::: निकालपत्र :::
(निकाल तारीख :04/02/2015 )
(घोषित द्वारा:श्रीमती ए.जी.सातपुते, मा.अध्यक्षा.)
तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
अर्जदार हा वकील असून, लातूर येथे राहतो. अर्जदाराने हुंडाई मोटार्स लि. वरना कार विकत घेतली जिचा आर.टी.ओ. नं. एम.एच.24/ व्ही.450 आहे, सदर गाडी ही एस.बी.आय. बँक बार्शी रोड लातूर येथुन कर्ज काढून घेतली. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे गाडीचा विमा काढलेला असून, अपघाती मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास त्याचा विमा देण्याची जिम्मेदारी गैरअर्जदाराने घेतलेली आहे. अर्जदाराच्या विमा पॉलिसीचा नं.ऋ 1712792311001751 असा असून या विमा पॉलिसीचा कालावधी दि. 28.04.2009 ते 27.04.2010 असा आहे. दि. 07.12.2009 रोजी अॅड.समद पटेल व अर्जदार दोघे मिळुन औरंगाबादकडे जात असतांना बिंदुसार डॅम पाली गावाजवळ जाणा-या खटकाळी नदीवर असलेल्या पुलावरुन गाडी ता असतांना ड्रायव्हरचा तोल जावुन गाडी खाली पडली , त्यामुळे गाडीचे नुकसान झाले व गाडी खराब झाली तसेच अॅड. समद व दशरथ काकडे यांना शारिरीक जखमा झाल्या. त्यानंतर अॅड. समद व त्यांच्या ड्रायव्हरला दीप हॉस्पीटल बीड येथे दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर सारडा हॉस्पीटल मध्ये ठेवण्यात आले. अर्जदाराचा उजवा गुडगा व उजव्या खांदयास मार लागला, अर्जदार हा एक महिना दवाखान्यात व घरी तीन महिने झोपुन होता. त्याच्या दवाखान्याचा खर्च हा रु. 50,000/- झाला आहे. अर्जदाराने घटनेची माहिती गैरअर्जदार विमा कंपनीस दिली. गैरअर्जदार विमा कंपनीने रु. 7 लाख रुपयामध्ये सदरचा क्लेम तडजोडीद्वारे मिळविला. परंतु गैरअर्जदाराने अर्जदारास झालेल्या शारिरीक जखमांसाठी व शारिरीक इलाजासाठी लागलेला खर्च मात्र कंपनीने दिलेला नाही. तसेच अर्जदाराने त्यासाठी गैरअर्जदार विमा कंपनीस रु. 14,672/- चा हप्ता देखील दिलेला आहे. गैरअर्जदार विमा कंपनीने रु. 7 लाख एका महिन्यात देण्याचे ठरवले व बॉंड पेपरही सही करुन घेतला. अर्जदाराने सर्व ट्रान्सफर पेपर्स त्या गाडीचा गैरअर्जदाराला करुन दिले. अर्जदाराला अशी माहिती मिळाली की, गैरअर्जदाराने सदरची गाडी अतिश मोहन भालसिंग त्रिवेनी नगर, निगडी पुणे यास रु. 8,00,000/- ला विकली आहे. गैरअर्जदार विमा कंपनीने खोटी माहिती देवुन सदरचा क्लेम हा रु. 7 लाख रुपयात तडतोड झाली म्हणुन सांगीतले. त्यामुळे गैरअर्जदार विमा कंपनीने चुकीच्या मार्गाने व अर्जदारास विश्वासात न घेता अनुचित प्रथेचा अवलंब करुन,अर्जदाराची गाडी विकली. व रु. 1,00,000/- नफा कमवला जो योग्य नाही. कारण सदरची माहिती अर्जदारास विमा कंपनीने दिलेली नाही. अर्जदारास दि. 05.05.2010 रोजी रु. 3 लाख मिळाले ते एस.बी.आय लातूर यांना देवुन बेबाकी प्रमाणपत्र घेतले. त्यानंतर दि. 24.08.2010 रोजी गैरअर्जदार विमा कंपनीने रु. 4 लाख ऐवजी रु. 3,75,000/- दिलेले आहे. व दि. 24.08.2010 रोजी गाडी विकत घेणा-याने रु. 25,000/- दिलेले आहेत.
गैरअर्जदार विमा कंपनीचे अधिकारी श्री. कुमठेकर यांना 100 वेळा फोन करुन ही ते फोन घेत नाहीत, तसेच अर्जदाराने मुंबई येथेही फोन केला, अर्जदारास गैरअर्जदाराने रु. 4 लाख दि. 01.04.2010 रोजी दिलेले आहे. एक महिन्याचा कालावधी संपल्या नंतर म्हणुन त्यावर 14 टक्के व्याजाने दि. 24.08.2010 पासुन दि. 01.04.2010 पर्यंत रु. 22,400/- एवढी रक्कम होते, तसेच अर्जदारास झालेल्या गुडघ्याच्या व खांदयाच्या अपंगत्वासाठी रु. 1,00,000/- अर्जदारास लागलेले वैदयकीय बिलापोटी रु. 50,000/- गैरअर्जदाराने दयावेत, म्हणुन अर्जदारास रु. 3,72,400/- रु. 14 टक्के व्याजासहीत गैरअर्जदाराने दयावेत, व दाव्याचा खर्च रु. 10,000/- देण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
गैरअर्जदाराच्या म्हणण्यानुसार अर्जदाराने एम.एच.24/व्ही 450 ची विमा पॉलिसी काढलेली आहे व सदर गाडीचा दिनांक 07.12.2009 रोजी अपघात झाला व या अपघातात गाडीचे नुकसान झाले त्याची विमा रक्कम रु. 7,00,000/- अर्जदाराला गैरअर्जदाराने विमा कंपनीने दिलेली असल्यामुळे त्या अपघातात झालेल्या जखमांबद्दल काही भाष्य त्यावेळी अर्जदाराने केलेले नाही व स्वत: गैरअर्जदाराच्या हक्कात करुन दिले व रक्कम रु. 7 लाख स्विकारली व यापुढे सदरची रक्कम कोणतीही मागणी नसल्याचे स्वत:च्या मर्जीचे पत्र दिलेले त्यामुळे सदर केसमध्ये अर्जदाराने मागितलेली रक्कम चुकीची असल्यामुळे, सदरचा दावा फेटाळण्यात यावा, तसेच अर्जदाराने अपंगत्व आल्याचे रु. 1,00,000/- व वैदयकीय बिलाचे रु.50,000/- ही रक्कम मागीतली ती योग्य नाही. म्हणुन अर्जदाराने मागीतलेली रक्कम रु. 3,72,400/- ही योग्य नाही. म्हणुन त्याची तक्रार फेटाळण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
मुद्दे उत्तर
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय.
