत खात्याचा क्रमांक 68010320194 असा असून गैरअर्जदार यांना देखील ते मान्य आहे. त्यामुळे अर्जदार हे त्यांचे ग्राहक नाहीत हे म्हणणे मान्य करता येत नाही. अर्जदाराने या पुष्ठयर्थ कोकाकोला विरुध्द डॉ.अमरजित सिंग यांचा मा.राष्टीय आयोगाचा निवाडा दाखल केला आहे. या निवाडयानुसार प्रमोशनल स्किम योग्य प्रकारे राबविली गेली नसेल तर ग्राहक संरक्षण कायद्या नुसार तक्रार करता येते. अर्जदाराने मे.निट लिमिटेड विरुध्द अनु कोहली, पुष्पांजली फार्म विरुध्द अन्सल प्रॉपर्टीज हे मा.राष्ट्रीय आयोगाचे निवाडे दाखल केले आहेत.
वरील सर्व निरीक्षणावरुन अर्जदार हे ग्राहक नाहीत हे गैरअर्जदार यांचे म्हणणे मंच मान्य करीत नाही.
गैरअर्जदार यांनी प्रत्येक जिल्हयातून गुणवत्ता यादीत प्रथम येणा-या दोन विद्यार्थांना स्कॉलरशिप देण्याची योजना स्वत:च जाहिर केली आहे. त्यामुळे कोणतेही संयुक्तिक कारण न देता पात्र विद्यार्थ्यास स्कॉलरशिप नाकारणे योग्य नसल्याचे मंचाचे स्पष्ट मत आहे. अर्जदाराची तक्रार मान्य करण्यात येत आहे.
वरील सर्व निरीक्षणावरुन मंच खालील आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदारास जाहिर केलेली स्कॉलरशिप रक्कम रुपये 5,00/- प्रति महिना या प्रमाणे एकूण रुपये 6,000/- (अक्षरी रुपये सहा हजार फक्त) 30 दिवसात द्यावे.
- गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदारास मानसिक त्रासा बद्दल रुपये 2,500/- (अक्षरी रुपये दोन हजार पाचशे फक्त) 30 दिवसात द्यावे.
- गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदारास खर्चा बद्दल रुपये 2,500/- (अक्षरी रुपये दोन हजार पाचशे फक्त) 30 दिवसात द्यावे.