द्वारा- श्री. एस. के. कापसे , मा. सदस्य यांचेनुसार
निकालपत्र
दिनांक 20 एप्रिल 2012
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांनी ओनिडा कंपनीचे वॉशिंग मशिन खरेदी केले होते. जाबदेणार क्र.1 हे ओनिडा कंपनीचे अधिकृत सर्व्हिस सेंटर आहे. मशिन मध्ये दोष निर्माण झाल्यामुळे तक्रारदारांनी दिनांक 25/5/2006 रोजी जाबदेणार क्र.1 यांच्याकडे मशिन दुरुस्तीसाठी दिली. तक्रारदारांना रुपये 480/- ची पावती क्र.2951 देण्यात आली व मशिन काही दिवसात दुरुस्त करुन देण्यात येईल असेही तक्रारदारांना सांगण्यात आले. जाबदेणार क्र.1 यांच्या सांगण्यावरुन तक्रारदारांनी दुसरी वॉशिंग मशिन त्यांच्याकडूनच विकत घेतली परंतु तक्रारदारांनी जुनी मशिन दुरुस्त करुन तक्रारदारांना देण्यात आली नाही. दिनांक 30/5/2006 रोजी तक्रारदारांनी जुन्या दुरुस्त न केलेल्या मशिनची मागणी जाबदेणार क्र.1 यांच्याकडे केली परंतू तक्रारदारांना मशिन दिली नाही. तक्रारदारांनी जाबदेणार क्र.1 यांना दिनांक 7/11/2007 रोजी पत्र व दिनांक 24/4/2008 रोजी नोटीस पाठवून मशिनची मागणी केली परंतु उपयोग झाला नाही म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून जुनी वॉशिंग मशिन परत मागतात, तसेच जाबदेणार यांना दिलेले रुपये 1070/- 18 टक्के व्याजासह, नुकसान भरपाई पोटी रुपये 25,000/- व इतर दिलासा मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार क्र.2 यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणार क्र.1 व जाबदेणार क्र.2 यांचे कार्यालय एकाच इमारतीमध्ये असून जाबदेणार क्र.1 यांचे कार्यालय तळमजल्यावर असून ते बराच काळ बंद असते. जाबदेणार क्र.2 यांचे कार्यालय त्याच इमारतीमध्ये वरच्या मजल्यावर आहे. मंचाने जाबदेणार क्र. 1 यांना काढलेली नोटीस जाबदेणार क्र.2 यांच्या कर्मचा-यांनी नजरचुकीने स्विकारली. तक्रारदार जाबदेणार क्र.2 यांचे ग्राहक नाहीत, कोणतीही सेवा दिलेली नाही व तक्रार दाखल करण्यास कारण घडलेले नाही. जाबदेणार क्र.1 व जाबदेणार क्र.2 यांचा कोणताही संबंध नाही. जाबदेणार क्र.1 व जाबेणार क्र.2 या एकच आहेत व त्यांच्या फक्त नावात बदल झालेला आहे यासंदर्भात तक्रारदारांनी पुरावा दाखल केलेला नाही, म्हणून तक्रार खर्चासह नामंजुर करावी अशी मागणी जाबदेणार क्र.2 करतात.
3. जाबदेणार क्र.1 यांना मंचाची नोटीस लागूनही गैरहजर, म्हणून त्यांच्याविरुध्द मंचाने एकतर्फा आदेश पारीत केला.
4. उभय पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी ओनिडा कंपनीचे वॉशिंग मशिन घेतले होते. त्यात दोष निर्माण झाल्यामुळे दुरुस्तीसाठी तक्रारदारांनी सदरहू मशिन जाबदेणार क्र. 1 यांना दिनांक 25/5/2006 रोजी दिले होते, त्याच्या दुरुस्तीसाठी जाबदेणार क्र.1 यांनी तक्रारदारांकडून त्याच दिवशी रुपये 480/- व दिनांक 1/6/2006 रोजी रुपये 590/- घेतले होते हे दाखल पावत्यांवरुन स्पष्ट होते. जाबदेणार क्र.1 हे ओनिडा कंपनीचे कस्टमर रिलेशन सेंटर आहे असेही पावतीवर नमूद करण्यात आलेले आहे. तक्रारदारांनी दाखल केलेल्या जाबदेणार क्र.1 यांच्या दिनांक 30/5/2006 च्या पावतीचे अवलोकन केले असता त्यावर तक्रारदारांचे नाव, मशिनचा मॉडेल नं. टी एम बी, व प्रॉब्लेम डेड असे स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहे. तक्रारदारांनी दिनांक 7/11/2007 च्या पत्रान्वये सदरहू मशिनची मागणी करुनही डेड झालेले वॉशिंग मशिन जाबदेणार क्र.1 यांनी तक्रारदारांना परत केलेले नाही. ही जाबदेणार क्र.1 यांच्या सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
5. तसेच जाबदेणार क्र.1 यांनी त्यांचे नाव बदलून जाबदेणार क्र.2-मर्क इलेक्ट्रॉनिक्स असे केले होते असे जरी तक्रारदारांचे म्हणणे असले तरी यासंदर्भात कागदोपत्री पुरावा तक्रारदारांनी दाखल केलेला नाही. तक्रारदारांनी जाबदेणार क्र.2 यांना वॉशिंग मशिन दुरुस्तीसाठी दिलेले होते, यासंदर्भातील पुरावा मंचासमोर दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे जाबदेणार क्र.2 यांच्याविरुध्द तक्रारदारांनी तक्रार शाबित केलेली नाही असे मंचाचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे जाबदेणार क्र.2 यांच्याविरुध्दची तक्रार नामंजुर करण्यात येत आहे. म्हणून तक्रारदार जाबदेणार क्र.1 यांच्याकडून ओनीडा कंपनीची वॉशिंग मशिन मॉडेल नं टी एम बी परत मिळण्यास, तसेच दुरुस्तीपोटी स्विकारलेली रक्कम रुपये 1070/- तक्रारदारांना तक्रार दाखल दिनांक 02/09/2008 पासून 9 टक्के व्याजाने मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे स्पष्ट मत आहे. तक्रारदारांची व्याजाची मागणी मंजुर केल्यामुळे नुकसान भरपाईची मागणी मंच नामंजुर करीत आहे.
वर नमूद विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे-
:- आदेश :-
[1] तक्रार जाबदेणार क्र.1 यांच्याविरुध्द अंशत: मान्य करण्यात येत आहे.
[2] जाबदेणार क्र. 1 यांनी तक्रारदारांना ओनीडा कंपनीची वॉशिंग मशिन मॉडेल
नं. टी एम बी आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत परत करावी.
[3] जाबदेणार क्र.1 यांनी तक्रारदारांना रक्कम रुपये 1070/- दिनांक 02/09/2008 पासून 9 टक्के व्याजाने संपुर्ण रक्कम अदा होईपर्यन्त आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत दयावी.
[4] जाबदेणार क्र.1 यांनी तक्रारदारांना तक्रारीचा खर्च रक्कम रुपये 1000/- अदा करावा.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.