निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 05/07/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 12/07/2013 तक्रार निकाल दिनांकः- 03/03/2014
कालावधी 07 महिने. 19 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल.M.Sc. L.L.B.
---------------------------------------------------------------------------------------------------------
शाकेर मूसा पटेल, अर्जदार
वय 32 वर्षे. धंदा.व्यापार. अॅड.जी.बी.भालेराव.
रा.काद्राबाद प्लॉट, जि.परभणी.
विरुध्द
1 दि मॅनेजर, गैरअर्जदार.
एल.अॅन्ड टी.जनरल इन्शुरन्स कंपनी लि. अॅड.जी.एच.दोडीया.
6 वा मजला, सीटी-2, प्लॉट नं. 177,
सी.एस.टी.रोड, बांदरा कुरला टेलीफोन एक्सचेन्ज जवळ,
कालीना शान्तांक्रुझ (पुर्व) मुंबई 400098.
2 राहुल बालकृष्ण कुलकर्णी, विमा एजन्ट,
एल.अॅन्ड टी.जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
रा.एल.अॅन्ड टी,फायनान्स कंपनी लि,
पांगरकर बिल्डींग नारायण चाळ कॉर्नर, परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटूरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदाराच्या वाहनाचा विमा मंजूर करण्याचे नाकारुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्या बद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, त्याने टँकर क्रमांक MH -43 –E 4735 चे मुळ मालक दर्शनसिंग करतारसिंग यांचेकडून सदर टँकर खरेदी केले होते, व त्याबाबत संबंधीत आर.टी.ओ. कडे दिनांक 21/12/2012 रोजी सदर वाहन अर्जदाराच्या नावे ट्रान्सफर झाले होते. सदर वाहनाचा जोखीम विमा गाडीच्या मुळ मालकाने गैरअर्जदार क्रमांक 1 कडे उतरविला होता व विम्याचा वैध कालावधी 13/03/2012 ते 12/03/2013 असा होता.
अर्जदाराचे म्हणणे की, दिनांक 22/12/2012 रोजी सदर टँकरव्दारे जालना शहराला पाणी पुरवठा करण्यसाठी जात असतांना अचानक एक बैलगाडी मध्ये आली त्यावेळीस टँकर चालकाने बैलगाडी वाचवण्यासाठी गेला असता, बैलगाडीस धक्का लागुन सदर टँकर खड्यात जावुन पडले व अपघात झाला व त्यात टँकरचे जवळपास 4 ते 5 लाख रु. चे नुकसान झाले.
अर्जदाराचे म्हणणे की, सदर अपघाता बाबत त्याने गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीच्या एजंटला ( गैरअर्जदार क्रमांक 2 ) माहिती दिली व त्यानी सदरची माहिती गैरअर्जदार विमा कंपनीला दिली व विमा कंपनीने दिनांक 26/12/2012 रोजी अपघात स्थळी विमा कंपनीच्या सर्व्हेअरने नुकसानीचे फोटो घेतले व नुकसानीचा सर्व्हे केला. त्यानंतर अर्जदाराचे सदर टँकर पोलीसांनी जप्त केला होता व त्याने रितसर न्यायालयातून टँकर सोडवुन घेतले व दुरुस्तीसाठी परभणी येथे आणले व ते जहीर मोटार मॅकेनिक व स्टार बॉडी बिल्डर कडून दुरुस्त करुन घेतला व अर्जदारास 3 लाख रु. चा खर्च झाला व या बाबतची संपूर्ण बिले घेवुन विमा कंपनीचे सर्व्हेअर श्री. कदम यांना बिले दिले व तसेच पोलीसांनी पंचनामा टँकरचे सर्व कागदपत्रे सर्व्हेअरकडे दिली.
