(द्वारा मा. सदस्या – श्रीमती. माधुरी एस. विश्वरुपे)
1. तक्रारदारांनी ता. 20/09/2013 रोजी मे. सात्रा टेलीकॉम नोकिया मोबाईल शॉप, मालाड(पुर्व), मुंबई यांचेकडुन लुमीया हँडसेट रक्कम रु. 9,800/-किमतीचा विकत घेतला. सामनेवाले नं. 2 ही सदर मोबाईलची उत्पादक कंपनी असुन सामनेवाले नं. 1 हे मोबाईल कंपनीचे सर्विस सेंटर आहे.
2. तक्रारदारांचा मोबाईल खरेदी केल्यानंतर नादुरूस्त झाला, सदर मोबाईल सतत (हँग) होत होता. तक्रारदारांनी सदर मोबाईल दुरूस्तीसाठी सामनेवाले 1 सर्विससेंटर यांचेकडे दिला. या संदर्भातील “Job Sheet” मंचामध्ये दाखल आहे. सामनेवाले 1 यांनी मोबाईलची दुरूस्ती केली तथापी मोबाईलमधील दोष तसेच राहिले. तक्रारदारांच्या मोबाईलमध्ये खरेदी केल्यानंतर 1 महिन्याचे कालावधीत त्यामध्ये निर्माण झालेल्या दोषांची दुरूस्ती सामनेवाले 1 यांचे कडील तज्ञ इंजिनिअर यांना करणे शक्य झाले नाही. त्यामुळे तक्रारदारांना प्रस्तुत तक्रार दाखल करणे भाग पडले आहे अशी तक्रारदाराची तक्रार आहे.
3. प्रस्तुत प्रकरणात सामनेवाले 1 यांचे विरुध्द ‘नो से’ व सामनेवाले 2 यांचे विरुध्द ‘एकतर्फा’ आदेश पारित झाला आहे. तक्रारदारांना प्रस्तुत प्रकरणात कोणताही पुरावा अथवा कागदपत्रे दाखल करावयाची नसून तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे व शपथपत्र हेच त्यांचे पुरावाशपथपत्र, लेखी युक्तिवाद व तोंडी युक्तिवाद समजण्यात यावा अशी पुर्सिस दाखल केली. सामनेवाले 1 व 2 यांचेतर्फे कोणताही आक्षेप दाखल नाही. सबब तक्रारदारांचा पुरावा अबाधित आहे.
4. तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे व शपथपत्र यांचे सखोल वाचन केले. उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मंच खालील प्रमाणे निष्कर्ष काढत आहे.
अ) तक्रारदारांनी सामनेवाले 2 यांच्या कंपनीने उत्पादित केलेला मोबाईल नं. मॉडेल नं. ‘नोकिया 520’ ता. 20/09/2013 रोजी मेसर्स सात्रा टेलीकॉम नोकिया मोबाईलशॉप यांचेकडुन रक्कम रु. 9,800/- एवढया किमतीचा विकत घेतल्याचे ‘Tax invoice’ वरुन स्पष्ट होते. तक्रारदारांनी ‘Tax invoice’ ची प्रत मंचात दाखल केली आहे.
ब) तक्रारदारांच्या मोबाईलमध्ये दोष निर्माण झाल्याची बाब ता. 10/10/2013 रोजीच्या ‘Delivery Note’ वरुन दिसुन येते. तसेच तक्रारदारांनी ‘Repair Cost’ ची रक्कम रु. 1,249/- सामनेवाले 2 यांचेकडे भरणा केल्याचे दिसुन येते.
क) तक्रारदारांनी ता. 10/09/2013 रोजी मोबाईल विकत घेतल्यानंतर केवळ 1 महिन्याच्या कालावधीत तक्रारदारांचा मोबाईल नादुरुस्त झाल्याचे तक्रारीतील दाखल कागदपत्रांवरुन स्पष्ट होते. तक्रारदारांनी तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे सदर मोबाईल खरेदी केल्यानंतर 1 महिन्याचे कालावधील नादुरूस्त झाला, तक्रारदाराचा मोबाईल सातत्याने ‘Hang’ होवुन त्याचा उपयोग करणे अशक्य झाले आहे. तक्रारीतील दाखल पुराव्यावरुन स्पष्ट होते.
ड) तक्रारदारांचा मोबाईल वॉरंटी कालावधीत नादुरूस्त झाला असुन सामनेवाले 1 यांचेकडुन सदर मोबाईलची दुरूस्ती होवु शकली नसल्यामुळे मोबाईलमध्ये ‘उत्पादकीय दोष’ असल्याचे स्पष्ट होते असे मंचाचे मत आहे. अशा परिस्थितीत सामनेवाले 2 उत्पादक कंपनीने तक्रारदारांना दोषयुक्त मोबाईल बदलुन नवील मोबाईल (Replacement) द्यावा अथवा सामनेवाले यांनी मोबाईलची किंमत रु. 9,800/- तक्रारदारांना परत देणे योग्य आहे असे मंचाचे मत आहे.
आदेश
1) तक्रार क्र. 888/2014 अंशतः मंजुर करण्यात येते.
2) सामनेवाले नं. 2 यांनी तक्रारदारांना उत्पादकीय दोषयुक्त मोबाईलची विक्री करुन सदोष सेवा दिल्याचे जाहीर करण्यात येते.
3) सामनेवाले नं. 1 यांचे विरुध्दची तक्रार प्रेटाळण्यात येते.
4) सामनेवाले 2 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना जुना दोषयुक्त मोबाईल बदलुन नवीन सिलबंद मोबाईल ‘Nokia - 520’ नवीन वॉरंटी सहीत ता. 30/08/2016 पर्यंत द्यावा.
अथवा
4) सामनेववाले नं. 2 यांनी तक्रारदारांना मोबाईलची किंमत रु. 9,800/-(रु. नौ हजार आठशे फक्त) ता. 20/09/2013 पासुन ता. 30/08/2016 पर्यंत 6% व्याजदराने द्यावी. तसे न केल्यास ता. 20/09/2013 पासुन आदेशाच्या पुर्ततेपर्यंत 9% व्याजदराने द्यावी.
5) सामनेववाले नं. 2 यांनी तक्रारदारांना मानसिक त्रास व तक्रारचा खर्च रु. 2,500/- (रु. दोन हजार पाचशे फक्त) ता. 30/08/2016 पर्यंत द्यावा.
6) आदेशाच्या प्रती उभय पक्षकाराना विनाविलंब, विनाशुल्क पाठविण्यात याव्यात.
7) तक्रारीचे अतिरिक्त संच असल्यास तक्रारदारांना परत करावेत.
ठिकाण – ठाणे.
दिनांक - 20/06/2016