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? नाही
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? नाही.
- काय आदेश ? अंतिम आदेशा प्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असून अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे. अर्जदाराच्या गाडी एम.एच 24/व्ही 450 या गाडीचा विमा गैरअर्जदाराने काढलेला आहे ही बाब गैरअर्जदारास मान्य आहे. तसेच अर्जदारास गैरअर्जदाराने विम्याची रक्कम रु. 7 लाख दिलेले आहे.
मुद्दा क्र 2 चे उत्तर नाही असे असून, अर्जदाराने गैरअर्जदाराकडून दि. 23.02.2010 या दिवशी बॉन्ड लिहुन दिला, त्या बॉन्डनुसार माझ्या गाडीचा अपघात दि. 07.12.2009 रोजी झाला त्यात एम.एच. 24/व्ही 450 या गाडीचे अपघातात नुकसान झाले होते. सदर गाडीच्या अपघाता नुसार गैरअर्जदाराने अर्जदारकडून कॅशलेस कन्सेंटमेंट लिहुन घेतले होते. त्यावेळेस त्यांनी कोणतीही उजर नसल्याचे स्पष्ट लिहीले आहे व सदरची रक्कम मी मर्जीने स्वत: घेत आहे. तसेच अर्जदार हा स्वत: वकिल आहे. त्यामुळे जेंव्हा कन्सेंटमेंट लेटर दिले त्याचा अर्थ ही त्यास माहित आहे. यात सदर गाडीचा विमा कालावधी हा दि. 28.04.2009 ते 27.4.2010 असा आहे. सदर केसमध्ये अर्जदार स्वत: त्या गाडीच्या बद.दल कोणताही क्लेम करणार नाही, असे स्पष्ट म्हटल्यानंतर ही तक्रार करणे योग्य होणार नाही. तसेच अर्जदाराने गाडीची रक्कम घेताना आपल्याला झालेल्या अपंगत्वाबद्दल व जखमांबद्दल त्याच्या वैदयकीय बिलाबाबत सदर बॉन्ड मध्ये काही लिहीले नाही. अर्जदार हा स्वत: वकील आहे व त्यांच्या सोबत गाडीत बसलेले अॅड समद पटेल हे दखील वकील आहेत, तेंव्हा या दोघांनी मोटार अपघात तक्रार केली नसेल कशावरुन , कारण सदरची तक्रार ही अर्जदाराने गाडीच्या बाबतीत मंचात केलेली आहे. व त्यांना एक महिन्यात रक्कम देतो म्हणुन दोन महिने लावले त्याच बाबतीत त्यांनी रु. 22,400/- क्कम व्याजाची जी मागीतलेली आहे, ती सुध्दा योग्य नाही. प्रत्येक गोष्ट तंतोतंत जुळावयास वेळ लागतो. तसेच सदरच्या गाडीची IDV रक्कम रु. 7,76,000/- अशी आहे. त्यापैकी अर्जदारास रु. 7,00,000/- विमा कंपनीने दिले हे पण गैरअर्जदाराने दिलेले सेवेत त्रूटी केलेली दिसून येत नाही. एखादी मोठी रक्कम तडजोडीने काढण्यासाठी सुध्दा कंपनीस बराच वेळ लागतो, तेंव्हा कार्यालयीन अडचणी लक्षात घेता, गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेली रक्कम रु. 7 लाख ही योग्य ओ. तसेच मेडीकल बिलासाठी त्यांनी डॉक्टरांचे शपथपत्र दिले व रु. 53,000/- ची मागणी केली त्याबाबत अर्जदारास मोटार अपघात प्राधिकरण ही वेगळे न्यायालय आहे. तसेच अर्जदाराने इतर कुठेही अशी तक्रार केली नाही असे सदरच्या अर्जात लिहीलेले नसल्यामुळे अर्जदाराचा त्याबाबतीतला अर्ज हे न्यायमंच विचारात घेवु शकत नाही. म्हणुन हे न्यायमंच अर्जदाराचा अर्ज फेटाळत आहे. त्यास योग्य ती रक्कम गैरअर्जदाराने दिलेली असल्यामुळे त्यांनी कोणतीही सेवेत त्रूटी केलेली नाही. म्हणुन सदरचा अर्ज नामंजुर करत आहे. खर्चा बाबत आदेश नाही.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
- खर्चा बाबत आदेश नाही.