अर्जदाराचे म्हणणे की, त्याने सदर टँकरचा विमा गैरअर्जदाराकडे काढलेला असल्यामुळे त्यानी सर्व कागदपत्रांसह नुकसान भरपाई विमादावा दाखल केला. सदरचा नुकसान विमादावा गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीने दिनांक 29/03/2013 च्या पत्राव्दारे फेटाळला व त्यात कारण दिले की, अपघाताच्या वेळी विमा हा अर्जदाराच्या नावे नव्हता.
अर्जदाराचे म्हणणे की, विमा कंपनीचे सदरचे कारण चुकीचे आहे, कारण अर्जदाराच्या नावे सदरचे टँकर दिनांक 21/12/2012 रोजी आर.टी.ओ. परभणी येथे झाले व मोटार वाहन कायद्यानुसार गाडी ट्रान्सफर झाल्यानंतर 14 दिवसांच्या आत विमा ट्रान्सफर करण्यासाठी नवीन मालकाने अर्ज देणे आवश्यक आहे व तो अर्ज अर्जदाराने विमा कंपनीकडे 14 दिवसाच्या आतच दिलेला आहे, म्हणजेच दिनांक 28/12/2012 रोजी अर्जदाराने मेलव्दारे त्याच्या नावावर सदर टँकरचा विमा ट्रान्सफर व्हावा म्हणून अर्ज दिलेला आहे व या बाबतची पोच विमा कंपनीचे अधिकारी निरजसिंग यानी अर्जदारास दिलेला आहे व तसेच अर्जदाराने दिनांक 03/01/2013 रोजी नियमा प्रमाणे 14 दिवसाच्या आत विमा कंपनीच्या संबंधीताकडे सर्व कागदपत्रांसह पॉलिसी ट्रान्सफर अर्जदाराच्या नावे व्हावी म्हणून अर्ज दिला होता.
अर्जदाराचे म्हणणे की, विमा कंपनीने चुकीचे कारण दाखवुन त्याचा विमादावा नाकारुन सेवेत त्रुटी दिली, म्हणून सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करावा व गैरअर्जदारांना आदेश करावा की, त्याने अर्जदाराचा टँकर क्रमांक MH- 43- E- 4735 चा अपघातात झालेल्या नुकसानी पोटी 3 लाख रु. अपघात दिनांक 22/12/2012 पासून 12 टक्के व्याजाने अर्जदारास द्यावेत व तसेच मानसिक त्रासापोटी 20,000/- व तक्रार अर्ज खर्चापोटी 5,000/- गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश करावा.
तक्रार अर्जाच्या पुष्टयार्थ अर्जदाराने नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे.
अर्जदाराने पुराव्याबाबत नि.क्रमांक 4 वर 19 कागदपत्राच्या प्रती दाखल केल्या आहेत. ज्यामध्ये गैरअर्जदार क्रमांक 1 याने अर्जदारास पाठविलेली E Mail ची प्रत, जहीर मोटार्सचे बिल, 14,700/- चे बील पावती, विशाल अॅटोमोबॉईलचे 4050, 5910, 4150 रु. चे बील, शिवम ग्लासचे बील, नांदेड मोपींगचे बील, स्टार बॉडीचे बील, नांदेड इंजिनिअरींगचे बील, महेश अॅटोचे बील, अर्जदाराने टँकर खरेदी केल्याचे विक्रीपत्र, गैरअर्जदाराचे पत्र, ड्रायव्हींग लायसेन्स, घटना स्थळ पंचनामा, वाहन मालकी बदलण्या बाबतचा अर्ज, आर.सी.बुक, विमा पॉलिसी इ.कागदपत्रे दाखल केली आहेत.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदाराना नोटीसा काढण्यात आल्या.
