निकालपत्र
(पारित दिनांक 13 ऑगष्ट, 2010)
व्दारा श्रीमती प्रतिभा बा. पोटदुखे, अध्यक्षा.
तक्रारकर्ता श्री. अरविंद सी. गुप्ता यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा थोडक्यात आशय असा की,
1. तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष क्रमांक 3 यांचेकडून टाटा इंडिका कार व्हीटू डीएलएस ही विकत घेतली. विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता यांना विकलेली कार ही सदोष, निर्मीतीत दोष असलेली होती. तसेच विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता यांना सदर कारची नोंदणी संबधीत कागदपत्रे ही दिलेली नाही त्यामुळे तक्रारकर्ता यांना अनेक गैरसोईचा सामना करावा लागत आहे.
2. तक्रारकर्ता यांनी यापुर्वी सुध्दा दिनांक 21/11/2009 रोजी विद्यमान ग्राहक मंचात सदर कार संबधी ग्राहक तक्रार 78/2009 ही दाखल केली होती व ती गुणवत्तेच्या आधारावर खारीज करण्यात आली होती.
3. दिनांक 10/06/2010 रोजी विरुध्दपक्ष यांच्याकडून पाठविण्यात आलेल्या व्यक्तीने तक्रारकर्ता यांना रुपये 2,00,000/- ची मागणी केली व धमकी दिली की, त्यांनी त्वरीत सदर रक्कम न दिल्यास त्यांचे वाहन हे कंपनीकडे परत पाठविण्यात येईल. तक्रारकर्ता म्हणतात की, सदर घटना घडल्यामुळे ग्राहक तक्रार दाखल करण्यास नविन कारण घडलेले आहे.
4. तक्रारकर्ता मागणी करतात की, सदर वाहनाचे कागदपत्रे, आरसी बुक, इन्श्युरंस पेपर, व टॅक्स हे त्यांना विरुध्दपक्ष यांचेकडून परत मिळण्याचा आदेश व्हावा, विवादीत कार ही बदलवून तक्रारकर्ता यांना देण्यात यावी अथवा त्यातील दोष दूर करण्यात यावे.
कारणे व निष्कर्ष
5 तक्रारकर्ता यांनी रेकॉर्डवर दाखल केलेली शपथपत्रे, दस्ताऐवज, इतर पुरावा तसेच तक्रारकर्ता यांनी याच वाहनाच्या संदर्भात दाखल केलेली ग्राहक तक्रार क्रं. 78/09 चे केलेले अवलोकन यावरुन असे निदर्शनास येते की, ग्राहक तक्रार क्रं. 78/09 मध्ये विरुध्द पक्ष यांनी लेखी जबाबात असे विधान केले होते की, तक्रारकर्ता यांनी त्यांना 17,000/-रुपये प्रत्येकीचे 2 धनादेश दिले होते. ते बँकेत न वटता परत आल्यामुळे वि.प.क्रं. 2 यांनी तक्रारकर्ता यांच्यावर नागपूर न्यायालयात निगोशिएबल इन्स्टूमेन्ट एक्ट 1881 च्या कलम 138 प्रमाणे कार्यवाही सुरु केली आहे. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्या या विधानाला ग्राहक तक्रार 78/09 मध्ये नाकारलेले नव्हते.
6 तसेच ग्राहक तक्रार क्रं. 78/09 चे दि. 17.02.2010 च्या आदेशात विद्यमान मंचाने तक्रारकर्ता यांनी वि.प.क्रं. 1 यांना लोनची संपूर्ण रक्कम परतफेड केल्याचे दिसत नाही असा निष्कर्ष काढून तक्रारकर्ता यांची ‘ नो डयू सर्टिफिकेट ‘ जारी करण्याची मागणी अमान्य करुन ग्राहक तक्रार खारीज केली होती.
7 सदर ग्राहक तक्रारीत तक्रारकर्ता म्हणतात की, दि. 10.06.10 रोजी वि.प.यांच्या द्वारे पाठविण्यात आलेल्या काही व्यक्तिनी त्यांना 2,00,000/- रुपयाची मागणी केली व धमकी दिली. मात्र तक्रारकर्ता यांनी याबाबतीत पोलीस रिपोर्ट दिल्याचे दिसून येत नाही. तसेच ही बाब सिध्द करण्यासाठी तक्रारकर्ता यांनी दुस-या कुणाचे शपथपत्रही जोडलेले नसल्यामुळे ही बाब विश्वसनीय वाटत नाही. त्यामुळे गुणवत्तेच्या आधारावर जारी करण्यात आलेला आदेश झाल्यानंतर परत सदर वाहना संदर्भात दाव्यासाठी दुसरे कारण घडले असे म्हणता येत नाही.
असे तथ्य व परिस्थिती असतांना खालील आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार ही प्राथमिक स्तरावर खारीज करण्यात येत आहे.