गैरअर्जदार क्रमांक 1 वकिला मार्फत मंचासमोर हजर व नि.क्रमांक 12 वर आपला लेखी जबाब सादर केला व त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे व ती खारीज होणे योग्य आहे. आम्ही अर्जदारास कसल्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही. अर्जदार हा आमचा ग्राहक नाही. अर्जदाराने दाखल केलेली पॉलिसी ही दर्शनसिंग करतारसिंग रा.वाशी नवी मुंबई यांच्या नावे आहे सदर पॉलिसीचा कालावधी 13/03/2012 ते 12/03/2013 असा आहे. व अर्जदारास सदरची तक्रार दाखल करण्याचा अधीकार नाही, तरी सुध्दा अर्जदाराकडून सदर अपघताची माहिती विमा कंपनीस मिळाल्यानंतर विमा कंपनीने सर्व्हेअर म्हणून श्री. अे.के.कदम यांची नियुक्ती केली व त्याप्रमाणे सर्व्हेअरनी सदर नुकसानीची पहाणी केली व त्यात त्याने वाहनाचे 53,820/- रु. चे नुकसान झाले. म्हणून अहवाल सादर केला होता, परंतु अपघाता दिवशी सदर वाहनाचा विमा अर्जदाराच्या नावे नव्हता व तो विमा टँकरचे मुळ मालक दर्शनसिंग यांचे नावे होता. म्हणून विमा कंपनीने दिनांक 29/03/2013 रोजी अर्जदाराचा विमादावा नामंजूर केला होता व तो योग्यच व कायदेशिर होते.
विमा कंपनीचे म्हणणे की, अर्जदाराने अपघाता नंतर म्हणजेच दिनांक 22/12/2012 नंतर सदरचा विमा त्याच्या नावे करावे म्हणून अर्ज दिला होता ते योग्य व कायदेशिर नाही, म्हणून मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
गैरअर्जदार विमा कंपनीने लेखी जबाबाच्या पुष्टयार्थ नि.क्रमांक 13 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 यास मंचाची नोटीस तामील होवुनही ( नि.क्रमांक 5/2 वर पोच पावती ) हजर नाहीत, त्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 2 विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे आहेत.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीने अर्जदाराचा टँकर
क्रमांक MH-43-E-4735 चा दिनांक 22/12/2012 रोजी
झालेल्या अपघातात झालेली नुकसान भरपाई देण्याचे
नाकारुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदाराने टँकर नं. MH-43-E-4735 हे टँकरचे मुळ मालक दर्शनसिंग करतारसिंग यांचेकडून अर्जदाराने खरेदी केले होते व सदर टँकर अर्जदाराच्या नावे दिनांक 21/12/2012 रोजी झाला होता, ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 4/18 वरील सदर टँकरच्या आर.सी.बुक वरुन सिध्द होते.
अर्जदाराच्या मालकीचा सदर टँकर मुळ मालक दर्शनसिंग करतारसिंग यांनी गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीकडे विमाकृत केला होता व सदर विम्याचा कालावधी दिनांक 13/03/2012 ते 12/03/2013 पर्यंत वैध होता, ही बाब नि.क्रमांक 4/19 वर दाखल केलेल्या पॉलिसीच्या प्रत वरुन सिध्द होते.
अर्जदाराच्या सदर टँकरचा दिनांक 22/12/2012 रोजी जालना अंबड रोडवर अपघात झाला होता, ही बाब नि.क्रमांक 4/15 वर दाखल केलेल्या घटनास्थळ पंचनाम्याच्या व तसेच नि.क्रमांक 4/16 वर दाखल केलेल्या पोलीस कागदपत्रावरुन सिध्द होते.व सदर टँकरचा अपघात हा विम्याच्या वैध कालावधी मध्ये झाला होता हे सिध्द होते.
अर्जदाराने सदर टँकरचे मुळ मालक दर्शनसिंग करतारसिंग यांनी गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीकडे काढलेली पॉलिसी अर्जदाराच्या नावे करावी म्हणून गैरअर्जदार विमा कंपनीस विमा कंपनीचे अधिकारी निरजसिंग यांना कळविली होती, व त्यांनी अर्जदाराचा E Mail दिनांक 28/12/2012 रोजी प्राप्त झाला व अर्जदाराचा सदरचा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी संबंधीताकडे पाठवला आहे, असे गैरअर्जदार विमा कंपनीच्या संबंधीत अधिका-याने अर्जदारास कळविले होते, ही बाब नि.क्रमांक 4/1 वर दाखल केलेल्या E Mail च्या प्रत वरुन सिध्द होते. व तसेच सदरची बाब नि.क्रमांक 4/17 वर दाखल केलेल्या अर्जदाराच्या दिनांक 03/01/2013 रोजी गैरअर्जदाराकडे केलेले अर्जाच्या प्रतीवरुन सिध्द होते.
अपघतानंतर अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीकडे टँकरचा अपघात नुकसान भरपाई मिळावी म्हणून अर्ज केला होता व गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीने अर्जदाराचा विमादावा अपघाता दिवशी पॉलिसी ही अर्जदाराच्या नावे नव्हती व पॉलिसी ट्रान्सफरसाठी वाहन ट्रान्सफर झाल्या तारखे पासून 14 दिवसाच्या आत विमा कंपनीकडे सर्व कागदपत्रांसह अर्ज दाखल करणे आवश्यक होते व ते अर्जदाराने न केल्याने अर्जदाराचा विमादावा सदरचे कारण दाखवुन फेटाळला होता. ही बाब नि.क्रमांक 4/13 वर दाखल केलेल्या Repudiation Letter वरुन सिध्द होते. सदरचे विमा कंपनीचे विमादावा नाकारण्याचे कारण मंचास योग्य वाटत नाही. कारण G R --17 खालील प्रमाणे आहे.
On transfer of ownership, the Liability Only cover, either under package policy, is deemed to have been transferred in favour of the person to whom the motor vehicle is transferred with effect from the date of transfer.
The transferee shall apply within fourteen days from the date of transfer in writing under recorded
Delivery to the insurer who has insured the vehicle, with the details of the registration of the vehicle, the date of transfer of the vehicle, the previous owner of the vehicle and the number and date of the insurance policy so that the insurer may make the necessary changes in his record and issue fresh Certificate of Insurance.
In case of Package Policies, transfer of the “ Own damage ” section of the policy in favour of the transferee, shall be made by the insurer only on receipt of a specific request from the transferor. If the transferee is not entitled to the benefit of the No Claim Bonus (NCB) shown on the policy, or is entitled to a lesser percentage of NCB than that existing in the policy, recovery of the difference between the transferee’s entitlement, if any, and that shown on the policy shall be made before effecting the transfer.
A fresh Proposal Form duly completed is to be obtained from the transferee in respect of both Liability Only and Package Policies.
Transfer of Package Policy in the name of the transferee can be done only on getting acceptable evidence of sale and a fresh proposal form duly filled and signed. The old Certificate of Insurance for the vehicle, is required to be surrendered and a fee of Rs. 50 is to be collected for issue of fresh Certificate in the name of the transferee. If for any reason, the old Certificate of Insurance cannot be surrendered, a proper declaration to that effect is to be taken from the transferee before a new Certificate of Insurance is issued.”
सदर GR-17 चे अवलोकन केले असता अर्जदाराने सदरचे टँकर त्यांच्या नावे झाल्यातारखे पासून 14 दिवसाच्या आत विमा त्याच्या नावे ट्रान्सफर करा म्हणून अर्ज गैरअर्जदाराकडे देणे आवश्यक होते व प्रस्तुत प्रकरणात अर्जदाराच्या नावे सदरचे टँकर हे 21/12/2012 रोजी झाले व अर्जदाराने गैरअर्जदारास दिनांक 28/12/2012 रोजी विमा पॉलिसी त्याच्या नावे ट्रान्सफर करावे, म्हणून कळविले होते व रितसर दिनांक 03/01/2013 रोजी सर्व कागदपत्रांसह लेखी अर्ज केला होता, ही बाब वर चर्चा केल्याप्रमाणे सिध्द झाली आहे व GR-17 च्या नियमा प्रमाणे अर्जदाराने पालन केलेले दिसते.
अर्जदाराचे म्हणणे की, त्याच्या मालकीचे सदरच्या टॅंकरचे दिनांक 22/12/2012 रोजी झालेल्या अपघातामुळे त्याचे टँकरचे 3 लाख रु. चे नुकसान झाले हे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही. कारण याबाबत कोणताही कागदोपत्री ठोस पुरावा अर्जदाराने मंचासमोर आणला नाही, वा त्यांनी दाखल केलेले पावत्या ज्यानी दिल्या आहेत त्यांचे शपथपत्र देखील अर्जदाराने मंचासमोर आणले नाही.
याउलट गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीने दाखल केलेल्या नि.12 वरील लेखी जबाबात परिच्छेद क्रमांक 1 मध्ये मान्य केले आहे की, विमा कंपनीचे सर्व्हेअर श्री. अे.के. कदम यांचे नुकसान पहाणी अहवालानुसार अर्जदाराच्या टँकरचे 53,820/- रु. चे नुकसान झाले होते.
गैरअर्जदार विमा कंपनीचे म्हणणे की, अपघाता दिवशी म्हणजेच दिनांक 22/12/2012 रोजी सदर टँकरची पॉलिसी अर्जदाराच्या नावे नव्हती म्हणून विमादावा नाकारला हे कारण मंचास योग्य वाटत नाही, कारण अर्जदाराने सदरचे टँकर मुळ मालकाकडून दिनांक 21/12/2012 रोजी खरेदी केले होते व त्याबाबत संबंधीत आर.टी.ओ. कार्यालयात अर्जदाराच्या नावे नोंद झाली, परंतु दुर्देवाने सदर टॅंकरचा अपघात दुस-याच दिवशी म्हणजे 22/12/2012 रोजी झाला व पॉलिसी अर्जदाराच्या नावे करणे करीता ट्रान्सफर झालेल्या तारखे पासून 14 दिवसाच्या आत विमा कंपनीकडे अर्ज दाखल करणे आवश्यक होते, केवळ अपघाता दिवशी अर्जदाराच्या नावे पॉलिसी नव्हती म्हणून विमा कंपनीस विमादावा टाळता येणार नाही. अर्जदार हा सदर टँकरचा अपघाता दिवशी मालक होता हे निश्चित व मालक या नात्याने अर्जदारास विमा कंपनी विरुध्द वाहन अपघात नुकसान भरपाईचा दावा करता येवु शकतो.
विमा कंपनीच्या सर्व्हेअर रिपोर्ट प्रमाणे अर्जदाराचे वाहनाचे नुकसान रु. 53,820/- हे 75 टक्के प्रमाणे Non Standard Basis वर अर्जदार गैरअर्जदाराकडून मिळणेस निश्चित पात्र आहे.असे मंचास वाटते.
याबाबत मा. राष्ट्रीय आयोग दिल्ली याने 2013(1) CPR 451 (NC) रिव्हीजन पिटीशन नं. 4341/ 2012 बजाज जनरल इंशुरन्स विरुध्द श्रीमती ललिता देवी या प्रकरणात म्हंटले आहे की, “ Registered owner has every right to claim insurance amount” सदरचा निकाल प्रस्तुत प्रकरणास तंतोतंत लागु पडतो.
गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीने अर्जदारास त्याच्या मालकीचे सदरचे टँकरचे झालेल्या अपघातात वाहन नुकसान भरपाई म्हणून 53,820/- रु. Non Standard वर देण्याचे नाकारुन अर्जदारास निश्चित सेवेत त्रुटी दिली आहे. असे मंचाचे ठाम मत आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे होकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीने आदेश तारखे पासून 30 दिवसाच्या आत
अर्जदाराचे टँकर क्रमांक MH-43-E-4735 चे वाहन नुकसान भरपाई पोटी
रु. 40,365/- फक्त ( अक्षरी रु. चाळीसहजार तिनशे पासष्ठ फक्त ) अर्जदारास
द्यावेत.
3 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी करावा.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.